संस्कृत साहित्याच्या क्षेत्रात महाकाव्यांचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्य असोत की कुमार संभवम् , रघुवंशम् अशी संस्कृत महाकाव्याची पंचप्राण म्हटली गेलेली पंचमहाकाव्य असोत संस्कृत साहित्याचे हे अत्यंत वैभवशाली दालन आहे.
केवळ प्राचीन काळातच अशी भव्य दिव्य काव्ये लिहिल्या गेली असे नाही तर गेल्या शतकात लिहिलेले असे अत्यंत महत्त्वपूर्ण महाकाव्य म्हणजे प्रज्ञाभारती श्री भा. वर्णेकर लिखित शिवराज्योदयम् !
छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी संस्कृतीचा प्राण. भारतीय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे स्थान कोणत्याही देवतेपेक्षा कमी नाही. समाजातील आदर्शतम महापुरुष म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासत असतो. याच कारणाने महाकाव्याला योग्य अशा प्रकारचे नायक चरित्र या स्वरूपात प्रज्ञा भारती वर्णेकर महोदयांनी शिवराज्योदयम् या महाकाव्याची रचना केली.
एकमेव महाकाव्य. तब्बल ६८ सर्गांमध्ये, सुमारे ४००० श्लोकांच्याद्वारे, प्रामुख्याने वीर रसावर आधारलेले हे महाकाव्य साकारले आहे.
पहिल्या सर्गात मंगलाचरण सोबत सहा ऋतूंचे वर्णन करण्यात आले आहे. दुसऱ्या सर्गात महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला वंदनीय असणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा प्रसंग चौथ्या सर्गात वर्णन करण्यात आला असून पुढे त्यांचे बालपण, शिक्षण यांचे सविस्तर वर्णन असून सातव्या वर्गात ते राजधानी विजापूरला जातात तो प्रसंग वर्णन करण्यात आला आहे.
जाताना आणि परत येत असताना जनतेच्या दुःखाने व्यथित झालेल्या शिवाजी महाराजांनी यावर आपणच उपाय शोधायचा हा संकल्प कसा मनात रुजवला त्याचे वर्णन असून दहाव्या सर्गात प्रत्यक्ष स्वराज्य स्थापनेचे वर्णन आले आहे.
अकराव्या ते सोळाव्या सर्गापर्यंत श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विकासासाठी केलेले विविध प्रयत्न, त्यात आलेले अडथळे, त्यावर त्यांनी केलेली मात इत्यादी वर्णन केले आहे.
सतराव्या सर्गा पासून तिसाव्या सर्गापर्यंत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग असणाऱ्या अफजल खान वधाचा अनेकांगी विचार मांडला आहे. शेवटी आई जिजाऊ साहेबांना झालेल्या आनंदाचे सविस्तर वर्णन आहे. पुढे वेगवेगळ्या सर्गांमध्ये सिद्धी जोहर ,शाहिस्तेखान यांचे आक्रमण व त्यांचा पाडाव, पुरंदरचा तह, छत्रपतींचे पकडले जाणे, दिल्ली दरबारातील प्रसंग, आग्र्यातून सुटका असे सर्व महत्वपूर्ण प्रसंग एक एक दोन दोन सर्गांमधून वर्णन केले आहेत.
सिंहगढ विजय:, छत्रसाल प्रबोधनम्, पर्णालविजयः, गागाभट्ट संकल्प: अशा प्रत्येक सर्गाच्या नावातच त्या त्या भागात काय वर्णन केले आहे हे सहज लक्षात येते. ६३ व्या सर्गामध्ये आई भवानी मातेची प्रार्थना करून स्वराज्याच्या छत्रपती पदावर झालेला अभिषेक पुढे ६८ व्या सर्गापर्यंत वर्णन करण्यात आलेला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेल्या या महाकाव्याच्या माध्यमातून शिवकालीन सामाजिक, आर्थिक, नैतिक , राजकीय वर्णन वेगवेगळ्या पैलूंसह स्पष्ट होत असल्याने आधुनिक काळातील महाकाव्य म्हणून हे महाकाव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
वैष्णवी नगाजी हनवंते
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए भाग २
दि. २४. ११. २०२२
