पुस्तकं आणि माणसं वाचायलाच हवीत. वाचून समजून घ्यायला हवीत. वाचल्याशिवाय दोन्हीही समजत नाहीत. एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं, तसंच माणसांचंही आहे. काही माणसं पुन्हा पुन्हा वाचावीशी, अंगीकारावीशी वाटतात. वर वर माणसं कळली असं वाटतं; पण त्यांचे मन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं वाचली, कळली असे म्हणता येत नाही. सरड्यापेक्षाही जलद रंग बदलणाऱ्या काही माणसांबद्दल अनुमानच बांधता येत नाही. मूल्य न बदललेली माणसं तत्त्वनिष्ठ असतात व तत्त्वाला धरूनच आयुष्य कंठतात. समोर असणारी माणसं कधी कधी अचानक क्षणात जातात, असेपर्यंत कुणी ठसा उमटवतं, कोणी पायवाट निर्माण करतं.
काही व्यक्तींचा ठसा आपल्यासाठी वारसा असतो, आरसा असतो. आरसा प्रतिमा सुधारण्यासाठी असतो. सगळ्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत नाही. ज्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होते, त्यांच्या आठवणींवर काहीजण जगतात, विरंगुळा शोधतात. चांगल्या पुस्तकांनी व माणसांनी आपल्यावर एक पगडा निर्माण केलेला असतो.
माणसं जातात म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर करून जातात. माणसं ठसा उमटवून जातात. माणसं वसा देऊन जातात. माणसं पाऊलवाट निर्माण करतात, माणसं प्रेम करतात, माणसं द्वेष करतात, माणसं इतरांना जाळतात, माणसं स्वतः जळतात. माणसं अनंत असतात, अनंत स्वभावाची असतात, शेवटी अनंतातच विलीन होतात. एखाद्याचं आयुष्य काही जणांच्या असण्यानं जीवन समृद्ध होतं, भरलेलं वाटतं, त्याचं जाणं सहनच होत नाही.
प्रत्येकाचा एक पावसाळा असतो, त्यांनी आपल्याला कधी ना कधी भिजवलेलं असतं. ज्या आठवणीत आपण भिजतो त्याच लक्षात राहातात. आठवणीच आपल्याला अंकुरित करतात, स्वतःतून उमलायला भाग पाडतात. माणसांचे फुलासारखं आहे उमलली नाही की कोमेजून जातात, उमलण्याचे प्रसंग असतील तरच फुलं व माणसं कोमेजत नाहीत, माणसांचंही असंच आहे. काहींच्या आठवणीनंच माणसं उमलतात, बहरतात. वेव्हलेंथ जुळल्याशिवाय संवाद होत नाही. कुणाचंही कुणाशी उगीच जमत नाही. प्रिय व्यक्तींच्या जाण्याने जीवनातलं नाट्य संपतं. जीवनातलं संगीत संपतं, जीवनातला संवाद सपतो.
कुठे गेली लताची दर्दभरी गाणी. तलत, के. एल. सैगलं दुःख देऊन हसती जखम देऊन गेले. जमादार ईलाही हे सुगंधी जखमा देऊन गेले. सुरेश भटांनी जगण्यातलं छळणं अधोरेखित केलं, सरणावर सुटका होते हे जाणवून दिलं. कळतं सगळं पण वळण्यासाठी कुणीतरी हवं असतं. सगळेच हरवले, हरवत चाललेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे असते. पावलावर पाऊल टाकले की रस्ता सुकर होतो. जाणाऱ्याने पाऊलवाट निर्माण करायची असते. सामान्यांनी पाऊलवाटेवरून चालायचं असतं, म्हणजे रस्ता चुकत नाही. आपल्याकडे समृद्ध वारसा आहे याचा एक अभिमान असतो, तोच जगण्यासाठी पुरेसा असतो. कुणी न कुणी कोणासाठी तरी निमित्त असतं, जगण्यासाठी.
माणसे गेली तरीही आपल्याला घडवून जातात. आत्मनिर्भर करून जातात. काही पुस्तकं व माणसं नुस्तीच वाचायची, काही नुसतीच करमणुकीसाठी, काही विरंगुळ्यासाठी काही, अभ्यासासाठी, काही निष्कर्षासाठी, काही चिंतन, मनन करण्यासाठी, काही पारायण करण्यासाठी असतात, पुस्तकांची आणि माणसांची उपयुक्तता कधीच संपत नाही. पुस्तकं आणि माणसं सारखी सारखी वाचली पाहिजेत, नव्या संदर्भात. वाचाल तरच घडाल.
एकलव्य व्हायची तयारी असली की द्रोणाचार्य भेटतातच. अनुकरणानेच माणसं शिकतात. आपण निसर्गाचे अनुकरण करतो, पैसे कुठे द्यावे लागतात? दुसऱ्यांच्या विचारांवर, आचारांवर आपले पालनपोषण होते, त्यासाठी पैसे कुठे द्यावे लागतात?
मुळांसारखं गाभ्यापर्यंत जाता यायला हवं. खूप आवडते लोक गेले. कुणी नक्षत्राचं चांदणं देऊन गेले, कुणी शरदाचे चांदणे देऊन गेले. प्रत्येकाचं देणं आपलं संचित असतं. वारसा नावाचा आरसाच आपल्याला जिवंत ठेवतो. आपण स्वयं मूल्यमापन करतो, व आपल्यालाच प्रेरणा देतो.
प्रिय व्यक्ती गेल्यावरच कळतं, आम्ही त्यांच्याकडून काय शिकलो? कसे शिकलो? कोणी आम्हाला वाढविले? आमचे अस्तित्व दखलपात्र कोणी केलं? काही अदृश्य हातांनी आम्हाला घडविले. प्रियजन आज नसले तरीही, हे जे वैभव आहे, ते त्यांच्यामुळेच आहे. रक्तातून तर फार प्रचंड सामर्थ्य वाहातं. अनुवंशिकतेचे झरे कधीच आटत नाहीत. त्यांना जिवंत ठेवणं, वाहातं ठेवणं हे आपलं काम आहे. निरीक्षणातूनही फार प्रचंड ज्ञान आपल्याला मिळतं.
पूर्वजांचे हावभाव, हेवेदावे, हातवारे, वागण्याची पद्धत, आवाज, विचार हे सगळं आपल्याला वारसा म्हणून मिळालेलं असतं. वारसा समृद्ध असला तरीही आरसा प्रमाण मानायचा. सोडून गेलेल्यांच्या भांडवलावरच आपण जगतो. अनेकांचा ठेवा आम्हाला अजून माहीतच नाही. समृद्ध संस्कृतीची अजून आमची ओळख तरी कुठे झाली आहे? म्हणून तर miles to go before I sleep प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपलीही मूर्ती कोणाच्या तरी मनमंदिरात वास्तव्य करावी, अशी आपलीही इच्छा असते. माणसं वाचली की आपल्या हृदयात त्यांची मूर्ती वसतेच.
