दहीहंडी उत्सवा संदर्भात मुख्य न्यायालयाच्या दडपणाखाली शासन दरबारी महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयांना दहीहंडी आयोजक, कि ज्यामध्ये प्रतिष्ठित राजकारणी व्यक्ती आहेत, त्यांनी विरोध केलाच आहे,परंतु दहीहंडीत सहभागी होणारे गोविंदा मंडळे पण नाराज झाली. शासनाने दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून जाहीर करून झालेल्या कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाच्या नेहमीच्या संदीग्ध धोरणामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे. दहीहंडी साहसी खेळ जाहीर झाला म्हणून आजच्या दहीहंडी उत्सवात त्यामुळे काय फरक पडणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. हा खेळ रस्त्यावरून मैदानात अथवा बंदिस्त क्रीडांगण खेळला जाणार आहे का? हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात अजूनही आहे. त्या बाबतीतल्या असणाऱ्या नियमावली अगदी ढोबळ सूचना जाहीर केल्या आहेत. दहीहंडी उत्सवाची साहसी खेळात गणना करणे किती योग्य आहे याची कारण मिमांसा करणे आवश्यक आहे.
साहसी खेळांची लोकप्रियता वाढत आहे ती त्यातील थरारकता, रोमांचकारकता आणि अंतिम निर्णयातील अनिश्चितेमुळे. या बरोबरच असलेला प्राणघातक धोका. निसर्गातील आजूबाजूचे वातावरण आणि त्यामुळे उद्भभवणाऱ्या धोक्याना सामोरे जात, साहसी खेळ साधारण पणे खेळले जातात. यात पारंपारिक गिर्यारोहण, स्कीईंग, पॅराग्लायडिंग, राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग वगैरे खेळांचा समावेश होतो. निसर्गाच्या माध्यमातून उद्भवणारी अस्मानी संकटे आणि त्याला सामोरे जाणारे मानवी कर्तृत्व हा साहसी खेळांचा जीव असतो. या सर्व घटकांचा विचार करता दहीहंडी उत्सवाला आपण साहसी खेळ म्हणू शकतो का याचा विचार प्रथम जाणकार व संबंधित व्यक्तींनी करावयास पाहिजे असे वाटते.
दहीहंडी फोडण्यात इतर खेळांना लागणारी शारिरीक क्षमता, कौशल्य, चपलता आणि सांघिक भावना यांचे दर्शन निश्चित होते. उंच थरावरील हंडी फोडण्याचे तंत्र चांगलेच विकसित झाले आहे. इतर कुठल्याही खेळातील खेळाडूच्या तुलनेत या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, सरावासाठी घेतलेले कष्ट आणि दिलेला वेळ यात हे गोविंदा कुठे हि कमी नाही हे पण निश्चित. या खेळात धोका आहे हे सुद्धा कोणी हि मान्य करेल. अर्थात प्रत्येक खेळात तसा कमी जास्त धोका हा असतोच. यासाठी सुरक्षतेची साधने आणि नियम असतात. या सर्व निकषावर दहीहंडी उत्सवाला नुसता खेळ म्हणून मान्यता मिळण्यास काहीच हरकत नाही.
स्पर्धात्मक खेळ म्हणून दहीहंडीचा विचार केल्यास जिम्नॅस्टिक्स खेळातील मूल्यमापन आणि नियमावलीचा आधार या खेळासाठी सुद्धा करता येईल. साहसी खेळाचा विचार करता दही हंडी हा खेळ गिर्यारोहणातील कृत्रिम प्रस्तरारोहण स्पर्धात्मक खेळाच्या अधिक जवळ जातो. यामधील चपलता, लवचिकता, शारिरीक क्षमता आणि एकाग्रता हे गुण या दहीहंडी खेळासाठी आवश्यक गोष्टी आहेत. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे शासन मान्यता खेळ म्हटला तर अधिकृत संघटना असली पाहिजे. त्यासाठी नियमावली, सभासदत्व, निवडणुका हे सर्व आलेच. दुर्देवाने आज देशातील जवळ जवळ सर्व क्रिडा संघटनांमध्ये वाद, आणि सत्ता संघर्ष याचे पेव फुटले आहे. त्यामध्ये आणखीन एका संघटनेची भर पडणार आहे का? आज केवळ ठाणे मुंबईत दहीहंडीची आयोजकांची आर्थिक उलाढाल हजारो कोटींच्या घरात जाते असे म्हणतात. काही गोविंदा मंडळे संस्थाने झाली आहेत. या सर्वाना कुठल्याही बंधनात आणि नियमात अडकून पडणे आवडेल का याचे उत्तर अजूनही स्पष्ट झाले नाही आहे.
आज कबड्डीच्या आय.पी. एल. मुळे कबड्डी खेळाला आणि खेळांडूना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही गोष्टी मिळत आहेत. हि खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे खेळातील दर्जा आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टीत खुप फरक पडला आहे. पुढील काही वर्षात कबड्डी खेळाच्या पावलावर पाय ठेवीत दहीहंडीची आय.पी.एल. संपूर्ण देशात आयोजित झाली तर आश्चर्य वाटावयास नको. नारळी पोर्णिमा ते जन्मअष्टमी पर्यंत भारतातील प्रमुख शहरात दहीहंडीची सर्कस आयोजित करून अंतिम दिवशी मुंबई अथवा ठाण्यात अंतिम धमाका उडवण्याच्या योजनेचा विचार आणि नियोजन काही कल्पक डोक्यात सुरुपण झाला असेल. याकरता अर्थात ठाणे शहराची जमीन अधिक सुपीक आहे.
या सर्वांचा विचार करता आपल्या राज्याचे विशेषता ठाणे मुंबईचे भूषण असलेल्या दहीहंडी ज्याला पारंपारिक शब्दात दहीकाला म्हणतात याचे बाजारू खेळात झालेले रुपांतर थांबिवणे आपल्याला शक्य आहे का याचा विचार प्रतेक नागरिकाने केला पाहिजे. कोकणातील चाकरमान्यांनी हा खेळ मुंबईत रुजविला आणि वाढवला. लोकगीतातून आणि भजनातून तो घराघरात गेला. त्याचे वर्णन ‘शिंकेची तोडीतो मडकेची फोडीतो: करी दह्या दुधाचा रबडा : अशा गोड शब्दात केले गेले आहे. गावातील लोणी रुपी धन हे मथुरेच्या बाजारात जाण्या अगोदर त्यावर गावातील सर्वात खालच्या थरापर्यंत असणाऱ्या प्रत्येक मुलांचा अधिकार आहे हा सामाजिकदृष्ट्या अतिशयमहत्वाचा संदेश आपल्या सर्वाना दही काला देत आहे हे आपण कधीच विसरलो आहे.
आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, आणि पर्यावरणाचा विचार करून आदर्श दहीहंडी उत्सव नक्कीच साजरा करता येईल. १९९८ साली प्रदूषण मुक्त गणपती उत्सवाचा विचार आणि कृती करणाऱ्या ठाण्यातील जिज्ञासा संस्थेने समविचारी स्वंस्थाना बरोबर घेऊन अशा प्रकारचा दहीहंडी उत्सव ठाणे शहरात साजरा करण्याचे रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी महानगरपालिकाचे मैदान, भगवती विद्यालय जवळ, विष्णूनगर, ठाणे येथे संपन्न होणार आहे. मैदानात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात बालकांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सुरेन्द्र दिघे
कार्यकारी विशस्त
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे