गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.
आतापर्यंतचा, दिवसभराचा प्रवास चांगला झाला होता. इतर सहप्रवासीही चांगले होते. एक, साठीच्या जवळपासचा, उंचापुरा, गोरापान, अतिशय दणकट शरीरयष्टीचा, निळ्या डोळ्यांचा सरदारजी तिच्या समोरच्या सीटवर होता. त्याचा श्रीमंती पेहराव, मोकळेपणाने गप्पागोष्टी करणे व हसतमुख असणे यामुळे तो सहज सर्वांचे लक्ष वेधून घे होता. डब्यातील सर्वांशी त्याने अल्पवेळेतच ओळख करून घेतली होती.ने पाचही बोटांत वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या घातल्या होत्या. सोन्याचा पट्टा असलेले घड्याळ मनगटावर चमकत होते. गळ्यात चकाकणारा सोन्याचा रूंद गोफ होता. तो जणू श्रीमंतीचे प्रदर्शन करीत असावा असे मीनलला वाटून गेले होते व थोडे खटकलेही होते. प्रथमदर्शनीच काहीसा प्रतिकूल ग्रह त्याच्याविषयी तिच्या मनात निर्माण झाला होता आणि प्रत्येक वेळी तो सर्वांना म्हणायचा, ‘आओ, चाय पिओ, थोडासा खालो.’ मीनल स्वतःच्याच मनोराज्यात दंग असल्याने तिने त्यांच्याकडे अद्याप दुर्लक्षच केले होते. सीमा, तिची वहिनी मात्र त्याच्याशी बरीच मोकळी झाली होती. तोही तिला बेटी, बेटी करीत होता. मीनलच्या मनात आले हा माणूस दिसतो किंवा दाखवतो तसा खरंच चांगला आहे का? प्रवासातल्या औट घटकेच्या ओळखी किती विश्वासार्ह मानायच्या? सीमाचे त्याच्याशी मोकळे बोलणे, स्वत:ची सर्व माहिती, कुठे जात आहोत, का जात आहोत हे सर्व सांगणे मीनलला खटकन होते. चांगुलपणाचे ढोंग करून माणसे हा हा म्हणता फसवतात हे तिला माहीत होते. सीमा तिच्यापेक्षा वयाने बरीच लहान असल्याने तिला सांभाळणे ही तिची जवाबदारी होती. ती म्हणाली, “चल गं सीमा, झोप बरं आता. तुमच्या गप्पांमुळं मला झोप येत नाहीये.” तो सरदारजी कुणी कपूर होता. चंदीगडचा त्याला मराठी कळत नसल्याने मीनल सीमाला जरा जोरातच म्हणाली. सीमा तिच्या वरच्या बर्थवर झोपायला गेली.
तो कपूर आजोबा मीनलला म्हणाला “बेटा ! खिडकी बंद कर दो, रेल्वे में बहूत चोरी होती है. “मीनलने खिडकी बंद केली व खिडकीकडे पाय करून झोपली. डब्यात पालिसांनीही दोन-तीन चकरा मारल्या. मीनला कसलीच काळजी वाटली नव्हती. झोपताना सवयीने तिने मंगळसूत्र गळ्यातून काढले व उशाला न ठेवता पर्समधे ठेवले. कुठल्यातरी स्टेशनवर गाडी थांबली. गर्दी होऊ लागली. त्यात खिडक्या बंद होत्या. गर्मी होऊ लागली. मीनल वैतागली. तिला झोप येईना. मंगळसूत्रासकट पर्स सांभाळणे गरजेचे होते. खरं तर ती प्रवासात सोन्याचे दागिने कधीच वापरत नसे. पण कसे कोण जाणे आज ते मंगळसूत्र बदलायचे राहून गेले होते. मग तिने स्वत:लाच बजावले की, आपण काय बेजवाबदार किंवा लहान नाही आहोत. दागिने करायचे अन् वापरायचे नाहीत तर त्यांचा उपयोग काय!
