‘रिकामं मन सैतानाचं घर असतं’, हे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतं. आपण मनाला सतत गुंतवून ठेवायलाच हवं. पुस्तकात तरी मनाला गुंतवायला हवं किंवा पुस्तकांपलीकडे मनाला गुंतवायला हवं. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या मनाचा ईकिगाई ठरवता आला पाहिजे. ईकिगाई म्हणजे ‘Art of staying young… while growing old’.
ईकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ आहे, सतत व्यस्त राहाण्यामध्ये असणारा आनंद. जपानी म्हण आहे, ‘फक्त कार्यरत राहिला तरीही शतायुषी व्हाल. ‘ ईकिगाई हा शब्द जपानमधील लोकांच्या दीर्घकाळ जगण्याचे रहस्य सांगतो. एखाद्या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना, लोकांमध्ये मिसळावं लागतं, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात तेव्हाच त्या संकल्पनेचा अर्थ पुस्तकरूपाने आपल्यासमोर मांडता येतो. थोडक्यात, पुस्तकात जे असतं ते निसर्गातल्या, व्यवहारातल्या गोष्टींचं निरीक्षण असतं म्हणून हे निरीक्षण पुन्हा अनुभवण्यासाठी पुस्तकाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न जर केला, तर आपल्याला जीवनामध्ये असंख्य लोकांमध्ये, निसर्गामध्ये, आजूबाजूच्या वातावरणामध्ये पुस्तकातील सर्व अर्थ सापडतात; पण म्हणून केवळ पुस्तकावर विसंबून न राहाता पुस्तकांच्या पलीकडे आपण जर पुस्तकातले अर्थ शोधले तर ते निश्चित सापडतात व आपला दृढविश्वास त्यावर बसतो. जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुषी असतात.
सुरुवातीला ईकिगाई या विषयावर प्रकाश टाकणारं कोणतंच पुस्तक उपलब्ध नसल्याने, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन माणसांच्या मुलाखती जेव्हा घेतल्या तेव्हा आयुष्याचं खरं रहस्य जाणलं आणि ते पुस्तकरूपाने आपल्यासमोर आलं. ज्या लोकांना ईकिगाई सापडला ते लोक आनंदी, समाधानी आणि दीर्घायुष्य आयुष्य जगतात. ईकिगाई वय वाढत असतानाही तरुण राहाण्याची कला आहे. लोकांच्या मते, प्रत्येकाच्या जीवनाचा ईकिगाई असतोच. जपानमध्ये निवृत्तीनंतरही लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात. खरं तर, शरीर साथ देतं तोपर्यंत त्यांच्या आवडीचे काम ते करतच राहातात. जपानी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश इतका महत्त्वाचा वाटतो की, त्यांच्या संस्कृतीमध्ये निवृत्त होण्याची संकल्पनाच अस्तित्वात नाही.
इतरांना मदत करणं हाच त्यांचा ईकिगाई आहे आणि तेच त्यांच्या शतकी जीवनाचं रहस्य आहे.
ज्या ज्या लोकांनी दीर्घायुषी लोकांचा अभ्यास केला ते याच निष्कर्षात पोहोचले की, दीर्घायुष्याचं रहस्य खाद्य संस्कृती, व्यायाम, जीवनाचा उद्देश जाणणं आणि मित्रपरिवारामध्ये चांगले नातेसंबंध टिकवणे हे आहे.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली, म्हणून त्यांना निवृत्त होऊ द्या असे काहींनी सांगितले. अनेकांनी त्यांना निवृत्त होऊ नका असे सांगितले आणि मग त्यांच्याही मनातला ईकिगाई जागरूक झाला असेल आणि त्याने सांगितले असेल की, निवृत्त व्हायचं नाही आणि आता ते पूर्वीप्रमाणे कार्यक्रमातच व्यस्त असतात आणि धडाधडीने निर्णय घेतात, निवृत्त झाले असते तर चित्र पालटले असते.
निवृत्तीनंतर माणसे अडगळीत जातात, त्यांचा प्रभाव तेवढा राहात नाही. नैराश्यात जायला ते कारण पुरेसं असतं.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन हे सुद्धा ८० वयाच्या पुढे असून निवडणूक लढवण्यास तयार आहेत.
‘आराम हराम है’ हे ज्यांना पटलं ते शेवटच्या क्षणापर्यंत व्यस्त राहातात.
ईकिगाईचे दहा नियम खालीलप्रमाणे आहेत -१) सतत कार्यरत राहा आणि कधीही निवृत्त होऊ नका. २) निवांत राहा.
३) पोटभरून जेऊ नका. ४) चांगला मित्रपरिवार. ५) पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा. ६) हास्य. ७) निसर्गाशी जोडलं जाणं. ८) धन्यवाद द्या. ९) वर्तमानामध्ये जगा. १०) तुमच्या ईकिगाईप्रमाणे वागा.
वॉल्टर ब्रेउनिंग (११४ वर्षे) जर तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला कार्यरत ठेवलं तर तुम्ही नक्कीच दीर्घायुषी व्हाल.
अलेक्झांडर इमीच (१११ वर्षे ) २०१४ मध्ये जगातील सर्वात दीर्घायुषी होते. ते म्हणतात, माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य हे आहे की, मी अजून मेलेलो नाही.
ईकिगाई ही एक जीवन जगण्याची कला आहे. आज आत्ता वर्तमानात जगा. या जगामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, हेच दर्शवणारी ईकिगाई ही कलाकृती आहे, हे पक्कं झाल्यावर आलेली उदासीनता क्षणार्धात नाहीशी होते. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश समजला की, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी सजग राहिल्यामुळे आनंद प्राप्त होईल.
जेव्हा आपण आपल्या ईकिगाईशी जोडले गेलेलो असतो तेव्हा आपल्याला जीवन जास्त अर्थपूर्ण वाटतं आणि आपण उत्साहाने सगळी कामं करतो.
