जन्म दिला मज ज्यांनी

माझ्या वडिलांचं नाव गडबडनाथ. हे नाव ऐकायला जरा हटके आणि थोडंसं विनोदी वाटतं. ते कसं व का ठेवण्यात आलं याचा खुलासा- किस्सा मला आजीकडून समजला तो असा की, त्या दिवशी घरात श्राद्धाची गडबड होती. सर्वजण धावपळीत होते. या गडबडीत माझ्या वडिलांचा जन्म झाला म्हणून गडबडनाथ ! माझ्या आजोबांना चार मुलं ! गडबडनाथ, त्रिंबकनाथ आणि छोटू (याचं खरं नाव माहीत नाही) आणि मोहन या नावाची मुलगी (दोन नंबर). माझ्या वडिलांना तीन मुलं. रामचंद्र, सुलोचना आणि मी अरविंद शेंडेफळ !

आई लग्न करून पिळगांवकरांच्या घरात आली. इथेही बऱ्यापैकी मोठं एकत्र कुटुंब. पणजोबा रामचंद्र राजाध्यक्ष हेही दत्तक घेतल्यामुळे (आत्याने) वडील आणि आडनाव दोन्ही बदलली आणि रामचंद्र -नारायण- मंगेश पिळगांवकर असं दत्तक नाव झालं. न्या. तेलंगांना सख्ख्या काकांनी दत्तक घेतल्यामुळे आडनाव बदललं नाही. पुढे हे तेलंग घराणं बनारसला गेलं आणि तिथेच वास्तव्याला राहिले. न्या. तेलंगांची बरीच प्रॉपर्टी लोणावळ्याला आहे. त्यात त्यांचा बंगला व बरीच जमीन होती. तिथे आता कॉलनी बांधली गेली आहे. द्वारकानाथ तेलंग शेवटी शेवटी हे सर्व सांभाळत होते. त्यांचा पोशाख रवीद्रनाथ टागोर यांच्या सारखा होता. लहानपणी त्यांना पाहिल्याचं स्मरतं. आम्हा मुलांना ते बागेतील गुलाब देत असत.



माझ्या वडिलांचं नाव गडबडनाथ. हे नाव ऐकायला जरा हटके आणि थोडंसं विनोदी वाटतं. ते कसं व का ठेवण्यात आलं याचा खुलासा- किस्सा मला आजीकडून समजला तो असा की, त्या दिवशी घरात श्राद्धाची गडबड होती. सर्वजण धावपळीत होते. या गडबडीत माझ्या वडिलांचा जन्म झाला म्हणून गडबडनाथ ! माझ्या आजोबांना चार मुलं ! गडबडनाथ, त्रिंबकनाथ आणि छोटू (याचं खरं नाव माहीत नाही) आणि मोहन या नावाची मुलगी (दोन नंबर). माझ्या वडिलांना तीन मुलं. रामचंद्र, सुलोचना आणि मी अरविंद शेंडेफळ !

आई लग्न करून पिळगांवकरांच्या घरात आली. इथेही बऱ्यापैकी मोठं एकत्र कुटुंब. पणजोबा रामचंद्र राजाध्यक्ष हेही दत्तक घेतल्यामुळे (आत्याने) वडील आणि आडनाव दोन्ही बदलली आणि रामचंद्र -नारायण- मंगेश पिळगांवकर असं दत्तक नाव झालं. न्या. तेलंगांना सख्ख्या काकांनी दत्तक घेतल्यामुळे आडनाव बदललं नाही. पुढे हे तेलंग घराणं बनारसला गेलं आणि तिथेच वास्तव्याला राहिले. न्या. तेलंगांची बरीच प्रॉपर्टी लोणावळ्याला आहे. त्यात त्यांचा बंगला व बरीच जमीन होती. तिथे आता कॉलनी बांधली गेली आहे. द्वारकानाथ तेलंग शेवटी शेवटी हे सर्व सांभाळत होते. त्यांचा पोशाख रवीद्रनाथ टागोर यांच्या सारखा होता. लहानपणी त्यांना पाहिल्याचं स्मरतं. आम्हा मुलांना ते बागेतील गुलाब देत असत.

रामचंद्र पिळगांवकर यांना चार मुली. सीताबाय, गंगूबाय, माणक आणि कमला. पैकी पहिल्या तीन लाड घराण्यात लग्न होऊन गेल्या. या तिन्ही लाडांचं आडनाव सारखं असलं तरी एकमेकांशी काही संबंध नाही. धाकटी कमला टांकी महाराज यांच्या कुटुंबात गेली. तिला एक मुलगी भानुमती. तिचं लग्न बाबूराव पै यांच्याशी झालं. त्यांनी मेहनत करून फेमस पिक्चर्सची स्थापना करून ” बडी बहन’, ‘प्यार की जीत’, ‘चूल आणि मूल’ असे अनेक चित्रपट दिले. रामचंद्र यांना मुलगे बरेच होते. पुरुषोत्तम, दीनानाथ (माझे आजोबा), आनंदराव, नारायण, बाबूकाका (हे क्रिकेटर होते व आर्यन शाळेत शिक्षक होते), केशर, भगुनाना.

माझ्यात आणि माझ्या भावंडांत नऊ-दहा वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे माझे बऱ्यापैकी लाड झाले. वडील सेक्रेटरियटमध्ये कामाला होते. अतिशय शांत स्वभाव. सहसा न चिडणारे, पण एकदा चिडले तर जमदग्नीच !

प्रायमरी चार यत्ता, म्युनिसिपल स्कूल, पहिली ते मॅट्रिक सात वर्षे आणि कॉलेजची चार वर्षे अशी पंधरा वर्षे शिक्षणाची पूर्ण केल्यावर एकवीस/ बाविसव्या वर्षी मी हायकोर्टात नोकरीला लागलो.

विल्सन कॉलेजात असताना अशोक रानडे (डॉ. अशोक रानडे) भेटला आणि माझ्या आयुष्यात संगीत आलं. ज्या क्लासमध्ये गाणं शिकत होतो तिथे जयंत सावरकर याच्याशी भेट झाली. आणि माझ्या आयुष्यात नाटक आलं. हे इतरत्रही आलेलं आहेच. त्यामुळे चर्वितचर्वण नको.

नोकरी करता करताच १९६४ पासून नाटक सुरू झालं. त्यावेळी नाटक हे मी करिअर म्हणून स्वीकारेन असं मलाही वाटलं नव्हतं. १९६७ ला मीना पेठे नावाचं एक वादळ माझ्या आयुष्यात आलं आणि मला झीरोचा हीरो करून माझ्या आयुष्यातून निघूनही गेलं. नाट्य व्यवसायात मी बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. ‘सं.वासवदत्ता’, ‘नयन’, ‘घनःश्याम’ इत्यादी.

अभिषेकी बुवांचं लग्न होण्यापूर्वीच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी कोणावर अवलंबून नाही, माझ्यावर कोणी अवलंबून नाही, अशी परिस्थिती होती. घरात कुणीही याबद्दल मला अवाक्षरानेही विचारलं नाही. माझ्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला माझी आई, काका आणि माझा पुतण्या दिनेश, प्रेक्षक म्हणून हजर असत. माझे सर्व नातेवाईक तिकीट काढून माझं नाटक पहायला येत. सगळी सारस्वत मंडळी. डॉ. रघुनंदन संझगिरी (डॉ. रमेशचे वडील – माझे काका) यांचं सर्व कुटुंबही येत असे.

त्यांच्या आजोबांची बहीण आणि माझ्या वडिलांचे आजोबा यांचा विवाह झाला होता. संझगिरींची मुलगी पिळगांवकरांच्या घरात. म्हणजे ते माझं आजोळ. माझ्या प्रयोगाला आलेले माझे वडील बाल्कनीतले प्रेक्षक माझ्याबद्दल काय कॉमेन्टस् करतात हे ऐकण्यासाठी बाल्कनीत चहा प्यायला जात असत.

१९८३ मध्ये वडील गेल्यानंतर आईने नाटकाला येणं बंद केलं. आता काका, आई, मी, माझा मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि दिनेश असं कुटुंब झालं.

आमच्या बिल्डिंगमध्ये मंत्री, नाईक, पाडगावकर, तीन केंकरे कुटुंबीय, मम्मा पिंटो (आमच्या समोर), मुर्डेश्वर, संशी, दिवगी अशी कुटुंबे होती. शेजारच्या एक्स्प्रेस बिल्डिंगमध्ये पारकर कुटुंब व गावस्कर ( सुनीलचे आजोबा) कुटुंब यांच्याशीही घरगुती स्नेहसंबंध होते.

माझे चुलत काका कमळनाथ पिळगांवकर व रघुनंदन संझगिरी आमचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्यानंतर डॉ. सुंदर गावस्कर केंकरे ( सुनीलची सख्खी आत्या) ही आमची फॅमिली डॉक्टर झाली. तिचा दवाखाना ताडदेवला होता. तिची आई शांताताई ( सुनीलची आजी ) यांचे व माझ्या आईचे बहिणीसारखे संबंध होते. दिवाळीत मी रांगोळी काढत असे. (टिपक्यांची नव्हे. चित्रं पाहून त्याप्रमाणे) शांताताई एकदा माझी वेळ विचारून सकाळी आमच्या घरी आल्या. त्यांची तब्येत ठीक नसताना दोन मजले चढून ! मी रांगोळी कशी काढतो ते बघायला! मला म्हणाल्या, “तू रांगोळी एक्स्पर्ट आहेस ते मला माहीत आहे. पण ती कशी काढतोस हे बघायला आल्ये!” किती आपुलकी आणि प्रेम !

