आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांशी वादविवाद, मारामाऱ्या कराव्या लागल्या. कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला वाचवायला खोटं बोलावं लागलं. अनेक आजारपणांना तोंड द्यावं लागलं. बसच्या अपघातांना तर तोटाच नव्हता. अर्थात असे प्रसंग सर्वसामान्य माणसांच्या तसे कलाकारांच्या आयुष्यात येतातच.
मी केलेल्या कामाची पावती मला पुरस्कारांच्या रूपात मिळाली. हे मानसन्मान माझ्या लायकीपेक्षा कितीतरी मोठे आहेत ही जाणीव आहे. त्यामुळे ‘उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको’ अशा वृत्तीने कालक्रमणा करीत आलो आहे.
माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा दहा वर्षांनी आणि बहीण सात वर्षांनी मोठी असल्यामुळे मी जरा, ज्याला Overprotected Child असं म्हणतात त्या सदरात मोडत होतो. घरात सगळे वडीलधारे. त्यामुळे माझी काळजी सगळ्यांनाच. माझ्या आईला मुलगी झाली तेव्हा तिला मुलगा व्हावा अशी इच्छा होती. पण झाली मुलगी! माझ्यावेळेला आईला मुलगी हवी होती त्यावेळी मी झालो. त्यामुळे तिची थोडी निराशा झाली. अर्थात याचा त्रास मला कधी झाला नाही. लहानपणी मी अतिशय गुटगुटीत आणि आनंदी बाळ होतो. आई मला पाच वर्षापर्यंत अंगावर पाजत होती असं तिने तिच्या आजारपणात सांगितलं होतं. घरातले आणि आजूबाजूचे मात्र खेळवायला प्रेमाने घेऊन जात. आमच्या बिल्डिंगमध्ये महाराष्ट्रीयन मेजॉरिटी असल्यामुळे एक प्रकारचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
हळूहळू बाल्यावस्थेतून पौगंडावस्थेत प्रवेश झाला. मी थोडासा introvert (आत्ममग्न ) झालो. मला माझ्याबरोबरची मुलेमुली मित्र होतेच. परंतु तरीही माझं माझ्या स्वतःवरच प्रेम होतं जास्त. या वयात एक प्रकारचं शारीरिक आकर्षण असतंच. माझ्या बाबतीत ते इतरांबद्दल न वाटता स्वतःबद्दलच वाटू लागलं.
घरात कुणी नसताना स्वतःला आरशात न्याहाळणं हा एक आवडता छंद जडला. या अवस्थेत मुलांना ज्या काही बऱ्यावाईट सवयी लागतात त्या थोड्याफार माझ्या अंगी बाणल्या होत्या. त्यावेळी अर्थातच याबद्दल आईवडिलांनी मुलांशी बोलणं, त्यांचं समुपदेशन करणं वगैरे प्रकार बोकाळले नव्हते. त्यामुळे माझे छंद माझ्यापुरतेच होते.
शाळेत जायला लागलो, नंतर हायस्कूलमध्ये दाखल झालो. तिथेही बऱ्यापैकी मित्रमंडळीत रमू लागलो होतो. शाळेत चौथी ते सातवी नाटकात स्त्री पार्ट करून बक्षीसंही मिळवली. त्यासाठी घरून विरोध झाला नाही. उलट थोडंफार कौतुकच झालं. बालगंधर्वांच्या जमान्यात जन्मलो असतो तर काय केलं असतं देव जाणे?
असे बहिणीच्या साड्या, आईची जरीची लुगडी, मामीचा जरीचा शालू पोशाख करून मेकअप करून आपण फार काही जगावेगळं करतो आहोत असं कधीच वाटलं नाही. माझ्या विद्यार्थी मित्रांत असेही काही होते, ज्यांनी माझ्याबरोबरच स्त्री पार्ट केले. आनंदाची एक गोष्ट ही की, याबद्दल इतर मुलं आमची टिंगलटवाळी करणं किंवा अश्लील काही बोलणं असं मात्र अजिबात करत नव्हती. त्याबाबतीत आम्ही सुदैवी ! अलीकडचा रॅगिंग हा प्रकार तेव्हा जन्मलाच नव्हता. आम्ही शाळेतून दोन-तीन दिवस ट्रीपला जात असू. पण आतासारखे गैरप्रकार कधीच केले नाहीत.
