नयन तुझे जादुगार
Category:
मनोरंजन लेखसंग्रहखरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.