स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा तिने प्रयत्न केला. समोरच्या कपूर आजोबांचे अलंकार पाहून तिची धास्ती थोडी कमी झाली. थोडा वेळ खिडकी उघडावी या विचाराने तिने उठून खिडकी उघडली. कोणते स्टेशन होते हे तिला कळले नाही. सीमाकडे तिने नजर टाकली. ती गाढ झोपली
होती. तिने तिची पर्स डोक्याखाली घेऊन बंद हातात अडकवले होते. तिला हसूच आले. तो कपूर आजोबा जागाच होता. पडल्या पडल्या इकडे तिकडे पाहत होता. खिडकी उघडली तरी हवा लागेना म्हणून तिने खिडकीकडे डोके केले. पर्स खाली, त्यावर एअर बॅग, त्यावर तिचे डोके, अशी ती पडून राहिली. फार वर्षांनी तिच्या मनासारखा प्रवास घडत होता. ती बर्फावर जाणार होती. हिमालयाचे दर्शन अगदी जवळून घेणार होती. मीनल झोप लागण्याआधीच स्वप्नात शिरली होती. एक हलकासा धक्का देउन गाडी सुरू झाली. पुढच्या क्षणात वेगाने एक हात खिडकीतून आत आला व झटक्याने काहीतरी ओढले गेले. मीनलच्या डोक्याला जोरात हिसका बसला. ती प्रतिक्षिप्तपणे उठून बसली व जोरात ओरडली. क्षणार्धात तिच्या लक्षात आले की, पर्स बाहेरून कुणीतरी ओढली होती. तिच्या ओरडण्याने डब्यातले सर्वच जण उठले. कपूर आजोबा काहीतरी ओरडतच त्वरेने डब्याच्या दाराकडे धावला. तिला काही सुचेना. ती ओरडू लागली, “चेन, चेन ओढा, गाडी थांबवा. “त्यावर एक जण म्हणाला, “अब क्या फायदा बहनजी? गाडी तो चल पडी है और वह चोर तो अब कहाँ तक पहुँच गया होगा. यहाँ भोपाल में हमेशाही ऐसा होता है।”डब्यात एकच हलकल्लोळ उसळला. झोपलेले सर्वच जागे झाले. एकत्र जमले. प्रत्येक जण जोरजोरात बोलत होता. सर्वांच्या नजरेचे केंद्र मीनल बनली. तिला दुःख, राग, अपमान काहीच आवरेना. कुणी तिच्याकडे रागाने तर कुणी सहानुभूतीने पाहत होते. तिला फारच विचित्र वाटू लागले. कसे तरी स्वत:ला सावरत ती सर्वांना उद्देशून म्हणाली, ” प्लीज ! आता सर्व जण झोपायला जा. माझ्यामुळं तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला. ”
एकाने विचारले, “पर्समध्ये खूप पैसे होते का?
”
मीनल एकदम हादरली. मनातल्या मनात पैशांचा हिशोब लावताना तिला मंगळसूत्र आठवले. हो तेच… जे फार हौसेने तिने नुकतेच केले होते. तेही पर्समध्येच होते की. आता तिचे पाय लटपटू लागले; पण निग्रहाने तिने स्वतःला आवरले. सीमाला झोपण्यास सांगितले. तेवढ्यात तेथे पोलीस आले. चोरीची वर्दी त्यांनाही मिळालीच होती. त्यांच्या प्रमुखाने तिला दिलासा देण्याऐवजी, “आप जैसी पढी लिखी होकर भी..” म्हणत तिच्या सुशिक्षितपणाची लाज काढली. गेल्या तीन महिन्यांत तो या गाडीवर डयूटीवर असताना ही पहिलीच चोरी झाल्यामुळे त्याच्या कारकीर्दीला बट्टा लागला. त्याचा राग त्याने मीनलवर काढला. तिची तक्रार नोंदवून घेऊन तो सहकाऱ्यांसह निघून गेला. मीनल शरमून गेली व हतबुध्द होऊन बसली.
