गाणारी सफरचंदे

एक होता राजा. त्याचं राज्य लहान होतं; पण मन मोठं होतं. त्यामुळं तो सुखी होता, आणि त्याची प्रजाही सुखी होती.

एकदा तो फिरत-फिरत एका जत्रेत जाऊन पोचला. तिथं त्याला एक तरुण दिसला. त्याच्या हातात सफरचंदाच्या झाडाची एक फांदी होती आणि त्या फांदीला सात सफरचंद लागली होती. राजाला मोठी गंमत वाटली. त्यानं त्या तरुणाला विचारलं, ‘काय रे भाऊ, ही सफरचंद विकायची आहेत कां?



(आयर्लंडची लोककथा)

एक होता राजा. त्याचं राज्य लहान होतं; पण मन मोठं होतं. त्यामुळं तो सुखी होता, आणि त्याची प्रजाही सुखी होती.

एकदा तो फिरत-फिरत एका जत्रेत जाऊन पोचला. तिथं त्याला एक तरुण दिसला. त्याच्या हातात सफरचंदाच्या झाडाची एक फांदी होती आणि त्या फांदीला सात सफरचंद लागली होती. राजाला मोठी गंमत वाटली. त्यानं त्या तरुणाला विचारलं, ‘काय रे भाऊ, ही सफरचंद विकायची आहेत कां? ”

तरुण म्हणाला, ‘लायक माणूस भेटला तर विकायची आहेत!’ ‘हे बघा, असं आहे की ही आहेत गाणारी सफरचंदं. हलविली की गाऊ लागतात, असं म्हणून त्यानं ती फांदी हलविली; त्याबरोबर त्या सफरचंदातून सुंदर मधुर संगीताचे सूर निघू लागले. ते ऐकून राजा खूष झाला. म्हणाला, ‘वा,काय सुंदर सूर आहेत! तरुण म्हणाला, ‘या सफरचंदात एक गुण आहे. जो याचं संगीत ऐकतो तो जर आजारी असेल तर बरा होतो, जखमी झाला असेल तर त्याची जखम भरून येते; आणि अपंग असेल तर तो धडधाकट होतो; दुःखी असेल तर तो आपलं दुःख विसरतो.’ राजा म्हणाला, ‘वाः हे तर आणखीनच छान! तरुण म्हणाला, ‘पण या सफरचंदात एक उणीव आहे त्यांच्या या देणग्या त्यांच्या मालकाला मात्र उपयोगी पडत नाहीत. फक्त त्याला संगीताचा आनंद घेता येतो. ‘काही हरकत नाही. दुसऱ्यांची दुःखं तरी दूर होतील! भाऊ, मला ही हवीत. काय घेणार त्याचं? ‘ तरुण म्हणाला, ‘त्या भानगडीत पडू नका. मी मागेन ते देणं तुम्हाला होणार नाही!’ राजा म्हणाला, ‘कां? मी अवश्य देईन. काय मागशील ते देईन. दुसऱ्यांची दुःखं, दोष जर असे यांनी दूर होत असले तर त्यांची किंमत द्यायला मी माघार घेणार नाही!’ तरुण म्हणाला, ‘तर मग यांची किंमत म्हणून तो बोलता बोलता थांबला.

