ज्ञानदा इंग्लिश स्कूलचे वेगळेपण

काही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.



काही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.

नागेश जोशी यांच्या अथक प्रयत्नाने व मार्गदर्शनाने शाळा औरंगाबादमध्ये नावाजलेली ठरत आहे. १९६० मध्ये सुरू झालेली शाळा आज नावारूपाला आलेली आहे. शाळेला प्रशस्त क्रीडांगण, भव्य निसर्ग परिसर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तास शाळेच्या मैदानावर घालवायला हवा, असा दंडक शाळेचा आहे. शाळेला सुसज्ज ग्रंथालय आहे. तसेच संगीत विभाग समृद्धतेने नटलेला आहे. सर्व प्रकारची वाद्यं येथे आहेत. येथे शिक्षक व विद्यार्थी स्वतंत्रपणे गाण्यांचे कार्यक्रम करतात. शाळेत चित्रपटाच्या गीतावर आधारित कोणतेच गीत बसवले जात नाही. बाहेरूनही कोरिओग्राफरला बोलावले जात नाही.

ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करणे सर्वांनाच जमत नाही. प्रयत्न व कष्ट यांची सांगड घालून जीवनाचा प्रवास करणं प्रत्येकाला जमत नाही. बँकिंग क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर नागेश जोशी यांच्या मनात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा नुसताच विचार आला नाही, तर त्यांनी तो प्रत्यक्ष अमलात आणला. ‘ज्ञानदा’ नावाच्या शैक्षणिक संस्थेची स्थापना अगदी नावाप्रमाणेच केवळ ज्ञानाची भरभरून उधळण करण्यासाठीच एन.के. जोशी सरांनी इ. स. २०१० साली पूर्णत्वास आणली.

‘ज्ञानदा’ या शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पर्यायाने समाजाला घडविण्याचे अनमोल असे कार्य गेल्या तेरा वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. भावी समाजनिर्मितीचे हे काम ज्ञानदा परिवार अगदी मनापासून प्रामाणिकपणे करीत आहेत.

संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि परंपरा या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे प्रकल्प आणि कार्यशाळेच्या माध्यमातून शिकवण्यात येतात उदाहरणार्थ, पर्यावरण विषयी विद्यार्थ्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने शाळेतर्फे ३६५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निर्मित्ताने झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली.

सर्व धर्मातील सणवार त्या पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न सदैव करण्यात येतो.

बैल पोळा साजरा करताना अगदी बैलांना आंघोळ घालणे, सजवणे, झुल घालणे यापासून पुरणपोळीचा नैवेद्य असो किंवा चैत्र पौर्णिमेची गुढी असो. अगदी सर्व रीतीपरंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांकडूनच करण्यात येते. पोंगल, ख्रिसमस, दिवाळी, ईद, होळी, रंगपंचमी अशा प्रत्येक धर्मातील महत्त्वाच्या तिथींची माहिती ते सण साजरे करून विद्यार्थ्यांना आवर्जून सांगण्यात येते. त्याचबरोबर सकाळी प्रार्थनेच्यावेळी निरनिराळ्या समाजातील स्वातंत्र्यसैनिक अथवा समाजसेवकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती देण्यात येते. स्काऊट गाईडच्या मार्फत त्यांना स्वसंरक्षण, आपत्कालीन परिस्थितीतील प्राथमिक उपचार पद्धती, स्वावलंबीपणा याविषयी शिकवण देण्यात येते. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवर हेल्मेट वापरण्याचे फायदे समाजाला सांगण्यासाठी सिडको, गारखेडा, वाळूज अशा मध्यवर्ती ठिकाणी पथनाट्य सादर करून लोकांची मने जिंकली. दरवर्षी १२ जानेवारी युवादिनाच्या निमित्ताने संस्थेत ‘We can Together’ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षक निरीक्षण करतात. विद्यार्थ्यांची वर्गात, शालेय परिसरात, तासिकेमध्ये, शिक्षकांसोबत तसेच मित्रांसोबत कशी वागणूक आहे, याविषयी निरीक्षण केले जाते. इतकेच नाही, तर पालकांच्या मदतीने घरातदेखील त्यांच्या वागणुकीतील बदल अभ्यासला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वात योग्य तो बदल घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचा उपयोग करून स्वतःमधील नकारात्मक कृतीचा त्याग करणाऱ्या मुलास प्रमाणपत्र देऊन त्याचा व त्याच्या पालकांचाही सत्कार करण्यात येतो. तर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पुस्तक शाळेच्या ग्रंथालयास भेट स्वरूपात देतात. जेणेकरून पुस्तकरूपीज्ञान इतर विद्यार्थ्यांना लाभ घेण्यास उपलब्ध होईल, हा त्यामागील हेतू आहे. याद्वारे वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळते. छत्रपती संभाजीनगर येथील रामकृष्ण मिशनतर्फेघेण्यात येणाऱ्या पाठांतराच्या स्पर्धेतदेखील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद असतो. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत विषयांतील उताऱ्यांचे पाठांतरं विद्यार्थी सहजपणे करतात. त्यासाठी शिक्षक स्पर्धक विद्यार्थ्यांचा सराव घेतात. स्मरणशक्ती दृढ करण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये शाळा आवर्जून भाग घेते. या स्पर्धेत जवळपास ३५ ते ४० शाळांच्या सहभागानंतरही ज्ञानदा शाळेचेच विद्यार्थी तीनही भाषेत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावतात.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील असते. समाजातील सामाजिक प्रश्नांविषयी जागृत करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात येते. जसे की, प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवी वापरण्यास त्यांना सांगण्यात येते. बाजारात जाताना, परगावी जाताना स्वतःजवळ कापडी पिशवी ठेवण्याची त्यांना शिकवण देण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक वापरणे कसे धोक्याचे आहे आणि त्याचा परिणाम याविषयी त्यांना वेळोवेळी सजग करण्यात येते. याबरोबरच लोकमत कॅम्पस क्लबतर्फे आयोजित निराळ्या स्पर्धेमार्फत विद्यार्थ्यांचा सहभाग दर्शनीय असतो. देशभक्ती गीत गायन स्पर्धा, नाटक, वादविवाद स्पर्धा, खाद्य स्पर्धा, सजावट स्पर्धा, रंगकाम, चित्रकाम, हस्तकला, प्रतिकृती उभारणे, मॉडेल तयार करणे, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषेतून सहभाग घेऊन विद्यार्थी यश मिळवतात.

शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्रातील थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तदेखील अनेक स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागी होतात. राधेश्याम प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या किल्लेबांधणी व कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय असतो. CBSE शाळा ही काळाची गरज आहे; पण आधुनिकतेबरोबरच महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील रीतीपरंपरा, चालीरीती, पेहराव, सणसमारंभ याची माहिती वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी वैज्ञानिक दृष्टीने देखील विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर स्कॉलरशिप, ऑलंपियाड एक्झाम, सामान्य चाचणी अशा प्रकारच्या परीक्षांमध्येसुद्धा विद्यार्थी आवर्जून सहभागी होतात. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून अनेक शोध लावण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला आहे. त्यासंबंधी जिल्हास्तरीय, राज्य पातळीवर अनेक पुरस्कार त्यांनी संपादन केले आहेत. चाटे स्कूल आयोजित विज्ञान प्रदर्शन, ‘Inspire Award’ मध्ये सहभागी होऊन रोख रक्कम १०,००० प्राप्त करण्यात शाळेचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. राज्यस्तरावर यश प्राप्त करून राष्ट्रीय पातळीवरदेखील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात मोबाईलद्वारे चालवण्यात येणारी घरातील वीजयंत्रणा, सौरऊर्जेवरील सायकल, अंधव्यक्तींना उपयुक्त वाचन यंत्र, मोबाईलच्या साहाय्याने उघडले जाणारे दार (AI तंत्रज्ञानावर आधारित) असे अनेक प्रकल्प करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इतकेच नव्हे, तर अनेक शैक्षणिक सहलीसुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी काढण्यात येतात. वर्तमानपत्राची प्रिंटिंग प्रेस, जलशुद्धीकरण केंद्र, औषधी केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस, धर्मादाय दवाखाने, (विशेष विद्यार्थ्यांची शाळा) स्वयंसिद्ध केंद्र, वैज्ञानिक केंद्र अशा ठिकाणी सहली नेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येते.

विद्यार्थ्यांच्यासोबतच शाळेतील शिक्षकांसाठीही अनेक उपक्रम वेळोवेळी आणि प्रसंगाप्रमाणे ठेवण्यात येतात. उदाहरणार्थ, योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार, योगासने त्याचबरोबर शिक्षक व विद्यार्थी यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. रेड हाऊस, ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस, येलो हाऊस यात विद्यार्थी स्पर्धक असल्यास शिक्षक प्रेरणा देतात व शिक्षकांच्या स्पर्धेत विद्यार्थी प्रेरणा देतात. या हाऊसमार्फत शिक्षकांची खाद्यपदार्थ स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील चारही विभागांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची प्रात्यक्षिके शिक्षकांच्या समूहाने अतिशय उत्कृष्टरीत्या सादरीकरण करून संपन्न केली. नाट्य स्पर्धेतही चारही विभागातील सर्व शिक्षकांनी अतिशय उत्तम असे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. शिक्षकांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्य करावे, यादृष्टीने रोटी बँकमध्ये स्त्री-पुरुष शिक्षकांनी पोळ्या देण्याची जबाबदारी व गरजू लोकांना ते आवश्यकतेच्यावेळी मिळाल्याचे समाधान अनुभवले.

क्रीडादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्यासोबतच शिक्षकांचीही विविध खेळ व स्पर्धा घेण्यात येतात. संपूर्ण शाळेत अशा स्पर्धांच्यावेळी अतिशय उत्साहाचे वातावरण असते. महिलादिनाच्या निमित्तानेदेखील शाळेतील शिक्षकांनी महिला दिनाच्या लोगोप्रमाणे उभे राहून प्रतिकृती सादर केली. शिक्षकांप्रमाणेच पालकांसाठीदेखील रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिक्षक, पालक यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे व ज्ञानदानाचे कार्य संपन्न करणे हे एकमेव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राधाकृष्ण फाऊंडेशनअंतर्गत ज्ञानदा शाळा अतिशय उत्साहाने व प्रसन्न वातावरणात सुरू आहे. या वटवृक्षाला आधार देणाऱ्या अनेक पारंब्या या संस्थेच्या परिसरात सदैव तत्पर आहेत. दिवस-रात्र शाळेच्या प्रगतीसाठी वैचारिक पातळीवर सतत कार्य करणाऱ्या समन्वयक सौ. अनिता सिधये, सचिव एन. .के. जोशी, प्राचार्या ममता जयस्वाल, नयनतारा नायर, कोषाध्यक्ष सौ. मनीषा जोशी व फाऊंडेशनचे सर्व आदरणीय सदस्यांच्या अविरत प्रयत्नामुळेच या संस्थेचा अल्पावधीतच समाजात नावलौकिक झाल आहे.

Author