नयन तुझे जादुगार

खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.



खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.

जेव्हा हा प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करायचं ठरलं. तेव्हा त्याचं संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांनी करावं असं ठरलं होतं. त्याचवेळी मास्तरांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या तालमी दादरच्या ठाकूर हॉलमध्ये चालायच्या. ते नाटक ‘नाट्यसंपदा’ या संस्थेसाठी मास्तरांनी लिहिलं होतं. त्या नाटकाच्या तालमी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत आणि आम्ही सगळे नोकरी करणारे म्हणून आमच्या तालमी साधारण सहा ते नऊ (ठाकूर हॉलमध्येच ) अशा चालत.

‘नयन’च्या सुरुवातीला नायिकेच्या भूमिकेसाठी वसुंधरा पेंडसे यांना विचारलं होतं. कारण त्यांचे डोळे, लांबसडक केस आणि देखणेपणा हा प्लस पॉइंट होता. पण त्यांनी नाटकात काम करण्याचं नाकारलं. त्यामुळे भारती मालवणकर हिला घेऊन प्रयोग करण्याचं ठरलं. तालमी सुरू झाल्या. तर दुसरीकडे खाँ साहेबांची भूमिका करायला योग्य नट मिळत नव्हता. त्यामुळे मास्तरांनी आमच्या नाटकावर लक्ष केंद्रित केलं.
संगीताची (दोन्ही नाटकांची) जबाबदारी अभिषेकींची होती. नंतर वसंतराव देशपांडे यांनी खाँ साहेबांची भूमिका करण्यास होकार दिल्यामुळे आणि ते पाच-सहा गायकांचे नाटक असल्यामुळे अभिषेकींना ‘नयन’ वरून नयन काढून घ्यावे लागले आणि ‘कट्यार’ मध्ये घुसवावे लागले.

आता ‘नयन तुझे जादुगार’चं संगीत कोण करणार असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा अभिषेकी मला म्हणाले, “तू आणि माधव ( डोंगरे ) जरा चालींचं बघा. मला वेळ मिळेल तसा मी येऊन लक्ष घालीन.” माधव डोंगरे हे नागपूरचे. मुंबई आकाशवाणीवर व्हायोलियनवादक म्हणून काम करत. शिवाय मास्तरांच्या परिचयातील. मी थीम साँग ‘नयन तुझे जादुगार’ आणि कुमुदचे ‘नभी चंद्रमा’ या दोन गाण्यांना चाली लावल्या. माधवने माझं शेवटचं ‘आज जायचे मना दूर दूर दूर’ या गाण्याला चाल लावली. कुमुदच्या दुसऱ्या गाण्याला चाल माधवनेच लावली.

एक दिवस तालमीला अभिषेकी आले. त्यांना आम्ही चाली ऐकवल्या. त्यांना त्या आवडल्या आणि माझं आणि माधवचं संगीत दिग्दर्शक म्हणून नावं द्यावीत असं सुचवलं. मी त्याला विरोध केला. म्हटलं, “अहो ही गाणी आवडली तर आमच्या दारात निर्मात्यांची लाईन लागेल, आमच्याही नाटकाचं संगीत दिग्दर्शन करा म्हणून! तेव्हा तुमचं नाव आहे तेच राहू द्या. फक्त ही गाणी तुमच्या नावावर झाली, तर तुम्हाला कमीपणा येईल किंवा काय याचा विचार करा.

त्यावर ते हसून म्हणाले, “नाही, खरंच चांगल्या झाल्या आहेत चाली.” शिवाय नाटकही पारपंरिक संगीत नाटकात बसेल अशा प्रकृतीचं नव्हतं. नाटकाचा विषयच चेटूक होता. चेटकीण प्रेमात पडली तर तिची चेटूक करण्याची शक्ती नाहीशी होते अशा अतिशय वेगळ्या विषयावरचं हे नाटक होतं. त्यामुळे आम्ही केलेल्या चाली, नाटकाला संगीताचा हलका फुलका रंग चढवायला लागतील तेवढ्याच कुवतीच्या होत्या. म्हणून त्या चालून गेल्या.

अभिषेकी बुवांच्या हयातीत हा खुलासा करण्याचा प्रश्नच आला नाही, पण अलीकडे अलीकडे काही रसिकांनी मला विचारलं की, ” तुमचं ‘उडुनि जा पाखरा’ (याची चाल माधवने लावली) हे गाणं खूप छान आहे. पण ती चाल अभिषेकींची वाटत नाही.” त्यावर मला हा खुलासा करावा लागला. आमच्यासारख्या अननुभवी कलाकारांनी केलेल्या चाली आपल्या नावावर जाऊ देण्याचा मोठेपणा बुवांनी दाखवला आणि त्याचे शिष्य असलेल्या आम्हाला आमच्या मेहनतीचं सार्थक झालं असं वाटलं.

या नाटकाच्या तालमींच्या दरम्यान दारव्हे.कर मास्तरांच्या शिस्तीचा चांगला अनुभव आला. नाटकात वावरताना स्पॉट कसे घ्यायचे, लुक्स कसे द्यायचे याचा वस्तुपाठच मिळाला. स्पर्धेतल्या नाटकाचा अनुभव असल्यामुळे आमच्या संचातला प्रयोग बसवताना मास्तरांनी त्यांना आवश्यक वाटले तसे प्रयोग केले. तालमी हळूहळू इतक्या रंगत गेल्या की सव्वा सहा ते नऊपर्यंत म्हणता म्हणता दहा कधी वाजायचे ते कळायचंच नाही. मास्तरांनी अत्यंत हौसेने प्रयोग बसवला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाचा लाभ करून घेतला. आगळावेगळा विषय, माफक गाणं आणि योग्य साथ देणारा नटवर्ग यामुळे नाटक इतकं चपखल बसलं की घड्याळ लावून चार तासात प्रयोग संपायचा. हो. त्यावेळी चार तास नाटक करण्याची परवानगी होती. आजच्यासारखा ‘उरक’ तेव्हा नव्हता.

