दोन हजार वर्षापूर्वीची भारतीय नाट्य कला,भारतीय राजनीति, भारतीय अर्थकारण,भारतीय समाजरचना समजून घेण्याच्या प्रयासात मृच्छकटिकम् हा एक मैलाचा दगड आहे. हे नाटक म्हणजे केवळ नाटक नाही,तर तत्कालीन समाजाचे ते नितांत रमणीय असे शाश्वत चित्रणच आहे.
भासनाट्यचक्राच्या उपलब्धीनंतर हे वास्तव समोर आले की, मृच्छकटिक हे भासांच्या चारुदत्त चे वाढीव रूप आहे; पण यामुळे शूद्रकांच्या प्रतिभेला कमीपणा तर येतच नाही; उलट त्यातून परंपराभिमान आणि प्राचीनत्वाचा आदरच दृगोचर होतो.
मृच्छकटिकम् चे कथानक हे एक स्वतंत्र आणि आणि सूत्रबद्ध कथानक आहे. आर्य चारुदत्त आणि गणिका वसंतसेना यांच्या अमर प्रेमाची ही दिव्यकथा.त्यासोबत चालत राहते ती राजकीय उलथापालथ.थोडक्यात राजकीय संघर्षात विकसित झालेले हे एक अभिनव प्रीतीकमल आहे.
एखाद्या प्रहसनासमान सुरूवात होणारे हे नाटक अंतिम अवस्थेत एक भीषण शोकांतिका होते की काय? असे वाटण्याइतपत वळण घेत जाते.अनेकविध गुणसम्पन्न व्यक्तिचित्रणे हे मृच्छकटिकाचे वैशिष्ट्य. आर्य चारुदत्त समान विप्रवरा पासून वधस्तंभावरील घातक (चंडाल) पर्यंत विविध व्यक्तीरेषा आपल्याला नवनवीन पैलूंसह भिडत राहतात.
उडडायिनीची विख्यात गणिका म्हणजे वसंतसेना.वसंतसेना आर्य चारुदत्तावर अनुरक्त होते; पण राजाचा शालक (मेहुणा) शकार तिला वश करण्याच्या प्रयत्नात असतो. एका सायंकाळी सैनिकांसह तो तिचा पाठलाग करतो. वसंत सेना अंधाराचा फायदा घेत चारुदत्ताच्या घरात शिरते.आपले दागिने इ. त्यांच्या स्वाधीन करून मैत्रेयासोबत घरी परतते.
त्याच रात्री वसंतसेनेच्या दासीवर प्रेम करणारा शर्विलक चारुदत्ताच्या घरी चोरी करतो आणि त्या वसंतसेनाच्या दागिन्यांनी तिचीच दासी दासमुक्त करतो. वस्तुस्थिती माहिती नसलेलां चारुदत्त आपले नैतिक दायित्व मानून आपल्या पत्नीचा अनमोल रत्नहार परतफेड म्हणून पाठवतो. पण वस्तुस्थिती वसंतसेना जाणत असल्याने चारुदत्ताला भुर्दंड नको म्हणून त्याचा पुत्र मातीची गाडी घेऊन खेळत आला असता ती गाडी सोन्याने भरून देते .याच प्रसंगावरून नाटकास मृच्छकटिकम् हे नाव देण्यात आले आहे.
वर्षाऋतूत पावसात अभिसारिका बनून वसंतसेना प्रेम साफल्याच्या याचनेसाठी चारुदकडे जाते. दुसऱ्या दिवशी पुष्पकरंडकात भेटण्याचे निश्चित होते.
इतपर्यंत नाटक सरळ सरळ चालत राहते;पण इथे चुकामुक होते आणि सगळे कथानकच वळण घेते. वसंतसेना चारुदत्ता च्या गाडीत बसण्याची ऐवजी शकाराच्या गाडीत बसते, तर तुरुंगातून बाहेर पडलेला आर्यक चारुदत्ताच्या गाडीतून फरार होतो. पुष्पकरंडकात शकार व वसंतसेना समोरासमोर येतात. तिला वश करण्याचे सर्व उपाय करून थकलेला शकार तिचा गळा दाबतो आणि वाळलेल्या पानांच्या ढिगार्यात तिला लपवतो.
चारुदत्तावर वचपा काढण्यासाठी शकार वसंतसेनेच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर लावतो. सकृतदर्शनी पुरावा आणि बचावाची कोणतीही बाजू नसल्याने चारुदत्तावर न केलेल्या खुनासाठी फाशीवर जाण्याची वेळ येते.
मात्र नेमक्या वेळी वसंतसेना प्रवेश घेत आणि अनिष्ट टळते. भीषण शोकांतिका एका सुखांत रुपकात परावर्तित होते आर्यकाची राज्यक्रांती सफल होते.शकाराचा गुन्हा सिद्ध होतो;पण चारुदतउदार अंत:करणाने त्याला क्षमा करतो.सर्वत्र आनंदीआनंद होतो. वैश्विक पातळीवर संस्कृत साहित्याचे लोकप्रिय दालन म्हणून मृच्छकटिकम् अजरामर आहे.
गौरव प्रदीप गारघाटे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. ०१. ०६. २०२२
