रघुवंशम् हे सूर्यवंशाचा इतिहास सुबोध आणि अनुसरणीय स्वरूपात रंगविणारे कविकुलगुरू कालिदासांचे १९ सर्गाचे महाकाव्य आहे.
रघुवंशाचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यातील विविध गुणसंपन्न व्यक्तीचित्रे. रघुवंशातील हे महान राजे एरव्ही इतिहासाच्या पानांमध्ये आपला मोठेपणा हरवून गेले असते. पण कालिदासांनी त्यांच्यातली मानवता, वेदना, संवेदना, नेमकी पकडलेली आहे. त्यामुळे हे राजे आपल्या गुणांच्या झगमगाटाने समस्त रसिकांना दीपवत आपल्या हृदयात जाऊन बसतात.
निरपत्यतेच्या वेदनेने हळवा झालेला, ग्रामस्थ गोपालांची विचारपूस करणारा दिलीप, गुरुदक्षिणा मागायला आलेला कौस्त्य विमुख जाऊ नये म्हणून धडपडणारा रघु , मृगाचे नेत्र पाहून पत्नीची आठवण होणारा अज, अजाणत्या कृत्यामुळे मिळालेल्या शापाचा बळी झालेला दुर्दैवी दशरथ, पर्वता सारखे दुःख झेलून राज कर्तव्यासाठी पत्नीचा त्याग करणारे अलौकिक श्रीराम, कामुक असूनही अनुपम कलाविज्ञानाने चटका लावणारा अग्निवर्ण या व्यक्तिरेखा अविस्मरणीय आहेत.
रघुवंशाचा विषय एकजिनसी नाही. ही एक चित्र मालिका आहे. मुळातील ही विविधता प्रत्येक चित्रातील वेगवेगळ्या प्रसंधयोजनेमुळे आणखी खुलली आहे. मनाच्या तटस्थपणात जिवंत संवादाचा रुचीपालट वारंवार आला आहे.
कालिदासांची वर्णने संयमित आहेत. कथेचा योग सोडून ती वाहत जात नाही. प्रदीर्घरचनेत निवेदन अपरिहार्य असते. पण रघुचा दिग्विजय, दशरथाची मृगया, रामाचा लंके होऊन अयोध्याकडे प्रवास, ठिकाणी अलंकृत शैलीचे रंग पसरून किंवा भावमृदु आठवणींचा गंध भरून कालिदास आस्वादनाला उणे पणा येऊ देत नाही.
शब्दप्रभुत्व, वृत्तरचनेची कौशल्यता, सहज सौंदर्याने नटलेली कुलकन्येसारखे प्रसन्न, मधुर,कांत अशी शैली, स्वर झंकारसारखी निनादणारी सुभाषिते आणि ओझड उपमा हे कालिदासाच्या कालाविलासाचे वैभव आहे.
निपुत्रिक दिलीप राजास कामधेनुकन्येच्या सेवेने झालेलीपुत्रप्राप्ती,रघुचेबालपण, राज्याभिषेक ,दिग्विजय आणि विश्वजित यज्ञ, अज- इंदुमतीचा स्वयंवर पूर्वक विवाह, स्वर्गीय माला हृदयावर पडून इंदुमती चा मृत्यू अजाचा करून विलाप आणि आत्महत्या, श्रावण हत्येमुळे शापित दशरथाचे जीवन, रामायणाची करुणोदात्त कथा, कुशाला राजलक्ष्मी चे स्वप्नात दर्शन, अयोध्येची पुनः स्थापना, आणि कुशाचा राजकारभार, कुशाचा वंशज आणि पुढील 21 राजे यांची राजवट, सुदर्शन याचा पुत्र या विलासी पण कलावंत राजाच्या मृत्युने अखेर,अशी रघुवंशाची रचना मांडलेली आहे.
‘कवीयशप्रार्थी’कालिदासांनी वंशाचा इतिहास तर मांडलेला आहेच, पण या महाकाव्यात चार आश्रमांचे आणि पुरुषार्थाचे वैभवही त्यांनी सुचित केलेले आहे. रघुवंशीय राजांनी गृहस्थाश्रम भोगला तो वंशवर्धनाचे कर्तव्य म्हणून ,शत्रूंवर पराक्रम गाजवला तो राज्य शासनाचा आब राखण्यासाठी, मितभाषित्व स्वीकारले, सत्याला वाचा फुटावी म्हणून, अपार वैभव मिळवले ते दानाला मर्यादा पडू नये म्हणून, समर्पित जीवनाचा कर्तव्य निरत भोगाचा हा आदर्श समाजाला उन्नतीला नेल्या वाचून राजणार नाही अशी श्रद्धा या महाकाव्यात आहे. हे महाकाव्य मनाला भुरळ घालणारे आहे. ज्याने एकदा ते वाचले तो मोहित झाल्या वाचून राहिला नाही.
कु. दीक्षा दुर्वास तेलंग
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए.भाग २
दि. २०. ०७. २०२२
