प्रेरणा कुठून आणि कोणापासून मिळेल हे सांगता येत नाही. कुणाला साहित्यातून तर कुणाला गाण्यातून, कुणाला भाषणामधून तर कोणाला आचरणा मधून प्रेरणा मिळते. प्रेरणेला मन नियंत्रित करतें. एखाद्याला संपवणे त्या व्यक्तीची प्रेरणा असू शकते व एखाद्याला वाचवणे सुद्धा काहींची प्रेरणा असू शकते आणि हे त्या त्या परिस्थितीत तुमचं मन कसं तुम्हाला प्रेरणा देतं यावर सर्व अवलंबून आहे. मनाची मशागत, मनावरील संस्कार हे माणसांच्या स्वभावावर परिणाम करतात.
एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावर प्रभाव पडतो, कळत ना कळत आपल्या विचारावर व आचरणावर त्या व्यक्तीच्या प्रेरणेचा प्रभाव पडतो. पूर्वीच्या काळी संत साहित्याने, अभंग आणि कीर्तनाने येणाऱ्या पिढीला जगण्याचे बळ दिले,आशावाद दिला, समाधान दिले. चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची रहावे. मरावे परी कीर्ती रुपी उरावे, यासारख्या पूर्वीच्या सुविचारांनी केवळ तत्त्वज्ञान दिले नाही तर समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली. भरकटलेल्या समाजाला संत साहित्याने, अध्यात्माने प्रेरणा दिली. निसर्गातील प्रत्येक घटना आपल्याला प्रेरणा देते. आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी होत आहे हे निश्चितच प्रेरणादायी नाही. एखाद्याची बुद्धिमत्ता आपल्याला प्रेरणा देते. अनेक वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे मानवी जीवन सुखी झाले आहे. माणसांचे आयुर्मान वाढवण्यापर्यंत अनेक नवीन शोध लागल्यामुळे माणसांचे जीवन प्रेरणादायी झाले आहे.आदिमानवापासून मानवापर्यंत माणसाने केलेली प्रगती प्रेरणादायी आहेच. अनेक वैज्ञानिकांनी शोध लावून मानवी जीवनात अमुलाग्र बदल केला आहे.अंधश्रद्धेची चिरफाड करून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला अधःपतनापासून वाचवण्याची प्रेरणा अनेक वैज्ञानिकांनी दिली. समाजातल्या काही अनावश्यक रूढी व परंपरा कालबाह्य झाल्यामुळे परिवर्तनाची प्रेरणा काही समाजसुधारकांनी दिल्यामुळे सामाजिक परिवर्तन झाले आहे.
निसर्गाच्या अनेक घटना आपल्याला विचार करायला लावतात. प्रत्येक घटना विचार करायला लावते व जगण्याची प्रेरणा देते.बीजाच्या अंकुरणातून सुजन प्रक्रिया प्रेरणा देते, श्रावण अवतरण्याची. सूर्यास्त झाला म्हणजे सगळं संपलं असं नव्हे. छटा अस्ताच्या सुद्धा प्रेरणादायी असतात. माणसाचा अस्त हा अटळ असतो पण कोणत्याही माणसाचा अस्त झाल्यानंतर त्याचं जाणं हे त्याच्या कुटुंबासाठी, काही जणांच समाजासाठी व काही जणांचे जाणं राष्ट्रांच्या हितासाठी प्रेरणा बनून जातं. एखाद्या थोर व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृत्यूनंतरही त्याच्या विचारांची वाट ही प्रेरणेची वाट असते.
अस्ता मध्येही आशेची बिजे असतात.अस्ताची जाणीव करून देणारा क्षण सुद्धा उद्याच्या सूर्योदयाची प्रेरणाच असतो. सूर्यास्त संपण्याच्या क्षणापासूनच माणूस उद्याच्या सूर्योदयाची स्वप्न बघायला सुरुवात करतो. उषःकाल होईल आणि सगळं उद्यापासून आशादायक होईल या प्रेरणेनच माणसं जगत असतात. माणसाचा स्वभाव ही सुद्धा एक छटाच असते. प्रत्येक छटा हा एक मुखवटा असतो. वेगवेगळ्या चेहऱ्याच्या छटे वरूनच माणसं समोरच्याशी वागतात. चेहऱ्यावर मुखवट्यांचाच राज्य असतं. प्रत्येक छटा एक वेगळा विचार देऊन जाते.
सुरज की किरणें रोज आती रहे रोज गाती रहे
लेके किरणोंके मेले. हा सूर्योदयाचा उत्सव आहे, मेळावा आहे,
जीवन समृद्ध करणारा आशावाद आहे.
शेतकरी सुद्धा पाऊस पडेल आणि मग आपलं शिवार हिरवं होईल या आशेने आकाशाकडे पाहत राहतो. संघर्ष करतांना, दुःख सोसतांना माणसं प्रेरणेमुळेच जिवंत राहतात. वो सुबह कभी तो आयेगी हे नैराश्य घालवते.सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची इच्छा प्रत्येकाची असते. नियमित चालणारा तो एक निसर्गक्रम आहे. मनाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सूर्योदय व सूर्यास्त पाहण्याचं प्रचंड वेड आहे. प्रत्येक छटा एक जीवन क्षणभंगुर आहे याची जाणीव मनाला करून देते. संध्याछाया भिववीती ह्रदया याची जाणीव करून देते.सूर्योदय ते सूर्यास्त या मधल्या काळात झोका घेतल्याप्रमाणे उंच माझा झोका म्हणत माणसे आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असतात.माणसाच्या चेहऱ्यावरच्या छटा सुध्दा प्रेरणादायी असतात.
मुलाला हसवले की तो ही हसतो व रडवले की तोही रडतो. तो खुश राहिल यासाठी आई जीवाचं रान करते. शिस्त लागावी, चांगले संस्कार त्याच्यावर व्हावे यासाठी आईला कधी कधी कठोर व्हावं लागतं, हे कठोर होणं सुद्धा एक प्रकारची प्रेरणाच असते. अती व अनावश्यक लाड केले की मुलें बिघडतात.
प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रेमाची पखरण झाली की प्रियकर ही भारावून जातो व प्रेमाची सुरुवात तिथे होते. प्रेमाला फक्त सौंदर्यच लागतं असं नव्हे तर तार जुळली की ते एकमेकावर जीव टाकतात.
प्राजक्ताचा सडा दुसऱ्याचं अंगण सजवतं प्रेम सुद्धा दुसऱ्याचं आयुष्य फुलवतं प्रेरणेचेही काही असेच आहे.