एका प्रयोगाला विजय तेंडुलकर आले होते. नाटक पाहिल्यानंतरचा त्यांचा अभिप्राय – “मी या नाटकाचा स्पर्धेचा प्रयोग पाहिला होता. तुम्ही सगळे काम करताना थोडीफार लिबर्टी घेताय पण दिग्दर्शकाची तुमच्यावरची पकड सुटलेली नाही.’ ”

पन्नासाव्या प्रयोगाला बाळासाहेब ठाकरे आले होते. तेव्हा ते ‘हिंदुहृदयसम्राट’ नव्हते. मध्यंतरात भाषण करताना ते म्हणाले, “इतक्या सुंदर नाटकात गाणी कशाला घातली आहेत कोण जाणे.” सुदैवाने त्या दिवशीच्या प्रयोगाला गाण्यांना फार छान दाद मिळालीच, परंतु तिसऱ्या अंकात एक लोकधून प्रसाद गातो त्यालाही कडाडून टाळी पडली. बाळासाहेब कौतुकाने नंतर म्हणाले, “तुम्ही माफक गाता म्हणून नाटकाची रंगत वाढते. हे एवढंच ठेवा. ‘ ”

या नाटकाचे ६०-६५ प्रयोग झाले. मुंबई, पुणे त्याचप्रमाणे कोकणातही प्रयोग झाले. प्रत्येकवेळी नाटकाचा प्रयोग रंगतदार होई. कधीकधी मुंबई-पुण्यापेक्षाही बाहेरगावी जास्त दाद मिळायची.

पुढे निर्मात्याला हैदराबादचा एक प्रयोग कॉन्ट्रॅक्टचा मिळाला होता. हैदराबादला एका प्रयोगासाठी आम्हा नोकरीवाल्यांचे तीन-चार दिवस खर्ची पडणार होते. त्यामुळे तिथून येताना गोवा दौरा करावा असं आम्ही निर्मात्याला सुचवलं. निर्मात्याची त्याला तयारी नव्हती. तेव्हा एक प्रयोग करायला कलाकारांनी नकार दिला. त्यामुळे निर्मात्याने नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला आणि अशारीतीने एक चांगलं नाटक बंद झालं.

आमचा ‘नयन’चा ग्रुप इतका चांगला जमला होता. त्यामुळे प्रयोगाच्यावेळी, दौऱ्याच्या वेळी आम्ही खूप मजा करीत असू. नाटक बंद झाल्यामुळे त्या आनंदाला आम्ही मुकलो. भारती मालवणकर ही त्यावेळी सिनेसृष्टीतही बऱ्यापैकी नावाजलेली होती. परंतु ती आम्हा सगळ्यांसोबत खेळीमेळीनं वागायची.

त्यावेळी आमची झालेली मैत्री ‘घनःश्याम नयनी आला’ या नाटकाच्या वेळेला अधिक दृढ झाली आणि भारती मालवणकरची मंगेशकर झाली तरी ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे हे विशेष!

‘नयन’चे प्रयोग सुरू असताना एकदा अभिषेकी बुवांच्या मैफिलीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर नागपूरला साथीला मी गेलो होतो. अभिषेकींची तब्येत अचानक बिघडल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यावेळी मास्तरांनी त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. बुवा काही आले नाहीत. पण मी आणि साथीदार गेलो होतो. त्यावेळी मास्तरांनी एक निरोप मोहन तोंडवळकरसाठी दिला होता. ‘नयनचे १०० प्रयोग केले तर मास्तरांतर्फे सर्व कलाकारांना प्रत्येकी शंभर रुपये (१९६७ चे) आणि निर्मात्याला स्पेशल पुरस्कार आणि भोजनाचं आमंत्रण. ‘ निरोप मी पोहोचवला. पण नंतर हैदराबादचा प्रयोग फिसकटला आणि नाटक बंद झालं. आमचे शंभर रुपये गेले आणि जेवणही गेलं. तरीही त्या नाटकाने आम्हाला भरपूर आनंद दिला, हे विसरता येत नाही.

‘नयन तुझे जादुगार’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाल्यानंतर २४ डिसेंबर १९६७ ला ‘कट्यार’चा पहिला प्रयोग झाला. तो ललितकलादर्श या भालचंद्र पेंढारकर यांच्या संस्थेच्या हीरक महोत्सव प्रसंगी. हा प्रयोग जवळजवळ सहा तास चालला. त्यानंतर शिवाजी मंदिर येथे झालेला दुसरा प्रयोग साधारण साडेपाच तास चालला. या प्रयोगाला आम्ही ‘नयन’ चे सर्व कलाकार तिकीट काढून बसलो होतो. प्रयोग अतिशय रंगतदार झाला. हे सांगणे न लगे.

मास्तरांशी परिचय झालाच होता. तालमीच्या वेळी शंकाकुशंका विचारण्याची मुभा होती. मास्तर नागपूरला परत गेल्यावर त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. मास्तरांचं हस्ताक्षर अतिशय वळणदार आणि सुबक. त्यांची सात-आठ पत्रं मी जपून ठेवली होती. परंतु नंतर ती गहाळ झाली याचं शल्य मनात आहे. एक मौल्यवान ठेवा हरपला.

Author