म्हणाला, उगाच कशाला त्या भरीला पडता? तुम्हाला स्वतःला काही याचा लाभ होणार नाही; आणि दुःख मात्र ओढवून घ्याल. राजा म्हणाला, ‘अरे, पण दुसऱ्यांना तरी लाभ होईल! तेव्हा बोल आता तुझीकिंमत?’तरुण म्हणाला, ‘तुमची राणी अन् तुमचा कुमार अन् कुमारी मला त्याबदली द्या!’ हे ऐकून राजाला आपल्या डोक्यावर कुणी घण घातला असं झालं, त्याला वाटलं होतं, हा मागून-मागून काय मागेल? धन-संपत्ती मागेल, जमीन-जहागीर मागेल; पण यानंतर राजाचा जणू प्राणच मागितला ! राजाला पराकाष्ठेचं दुःख झालं; पण आता तो वचनानं बांधला होता. मनात अतिशय वेदना होत असतानासुद्धा त्या दाबून टाकून तो म्हणाला, ‘ठीक आहे, घेऊन जा ! राजानं त्याला आपल्या वाड्यात नेलं. तिथं राणीला अन् आपल्या लहान कुमाराला आणि कुमारीला बोलावलं आणि त्यांना झालेली हकिगत सांगून ह्या तरुणाबरोबर जायला सांगितलं. राणीच्या अन् कुमार-कुमारीच्या डोळ्यांत पाणी आलं. ते दुःखानं रडू लागले. तेव्हा राजानं त्यांच्या डोक्यावर ती गाणाऱ्या सफ रचंदाची फांदी हलवली. त्याबरोबर त्यातून अत्यंत सुरेख संगीत बाहेर पडू लागलं आणि ते ऐकता ऐकता राणी अन् मुलं आपलं दुःख पूर्ण विसरून गेली. ते आपला महाल सोडून, राजाला सोडून त्या तरुणाबरोबर चालू लागले. दुःखानं राजा जमिनीवर कोसळला; पण त्याचं दुःख काही गाणाऱ्या सफरचंदाकडून दूर झालं नाही. असे दिवस चालले. राजा त्या फांदीचा उपयोग आता आपल्या राज्यातल्या दुःखी, अपंग, आजारी माणसांच्या बाबतीत करू लागला. दुःखी होते ते दुःख विसरू लागले, आजारी होते ते बरे झाले, अपंग होते ते धड झाले. पण राजा मात्र स्वतःचं दुःख विसरू शकत नव्हता. दिवसें दिवस ते वाढतच जात होते. आता त्याला खाणं-पिणंही नकोसं वाटायला लागले.

जिकडं-तिकडं त्याला आपली प्रिय राणी अन् मुलं दिसू लागली. भरल्या ताटावरून तो न जेवता उठू लागला. असं एक वर्ष निघून गेलं. ‘आता नाही मला राहवत. माझी राणी अन् कुमार-कुमारी यांचं काय झालं हे कळल्यावाचून मला चैन पडणार नाही. मला त्यांना शोधून काढलंच पाहिजे. असं म्हणून राजा आपल्या राज्याचा कारभार प्रधानाकडे सोपवून एकटाच बाहेर पडला.

राजा निघाला. त्यानं नगर सोडलं. राज्याची सीमा ओलांडली, तेवढ्यात अचानक धुक्यानं चारी दिशा अंधुक झाल्या, कुणीकडचं काही दिसेनासं झालं; तरी राजा थांबला नाही. भूक नाही, तहान नाही, विसावा नाही; धुकं भरलेलं असो की वावटळ सुटलेली असो, आता थांबायचं नाही. तो माहीत नसलेल्या वाटेनं पुढं-पुढं चालू लागला. धुकं पार करीत तो बाहेर आला, तेव्हा त्याला एक मोठ्ठे मैदान लागलं. तिथं काही माणसं एका घराचं छप्पर झाकीत होती- कौलांनी नाही; पंखांनी! राजाला आश्चर्य वाटलं. छप्पर झाकता झाकताना पंख कमी पडले. आता काय करायचं? ‘चला, आणखी घेऊन येऊ या. छप्पर तर पंखांनीच झाकायचं!’ राजा म्हणाला, ‘छप्परावर कौलं घातली तर?’सगळे म्हणाला, ‘काय कौलं? शी, आम्ही पंखानीच ते झाकणार! राजानं विचारलं, ‘कोणत्या पक्ष्यांचे हे पंख आहेत?’माणसं म्हणाली, ‘ते तर आमचं गुपित आहे. ते आम्ही कुणालाही सांगणार नाही!’ असं म्हणून ती माणसं पंख आणायला घोड्यावर स्वार होऊन लगोलग निघून गेली. राजा त्यांच्या परत येण्याची वाटत पाहत तिथंच उभा राहिला. इतक्यात जोराचा वारा सुटला आणि छपरावर झाकलेले पंख उडूनऱ्याबरोबर कुठच्या कुठं गेले होते. माणसं परत आली तर पंख नाहीसे झाले होते अन् छप्पर उघडं पडलं होतं. माणसं म्हणाली, ‘पंख उडून गेली? हरकत नाही. पण छप्पर आम्ही पंखांनीच झाकणार; कौलांनी नाही. नाही म्हणजे नाही, नाही, नाही! राजा आता पुढं निघाला. वाटेत एक मुलगा भेटला. जंगलातून एक वाळलेली काटकी आणून त्यानं एका शेकोटीत ती टाकली; आणि दुसरी काटकी आणण्याकरिता तो परत जंगलात गेला, थोड्या वेळात दुसरी काटकी त्यानं आणली; तर तेवढ्यात पहिली टाकलेली काटकी जळून खाक झाली होती. ही दुसरी काटकी त्या शेकोटीत टाकून तो तिसरी आणायला परत जंगलात गेला.

