टिप्पणी : ग़ज़लगो सुरेश भट, दुश्यंत आणि ग़ालिब

सुरेश भट आणि दुश्यंत कुमार हे दोघेही श्रेष्ठ ग़ज़लगो आहेत, हें निर्विवाद. मात्र, ज्या ग़ालिबच्या शायरीची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेली आहे, त्याच्या तुलनेत भट आणि दुश्यंत यांना कुणी ज्ञानवंत कदाचित् तुल्यबल ठरवूंही शकेल, पण त्यांना श्रेष्ठतर मात्र मुळीच ठरवूं शकणार नाहीं.



लोकसत्ता, मुंबई आवृत्तीच्या रविवार २४.१२.१७ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. राम पंडित यांची, ‘सुरेश भट आणि …’ या प्रदीप निफाडकरांच्या पुस्तकावर समीक्षा प्रसिद्ध झालेली आहे.

त्यातील दोनएक मुद्द्यांबद्दल हें पत्र. मी ज्या मुद्द्यांबद्दल लिहीत आहे, त्यांवरील राम पंडितांच्या भाष्याशी मी सहमत आहे.

एक गोष्ट उघड आहे, ती ही की सुरेश भट, ग़ालिब व दुश्यंत या तीन श्रेष्ठ ग़ज़लगोंची तुलना करण्याची कांहीं आवश्यकता आहे काय ? साहित्य-समीक्षेच्या पुस्तकात एक वेळ आपण तुलनात्मक अभ्यास समजूं शकतो. मात्र, प्रस्तुत पुस्तक तशा प्रकारचें नाहीं.

सुरेश भट आणि दुश्यंत कुमार हे दोघेही श्रेष्ठ ग़ज़लगो आहेत, हें निर्विवाद. मात्र, ज्या ग़ालिबच्या शायरीची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेली आहे, त्याच्या तुलनेत भट आणि दुश्यंत यांना कुणी ज्ञानवंत कदाचित् तुल्यबल ठरवूंही शकेल, पण त्यांना श्रेष्ठतर मात्र मुळीच ठरवूं शकणार नाहीं. परत, भटांना ग़ालिबपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचें कारण तर अगदी साहित्यबाह्य आहे. ग़ालिबच्या दृष्टीनें, पेन्शन मिळणें हा खरेंतर त्याचा हक्कच होता. त्यासाठी त्याला नाइलाज़ानें कंपनी सरकारचा उंबरठा झिजवायला लागला. आणि, तसें पाहिलें तर, आजच्या काळात ‘मटेरियल बेनिफिट’साठी सरकारची हांजी-हांजी करणारे साहित्यिक आपण पहात नाहीं काय? पण त्यांच्या साहित्यकृतींचा विचार करतांना असे साहित्यबाह्य मुद्दे ध्यानात घ्यायचे नसतात.

आतां दुश्यंत यांच्याबद्दल. जसें मराठी ग़ज़लच्या संदर्भात आपण ‘भटांपूर्वीची ग़ज़ल’ आणि ‘नंतरची ग़ज़ल’ असे भाग करतो व त्यानुसार विश्लेषण करतो, तसेंच हिंदी ग़ज़लच्या क्षेत्रात, ‘दुश्यंत से पहले’ आणि ‘दुश्यंत के बाद’ असे विभाग मानून विश्लेषण केलें जातें. म्हणजेच, या दोघांनीही आपापल्या भाषेतील ग़ज़लच्या क्षेत्रात एक नवीन युग निर्माण केलें. त्यामुळे, त्यांचे महत्व एक वेळ समतुल्य मानतां येईल, पण एकाला दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ मानतां येणार नाहीं.

परत, इथेंही भटांचे श्रेष्ठत्व काव्याच्या गुणवत्तेवरून नाहीं, तर अन्य कारणानें दाखविलें आहे. प्रत्येक कवी हा गुरु असतोच असें नाहीं. पण त्याच्या काव्याचा अभ्यास करतांना काव्याची गुणवत्ताच पहायची असते, किती शिष्य घडवले, हें नव्हे. आणखी एक गोष्ट ध्यानात घेणें महत्वाचें आहे. भट जरी व्याधिग्रस्त असत, तरी त्यांना दीर्घायुष्य लाभलें होतें. दुश्यंत यांचे वयाच्या केवळ ४२व्या वर्षीं निधन झालें !! त्यामुळे, किती शिष्य घडवले या निकषावरील दोघांची तुलनाही अनुचित आहे.

व्यक्तिश: मला सुरेश भट व दुश्यंत कुमार या दोघांबद्दलही आदर आहे ( आणि अर्थातच, ग़ालिबबद्दल आहेच आहे). फक्त अनुचित मुद्द्यावरून तुलना केली जाऊं नये, असें मला वाटतें. राम पंडित यांनी या बाबीचा योग्य तो समाचार त्यांच्या समीक्षेत घेतलेलाच आहे.

( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ३१.१२.२०१७)

– सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →