घे कुठार ! कर उगार
घाव आता घाली । धृ. ।।
धरणीने पोशियले
रविकिरणे वाढविले
राहियला सतत मरुत
आजवरी वाली ।।१ ।।
किती विहगा खांद्यावरी
खेळविले बाळांपरि
शांत गुरे छायेमधि
आजवरी झाली ।॥२॥।
प्रेमामृत तरुण तरुणि
गेल्या ओतून इथुनि
संकेतस्थळ होणे
आजवरी भाळी ।।३।।
काळाचा कठिण घात
वस्तूचा होत पात
आनंदे पाहत मी
प्रकृतीच्या चाली ।।४॥।
होऊ देत देह छिन्न
शकलांवर शिजवी अन्न
मन निवेल ऐकुनिया
तृप्ती तुला आली ! ।॥५॥
Post Views: 22