सुंदरताईही तशीच. त्यावेळी मला उष्णतेमुळे घशाचा व आवाजाचा त्रास नेहमी होत असे. त्यावेळी माझा गळा आणि तिच्या गोळ्या अशी जुगलबंदी चालायची. तिने आमच्याकडून औषधाचे पैसे कधीच घेतले नाहीत. मग अधूनमधून मी काही भेटवस्तू तिला देत असे. एकदा नागपूर दौऱ्याहून येताना मी बऱ्याच साड्या आणल्या होत्या. माझी आई, मामी यांच्यासाठी नऊवाही लुगडी, बहिणींसाठी खडी काढलेल्या ( नागपुरी खासियत ) चार – पाच साड्या होत्या.

त्यात दोन पांढऱ्या (निळसर छटा असलेल्या दोन साड्या व तीनचार काळ्या, सोनेरी खडीची कुयऱ्या काढलेल्या होत्या. काळ्या रंगाच्या साड्या संक्रांतीसाठी वापरतात हे मला माहीत होतं. मी माझ्या बहिणीला प्रथम विचारलं. तेव्हा तिने पांढरी साडी सिलेक्ट केली. ती सावळी होती म्हणून. नंतर सुंदरताईला विचारलं. ती म्हणाली, “अरे मी आधी काळी त्यात काळी साडी नेसले तर आणखी काळी दिसेन. माझ्या मामे बहिणीने पांढरीच साडी निवडली. विद्यावहिनी अभिषेकींनी मात्र जाणीवपूर्वक काळी साडीच निवडली. त्या ती साडी नेसून लताबाईंच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी विचारलं, “छान आहे साडी. कुणी दिली? ” “आमचे अरविंद पिळगांवकर आहेत त्यांनी दिली. ” म्हणजे माझा चॉइस लतादीदींना

पण आवडला होता. असाच एकदा नारळीपौर्णिमेला नारळीपाक घेऊन तिच्या दवाखान्यात गेलो. तिला नारळीपाक दिला. तिचा मोठा मुलगा हेमंत, त्याच्या आवडीची मिठाई. थोड्यावेळाने ती हातात एक छोटी पुडी घेऊन आली. मला म्हणाली, “हात पुढे कर.” मला वाटलं काही प्रसाद वगैरे असेल. म्हणून मी हात केला. “असा नाही रे. पालथा कर.” मी केला. तिने त्या छोट्या पुडीतून राखी काढली आणि म्हणाली, “तुला बांधली तर चालेल ना?” (त्यावेळी माधव केंकरे हयात नव्हते) मी म्हटलं, ” हे नातं बहीणभावाचं आहे असं मी मानतो. त्यात विचारण्याचा काय संबंध?” तिला स्वतःचे सख्खे चारपाच भाऊ होते. तरीही तिने मला राखी बांधली. म्हणाली, “गेल्या जन्मी तू माझा भाऊ होतास !’ मी म्हटलं, “अगं, गेल्या कशाला? या जन्मीच आहे.” त्यानंतर मी नेमाने नारळीपाक घेऊन नारळीपौर्णिमेला रक्षाबंधन करून घ्यायला लागलो.

आयुष्यात जाणून बुजून कुणाला दुखवलं नाही. तसं कुणाशी वैरही धरलं नाही. एखाद्याची एखादी गोष्ट पटली नाही तर परत त्या वाटेला गेलो नाही. माझ्या घरच्या पाच पिढ्या मी सांभाळल्या. माझी आई चार-पाच वर्षे पंढरपूरच्या वारीला जायची. आमच्या ओळखीत गुलबाय संझगिरी आणि मोतीराम संझगिरी हे होते. त्यांचा भजनी ग्रुप होता. बहुतेक सगळ्या बायका होत्या. माझे वडील फक्त पहिल्या वर्षी गेले. नंतर आई चार – पाच वर्षे जात होती. ती नसताना आजीला आणि इतर कुटुंबियांना सांभाळलं. आजी, आई, वडील, काका ही पिढी, माझा भाऊ आणि वहिनी आणि मी ही तिसरी पिढी, माझ्या बहिणीची मुलं आणि माझ्या भावाचा मुलगा माझ्या अंगाखांद्यावरच वाढले. आता ही चौथी पिढी आणि आता त्यांची मुलं ही पाचवी पिढी मी सांभाळली. अर्थात सर्वांनीही मला सांभाळलं. माझ्या घरच्यांनी मला “हे तुझं काय चाललंय, काय करतोस, कुठे जातोस” इत्यादी प्रश्न कधीच विचारले नाहीत. माझ्या बहिणीने जाण्याच्या आदल्या दिवशी तीनही मुलांना सांगितलं, “अरविंद मामाने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप केलंय. त्याला अंतर देऊ नका.” आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून रहातो. आयुष्यात हीच खरी कमाई. पोटचं कुणीही नसलं तरी पोटच्या मुलांप्रमाणे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यानंतरच्या पिढीने मला खूप काही दिलं.देत आहेत. माझ्या भावाच्या मुलाला दिनेशला त्याच्या ऑफिसमध्ये मोठ्ठे प्रमोशन मिळालं तेव्हा त्याने मला नमस्कार केला. त्याला म्हटलं, “आज तुझे आईबाबा हवे होते.” तर म्हणाला, “तूच माझी आई आणि तूच माझा बाबा ! आईबाबा !”

Author