संस्कृत साहित्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे शतक काव्य. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. शंभर पद्यांची रचना. काही वेळा ही काव्ये नीतिशतकासारखी प्रत्येक श्लोक वेगळा असणारी असतात किंवा काही वेळा एक विशिष्ट विषय घेऊन त्यावर रचना केलेली असते. या दुसऱ्या प्रकारात बसणारे एक सुंदर काव्य म्हणजे मयूर कवी विरचित सूर्य शतकम् ! हे मयूर कवी बाणभट्टाच्या समकालीन होते हे निश्चित. बाणभट्टांचे आणि त्यांचे नेमके नाते काय ? या विषयावर पंडितांमध्ये मतभेद असले तरी बाणभट्टांसोबत त्यांचे नाते सर्व मान्य आहे. बाणभट्ट हे श्री हर्षाच्या दरबारात होते आणि श्रीहर्षांचा काळ सातव्या शतकाचा निश्चित असल्याने तोच मयूर कवींचा काळ होय.
बाणभट्टांची पत्नी ही काहींच्या मते मयूर कवींची कन्या तर काहींच्या मते भगिनी. तिच्या आणि बाणभट्टांच्या संवादात मयूर कवीने काहीतरी तिला न आवडणारे वचन सादर केल्याने तिने शाप दिल्यामुळे त्यांना कुष्ठरोग झाला असे दंतकथा सांगते.
भारतीय संस्कृतीनुसार आरोग्य हे भगवान सूर्यांना मागावे. त्यानुसार मयूर कवींनी आपल्या रोगमुक्तीसाठी हा ग्रंथ निर्माण केला असे परंपरा सांगते. सूर्याच्या विविधांगी वर्णनाला समर्पित १०० श्लोक म्हणजे सूर्य शतकम् . मुळात विशिष्ट उद्देशाने या काव्याची रचना केली असल्याने त्यात अत्यंत सुसंबंध अशा पद्धतीने विविध विभाग कवीने स्वतःच करून दिलेले आहेत.
सर्वप्रथम सूर्यकिरणांचे वर्णन करण्यात आले आहे. त्या किरणांमुळे मिळणारी ऊर्जा, प्रकाश, चैतन्य, जगण्याची उर्मी या सर्व गोष्टींचे वर्णन केले आहे. त्यात किरणांच्या रोग प्रतिकारक क्षमतेचा विशेष विचार मूळ उद्देशाच्या दृष्टीने केला आहे.
ज्याप्रमाणे सर्पदंश झालेली व्यक्तीच्या सर्व चेतना जातात आणि मग औषधाने त्या परत येतात त्याप्रमाणे काळसर्पाने निद्रारूपात हरण केलेली चैतन्य या सूर्यकिरणरूपी औषधाने परत प्राप्त होते अशा सुंदर उपमांच्या माध्यमातून कवी सूर्यकिरणांचे महत्त्व स्पष्ट करतात.
भारतीय संस्कृतीत भगवान सूर्य रथावर बसलेले वर्णन केले आहेत. त्यामुळे स्वाभाविक कवीने पुढे रथाचे वर्णन केले आहे. त्या रथाचे दिव्यत्व, त्याचा मार्ग, त्यावर घडणाऱ्या चमत्कारिक गोष्टी, रथाच्या एकाच चाकाचे स्वरूप अशा विविध गोष्टींचे वर्णन केल्या नंतर त्या रथाचा सारथी असणाऱ्या अरुणाचे वर्णन करण्यात आले आहे.
गरुडाचा भाऊ असणारा अरुण केवळ कमरेच्या वरचा देह असणारा आहे. सूर्याच्या रथाला कायम चालायचे असल्यामुळे त्या सारख्याला खाली उतरायचे नाही त्यामुळे त्याला पायांची आवश्यकताच नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यामागे आहे. यानंतर सूर्याच्या रथाच्या सप्तश्वांचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांचा रंग, त्यांची गती, त्यांना येणारा थकवा, त्यावरील उपाय अशा विविध अंगाने मयूर कवींनी सूर्य अश्वांचे वर्णन केले आहे.
त्यानंतर सूर्य मंडळाचे आणि सगळ्यात शेवटी भगवान सूर्यांच्या परमात्मा तत्वाचे आध्यात्मिक वर्णन करण्यात आले आहे. अशा स्वरूपात मयूर कवीने सूर्याची आराधना केल्यानंतर ते रोगमुक्त झाले असे परंपरा सांगते. आज जरी आपल्याला रोगमुक्ती या दृष्टीने अशा ग्रंथांचा थेट उपयोग होत नसला तरी सूर्याच्या वर्णनाचे अत्यंत विलोभनीय वर्णन या दृष्टीने सूर्य शतकम् हा संस्कृत मधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
साक्षी दिलीप बिनगुळे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. १२. १०. २०२२