इतका वेळ शांतपणे बघत बसलेला तो कपूर आजोबा तिला म्हणाला, “बेटा! तुम्हे रेल की आदत नहीं ऐसा लगता है, इसीलीए तुमने मेरी बात नहीं सुनी, मैं तो दरवाजे तक भागा भी था, लेकीन गाडी तेज हुई थी इसलीए….. खैर, जाने दो. जो होना था हो गया, एक जेवर गया तो क्या, और भी आयेंगे अब दुख मत करो. “हे एकले आणि प्रथमच त्या आजोबाबद्दल तिला काहीतरी वेगळे वाटले. इतक्या कलकलाटात त्याचे बोलणे तिला आश्वासक वाटले. तिने जरा नजर बदलली. ती झोपायचा प्रयत्न करू लागली पण प्रवासाचा आनंद, गमती, हौसमौज सगळ्यावरच विरजण पडले होते. पहाट झाली. कपूर आजोबा उठून चहा घेत होते. तिला उठलेली पाहताच म्हणाले, “आओ बेटी, चाय ले लो.”, “नहीं, नहीं! अभी तो मुझे ब्रश करना है, ” मीनल म्हणाली. ब्रशच्या आठवणीबरोबरच पर्स आठवली. ब्रश, कंगवा, सुटकेसची, एअरबॅगची किल्ली सर्व काही पर्समधेच होत. पुन्हा ते मंगळसूत्र मनात लखकन् चमकून गेले. किती सुबक, पिवळेधम्मक, चांगले घनसर… कुठून दुर्बुध्दी सुचली अन् ते गळ्यातून काढून पर्समध्ये ठेवले. त्याऐवजी ते गळ्यातच राहिलं असते या कपूर आजोबांच्या गळ्यातल्या गोफासारखे तर…? आता तिला त्यांच्या अंगावरील दागिन्यांचा उलगडा झाला. ‘तो आजोबा ‘ऐवजी ‘ते आजोबा’ असा विचार बदलला. तिला किंचितसे स्वत:चे हसूही आले. ती काहीसे हसत, मोकळेपणाने म्हणाली, “चाय तो आपसे ही लेनी पडेगी, पर्स जो नहीं है. “हाँ बेटी, जरूर लो,” त्यांनी तिला चहा दिला. जबरदस्तीने बिस्किटे खायला लावली. पैशांची चौकशी केली. लागत असल्यास पैसे देण्यासही ते तयार झाले. पण त्यांच्याकडून पैसे…?, “उसमें क्या है बेटी? मेरी एक बेटी तुम्हारी जितनी है, यह देखो. ” म्हणत त्याने त्याच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला. फोटोतल्या सर्वांची ओळख करून दिली. पैसे तर थोडेफार तिच्या सुटकेसमध्येही होतेच; पण ती उघडण्याचा प्रश्न होता. संकोचत ती म्हणाली, “उसकी जरूरत नहीं, मेरी भाभी भी तो मेरे साथ हैं, आता सुटकेस व एअर बॅगची कुलपे बिना किल्लीची कशी उघडावी, विचार कर करता तिच्या लक्षात आले की अक्षरश: या क्षणी तिच्या हातात काहीच नाही. तिला एकदम हसू फुटले. तिने ठरवले की, आहे परिस्थिती स्वीकारतच तिचा सामना करायचा. नाही तर सीमाचाही मूड जाईल. आपले हात हवेत उडवत ती हसत हसत तिच्या आजूबाजूच्या लोकांना उद्देशून म्हणाली, “हे पाहा, आता माझ्याकडे हरवण्यासारखे काहीच नाही. जे आहे ते बंद आहे. त्यामुळे मला आळीपाळीने खाऊपिऊ घालणे ही तुमची सर्वांची जवाबदारी आहे.” सीमाकडे बघत म्हणाली, “या सर्वाला कारणीभूत आहे ‘भोपाळ दुर्घटना”. हास्याची एक लकेर सर्वांच्या चेहऱ्यावर तरंगली. त्यांनी तिच्या खिलाडूपणाला दाद दिली. एकाने विचारले “पैसे व मंगळसूत्र मिळून किती हजारांचे नुकसान झाले? ” ती उत्तरली, “जाऊद्या हो. जायचे ते गेलेच. लाखमोलाची माणसं आपल्याला सोडून दूर जातात तिथं या काही हजारांचे काय? “हे बोलत असताना तिची स्वर्गवासी झालेली आई तिच्या मनात होती. “आणि झालेले नुकसान म्हणजे माझ्या निष्काळजीपणाची मी किंमत चुकवली आहे.”