तिसरी काटकी घेऊन तो येतो, तेवढ्यात दुसरी काटकी जळून गेली होती.

राजानं विचारलं, ‘तू हे काय करतो आहेस?’ तो म्हणाला, ‘दिसत नाही तुम्हाला? थंडी किती पडली आहे, त्यासाठी शेकोटी करीत आहे. ‘ राजा म्हणाला, ‘अरे, मग शेकायला तू बसत का नाहीस?’ मुलगा म्हणाला, ‘शेकोटी चांगली पेटली तर पाहिजे, म्हणजे बसेन.

त्याकरिता तर काटकी आणायला मी जातो आहे. ‘असं म्हणून तो फिरून जंगलात काटकी आणायला पळत गेला.

तिथून राजा पुढं चालला. तेव्हा एके ठिकाणी त्याला तीन विहिरी दिसल्या.

प्रत्येक विहिरीवर माणसाचं मोठ्ठ्या आकाराचं डोकं कोरलेलं होतं. पहिल्या डोक्याच्या तोंडात पाण्याची एक धार पडत होती; आणि तोंडातून दोन धारा बाहेर पडत होत्या. दुसऱ्या डोक्याच्या तोंडात दोन धारा पडत होत्या आणि तोंडातून एक धार बाहेर पडत होती. तिसऱ्या डोक्याच्या तोंडात तीन धारा पडत होत्या आणि तोंडातून एकही धार बाहेर पडत नव्हती.

राजा आश्चर्यानं हे दृश्य पाहत राहिला. त्याला वाटलं, नक्की यात काही तरी रहस्य आहे, पण विचारायचं कुणाला? तिथं तर कुणीच नव्हतं.

राजा पुढं चालला. चालता चालता एक मोकळं पटांगण लागलं. त्यात मधोमध एक घर होतं. राजा थकून गेला होता. त्यानं त्या घरात जाऊन आसरा मागावा असा विचार केला. त्यानं दार खडखडावलं. एक बाई आणि एक पुरुष यांनी दार उघडलं आणि राजाचं स्वागत केलं.

राजानं नमस्कार करून विचारलं, ‘आजच्या रात्रीपुरता मला इथं आसरा मिळेल कां?’ घर-धनी म्हणाला, ‘हे काय विचारावं? आपण आमचे अतिथिदेव आहात.

अतिथीचा सत्कार करणं हा गृहस्थाचा धर्म आहे. ‘ इतक्यात घरधनीण एका टोपलीत गहू भरून घेऊन आली. तिनं टोपली राजापुढं ठेवली, तेव्हा घरधनी म्हणाला, ‘धान्य तयार आहे. आपण आनंदानं स्वैपाक करुन जेवण करा.’ राजा म्हणाला, ‘हे गहू आहेत, याचं काय करायचं, अन् कसं करायचं ते काही मला माहीत नाही. बाई म्हणाली, ‘ते मी सांगते. हे दाणे दळून त्याचं पीठ करायचं, पिठाची कणिक मळायची. अन् तिच्या पोळ्या बनवायच्या. एक एक पोळी भाजायची अन् मग…. खायची! हे शेवटचं काम तरी येतं ना?’ राजा हसून म्हणाला, ‘हां, ते मात्र येतंय्.

गृहस्थ म्हणाला, ‘तर मग दुसरी कामं मी तुम्हाला शिकवितो. धान्यातून पोळ्या बनवायच्या, त्याच्या तीन पायऱ्या आहेत. एक खरी-खरी गोष्ट दुसरी तुम्ही सांगितलीत की पहिली पायरी सर; म्हणजे गव्हाचं पीठ तयार होईल.

