आज कुरुगड्डी या नावाने प्रसिद्ध असलेले हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आंध्र राज्यात कृष्णा स्टेशनपासून २७ किलोमिटर असून हे एका बेटावरच बसलेले आहे. श्रीपादवल्लभ या दत्तावताराचे हे तपःस्थान असून येथील एका गुहेत त्यांच्या पादुका व शिवलिंग आहे. गुरुद्वादशीला येथे मोठी यात्रा भरते. श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी आपला एक चातुर्मास येथे केला होता.
हे कुरवपूर म्हणजे ३ किलोमिटर रुंद अशा कृष्णेच्या प्रवाहामधले एक बेट – एक मैल लांब, अर्धा मैल रुंद असून एका टोकास गाव व मध्ये शेती आहेत. हल्लीच्या आंध्र राज्यांतर्गत रायचूर जिल्हा व तालुक्यातील हे एक खेडे आहे. अग्रहार नावाच्या हे नाममात्र उरलेल्या गावात कुरवपूर आहे. श्रीपादकाली ही दोनही गावे सुस्थितीत होती. श्रीपादमंदिर भागाची सरकारी दप्तरात हल्लीही ‘अग्रहार गाव’ म्हणून नोंद आहे.
येथे रोज पहाटे, दुपारी व रात्री नौबत व चौघडा झडत असून तो नौबतखाना इंदूरच्या माजी महाराणी सौ. इंदिराबाईसाहेब यांनी बांधला असून त्यांच्या कायम खर्चाची व्यवस्थाही त्यांनीच केली आहे.
येथे “श्रीपाद श्री वल्लभ” ग्रंथालय असून श्री. वामनराव गुळवणी महाराजांनी आपण प्रकाशित केलेले श्री टेंबे स्वामी महाराजांचे सर्व ग्रंथ ग्रंथालयास भेट दिलेले आहेत.
१) श्रीपाद श्रीवल्लभ जयंती (भाद्रपद शु. ४) (२) गुरुपौर्णिमा (भाद्रपद शु. १५) (३) विजया दशमी (४) गुरूद्वादशी (अश्विन व. १२ श्रीपादश्रीवल्लभअवतारासमाप्ती) (५) दीपाराधना (कार्तिक शु.१) (६) श्रीदत्तजयंती (मार्गशीर्ष शु. १५) (७) श्रीनृसिंह सरस्वती जयंती (पौष शु. २) (८) महाशिवरात्र (९) वसंतपूजा (चैत्र-वैशाख) (१०) श्रावणी वगैरे उत्सव श्रींच्या मंदिरात होत असतात. पहाटे पाच वाजता गर्भागाराचे द्वार उघडल्या नंतर भूपाळ्या, काकड आरत्या होऊन देवाची वस्त्रे काढतात व स्नान, पूजा, सकाळी ९.०० वा. अभिषेक, दुपारी १२.०० वा. महापूजा, आरती, नैवेद्य, रात्री ८.३० – ९.३० वा. आरती शेजारती.
येथील कृष्णेचे पात्र अत्यंत खडकाळ व हत्तीएवढ्या शिलांनी परिपूर्ण असल्याने येथे नावा चालू शकत नाहीत. हे स्थान मात्र अत्यंत जागृत आहे. येथे येण्याचे मार्गही फारसे माहीत नाहीत. श्रीगुरूचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर यांची माहिती दिली आहे.
येथे येण्याचे पहिला मार्ग: – सोलापूर-गुंटकल ब्रॉडगेज रेल्वेने रायचूर स्टेशन गाठावे. रायचूर जिल्ह्याचे ठिकाण आहे. तेथे उतरून गावच्या गाजगार या शेवटच्या गल्लीनी फकीरया छावणी यांच्या धर्मशाळेत यावे. कुरूगड्डीस जाण्यास बसेस येथून जवळूनच सुटतात. बैलगाड्याही येथे मिळतात. स्टेशनपासून ही धर्मशाळा चार किलोमीटरवर आहे. रायचूर ते गद्वालची बस रायचूर सिटी सिनेमाजवळून सुटते. या बसने यापलदिन्नी गावालगत उतरावे.
तेथून चालत वा छकडी गाडीने अतकूर खेड्यास यावे. तेथे पूर्वीच्या उत्तरादी मठाच्या स्वामींच्या समाधी आहेत. मठही होता. तो पडून गेला. कुलकर्णी कर्ण व जोशी दोनच ब्राह्मणांची घरे आहेत. अवेळी येथे आल्यास उतरण्याची सोय येथे आहे. येथून चार फर्लांगावर कृष्णाकाठ असून नदीपार करविणारे लोक येथेही आहेत. कृष्णेचे दोन प्रवाह येथून पार व्हावे लागतात. मात्र उन्हाळ्यातच हे लोकांच्या उपयोगाचे. पावसाळ्यात उपयोगी येणारे फक्त कुरूगड्डीचे लोक आधी पूजा-यात्रा कळविल्यास ते या लोकांना पाठवतात अथवा नदीकाठाने मोठी आरोळी ठोकल्यास ते लोक येतात.
दुसरा मार्ग: – सोलापूर-गुंटकल या ब्रॉड गेजने रेल्वेने रायचूरच्या अलीकडे कृष्णा नावाचे स्टेशन आहे. तेथे उतरल्यास (१) भागी गुंडप्पा शेट्टी आदवामी (२) रायचूर विश्वनाथ शेट्टी (३) रायचूर फकीरया छावणी व (४) हैदाराबाद गोविंद नाईक अशा चौघांच्या धर्मशाळा असून त्यांत शेवटची प्रशस्त आहे. यांखेरीज कृष्णाकाठी एक शिवालय व नजीकच दत्तमंदिरही आहे. संन्याशांना ही जागा चांगली आहे. येथील वस्ती बरीच असून वैदिक ब्राह्मणही पुष्कळ आहेत. दिनकर्म करण्याकरता फार पुरातन काळापासून लोक येथे येत असतात.
उत्तरेकडून येणाऱ्या प्रवाशांचे वरील दोन मार्ग झाले. मखथल गावापासून १५ किलोमीटरवर मधनगोड नावाचे खेडे आहे. या खेड्यापासून २ किलोमीटरवर श्रीपादगुंड म्हणून नावाने ओळखली जाणारी एक मोठी शिला आहे. येथे या शिलेस पानवट्टल असून तेथे पादुका आहेत. या सभोवती सुन्दर मंदिर बांधलेले असून पुढे सभामंडप आहे. बल्लमेश ब्राह्मणाला चोरांनी ठार केलेले व श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रगट होऊन चोरांना मारून वल्लभ ब्राह्मणास जिवंत केले; तेच हे ठिकाण म्हणून दाखवले जाते.
Contributor: मराठीसृष्टी टिम
