शिशुपालवधम्

संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाकाव्य म्हणजे महाकवी माघ विरचित शिशुपालवधम्

इ. स. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा माघाचा काळ मानला जातो. शिशुपालवधाच्या अखेरीस जोडलेल्या पाच श्लोकांत महाकवी माघाविषयीची माहिती तृतीय पुरुषी निवेदनात दिलेली आहे. त्यावरून त्याच्या पित्याचे नाव दत्तक सर्वाश्रय होते असे दिसते. त्यांचे आजोबा सुप्रभदेव हा वर्मल नावाच्या कोणा राजाचा मंत्री होते अशी देखील माहिती ह्या श्लोकांमधून मिळते.



संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाकाव्य म्हणजे महाकवी माघ विरचित शिशुपालवधम्

इ. स. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा माघाचा काळ मानला जातो. शिशुपालवधाच्या अखेरीस जोडलेल्या पाच श्लोकांत महाकवी माघाविषयीची माहिती तृतीय पुरुषी निवेदनात दिलेली आहे. त्यावरून त्याच्या पित्याचे नाव दत्तक सर्वाश्रय होते असे दिसते. त्यांचे आजोबा सुप्रभदेव हा वर्मल नावाच्या कोणा राजाचा मंत्री होते अशी देखील माहिती ह्या श्लोकांमधून मिळते.

शिशुपालवधम् महाकाव्यात वीस सर्ग असून त्याची श्लोकसंख्या १६४५ आहे. शिशुपालवधाचा आरंभ आणि प्रत्येक सर्गाचा शेवट ‘श्री’ कारने झाला आहे. प्रस्तुत महाकाव्याचे नायक भगवान श्रीकृष्ण असून हे महाकाव्य वीररसप्रधान आहे.

शिशुपालवधम् महाकाव्यातील मूळ कथा, महाभारताच्या सभापर्वातील असून मूळ कथा थोडक्यात अशा स्वरूपात पाहता येते.

राजसूय यज्ञाच्या प्रसंगी अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला दिला परंतु शिशुपालाने त्यास आक्षेप घेऊन कृष्ण-भीष्मांची अतिशय निंदनीय शब्दात अत्यंत कठोर निर्भत्सना केली. शिशुपालाच्या आईस दिलेल्या वचनानुसार कृष्णाने त्याचे शंभर अपराध पोटात घातले परंतु शिशुपालाने राजसूय यज्ञाच्या प्रसंगी वरीलप्रमाणे वर्तन करून ही अपराधांची मर्यादा ओलांडल्यानंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला.

महाभारतातील या मूळ सरळ कथेत माघाने बराच बदल केला आहे. कृष्णाचा इंद्रप्रस्थापर्यंतचा प्रवास, वाटेतील रैवतक पर्वताचे वर्णन, श्रीकृष्णाला आपली फलपुष्पसेवा अर्पण करण्यासाठी त्या पर्वतावर प्रकटलेल्या सहा ऋतुंचे वर्णन, यादवांच्या विलासक्रीडा, इ. अनेक वर्ण्यविषय माघाने आपल्या काव्यात स्व प्रतिभेने रंगवले आहेत. ते काव्यानुकूल असले, तरी ते कथेचा ओघ खंडित करतात. त्यामुळे पहिल्या तीन सर्गानंतर मूळ महाभारतात असलेले कथानक नंतर थेट तेराव्या सर्गातच प्रकट होते.

माघाने शिशुपालवधाची रचना भारवीकृत किरातार्जुनीय या महाकाव्याच्या नमुन्यावर आणि भारवींपेक्षा काव्यगुणांमध्ये अधिक श्रेष्ठ काव्य निर्माण करण्याच्या हेतूने केली आहे हे दोन्ही काव्यांची संरचना, त्यांचा घाट, वृत्तयोजना, अलंकाररचना, चित्रबंध आणि प्रसंगसाम्य पाहता दिसून येते.

व्याकरण, राजनीती, काव्यशास्त्र, वैद्यक इ. विविध विषयांतील आपले प्राविण्य दाखविण्याची महाकवी माघांची वृत्ती, तसेच चित्रबंधरचना, अलंकारांची अतिरेकी सजावट यामुळे कवित्वशक्ती अनेक ठिकाणी गुदमरून गेली आहे, तसेच काव्यरचनेत कृत्रिमताही आलेली आहे असे अनेक समीक्षक मानतात भाषाप्रभुत्व, अभिनव शब्दयोजना, कल्पनाविलास ह्यांतून रसिकांना आव्हानप्रद ठरणारी जटिल शब्दरचना या महाकाव्यात सर्वत्र पाहावयास मिळते.
उत्तरकालीन अभिरुचीचा आणि काव्यरचनेचा माघ हा आदर्श ठरला.

उपमा कालिदासस्य
भारवे: अर्थगौरवम्!
दण्डिन: पदलालित्यं
माघे सन्ति त्रयोगुण:!

या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे कालिदासाचे उपमाकौशल्य, भारवीचा अर्थगौरव आणि दंडीचे पदलालित्य हे तीनही गुण माघाच्या या महाकाव्यात एकवटले आहेत, असे प्राचीनांचे मत होते. भारवीच्या किरातार्जुनाप्रमाणे माघाचे शिशुपालवधही लोकप्रिय होते, हे त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक टीकांवरून स्पष्ट होते.

मूळ महाभारतात असणाऱ्या एका सामान्य कथेला आपल्या प्रतिभेने महाकाव्याचे रूप देणाऱ्या माघांचे स्थान संस्कृत साहित्यात या काव्याने अजरामर झालेले आहे.

ज्योत्स्ना रवींद्र पावडे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. २९. ०६. २०२२

Author