वृक्षायुर्वेद

वराहमिहिरयाचा ‘ बृहत्संहिता’ या बृहद्ग्रंथाचा ५५ अध्याय वृक्षायुर्वेद म्हणविला जातो. यात एकूण ३१ श्लोक आहेत. वराहमिहिर यांनी उज्जैन येथे हा ग्रंथ निर्माण केला.



वराहमिहिरयाचा ‘ बृहत्संहिता’ या बृहद्ग्रंथाचा ५५ अध्याय वृक्षायुर्वेद म्हणविला जातो. यात एकूण ३१ श्लोक आहेत. वराहमिहिर यांनी उज्जैन येथे हा ग्रंथ निर्माण केला.

ग्रंथाच्या या भागात पिके आणि त्याच्या लागवडीच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. यात झाडांची वाढ, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.

झाडांची वाढ – या संबंधी माहिती देताना फांदी लावून येणारे वृक्ष असा उल्लेख आहे. त्यांना कांडरोप्य असे म्हटले आहे. यालाच आपण छाट कलमे म्हणतो. दुसर्‍या पद्धतीची माहिती वाचत असताना हे भेट कलमाचे वर्णन आहे हे लक्षात येते. छाट कलमाच्या काठीस शेण लावून मग ती जमिनीत लावावी असेही सुचविले आहे.

जमिनीची तयारी – जमिनीतील बीज पेरून फुलल्यावर तिथेच मर्दन करावे. मऊ जमिन सर्व वृक्षांना हितकारक असे वर्णन केले आहे.

बीजप्रक्रिया – अंकोल वृक्षांच्या रसाने शंभर वेळा संचित किंवा त्याच्या तेलाने किंवा भोकरीचा रस वा तेलाने शंभर वेळा सिक्त करून कोणतेही बी गारांचे पाणी मिसळलेल्या जमिनीत लावावे. त्याने बीजास त्वरित अंकुर येतात.
कांचन,आवळा, धावडा, अडुळसा, धोत्रा, तिवर यांची मुळे व रुई मंदार यांच्या पानांसह काड्याअशा एकूण आठ वस्तू दुधात घालून तापवाव्या. निवल्यावर त्यात कवठाचे बी टाकून १०० टाळ्या वाजवाव्या व नंतर ते बी उन्हात वाळवावे. असे ३० दिवस करून नंतर संस्कारित खड्डय़ात लावावे.

त्वरित फलन – भोकराचे बी कृत्रिम तुष (कोंडा, भूस) काढून अंकोलयुक्त पाण्याने भिजवून वाळवावे.असे ७ दिवस करून म्हशीच्या शेणात चोळावे व त्याच शेणात गारांचे पाणी दिलेल्या मातीत लावावे. एक दिवसात फळ येते. हातास तूप लावून कोणतेही बी दुधाने १० दिवस सिंचित करावे. नंतर गाईचे शेणात चोळावे. नंतर ते भांड्यात ठेवून त्याला डुकराच्या व हरणाच्या मांसाची धुरी द्यावी.नंतर डुकराचे चरबीत घोळवून तिळाचे रोप कापून तयार केलेल्या जमिनीत लावून त्यावर दूध-पाणी शिंपडल्यास त्या बीजास त्वरित फुले येतात. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या ग्रंथात सांगितल्या आहेत

रोपप्रक्रिया – तूप, वाळा, तीळ, मध, वावडिंग, दूध, गाईचे शेण यांचा मुळापासून फांद्यांपर्यंत लेप लावून तो वृक्ष अन्य देशी नेऊन लावला तरी जगतो.

जीवनवर्धके – झाडांच्या इंद्रियांना कार्यप्रवण करून त्यांना फलदायी बनविणे हा या जीवनवर्धक मिश्रणांचा हेतू आहे. यामुळे अतिकठीण अशी चिंचही अंकुरित होते तर इतर झाडे होतीलच. रोग – ऊन, थंडी ,वारा यांचा अतिरेक झाला म्हणजे रोग होतात असे यात मानले आहे.

लक्षणे – पाने पांढरी पडतात, अंकुर वाढत नाहीत, फांद्या वाळतात. वृक्षरोग व्रण – व्रणांवर वावडिंग, तूप व मातीचा चिखल यांचा लेप देऊन त्यावर दूध-पाणी शिंपडावे.

वृक्ष लागवड- लागवडीसंबंधी विस्तृत विवेचन यात दिले आहे. दोन वृक्षांत अंतर कां ठेवावे, किती ठेवावे, लागवडीचा काल (यासंदर्भात ऋतू ,नक्षत्रे इत्यादीचा विचार केला आहे), खड्डा केवढा घ्यावा, त्यावर कोणती प्रक्रिया करून तो कसा भरावा या संबंधीचे विवेचनही यात केले आहे. एका ठिकाणचा वृक्ष काढून दुसर्‍या ठिकाणी लावायचा असल्यास काय काळजी घ्यावी याचाही तपशील दिला आहे. लागवड जवळ झाल्यास फांद्या एकमेकास लागतात व मुळे एकमेकांत गुंततात व त्यामुळे फळे मिळत नाहीत.

लागवड काल – नक्षत्रे, उत्तरा, रोहिणी, मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, मूळ, विशाखा, पुष्य, श्रवण, अश्विनी, हस्त या नक्षत्रांत लागवड करावी. वर्षां काळात (श्रावण-भाद्रपद महिने)फांद्या फुटलेले वृक्ष लावावे.

लागवड पद्धत – एका ठिकाणीचा वृक्ष दुसरीकडे लावणे असल्यास, त्याचे जे अंग ज्या दिशेस असेल तेच अंग त्याच दिशेस ठेवून तो लावावा. (उपटण्यापूर्वी चुन्याची खूण करावी.)

सिंचन – झाडांना कोणत्या ऋतूत किती पाणी द्यावे याचा थोडक्यात तपशील दिला आहे. ग्रीष्म ऋतूत – सकाळ-संध्याकाळ पाणी द्यावे. हेमंत ऋतूत व शिशिरात – दिवसाआड पाणी द्यावे, वर्षा ऋतूत – जमीन कोरडी पडल्यास द्यावे. अशा अनेक उपयुक्त बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण साहित्य रत्न आहे.

निकिता संतोष थाटे
बी.ए. २
दि. ०२. ११. २०२२

Author