प्रेरणा देणारी पुस्तकांची पायवाट

शिक्षक व पुस्तके काय घडवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भालचंद्र मुणगेकर यांचे असा मी घडलो हे आत्मचरित्र होय. अतिशय प्रांजळपणे टिपकागदा प्रमाणे सर्व घटना टिपणारे.हे पुस्तक केवळ भाषेचा डोलारा, उपमा, अलंकार याचा कृत्रिम स्प्रे नसून हा वास्तवाचा दस्तावेज आहे.यात मी नसून आम्ही,आमचं नसून आपलं याचं प्रतिबिंब दिसतं.



शिक्षक व पुस्तके काय घडवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भालचंद्र मुणगेकर यांचे असा मी घडलो हे आत्मचरित्र होय. अतिशय प्रांजळपणे टिपकागदा प्रमाणे सर्व घटना टिपणारे.हे पुस्तक केवळ भाषेचा डोलारा, उपमा, अलंकार याचा कृत्रिम स्प्रे नसून हा वास्तवाचा दस्तावेज आहे.यात मी नसून आम्ही,आमचं नसून आपलं याचं प्रतिबिंब दिसतं.

ही केवळ कुलगुरू पदापर्यंत पोहोचलेल्या हर्षाची कहाणी नाही. कुलगुरू हा केवळ समाजव्यवस्थेचा बायप्रॉडक्ट नसून समाजव्यवस्थेने घडविलेलं शिल्प असु शकतं याची प्रचिती येते. मूलभूत प्रेरणा समाजव्यवस्थेतूनच घडतात. सामाजिक व्यवस्थेतून आवश्यक ते खत, पोषण मिळालं तर जात दुय्यम ठरुन ती यशावर, नियतीवर मात करते.

मी असं घडलो ही कहाणी नसून संघर्षाची कहाणी आहे. सांगण्यासारखं अशयसमृद्ध, रंगीबेरंगी, इंद्रधनू कथानक असताना सगळा सारीपाठ उलगडून न दाखवता केवळ १८ वर्षापर्यंतचा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट उलगडून दाखवण्याचा संयमित पणा कौतुकास्पद आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुलतात. पण पुढील आयुष्यात गुणात्मक रित्या अथवा मूलभूत पणे मी नवीन काही शिकलो असे मला वाटत नाही हा व्यवस्थेशी प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे.४४ वर्षांपूर्वीच्या आठवणी व त्यातील जगण्याच्या मूलभूत प्रेरणा व पुढे त्याचा विस्तार व्यक्ती,संस्थांमुळे निखालसपणे अधिक पक्क्या झाल्या.

मी अनेकांच्या त्यागातून उभा राहिलो. उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट पुस्तके, काही धडे यामधून मानसिक उभारणी, प्रेमातून आत्मविश्वास निर्माण करणारं कोकणच समृद्ध वातावरण ही शिदोरी ए त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मी कुठेच डोकावत नाही.

अतिशय प्रामाणिकपणे संगणकात फीड केल्याप्रमाणे सर्व आठवणी आपल्यासमोर येतात.प्रज्ञा किंवा वरून आज्ञा असल्याशिवाय मोठी पदे मिळाणे तसे दुर्मिळच, पण या अर्थतज्ञाची पाळेमुळे खूप खोलवर समाज व्यवस्थेमुळे अशी काही पोसली गेली आहेत की वृक्ष बहरणारच. प्रत्येकाच्या आयुष्याचा गुलमोहर होणं किंवा निवडुंग होणं हे समाजव्यवस्थेच्या पोषणावरच अवलंबून असावं. मराठी साहित्य, धडे, कविता पाठांतर, दुसरीतच बाल रामायण पाठ होणं. वर्गात पहिला येण्याचा निश्चय करणं व अमलांत आणणं. पाचव्या वर्गात असताना भाषण, दहा अकरा तास सतत अभ्यास ही चुणुक अडीच-तीन हजार वस्तीच्या मुणगे गावातही असू शकते. संबंध आयुष्यभर पुरेल इतका आत्मविश्वास ज्या शाळेने, शिक्षकांनी दिला त्यांचा कित्ता आजच्या व्यवस्थेने गिरवायला हवा.

