तरुणपण उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक असते. तरुणपण बालपणाच्या पायावर उभे असते. त्यामुळे बालवयात योग्य संस्कार झाले, तर तरुणपणात त्याचा फायदा नक्कीच होतो. तरुणपण हे वाया जाऊ नये म्हणून तरुणांना संयम आवश्यक आहे. कारण तरुण सध्या व्यसनाच्या जाळ्यात, भौतिक सुखाच्या जाळ्यात अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर काढायचे असेल तरच पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे जाण्यासाठी बालपण शिस्तीत, संस्कारात व्यतीत व्हायला हवं. पूर्वी तरुणपण होतं कुटुंबासाठी, देशासाठी; पण आज तरुणपण स्वतःसाठी, स्वतःच्या भौतिक सुखासाठी आणि दुसऱ्याचा विचार न करण्यासाठीच आहे की काय अशी शंका येऊ लागते. तरुणपण कशासाठी हे ठरवत असताना, प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे. लहानपणी ‘श्यामची आई’ पुस्तकात वाचलेली असते; पण आपल्या आईत ‘श्यामची आई’ शोधता यायला हवी. लहानपण हे पुस्तके वाचण्यासाठी असतं, तर तरुणपण हे पुस्तकातल्या गोष्टी पुस्तकाबाहेर शोधण्यासाठी असतं. आजच्या तरुणांकडे आदर्श नाही, यशोगाथा नाहीत; पण त्या त्यांना समजूनही घ्यायच्या नाहीत, त्याकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. आमच्या तरुणांना स्वरसम्राज्ञी, कोकिळा लता मंगेशकर समजून घ्यायची नाही. आमच्या तरुणांना अभिजात चित्रपटांच्या कलास्वाद कसा घ्यायचा हे माहिती नाही व माहितीही करून घ्यायचं नाही.
या तरुणांना इतिहास माहीत नाही ते इतिहास काय घडवणार. काहींना के.एल.सैगल माहीत नाही, नटसम्राट लिहिणारे वि. वा. शिरवाडकर माहीत नाहीत, जी.ए.कुलकर्णी माहीत नाहीत, क्रिकेटर नवाब पतोडी माहीत नाहीत, कुस्तीपटू खाशाबा जाधव माहीत नाहीत अशी अनेक कितीतरी गाजलेली व्यक्तिमत्त्वे, गाजलेली पुस्तके, गाजलेले चित्रपट, कथा, कादंबऱ्या, कविता त्यांना माहीत नाहीत व त्याचे त्यांना काही वाटतही नाही.
आज आदर्श वेगळेच आहेत. त्यांना वेस्टर्न संगीत आवडतं. वेस्टर्न कल्चर आवडतं, आवडण्यात काही गैरही नाही; पण ही आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे व संवर्धित केली पाहिजे. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तरुण पिढी ही अग्रेसर असेल; पण इंटिलिजन्स कोशंटपेक्षा इमोशनल कोशंटसुद्धा विकसित व्हायला हवा.
आई-वडिलांचा सांभाळ करणं व जन्मदात्या आई-वडिलांच्या अंत्यविधीलाही हजर न राहाणारे तरुण कितीही भौतिक प्रगती करत असले, तरीही माणूस हा भावनेच्या, प्रेमाच्या प्रदेशात राहातो, याची जाण तरुणांनी ठेवायलाच हवी.
जीवनात विवेकानंद व्हायचं का मायकल जॅक्सन व्हायचं हे ठरवता आलं पाहिजे. तरुणपण भरकटलं तर आयुष्य भरकटतं. तरुणपण स्वतःला शिस्तीत गुंफण्यासाठी आहे. तरुणपण ही एक लक्ष्मणरेषा आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. देशासाठी तारुण्य ओवाळून टाकणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं स्मरण तरुणांना व्हायला हवं. तरुणपण देशविरोधी घोषणा देण्यासाठी नाही, आपल्या सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी नाही, कर्ज बुडवून परदेशात पळून जाण्यासाठी नाही. भ्रष्टाचार करून तुरुंगात जाण्यासाठी बलात्कार, दरोडे, खून यासाठी तर नाहीच नाही. जसे संस्कार तसेच व्यक्तिमत्त्व आकार घेते.
बालपणावर तारुण्याची इमारत उभी राहाते व तारुण्यावर भविष्याचा कळस उभा राहातो.
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ म्हणणारे सावरकर कोठे व लाखो, कोटींचे पॅकेज घेऊन परदेशात स्थायिक होणारे आणि मातृभूमीला विसरणारे तरुण कोठे?
तरुणपण भगत सिंह जगण्यात आहे, कबीर सिंग पाहाण्यात नाही. तरुणपण वेळप्रसंगी, देशासाठी तारुण्य ओवाळून टाकण्यासाठी आहे. तरुणपण व्यसनावर जीव ओवाळून टाकण्यासाठी नाही. कबीर सिंग चित्रपटात व्यसन, चुंबन, अलिंगन यांचा इतका अतिरेक आहे की, आतापर्यंतच्या सर्व चित्रपटात नसतील एवढी चुंबन दृश्ये या चित्रपटात आहेत. त्यामुळे तरुणांची गर्दी प्रचंड आहे, हे कुठेतरी थांबायला हवं. चांगले आदर्श आमच्या तरुणांसमोर यायला हवेत. तरच देशासाठी, समाजासाठी तरुण उपयोगी पडू शकतील. नुसता स्वकेंद्रित विचार करणारे तरुण, कुटुंब, समाज, देश रसातळाला नेतील.
प्रत्येक वयाचं काही घेणं असतं, तसं प्रत्येक वयाचं काही देणंही असतं. पुस्तकात भगत सिंह, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्यासारखी मूल्ये इतर व्यक्तींमध्ये शोधता आली पाहिजे.
पुस्तके वाचन शिकवतात; पण जीवने वचन शिकवतात.