मी माझी आई आणि मोठी बहीण ताई यांच्याच सावलीत वाढल्यामुळे लहानपणी थोडासा नाजूक आणि बायकीच होतो. स्त्री पार्ट करून त्यात थोडी भर पडली असावी की काय हे सांगता येत नाही. तरीही माझ्या आजूबाजूची मुले आणि मुली एकत्र खेळताना या विषयावरून मात्र थट्टामस्करी कधीच होत नसे.
माझा आवाज फुटल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारचा झाला. त्यात संगीत शिकायला लागल्यापासून मला जाणवू लागली एक गोष्टी ती ही की, माझा आवाज सुरेल आणि धारदार आहे. पण त्याला एक नाजूक छटा आहे. माझ्या ध्वनिमुद्रिका ऐकल्यावर कदाचित त्याचा प्रत्यय येईल. तरीही मी अनेक ठिकाणी मैफिली केल्या. नाटकांचे प्रयोग केले, पण सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. अर्थात काही टिंगलखोर, टवाळक्यांकडून माझ्या पाठीमागे शेरेबाजी होत असावी याची मला खात्री आहे. पण अशा या टिकेला उत्तर देण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. आपण बरं, आपलं काम बरं असा माझा खाक्या होता. कॉलेज जीवनातही तसा काही अनुभव आला नाही. माझे ठराविक मित्र होते. काही नात्याचे आणि परिचयाचे विद्यार्थी होते.
कॉलेजला असताना आमच्या समोर डनलॉपचं गोडाऊन होतं. त्याच्या एका बाजूला मोकळी जागा होती. तिथे आम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळत असू. परंतु स्पोर्टस् विषयी मला फारसं आकर्षण नव्हतं. कॉलेजला पीरीयड्स नसले की मी राघववाडीत माझी सख्खी आत्या रहायची, तिच्या घरी किंवा शुभा खोटेच्या घरी गावदेवीला जात असे. फर्स्ट इयर आणि इंटरला मी शुभाचीच पुस्तकं वापरल्याचं आठवतं. तेव्हा ती प्रथा होती. कॉलेजला फायनल इयरला असताना ‘मदनदहनम् ‘ संस्कृत संगीतिका केली. त्याबद्दल पुढे येईलंच.
कॉलेज संपल्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. परंतु ती मिळायला १९६० साल उजाडलं. आमच्याच नातेवाईकांच्या ओळखीने हायकोर्टात क्लार्क म्हणून नेमणूक झाली. पगार तसा ठीक होता. परंतु आपण सिनेमात काम करावं किंवा पार्श्वगायक व्हावं म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील असं एक वेड डोक्यात शिरलं.
अर्थात सुरुवातीला उमेदवारी करावी लागणार होती. म्हणून ‘सिने प्लेबॅक सिंगर्स असोसिएशन’चा मेंबर झालो. संगीतकार आणि प्रसिद्ध भजनी बुवा स्नेहल भाटकरांबरोबर सदाशिवराव कवींच्या ‘तुकाराम’ सिनेमात कोरसला गायलोदेखील. पण ओळखीमुळे असोसिएशनतर्फे काम मिळालंच नाही. सिनेमात एक्स्ट्रापासून सुरुवात करावी लागणार होती. या क्षेत्रात यायचं असेल तर कोणीतरी गॉडफादर लागतोच. तसा मी शोधत होतो.