दुसरी एक खरी गोष्ट सांगितलीत की पिठाच्या पोळ्या होतील; आणि तिसरी एक खरी गोष्ट सांगितलीत की पोळ्या भाजून तयार होतील. बोला, एवढं करता येईल की नाही. ‘ राजा म्हणाला, ‘पहिली खरी गोष्ट तुम्ही सांगा.’ घरधनी म्हणाला, ‘ठीक आहे, मी सांगतो. माझ्यापाशी घरात इतकंच धान्य आहे. बघा, यातला एक दाणा मी माझ्यापाशी ठेवून घेतो. टोपलीतले बाकीचे दाणे दळले जातील आणि त्यांची पोळी बनून ती खाल्ली जाईल. तेव्हा हा दाणा मी परत टोपलीत टाकीन, तेव्हा टोपली फिरुन दाण्यांनी भरून जाईल. ही माझ्या अनुभवाची खरी गोष्ट आहे !

हे तो बोलताच टोपलीतल्या दाण्यांचं पीठ झालेलं त्याला दिसलं. आता राजा बाईकडे वळला आणि म्हणाला, ‘दुसरी खरी गोष्ट तुम्ही सांगा.’ बाई म्हणाली, ‘अतिथीनं म्हटल्यावर त्याला नाही कोण म्हणेल? ऐका तर मग माझी खरी गोष्ट. माझ्यापाशी सात गायी आहेत. त्यांचं दूध रोज सात बादल्या भरतील इतकं निघतं. मी दूध सगळं झाडाला घालते पण मी एकाही गायीची धार काढीत नाही. मोटेतलं पाणी जसं शेताला जातं तशा दुधाच्या धारा आपोआप झाडाला जाऊन पोचतात. माझ्या अनुभवाची ही खरी गोष्ट आहे. ‘ राजाला दिसलं- कणकीच्या पोळ्या तयार झाल्या होत्या.

आता राजाची पाळी आली. तो म्हणाला, ‘बरोबर बारा महिन्यांपूर्वी एक तरुण जत्रेत सात सफरचंद विकायला आला होता. मी त्यानं मागितल्या किंमतीला त्याची गाणारी सफरचंद खरेदी केली होती. तो ती घेवून गेला. त्याला शोधायला मी बाहेर पडलो आहे. माझ्या अंगाची सालटी लोंबू लागली तरी मी आता स्वस्थ राहणार नाही. माझ्या अनुभवाची ही खरी गोष्ट आहे.’ एवढं तो म्हणतो आहे, तेवढ्यात त्या पोळ्या भाजून तयार झाल्या होत्या.

घरधनी म्हणाला, ‘चला तर, आता आपण जेवून घेऊ या.’ हे शब्द ऐकताच राजाच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला राणीची न् मुला-मुलीची आठवण होऊन त्याचं मन तडफडू लागलं होतं, त्यांना सोडून तो कधी समाधानानं जेवला नव्हता. तो उदास स्वरानं म्हणाला, ‘एकट्यानं जेवण मला जमायचं नाही. मला माफ करा!’ गृहस्थम्हणाला, ‘सोबत आम्ही दोघं आहोत ना!” राजा म्हणाला, ‘तरी माझं मन होत नाही.’ गृहस्थ म्हणाला, ‘आणखी तिघांना सोबतीला बोलावलं तर?’ तर- ‘राजाला पुढे बोलवलं नाही, त्याचा गळा भरून आला.’ इतक्यात आतला एक दरवाजा उघडला आणि तीनजणं बाहेर येऊन उभी राहिली.

‘राणी ! माझा कुमार, कुमारी ! ‘ असं ओरडत राजा एकदम धावत जाऊन तिघांना भेटला. त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

आता राजाचं लक्ष त्या घरधऱ्याकडं गेलं, तर तो गाणारी सफरचंदं घेऊन येणारा तरुणच तिथं उभा होता आणि मंद-मंद धावत होता. राजा आश्चर्यानं त्याच्याकडं बघत राहिला.

