किरातार्जुनीयम्

पंचमहाकाव्यांपैकी महत्वपूर्ण काव्य असणाऱ्या भारवी विरचित किरातार्जुनीयाचे अठरा सर्ग असून, विविध वृत्तांत रचिलेले एकूण १,०३९ श्लोक आहेत. त्याचा आरंभ ‘श्री’काराने झालेला असून प्रत्येक सर्गाच्या अखेरच्या श्लोकात ‘लक्ष्मी’ हा शब्द योजिलेला आहे. यावरून ह्या महाकाव्याला लक्ष्मीपदांक असेही म्हणतात. महाकाव्याचा नायक अर्जुन, प्रधान रस वीर आणि अर्जुनाला प्राप्त झालेले पाशुपतास्त्र हे फळ आहे.



पंचमहाकाव्यांपैकी महत्वपूर्ण काव्य असणाऱ्या भारवी विरचित किरातार्जुनीयाचे अठरा सर्ग असून, विविध वृत्तांत रचिलेले एकूण १,०३९ श्लोक आहेत. त्याचा आरंभ ‘श्री’काराने झालेला असून प्रत्येक सर्गाच्या अखेरच्या श्लोकात ‘लक्ष्मी’ हा शब्द योजिलेला आहे. यावरून ह्या महाकाव्याला लक्ष्मीपदांक असेही म्हणतात.
महाकाव्याचा नायक अर्जुन, प्रधान रस वीर आणि अर्जुनाला प्राप्त झालेले पाशुपतास्त्र हे फळ आहे.

बारा वर्षांचा वनवास भोगीत असलेले पांडव द्वैतवनात असताना, दुर्योधनाचा राज्यकारभार कसा चालला आहे ? हे जाणून घेण्यासाठी युधिष्ठिर एक हेर हस्तिनापुराला पाठवतो; पण दुर्योधन आपले राज्य उत्तम प्रकारे चालवीत असून लोकादरास पात्र झाला असल्याची वार्ता हा हेर आणतो. हे ऐकून संतप्त द्रौपदी कौरवांशी त्वरित युद्ध सुरू करण्याचा युधिष्ठिराला आग्रह करते. भीमाचा पाठिंबा मिळतो; पण युधिष्ठिर अनुकूल नसतो. हे चालू असतानाच व्यासमुनी तेथे येतात आणि युद्ध अत्यावश्यक असलेतरी कौरवांचा पराभव करण्यासाठी अर्जुनाने हिमालयात तपस्या करण्याचा सल्ला देतात.

व्यासमुनी अंतर्धान पावल्यावर एक यक्ष प्रकटतो आणि तो अर्जुनाचा मार्गदर्शक होतो. अर्जुन आणि यक्ष निघून जातात. अर्जुनाला इंद्रकील पर्वतावर तपस्या करण्यास सांगून अदृश्य होतो. अर्जुनाच्या कठोर तपश्चर्येमुळे अर्जुनाचा तपोभंग करण्यासाठी इंद्र गंधर्वांना आणि अप्सरांना पाठवतो; पण हा प्रयत्न विफल होतो. नंतर एका तापसाच्या वेषात स्वतः इंद्र अर्जुनासमोर येतो. युद्धाच्या हेतूने तपस्या करणे अनुचित आहे, असा युक्तिवाद करून तो अर्जुनाला तपापासून परावृत्त करू पाहतो; पण अर्जुनाचा निश्चय अढळ राहिलेला पाहून तो खरे रूप प्रकट करतो आणि अर्जुनाला शिवाची आराधना करावयास सांगतो.

शिवाच्या अनुग्रहासाठी अर्जुन आपले तप अधिक प्रखर करतो. ते उग्र तेज असह्य होऊन हिमालयावरील काही तपस्वी शंकराला शरण जातात. तथापि अर्जुन हा नरनारायणांपैकी नराचा अवतार असल्याचे सांगून शंकर त्यांची समजूत घालतो. त्याच वेळी मूक नावाचा एक राक्षस रानडुकराचे रूप घेऊन शंकर आपल्या किरातवेषधारी अनुचरांसह अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी येतात. अर्जुन आणि शंकर एकाच वेळी त्या रानडुकरावर बाण सोडतात आणि ते त्याला एकाच वेळी लागून तो गतप्राण होतो. अर्जुन आपला बाण त्या रानडुकराच्या शरीरातून खेचून काढण्याठी जातो, तेव्हा तेथे उभा असलेला एक किरात त्याला अडवतो आणि तो बाण आपल्या राजाचा असून त्याला अर्जुनाने हात लावू नये असे सांगतो. त्यामुळे कलह उत्पन्न होऊन सर्व किरातसेना अर्जुनावर चालून येते; पण अर्जुन तिला समर्थपणे तोंड देतो. त्यानंतर किराताचे रूप घेतलेला प्रत्यक्ष शंकर अर्जुनाशी लढावयास उभे राहतात. शस्त्रास्त्रांचे युद्ध झाल्यानंतर ते दोघे मल्लयुद्ध करतात आणि अर्जुनाच्या धैर्याने आणि शौर्याने संतुष्ट होऊन शंकर आपल्या मूळ स्वरूपात अर्जुनासमोर प्रकट होतात.

आपण प्रत्यक्ष शंकराशी युद्ध केले ह्याची जाणीव होऊन अर्जुन विनम्रपणे क्षमा मागतो आणि त्याची स्तुती करून आपणास विजय मिळावा, अशी प्रार्थना करतो. श्री.शंकर आनंदाने अर्जुनाला आपले पाशुपतास्त्र देतात.

ही कथा महाभारताच्या अरण्यपर्वात आली आहे; परंतु ती आपल्या महाकाव्यात आणताना भारवीने तीत अनेक महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. त्यामुळे भारवीच्या समर्थ काव्यशैलीचा प्रत्यय येतो. ती प्रौढ आणि ओजस्वी आहे. भारवीच्या भाषेतील अर्थगौरवाची प्रशंसा रसिकांनी केलेली आहे. यामुळेच मल्लिनाथाने किरातार्जुनीयाला ‘नारिकेलपाक’ म्हटले आहे.

कांचन लोहे
बी.ए. भाग २
दि. १५. ०६. २०२२

Author