संगीत दिग्दर्शकांना भेटून काम मिळवणं माझ्यासाठी जरा अवघडच होतं. याबाबतीत माझा काका माझ्या मदतीला आला. तो प्रख्यात निर्माते बाबुराव पै (‘फेमस पिक्चर्स’चे मालक) यांच्या स्टुडियोत टाईमकीपर म्हणून काम करत होता. त्याच्या ओळखीने मदन म्हणून एक एक्स्ट्रा सप्लायरकडे आम्ही गेलो. त्याने मला पाहिलं आणि मधून मधून भेटायला सांगितलं. त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हते. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी रणजित (दादर) स्टुडिओच्या बाजूच्या गल्लीत जावं लागायचं. त्याच्या ओळखीनं मला दोन-तीन पिक्चर्समध्ये एक्स्ट्रा म्हणून काम मिळालं. ‘दोस्ती’ नावाचा जो सिनेमा होता त्यात सुधीरकुमारच्या ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’ या गाण्याच्या वेळी मी एका लँपपोस्टपाशी उभा असलेला स्वच्छ दिसतोय. शूटिंग ओवेंडन रोड, मलबार हिल इथे झालं होतं. तिथे अन्नपूर्णादेवी (पं. रविशंकरांची पत्नी) रहात होत्या. पैसे तसे काही फारसे नव्हते, पण काम मिळालं. दुसरे दोन चित्रपट होते त्यात एकात राजश्री-धर्मेंद्र आणि दुसऱ्यात नूतन आणि रेहमान असे कलाकार होते. नावं नक्की आठवत नाहीत. ‘दिल ने फिर याद किया’ (जुना) असावा. शूटिंग थोडावेळ थांबलं होतं. मी एका टेबलावर बसलो होतो. राजश्री माझ्या बाजूलाच उभी होती. समोरच धर्मेंद्र मांडी घालून बसला होता.
राजश्री एकदम धर्मेंद्रला म्हणाली, “काय रे जेवायला बसलायस काय? ” त्याला मराठी काही कळेना आणि ती हसत होती. थोड्या वेळाने मी त्याला खूण करून जेवणाची ॲक्शन करून दाखवली. त्याला कळलं आणि तो म्हणाला, हा! खाना खाना है। लावो दाल चावल.
दुसरं शूटिंग अंधेरीला होतं. त्यात नूतनचं नृत्य आणि गाणं आणि रेहमान व त्याचे पाहुणे असा सीन होता. नृत्य दिग्दर्शक नूतनजींना पदन्यास समजावत होता. त्या तशा नृत्यांगना नव्हत्या. त्यामुळे रीटेक बरेच झाले. थोडा उशीर झाला. पॅकअप झाल्यावर कळलं की, शेवटची ट्रेन निघून गेली आहे. आता खूप पंचाईत झाली. रात्रभर कुठे थांबणार? एका विचित्र प्रसंगात अडकलो होतो. एक्स्ट्रापैकी दोघेतिघे माझ्याकडे आले आणि म्हणाले, “अभी ट्रेन नहीं है । आप हमारे साथ चलो। सवेरे उठकर चले जाना ।” मला त्यांच्या वागण्यामुळे थोडा संशय आला. कदाचित मी नवीन आहे तेव्हा आयताच त्यांच्या हातात सापडेन असा त्यांचा अंदाज असावा. म्हटलं, “नहीं नहीं । मुझे घर जाना हैं। स्टेशनपर जाऊंगा और सवेरे की गाडीसे चला जाऊंगा।” त्यांचं न ऐकता मी सरळ स्टेशन गाठलं. नाहीतरी असिस्टंट डायरेक्टर मला म्हणालाच होता, “आप अच्छे घरके है। अच्छा है आप एक शरीफ डायरेक्टर के साथ काम कर रहे हो। दूसरा कोई होता तो आप बुरी तरह फँस जाते । ”
मी हायकोर्टात नोकरीला होतो तिथे ऑफिसमध्ये चहा द्यायला एक तरुण मुलगा यायचा. तो रणजित स्टुडियोकडे रहात होता. मी तिथे उमेदवारी करताना तो मला भेटला. तो म्हणाला, “अरे, यह तो रंडी का धंदा है। कायको यहाँ आते हो । । ”
स्टेशनवर आलो तर सर्व रिकामं होतं. सकाळची गाडी पाचच्या सुमारास असावी. तेवढा वेळ स्टेशनवर काढावा असा विचार केला.
