फिन्द्री” बनली प्रोफेसर … बापासाठी नकुशी ,आईसाठी साहेबीन आपण काहींना नकोसे जरी असलो तरी अनेकांना हवेसें असतो आणि त्यासाठी जगायचं असतं.आपलं अस्तित्व केवळ भविष्यावर सोपवून चालत नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो.मुलगी झाली म्हणून तिला लहानपणी बाळ असताना फेकलं गेलं ,नकोशी असणारी ती मोठेपणी मात्र शिकली आणि प्राध्यापक बनली व डॉक्टरेटही मिळवली व महाविद्यालया मध्ये विभाग प्रमुख आहे व अध्यापन ही करते. हे स्वप्नं नव्हें ही वास्तवातील प्रेरणेची पायवाटच आहे.पण बापाला मुलगी नको होती म्हणून तिचं फेकलं जाणं हे अस्तित्वाचं सृजनात्मक रूप घेऊन अवतरले आहे.
मराठवाड्यातील एका दलित कुटुंबात एका मुलीचा जन्म होतो . वंशाला दिवा म्हणून मुलगी नको मुलगाच हवा या इच्छेपोटी वडील त्या जन्मलेल्या गोळ्याला फेकून देतात. नुकताच जन्मलेला तो जीव रक्तबंबाळ होतो. लोकांना वाटतं याच्यात आता प्राण उरलेला नाही . लोकं त्या बाळाला जिवंत नाही असं समजून निराश होतात. पण काही वेळाने ते बाळ श्वास घेतो आणि रडायला लागतं . खरंतर एखादा चमत्कार व्हावा तशीच ही घटना… एखाद्या सिनेमातील सीन आठवावा अशीच ही घटना… मराठवाड्यातील एका दलित कुटुंबात घडली आणि फ़िन्द्री म्हणजेच ही नकोशी असलेली मुलगी जगायला लागली.
ती जगताना मरणाच्या यातना मात्र नेहमीच भोगत होती . बापाचा जरी राग असला ,तरी आईने मात्र आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं .एक वेळेस आपण उपाशी राहिलं तरी चालेल ,पण माझी मुलगी शिकली पाहिजे … असा निश्चय मुलीच्या आईने केला.
मुलगी बारावी बोर्डात पहिली आली. सत्कार होता आणि हा सत्कार करून आल्यानंतर बाबाने मारलेली थोबाडीत म्हणजे तिच्या यशाला मिळालेलं उत्तर होतं. या अशा परिस्थितीत आईने लाथा बुक्क्या खाल्या . त्यातील काही लाथा सुनिताला पण खाव्या लागल्या.. जितका त्रास सुनिताला झाला नसेल , त्याहून अधिक त्रास तिच्या अशिक्षित आईने झेलला . पण आज फिन्द्री या पुस्तकाच्या माध्यमातून संगीताची कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणजेच सुनीता बोर्डे मुलींचे शिक्षण हा सर्वात जिवंत विषय आहे. फिन्द्री म्हणजे काय ?फिन्द्री म्हणजेच नको असलेली … सुनिता यांचं आयुष्य हालाखीच्या परिस्थितीत गेले . दारुडा बाप … अशिक्षित आई आहे . पण पितृसत्ताक परिस्थितीला फाट्यावर मारत आपल्या मुलीला शिक्षण देण्याची धमक असलेली आई हीच सुनीताचा आदर्श होती . शिक्षण हाच बाईची गुलामी संपवण्याचा मार्ग हे सुनीताच्या आईने पूरते जाणले होते .लेकीच्या शिक्षणासाठी नवऱ्याचा छळ ,अन्याय ,अत्याचार ,अपमान सगळं सहन केलं . पितृसत्ताक कुटुंब नेहमीच बाईला आपल्या बंधनात ठेवायला बघतं . तिने वागावं कसं ? बोलावं कसं ? काय खावं ?काय वापरावं ?हे सर्व काही पुरुषाच्या मर्जीवर ठरतं आणि जर हे नियम मोडण्याचा कोणत्याही स्त्रीने प्रयत्न केला, तर तिथे जन्म घेते ती म्हणजे हिंसा . घरातील रक्ताची नाती असणारा पुरुष आंधळेपणाने त्या बाईवर हिंसा करायला सुरुवात करतो आणि या हिंसेची शिकार झालेली बाई तिच्या स्वप्नांना तिलांजली देते. तिच्या इच्छा आकांक्षा संपूर्णपणे संपवते . पण फिन्द्री कादंबरीतील आईने आपल्या मुलीची स्वप्न तशीच जिवंत ठेवली. स्वतः मरण यातना भोगल्या पण आपल्या मुलीला शिकवलं.
फिंद्री ही कादंबरी लिहली त्यामागचा हेतू लेखिका सुनीता बोर्डे सांगतात कि ,”लेखकाचे लेखन आणि त्याचं जीवन याचं अंतर जितकं कमी तितकी ती कलाकृती वाचकाला मनाला जास्त भिडते. “As you write more and more personal becomes more and more universal.” या कादंबरीत असणारी नायिका संगीता आणि तिच्या शिक्षणासाठी धडपडणारी तिची आई यांच्या संघर्षापूर्तीच ही कहाणी मर्यादित नाही तर पिढ्यानपिढ्या स्त्रियांचा होणारे शोषण त्यांच्या संघर्षाचे प्रतिबिंब या कादंबरीतून दाखवलं आहे.”काहीही झालं तरी आडव्या येणाऱ्या ओढ्याची ,सापाची ,चिखलाची,फुपाट्याची ,काट्यांची, चिंचेच्या हिरव्या फोकाची तमा न करता शिकायचं होतं … दुःख धरून बसलेल्या परिस्थितीला बदलण्यासाठी खऱ्या किरकुड्याचं विष एखाद्यावेळी उतरवता येतं ,पण गरिबीचं किरकूड बसल्यावर त्याचे विष उतरवायला शिक्षणाशिवाय जालीम उपाय नाही”
अस्तित्व नाकारणारे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्याच्यावर मात करून स्वतःला सिद्ध करणे यातच आयुष्य ची सार्थकता आहे. केवळ स्वतःला सिद्ध करून काही माणसे थांबत नाहीत तर इतरांनाही मदतीचा हात देतात असेच कार्य समाजसेवेचेही सुनीता बोर्डे करत आहेत.
जीने के लिये सोचा ही ना था दर्द संभालनें मे होंगे हे जीवन जगतांना हळूहळू कळत जातें. तरीही या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे वाटायला लावणारी परिस्थिती आपणच निर्माण करू शकतो.
