नचिकेताची गोष्ट

प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता. अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ आरंभिला.



प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता.

अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ आरंभिला. हा यज्ञ करणे फार कठीण कर्म होते. कारण यात सर्वस्वाचे दांन करावे लागे. यज्ञाचे वेळी उद्दालक ऋषी आपल्या जवळील गाईचे रोज दान करी. शेवटी शेवटी रोड व अशक्त गाईच शिल्लक राहिल्या. त्याही त्याने दान केल्या. तेव्हा या हुषार मुलाच्या मनात विचार आला की या रोड व अशक्त गाईच्या दानाने आपल्या पित्याला पुण्य कसे लाभणार. आपल्याजवळील सर्वात उत्तम वस्तूचे दान केले तरच पुण्य लाभणार. उत्तमातील उत्तमाचा त्याग केला तरच आपल्या पित्याला पुण्य लाभेल. असा विचार करून तो आपल्या पित्याजवळ गेला व म्हणाला, “बाबा मी तुमचा मुलगा तुमच्या जवळील सर्व श्रेष्ठ वस्तू आहे. तुम्ही माझे दान कोणाला करणार?” मुलाचा हा प्रश्न ऐकून उद्दालक आश्चर्यचकित झाले. गालातल्या गालात हसून नचिकेताला म्हणाले, “अरे वेड्या, मुलाचे का कोणी दान करतात. जा खेळायला, मुले वाट पाहत असतील.” पण नचिकेताचे समाधान झाले नाही. रोडक्यागाई दान करून पित्याला पुण्य कसे लाभेल? या एकाच प्रश्नाचा भुंगा त्याचे डोके कुरतडू लागला. आपल्या या शरीराचा आपल्या पित्याकरिता काही उपयोग व्हायलाच हवा असा विचार त्याच्या मनात सारखा येऊ लागला. या विचारातच तो आपल्या पित्याकडे गेला व विचारू लागला, “बाबा तुम्ही मला कोणाला दान देणार?” हा त्याचा भोळा भाबडा प्रश्न उद्दालक ऋषीचा पिच्छा सोडीना. शेवटी पिता चिडला व रागाच्या भरात चिडून उद्दालक ऋषी म्हणाले, “मर, मी तुला यमाला दिले.” तोंडून शब्द निघून गेले व मग ऋषींना पश्चाताप झाला. आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो. पण भात्यातून बाण निघून गेला तो परत कसा घेता येणार?

नचिकेताने पित्याला नम्रभावाने नमस्कार केला व यमराजाकडे जाण्यास निघाला. तो चालता असता आकाशवाणी झाली. व यमराजाकडे जाण्याचा रस्ता त्याला समजला. यमाचे राज्य पितृलोकात होते. यम प्राण हरण करणारा म्हणून तो दुष्ट असे आपण समजतो. पण यमराज फार दयाळू राजा. आपल्या प्रजेचे पालन तो पितृवत करतो. यमाचे दोन इमानी कुत्रे यमराजाच्या दरबाराचे रक्षण करीत. नचिकेत यमराज्यात पोहचला. तेव्हा यम राज्यात नव्हता ही बातमी समजताच यमाच्या दरबाराच्या पायरीवर तो यमाची वाट पाहात बसला. अन्न पाणी न घेता तीन रात्री तो तेथेच बसून राहिला. यम राज्यात आल्यावर त्याने नचिकेताची प्रेमाने विचारपूस केली. “बाळा तू कोण? कोठून आलास? कशासाठी आलास? माझी वाट पाहत तू उपवासी का बरे राहिलास?” अत्यंत नम्रपणे यमाला नमस्कार करून नचिकेत उत्तरला, “माझ्या पित्याने मला आपणाकडे पाठविले आहे.” असे म्हणून त्याने सर्व हकिगत सांगितली. यमाला फार आश्चर्य वाटले. पित्याचे वचन खरे करण्याकरिता देहत्याग करणाऱ्या नचिकेतावर यमराज प्रसन्न झाले.

आपल्याकडे आलेला अतिथी तीन दिवस उपवासी राहिला या पापाचे प्रायश्चित म्हणून त्याने नचिकेताला तीन वर मागण्यास सांगितले.

नचिकेताने पहिला वर मागितला. “माझ्या पित्याला सर्व दु:खातून दूर कर.”

यमराज म्हणाले, “तथास्तु” बाळ दुसरा वर माग. नचिकेत म्हणाला, “माझ्या हातून परोपकार घडू दे, यज्ञयागादी पुण्य कर्म माझ्या हातून होऊ देत.” “तथास्तु यमराज उद्गारले. बाळा नचिकेता तू स्वत: करता काहीच मागितले नाहीस आता तिसरा वर माग. यमाला प्रणिपात करून नचिकेता म्हणाला, “महाराज, मृत्यूनंतर जीवाचे काय होते? मृत्यूवर विजय कसा मिळवावा हे आपण मला समजावून द्याल का? ” हा वर ऐकून यम विचारात पडले.

जन्ममृत्यूचे रहस्य यमराज कसे सांगणार ! पण शब्द दिला. शब्द मागे कसा फिरवणार? यम राजाला मोठा पेच पडला.

नचिकेताचा नम्रभाव व ज्ञानलालसा पाहून त्याला आपला शिष्य करण्याचे यमाने ठरविले. तरीपण शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून यम नचिकेताला म्हणाले, “बाळा तुला दुसरे काही हवे का? धन- रत्ने, हिरे-जवाहर, सुंदर लावण्यवती अप्सरा, मोठमोठी राज्ये मी तुला देतो. जन्ममृत्यूचे रहस्य समजावून घेण्याचा हट्ट सोड.” यावर नचिकेता म्हणाला, “महाराज, या नश्वर देणग्या घेऊन काय करू? आत्मज्ञान मिळाले तर जन्माचे सार्थक होईल. तरी मला ज्ञानापासून वंचित करू नका.” नचिकेताचे मनापासूनचे हे बोल ऐकून यमराज संतुष्ट झाले. व त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. पुढे यमराजाने त्याला आत्मज्ञानाचा मार्ग सांगून आत्मा ईश्वर आहे म्हणून तो अमर आहे. हे ज्ञान होणे म्हणजे मृत्यूवर विजय मिळविणे होय अशा त-हेचा उपदेश त्याला यमाने केला.

नचिकेताला जन्म मरणाचे रहस्य ज्ञात झाले. या आनंदात तो पित्याकडे परत आला. आपला मुलगा ज्ञानी होऊन आला हे पाहून पित्याला उद्दालक ऋषीला ही परम संतोष झाला.

Author