कारण ते सुरक्षित होतं. पलीकडेच एक रेल्वेचं क्रॉसिंग गेट होतं. त्याच्या बाहेर थोडीशी गर्दी दिसली. म्हटलं पाहुया काय आहे? ते लोक अशाच एखाद्या वाहनाची वाट पहात असावेत. म्हटलं थोडावेळ इथे थांबून पहावं ! थोड्यावेळाने एक गाडी आली. त्यात तीनचार लोक होते. त्यातला एकजण उतरला आणि म्हणाला, “तारदेव जानेवाला कोई है? हमलोग तारदेव जा रहे हैं।” थोडा विचार केला, देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं, “मुझे तारदेव जाना है।” माणसं तशी सभ्य वाटत होती. अशातऱ्हेने नशिबाने ती गाडी मिळाल्यामुळे मी सुरक्षितपणे सोनावाला बिल्डिंगमधल्या त्यांच्या टेलरिंगच्या दुकानापाशी उतरलो. तीनच्या सुमारास घरी पोहोचलो.
काही दिवसांनी त्या दुकानात परत गेलो चौकशी करण्यासाठी. सगळी हकीकत सांगून म्हटलं, “उस दिन रातको आप लोगोंने मुझे छोडा था इसलिए धन्यवाद देने आया हूं.” ते म्हणाले, “हम आपको जानते नहीं और आपको किसने छोडा ये सब हम नहीं जानते । और हमारे पास गाडी भी नहीं है । ” दोन मिनिटं काय बोलावं सुचेना. हे जर ते लोक नाहीत तर ते कोण होते? की परमेश्वराने माझी सुटका करण्यासाठी दूत पाठवले होते? परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे!
यानंतर निश्चय केला. यापुढे या भानगडीत पडायचं नाही. ये अपने बस की बात नहीं है। १९५७ पासूनची माझी संगीताची सहा वर्षांची कमाई आणि १९६३-६४ पासून नाटक हे दोन विषय असल्यामुळे यापुढचा माझा प्रवास कसा झाला त्याबद्दल आपल्याला वाचायला मिळेलंच ! नोकरी सुरू होतीच.
नाटकांतून हळूहळू भूमिका मिळू लागल्या. सुरुवातीला नवीन कलाकारांवर जशी टीका होते तशी माझ्यावरही झाली. ती होणं अपरिहार्य होतं. अर्थात माझं काम मी चोख करत असे. त्यामुळे एक प्रामाणिक कलाकार अशी माझी प्रतिमा होती. त्यामुळे टीका झाली तरी माझं दिसणं, गाणं या जमेच्या बाजू होत्या. ‘लिटिल थिएटर’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘रंगशारदा’, ‘कलावैभव’, ‘नाट्य मंदार’, ‘चंद्रलेखा’ अशा नामवंत संस्थांतून कामं केली. पुण्याच्या ‘भरत नाट्य संशोधन मंदिर’, ‘वरद रंगभूमी’ (कोल्हटकर), ‘मराठी रंगभूमी’ (शिलेदार), ‘कलाद्वयी’, ‘बालगंधर्व रसिक मंडळ’ अशा संस्थांतूनही कामं केली. ज्या अर्थी मला या संस्थांमधून भूमिका मिळत गेल्या, त्या अर्थी माझ्यात थोडंफार कर्तृत्व असावं हे नक्की! १९६७ साली आलेल्या ‘सं. वासवदत्ता’ या नाटकाने मला नायकपदी नेऊन बसवलं. अर्थात तेव्हा आणि नंतरही टीका झालीच. अभिनय सुधारला पाहिजे. आवाजात मर्दानीपणा आला पाहिजे इत्यादि इत्यादि… या प्रक्रियेतून बहुधा बऱ्याच कलाकारांना जावं लागतं.