जीवन निष्ठा पक्क्या करण्यामध्ये चैत्यभूमी, नवभारत विद्यालय व नंदादीप हे वि. स. खांडेकर यांचे निवासस्थान या ठिकाणी जाऊन कृतज्ञता व्यक्त करणं हे कर्मकांड नव्हे तर कर्तव्य आहे असं ते म्हणत. सामाजिक भावना व विकसनशील मानवी जीवनाचा आत्मा आहे हे सांगणारे वि. स. खांडेकर प्रमाण मानणं. क्रौंचवध मधील विलक्षण प्रभावामुळे रिझर्व बँकेची नोकरी सोडणं हे सामान्य माणसाचं काम नव्हे. वयाच्या सातव्या वर्षी शाळेत दाखल झाल्यानंतर तिसरीला काठावर पास झाल्यानंतर चौथीपासून पहिला येण्याचा निर्णय निश्चयपूर्वक अमलात आणला. तरखडकरांची तीन भाषांतरे पाठ करणे. पहिलीत सगळी मुळाक्षरे, बाराखडी, १०० पर्यंत आकडे, वळणदार अक्षर व यासाठी पोषक वातावरण, शिक्षक यामुळे शक्य झाले. दुसरीतच संपूर्ण बाल रामायण पाठ होणे हे संस्कार व्यक्तिमत्त्वाला आकार देणारेच. आम्ही मुण गेकरांना शिकवलं नाही त्याचे वाईट वाटते असे काही शिक्षक म्हणायचे.धडे व कवितांचा भावविश्वावर इतका परिणाम झाला की त्या त्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. मुणगेकर तुझे निबंध वाचताना ते मार्क देण्यासाठी लिहिले आहेत असे वाटतच नाही. अशा निबंधाला काय मार्क देणार? हा शिक्षकांनाही प्रश्न पडायचा. सगळे शिक्षक, धडे, कविता आठवणे व तसेच स्वतःला घडवणे हे सोपे काम नव्हे. हे पाहिल्यावर आजच्या शिक्षण पद्धतीतील पोकळपणा जाणवतो. परिस्थितीवर मात केली तर जात नावाची कवचकुंडले कुठल्याकुठे गळून पडतात. चाळीस वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक साकारताना कुठेही जातीमुळे, समाजामुळे सेटबॅक मिळाला याची खंत नाही. वस्तुस्थिती म्हणून दलित असणं हा योगायोग होता पण त्याचा वियोग न करता त्यांचे जीवन म्हणजे व्यक्ती, साहित्य यावर पोसलेली एक ललित कथाच आहे.

असेच आमचे शिक्षक असते , अशीच आमुची शाळा असती तर आम्हीही चांगले घडलो असतो.. ही वेदना हे आत्मचरित्र चरित्र वाचल्यावर सलत राहते. आयुष्यात कोणतेही कटू प्रसंग डिलिट न करता आपल्या समोर येतात ते वस्तुस्थिती म्हणून, सहानुभूती म्हणून नाही.

जगण्याचं प्रयोजन पक्क असले की ठरवून लिहिलं जात नाही,तर जे लिहिलं जातं तेच साहित्य म्हणून समोर येत.

सामाजिक पोषण सकस असलं ती जात,दलित असणं कुठेच आड येत नाही. या आत्मचरित्रात केवळ वेदनेचा हुंकार नाही तर हे संस्काराचं आगार आहे. परिस्थितीवर मात केली तर जात नावाची कवच कुंडले कुठल्या कुठे गळून पडतात. आयुष्यभर पुरेल इतका आत्मविश्वास शाळेतील शिक्षकांनीच दिला. ज्या नियतीने सुपारी विकायला लावले तिला हात दाखवून तिचे नियोजन करून त्यांनी नियतीलाच सुपारी दिली.संघर्ष करणाऱ्या साठी ही ज्ञाने श्र्वरी आहे.पारायण करावी अशी एक तरीओवी अनुभवावी अशी.

अशी माणूस घडविणारी पुस्तके आजच्या मुलांनी वाचायलाच हवी. चांगली पुस्तकें सुद्धा पायवाट असते आपल्याला घडविणारी.

Author