आगमनाची प्रतीक्षा मज
तू श्वासांची शृंखला..
भावनांची विश्वस्त ठेव
तू सागरीचा शिंपला ..
काट्यात अडते पाऊल
तू फुलांचा सडा..
ह्रदयाच्या काठोकाठ
भरला प्रेम घडा..
रात्र चांदण्यांची नक्षी
तू चंद्र शीतल..
सांज आठवांची मैफिल
तू क्षितीज तरल..
सूर ताल लय संगीत
तू छेडीता तारा..
सप्तरंगी सजते इंद्रधनु
तू रंगांचा नजारा..
उन्मळून पडल्या पानांची
तू नवी पालवी..
जुन्या वळणावरती
तू वाट नवी..
फुला पानांत निजलेल्या
तू दवांच्या ओळी..
सुख स्वप्न साकार व्हावे
पहाटेच्या वेळी..
पुसटशी हातावरची
तू माझी जन्मरेख..
जन्मभर आखला हा
प्रेमाचा आलेख..