कधी कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टिंगलीला सामोरं जावं लागे. अशावेळी नैराश्य येई. अति झालं की आत्महत्येचेही विचार मनात येत. पण ती करण्याइतकं धैर्य माझ्यात नव्हतं. मग मी विचार करू लागलो, जे माझ्यावर टीका करतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व काय आहे? तर फारसं काही हाती लागलं नाही. ज्यांना आयुष्यात काही करणं जमत नाही ते इतरांची वैगुण्य शोधून टिंगल करतात. मग आपण अशा लोकांच्या टीकेला का महत्त्व द्यायचं? मागे एक गोपीकृष्णचा सिनेमा मला वाटतं “नवरे सगळे गाढव असतात” आला होता. त्यात माझीही एक भूमिका होती. त्यावेळी काही टिंगलखोरांनी मला विचारलं, “अरे तुझा सिनेमा सेंट्रलला लागला आहे. पाहिलास की नाही? ”
“मी म्हटलं, “माझा सिनेमा दुसऱ्यांनी पहावा. मला तो बघून काय उपयोग? हळूहळू पारितोषिकं मिळायला सुरुवात झाली. पहिलंच पारितोषिक नानासाहेब फाटक पुरस्कृत गणपतराव जोशी यांच्या नावाचं सुवर्ण पदक मिळालं. नंतर पुरस्कारांची लाईनच लागली. माझ्या घरी किर्लोस्कर, देवल ते केशवराव आणि बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर ते छोटा गंधर्व अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचे पुरस्कार आहेत. ते पाहून एकीकडे मानसन्मान आणि दुसऱ्या बाजूला टीका आणि टिंगल. हा काय प्रकार आहे असं वाटत असे. नंतर नंतर तर ज्यांनी सुरुवातीला माझ्यावर टीका केली, त्यांच्या हातूनच मला पुरस्कार आणि सत्कार प्राप्त झाले. ज्या आत्माराम भेंडेंनी मला आयएनटीच्या ‘आनंदी’ ( नाना जोग लिखित ) नाटकातून काढून टाकलं होतं. त्यांना जेव्हा ‘प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला त्यांच्याबरोबरीने मला ‘अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार’ (जीवनगौरव) मिळाला. कालाय तस्मै नमः ।
सत्कारांच्या वेळेस माझ्या व भेंडे कुटुंबियांसाठी काही आसनं राखीव होती. भेंडे कुटुंबवत्सल असून त्यांच्या सगळ्या सीट्स रिकाम्या होत्या आणि माझ्याकडच्या कुटुंबियांनी इतकी गर्दी केली होती की त्या रिकाम्या आसनांवर सगळे माझेच कुटुंबीय बसले होते. माझी ९० वर्षांची आतेबहीण लताताई लाड ही मुद्दाम पुण्याहून समारंभाला आली होती. मला म्हणाली, “एवढा मोठा समारंभ आणि माझ्या भावाचा सत्कार केव्हा पहाणार? म्हणून मुद्दाम आले!” आजपर्यंतच्या आयुष्यात खूप माणसं जोडली. ज्यांच्या पायाशी बसण्याची लायकी, त्यांच्याशी घरगुती संबंध जुळले. त्यांच्याबरोबर गप्पा, चर्चा करून ज्ञानाचं भांडार जमा केलं. पद्मश्री डॉ. दाजी भाटवडेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पुण्याचे लोक यांच्याशी घनिष्ट संबंध आले. एका सर्वसाधारण मुलाचं आयुष्य सार्थकी लागलं.
आता शरीर थकत चाललंय. वयाच्या ८४-८५ पर्यंत एकही औषध न घेणारा मी आता औषधावरच जगतोय. नशिबाने शुगर आणि प्रेशर हे दोन जीवघेणे आजार मात्र माझ्यापासून दहा हात लांब आहेत. प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहेच. आता आयुष्याचा निरोप घेण्याची वेळ आली आहे!
फक्त डॉक्टरला सांगितलंय, I don’t want to die as a patiant. I want to die as a performing artist.