गाडी थांबत होती. धावत होती. प्रवास पुढे पुढे चालूच होता. तोंड धुवायचे नाही, कपडे बदलायचे नाही पैसे खर्च करायचे नाहीत या निष्क्रिय अवस्थेत दुपारपर्यंतचा वेळ काहीशी गंमत, काहीशी अस्वस्थता यात तिने घालवला. झाल्या घटनेबद्दल ती कुणाशीच, अगदी सीमाशीदेखील पुन्हा अवाक्षरही बोलली नाही. आलेले संकट ती कशी झेलू शकते, हे बघायचे असे तिने ठरवले. ती स्वतःचीच परीक्षा घेत होती. हळूहळू डब्यातील वातावरण पूर्ण निवळले. हास्य, विनोद, गप्पा, पत्ते सुरु झाले होते. कपूर आजोबा सारखे तिचे निरीक्षण करीत होते. तिच्या हे लक्षात येत होते, पण काही उलगडा होईना आणि आता त्यांचा रागही येईना. मध्येच अचानक युक्ती सुचून तिने इतरांच्या किल्ल्या सुटकेसला लावून पाहिल्या. सुदैवाने एक लागली व सुटकेस उघडली. अलिबाबाची गुहा उघडल्याचा आनंद मिळाला. लगेच कपूरकडे पाहत ती म्हणाली. ‘एक छूट गया.’ ‘क्या हुआ? पर्स मिल गई? ‘ त्यांच्या प्रश्नात एक आशा होती. ‘नहीं, नहीं, लेकीन सुटकेस खुल गई.’ कपूरही खुशीत आले व दोघे मिळून एअरबॅग उघडण्याच्या मागे लागले. पुन्हा तिला काहीतरी सुचले व कुलूप लावलेले हूक फाकवण्याचा तिने प्रयत्न केला. तोही प्रश्न लवकरच सुटला. कुलूप न उघडताच अलगद बाहेर पडले. एवढ्याशा गोष्टीने त्यांना लहान मुलासारखा आनंद झाला. कपूर तिच्या डोक्यावर हात ठेवीत म्हणाले, “यह अक्कल रात कहाँ गयी थी?”, त्यांच्या आवाजात सिग्धता होती.
“वह गयी थी हिमाचल में मुझसे आगे. ” तिने हसत उत्तर दिले. “सुनो बेटी, तुम्हारा दिल बहुत बडा है, मैं रातभर सोया नहीं तुम्हारे बारे में सोच रहा था, आज भी सुबह से देख रहा हुँ तुम्हे दुख तो बहुत हुआ है, लेकीन तुम बता नहीं रही हो. अरे, पाँच रूपये गुम गये तो औरतों बहुत दुख होता है, तुम्हारा तो पंद्रह-बीस हजार का नुकसान हुआ है. जितना गया उससे बढकर आयेगा यह मेरी बात ध्यान में रखो” कपूर आजोबांनी बोलता बोलता त्यांचे कार्ड तिला दिले. त्यांना अंबास्थास उतरायचे होते. स्टेशन जवळ आले तसे त्यांनी सामान आवरले. सर्वांचा हसत निरोप घेतला व गाडी थांबताच उतरून निघून गेले. ते दिसेनासे होईपर्यंत ना मीनल त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिली. तिला वाटले, आपल्याला माणसे ओळखण्याचा किती गर्व होता; पण या माणसाला आपण नाही ओळखू शकलो. लबाड, वायफळ बोलणारा, श्रीमंतीचे प्रदर्शन करणारा, ढोंगी, दुसऱ्यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करणारा; असे त्या निळया डोळयांच्या कपूर आजोबाबद्दल आदल्या दिवशीचे तिचे मत दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत चार बदलून गेले होते. आता तिला ते खेळकर, मिस्कील, मोकळ्या स्वभावाचे, परोपकारी व सावधपणे प्रवास करणारे असे वाटू लागले. ती स्वत:वरच नाराज झाली.
तिही तो प्रवास चांगला झाला. हिमाचल प्रदेशाच्या निसर्गसौंदर्याबरोबर एक आठवण तिने जपली आहे ती त्या गाडीतल्या हिसक्याची आणि दुसरी तिच्या डोक्यावर विसावलेल्या आश्वासक व प्रेमळ हाताची. निळ्या डोळ्यांचा तो धिप्पाड म्हातारा तिच्या मनात ठसूनच गेला.