विश्वविख्यात पंडित विष्णू शर्मा यांनी पाचव्या शतकात रचलेल्या संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्विख्यात संग्रह म्हणजे पंचतंत्र.
त्याचे एकूण पाच भाग असून प्रत्येक भागास ‘तंत्र’ अशी संज्ञा आहे. प्रत्येक भागाचा विस्तार एका मुख्य कथेच्या आधारे दुसऱ्या कथा रचून केला गेला असल्यामुळे त्याला ‘तंत्र’ ही संज्ञा दिली गेली असणे शक्य आहे. पंचतंत्राच्या आरंभी एक लहानसे ‘कथामुख’ आहे. त्यात ह्या संग्रहातील कथा कोणत्या निमित्ताने सांगितल्या गेल्या, त्याची माहिती आहे. ती पार्श्वभूमी अशी की दक्षिण देशी, अमरशक्ती ह्या नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला वसुशक्ती, उग्रशक्ती आणि अनेकशक्ती असे तीन राजपुत्र होते. हे तिघेही विवेकशून्य आणि शास्त्रविमुख होते. त्यांची बुद्धी जागृत करावी अशी राजाची इच्छा होती. म्हणून त्याने सुमती नावाच्या एका मंत्र्याच्या सल्ल्यावरून विष्णुशर्मानामक एका विद्वान ब्राह्मणाला पाचारण करून त्यास आपल्या मुलांना राजनीती अणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहारज्ञान शिकविण्याची विनंती केली.
विष्णुशर्म्याने ज्या कथांद्वारे ह्या राजपुत्रांना उपदेश करून शहाणे केले, त्याच कथांचा संग्रह म्हणजे पंचतंत्र.
ह्या बोधकथासंग्रहाचा काळ निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. तथापि तो इसवी सनाचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकाच्या मागे नेता येत नाही असे मानण्याकडे पंडितांचा कल आहे. मात्र इ. स. पाचशेच्या सुमारास तो अस्तित्वात होता, असे निश्चितपणे म्हणता येते.
पंचतंत्रातील पाच तंत्रांना (१) मित्रभेद, (२) मित्रसंप्राप्ती, (३) काकोलूकीय किंवा संधि-विग्रह, (४) लब्धप्रणाश (मिळालेले घालविणे) आणि (५) अपरिक्षितकारित्व (घाईने केलेली कृती) अशी नावे आहेत. प्रत्येक तंत्राचे नाव त्याच्या आरंभीच सांगितले आहे आणि मुख्य कथेचे सूचन करणारा एक ‘आद्य श्लोक’ ही दिलेला आहे. उदा., ‘मित्रभेद’ ह्या पहिल्या तंत्राच्या आरंभी –
वर्धमानो महान्स्नेहः सिंहगोवृषयोर्वने।
पिशुनेनातिलुब्धेन जंबुकेन विनाशितः।।
(वनामध्ये सिंह अणि बैल ह्यांची वाढती मैत्री एका दुष्ट आणि अतिलोभी कोल्ह्याने नाहीशी केली) असा आद्य श्लोक आहे.
हा श्लोक गुरू विष्णुशर्मा ह्याने उच्चारल्याचे पंचतंत्रात स्पष्ट म्हटलेले नसले, तरी तसे गृहीत धरता येईल. ह्या श्लोकावर राजपुत्र ‘असे कसे झाले?’ असा प्रश्न विचारतात आणि मग पिंगलक नावाचा सिंह आणि संजीवक नावाचा बैल ह्यांच्या मैत्रीत एका कोल्ह्याने फूट पाडल्यामुळे अखेर पिंगलकाने संजीवकास मारले, ही ह्या तंत्रातील मुख्य कथा विष्णुशर्मा सांगतो.
कथेत येणाऱ्या उपकथांचा आरंभ असाच एखाद्या श्लोकाने होतो परंतु ह्या उपकथा कथेतली पात्रे सांगतात, अशी योजना आहे.
मित्रभेद कसा केला जातो, हे पहिल्या तंत्रात सांगून झाल्यानंतर ‘मित्रसंप्राप्ती’ ह्या दुसऱ्या तंत्रात कपोतराज चित्रग्रीव, त्याचा मित्र मूषक हिरण्यक, हिरण्यकाची मैत्री संपादन करणारा कावळा लघुपतनक, त्याचा मित्र कासव मंथरक आणि शेवटी ह्यांना येऊन मिळणारा मृग चित्रांगद ह्यांच्या मैत्रीची कथा आहे.
‘संधि-विग्रह’ किंवा ‘काकोलूकीय’ ह्या तिसऱ्या तंत्रात कावळे आणि घुबडे (काक व उलूक) ह्यांच्या वैराची मुख्य कथा असून कावळ्यांचा राजा मेघवर्ण हा आपल्या सचिवाच्या–स्थिरजीवीच्या–कपटनीतीचे अवलंबन करून उलूकराज अरिमर्दनाची गुहा जाळून टाकतो, असे दाखविले आहे.
‘लब्धप्रणाश’ म्हणजे हाती आलेले घालविणे. ह्या चौथ्या तंत्रात हाती आलेले वानर सुसराने कसे घालविले, ती कथा आहे आणि पाचव्या तंत्रात परिस्थिती नीट समजून घेण्यापूर्वीच जो घाईने कृत्य करतो, त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ कशी येते, हे एक ब्राह्मण आणि मुंगूस ह्यांच्या कथेतून दाखविले आहे.
पंचतंत्रात आढळून येणारी गद्यशैली साधी पण वेधक आहे. विविध कथांचे सार कलापूर्ण, सुभाषितात्मक श्लोकांत देण्याची पद्धती पंचतंत्राने अवलंबिलेली आहे. उपदेश करणे हा प्रधान हेतू असूनही त्यातील कथांची मनोरंजकता कमी झालेली नाही. अनेक शतके आणि अनेक ठिकाणी ज्यांतील कथा पिढ्यान् पिढ्या मोठ्या आवडीने वाचल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, अशा काही थोड्या ग्रंथांमध्ये पंचतंत्राचा समावेश होतो.
पन्नासांवर भाषांत पंचतंत्र अनुवादिले गेले आहे, ह्यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येऊ शकेल.
कु. विशाखा नरेंद्र सुगरवार
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. १४. ०९. २०२२