तरुण म्हणाला, ‘राजा, मी परीचा मुलगा आहे. मीच तुला गाणारी सफरचंदं दिली. मला तुला इकडं बोलवायचं होतं – माझ्या परिलोकात. बोल, तुला आणखी काही समजून घ्यायचं आहे?’ राजा म्हणाला, ‘ मी इकडं येत असताना वाटेत मी दोन-तीन अद्भुत गोष्टी बघितल्या, त्याचं रहस्य मला समजून घ्यायचं आहे. प्रथम मी पाहिलं, की कित्येक माणसं घराचं छप्पर कौलांनी न झाकता पंखांनी झाकत होती. पंख अपुरी पडली म्हणून ती आणखी पंखं आणायला धावत गेली; पण येऊन बघतात तर छपरावर पसरलेली पंखं उडून गेली होती. तरी ती पंखांनीच छप्पर झाकायचा हट्ट धरीत होती. हे काय? ‘ परिकुमार म्हणाला, ‘जगात जे लोक पैशाच्या मागे धावतात आणि पैसा कमावण्यासाठी आकाशपाताळ एक करतात ते पंखांनी छप्पर झाकणाऱ्या या लोकांसारखे होत. त्यांनी कितीही पंखं गोळा केली तरी ती नेहमी कमीच पडणार; आणि अधिक पंख आणण्यासाठी ते धावत राहणार. त्यांची गरज कधीच सरायची नाही आणि संतोषाचं त्यांचं छप्पर कधीच झाकलं जायचं नाही!’ राजा म्हणाला, ‘दुसरी एक गोष्ट मला दिसली. एक मुलगा काटकी पेटवून शेकोटी करीत होता, ती पेटवून तो लगेच दुसरी काटकी आणायला जंगलात जात होता. ती दुसरी काटकी घेऊन येईपर्यंत ही पहिली काटकी जळून राख होऊन जात होती, तेव्हा तो दुसरी काटकी पेटवून पुनः जंगलात तिसरी काटकी आणायला जात होता. अशी तो शेकोटी करीत होता; पण त्याला काही शेकायला मिळत नव्हतं. याचा अर्थ काय?’ परिकुमार म्हणाला, ‘राजा, स्वार्थी माणूस आपला स्वार्थ साधण्याकरिता कितीही जळण गोळा करीत राहिला तरी त्याची शेकोटी त्याला ऊब कधीच देत नाही. तो आडवाटेलाच जातो, त्याची फसगत होत राहते! त्याच्या आशेतच त्याची निराशा दडलेली असते हे त्याला कळत नाही!’ राजा म्हणाला, ‘तिसरी गोष्ट, वाटनं येताना मी तीन विहिरी पाहिल्या. तिन्ही विहिरीवर माणसाचं डोकं कोरलेलं होतं. एका डोक्याच्या तोंडात पाण्याची एक धार पडत होती आणि तोंडातून दोन धारा बाहेर पडत होत्या. दुसऱ्या डोक्याच्या तोंडात दोन धारा पडत होत्या; पण बाहेर एकच धार पडत होती.

आणि तिसऱ्या डोक्याच्या तोंडात तीन धारा पडत होत्या; पण एकही धार बाहेर पडत नव्हती. हे काय? ‘ परिकुमार म्हणाला, ‘हे डोक्याचं चित्र प्रत्येक माणसानं सतत आपल्या डोळ्यापुढं ठेवण्यासारखं आहे. तीन प्रकारच्या डोक्यांप्रमाणे तीन तऱ्हेची माणसं या जगात आहेत. विहीर म्हणजे मानव-समाज. पहिल्या प्रकारची माणसं समाजापासून जेवढं घेतात त्याच्या दुप्पट ते समाजाला देतात, दुसऱ्या प्रकारची माणसं जेवढं देतात त्याच्या दुप्पट घेतात; आणि तिसऱ्या प्रकारची माणसं फक्त घेतच राहतात, देत काहीच नाहीत ! फक्त गद्दम करायचं एवढेच त्यांना माहीत असतं.

ही सारी रहस्यं ऐकून राजाला फार आनंद झाला. रात्री भोजन करून सगळे झोपले. सकाळी झोप संपताच राजा उठून बघतो तो, त्याची राणी आणि कुमार-कुमारी सगळे आपल्या महालातच आहेत!

Author