संस्कृत साहित्यात श्री हर्षांच्या नावाने विख्यात असणाऱ्या तीन नाटकांपैकी एक अत्यंत सुंदर नाटक म्हणजे नागानंद. आपल्या आगळ्यावेगळ्या त्यागपूर्ण जीवनाच्या संस्कारामुळे हे नाटक संस्कृत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.
विद्याधरांचे राजे जीमूतकेतू यांचा पुत्र जीमूतवाहन आणि सिद्ध राजपुत्री मलयवती यांच्या प्रेम कथेवर हे नाटक आधारलेले असले तरी यात केवळ एक प्रेम कथा नसून एका अत्यंत श्रेष्ठ त्यागाचे वर्णन नाटकाच्या चौथ्या आणि पाचव्या अंकात पाहावयास मिळते.
पहिल्या तीन अंकात तर सर्वसामान्यपणे प्रेम कथा रेखाटण्यात आलेली आहे. मात्र चौथ्या अंकात घडणाऱ्या एका घटनेने संपूर्ण नाटकाला वेगळी कलाटणी मिळते आणि त्यामुळेच पुढे हे नाटक संस्कृतच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण नाटक ठरते.
नाटकाचा नायक जीमूतवाहन आपला मित्र मित्रावसू सोबत समुद्राच्या किनारी फिरत असताना त्याला तेथे हाडांचा प्रचंड मोठा ढीग दिसतो. चौकशी केल्यानंतर कळते की गरुडाच्या द्वारे नाग लोकांची होणारी प्रचंड हत्या सहन न झाल्याने नागांचा राजा असणाऱ्या वासुकीने गरुडा सोबत करार करून त्याला रोज एक नाग भक्षणासाठी देण्याचे कबूल केले. गरुडाने वर्षानुवर्षे खाल्लेल्या नागांच्या हाडाचा हा ढीग आहे हे समजल्यावर नायक अत्यंत दुःखी होतो.
त्याचवेळी त्याच्या कानावर एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो. तेथे गेल्यावर कळते की त्या रडणाऱ्या वृद्ध स्त्रीचा मुलगा शंखचूड याला आज गरुडाचे भक्ष म्हणून गरुडाकडे जाणे आहे.
राजकुमार जीमूतवाहन त्या वृद्धेचे दुःख पाहून त्यांची समजूत काढून, त्या मुलाच्या ऐवजी स्वतः बळी जाण्यासाठी सिद्ध होतो. तेवढ्यात गरुड तेथे येतो आणि बळीच्या जागी तोंडावर लाल वस्त्र घेऊन उभ्या असणाऱ्या जीमूतवाहनालाच आपले भक्ष समजून घेऊन जातो.
गरुड जीमूतवाहनाच्या अंगाचे लचके तोडण्यास सुरुवात करतो. मात्र उचलून आणल्यापासून आत्तापर्यंत मृत्यूच्या भीतीने न ओरडणारा आणि एवढे दुःख सहज हसत हसत सहन करणारा हा आहे तरी कोण? या विचाराने गरुड आश्चर्यचकित होतो. त्याने विचारल्यानंतर जीमूतवाहन त्याला आपला परिचय देतो.
जीमूतवाहन कोण आहे हे कळल्यावर आणि अनोळखी नागासाठी त्याने केलेला तो अपूर्व त्याग पाहिल्यावर गरुडाला आपली चूक उमगते. त्याला पूर्ववत निरोगी करण्यासाठी गरुड अमृत आणण्यासाठी स्वर्गात जातो.
त्याचवेळी मलयवतीच्या उपासनेने प्रसन्न झालेली देवी गौरी तेथे प्रगट होते आणि आपल्या आशीर्वादाने जीमूतवाहनाला पूर्ववत करते.
स्वर्गातून अमृत घेऊन आलेला गरुड त्या अमृताच्या द्वारे पूर्वी भक्षण केलेल्या सर्व नागांना जिवंत करतो.
अशा रीतीने जीमूतवाहनाच्या अपूर्व त्यागामुळे नागांना झालेला आनंद नाटकात वर्णन केला असल्यामुळे नाटकाचे नाव नागानंद असे ठेवले आहे.
दीक्षा संजय गौरी
लोकमान्य टिळक महाविद्यालय,
वणी बी.ए. भाग १
दि. २४. ०८. २०२२
