जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता.
July 29, 2021
सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदा ई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबात जन्माला आलेले. सर्व पठाण-पख्तुन-अफगाण विशेष (बादशाह खान यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशातील लोकांना, अफगाण किंवा पठाण असे संबोधले जायचे. परंतु ते स्वत: असे म्हणत, की आम्ही पख्तुन आहोत, तीच आमची खरी ओळख आहे.) अंगात सहज आलेले. जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य. त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा या प्रदेशावर इंग्रजी साम्राज्याचा अंमल होता. इंग्रजांचे साम्राज्य बंदूक आणि डावपेच, दहशत आणि कारस्थान यावर उभे राहिलेले. पठाण टोळ्यांना अर्थातच, अशी परकीय राजवट चालणे शक्य नाही. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासून इंग्रज राजवट अधिकाधिक क्रूर होऊ लागली होती. तिकडे पठाणी टोळ्या इंग्रजांना आव्हान देत होत्या. भारतातही स्वातंत्र्य भावना पसरू लागली होती. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मध्यमवयीन वकिलाने दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय, वंशद्वेष्ट्या सत्तेच्या विरोधात आंदोलन पुकारलेले होते; परंतु ते आंदोलन होते, सत्याग्रहाचे. अहिंसेने चाललेले. गोपाळकृष्ण गोखलेंनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन गांधीजींना भारतात पाचारण केले होते. गांधीजी भारतात आले, तेव्हा त्यांना ‘महात्मा’ हे बिरुद लावले गेलेले नव्हते. गांधीजींनी त्यांचे ‘अहिंसेचे’, ‘सत्याचे’, ‘आत्मशुद्धी’चे प्रयोग सुरू केले आणि अवघा देश फिरून त्यांनी लोक कसे जीवन जगतात, देशाची स्थिती कशी आहे, याचा प्रत्यक्ष शोध-वेध घेतला. गांधीजी जेव्हा हा शोध घेत होते, त्याच वेळेस बादशाह खान हे पख्तुनिस्तानमध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारांनी अहिंसेच्या विचाराकडे वळू लागले होते. बंदुकीने, म्हणजेच हिंसेने प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, डोळ्याचा बदला शत्रूचा डोळा फोडून घेतला तर क्रमात अवघे जग आंधळे होईल. अहिंसेने संघर्ष केला तर कदाचित लगेच विजय प्राप्त होणार नाही; पण पराभव तर नक्कीच होणार नाही आणि अंतिम विजय नक्कीच होईल, असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली होती. परंतु पख्तुन, पठाण, अफगाण लोकांना बंदुकीचा, शस्त्रांचा, संघर्षाचा त्याग करायला सांगणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि ‘पुरुषार्था’चाच त्याग करायला सांगण्यासारखे होते. बादशाह खान यांनी अहिंसक सेना स्थापन केली. त्या सेनेचे नाव ‘खुदाई खिदमतगार’ म्हणजेच, ‘ईश्वराचे सेवक’. बादशाह खान यांच्या या सेनेत एक लाखाहून अधिक ‘सैनिक’ सामील झाले. बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. ‘इस्लाम’ धर्म हा शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा आहे आणि इस्लामच्या नावावर हिंसा करणे, विद्वेष करणे, हे तर महंमद पैगंबराच्या शिकवणुकीचा अवमान करणे आहे, असे त्यांचे मत होते. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता, हे सिद्ध होते. गांधीजी आणि बादशाह खान दोघांना फाळणी मंजूर नव्हती; कारण धर्माच्या आधारावर देश तोडला जात होता आणि धर्मद्वेषातून हिंसेचा आगडोंब उसळू लागला होता. गांधीजींची १९४८ मध्ये ३० जानेवारीला हत्या झाली, तीसुद्धा त्याच विद्वेषाच्या वातावरणात. बादशाह खान यांचा गुरू, सहकारी, मित्र, सहाध्यायी, मार्गदर्शक गेला आणि गांधीवादी विचारांचा झेंडा बादशाह खान यांच्याकडे आला. पाकिस्तानला बादशहा खान यांचे तत्त्वज्ञान आणि ‘खुदाई खिदमतगार’चे कार्य मंजूर असणे शक्यच नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो देशद्रोह-धर्मद्रोह-पाकिस्तानद्रोह होता. साहजिकच पाकिस्तानने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि ब्रिटिशांनी जितका काळ त्यांना तुरुंगात डांबले नव्हते, तितका काळ पाकिस्तानने डांबले. गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कोणी सांगितले, तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. नेमके तेच विधान फ्रंटियर गांधींना अधिक प्रकर्षाने लागू आहे. सत्याग्रह आणि अहिंसा ही ‘शस्त्रे’ घेऊन बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचा ‘वेडेपणा’ सुचणा-या गांधीजींच्या आणि फ्रंटियर गांधींच्या चरित्राचा वेध कसा घेणार? पण, त्यांनी असे लाखो वेडे तयार केले. कॅनडियन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका टेरी मॅक्लुहान यांनी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या जीवनावरील चित्तथरारक डॉक्युमेंटरी उर्फ चरित्रपट बनविला. मा.खान अब्दुल गफारखान यांचे निधन २० जानेवारी १९८८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 20, 2017
अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे.
‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली वेगळी छाप पाडली. अभिनयासोबतच शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची जाण असलेल्या गिरिजाचा मोहक चेहरा अल्पावधीतच घराघरात पोहचला.
गिरिजाने २०१३ साली ‘गोविंदा’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. गिरिजाने आज अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा जरी उमटवला असला तरीही लहानपणी तिला अभिनय क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. गिरिजाला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होत. मात्र गिरिजाच्या वडिलांनी तिच्यातला कलाकार बालपणीच हेरला आणि तिला अभिनयाची गोडी लावली. ‘ऐश इज बार्ंनग’ या तिने अभिनय साकारलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय पारितोषिकं लाभली आणि हाच दिवस गिरिजासाठी टार्ंनग पॉइंट ठरला.
गुढीपाढवा निमित्ताच्या विशेष फोटोशूटसाठी मला गिरिजाचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली होती. या पाडव्याच्या शूटसाठी तिची वेशभूषा आणि तिचा एकूणच लूक कसा असेल हे तिच्याशी बोलून शूटचा दिवस आम्ही निश्चित केला. मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज आम्ही निश्चित केला होता. हा मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज लक्षात घेऊन तशीच वेशभूषा आणि रंगभूषा तिची करण्यात आली होती. पिवळ्या उठावदार रंगाची साडी, त्यावर साजेसा दिसेल असा हातात पांढऱया-लाल रंगांचा चुडा, नाकात मोत्यांची नथ, कलाकुसर केलेले दागिने, केसात मळलेला गजरा, कपाळावर टिकली असा तिचा शृंगार होता. तिचा हाच मोहक चेहरा कॅमेराबद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. गुढीची पूजा करतानाचे तिचे काही फोटो मी टिपले. वृत्तपत्राची गरज असलेले फोटो टिपल्यानांतर याच वेषभूषेतले तिचे काही पोर्टेट मी टिपले. तिच्या चेहऱयावरचं स्मितहास्य आणि सोनेरी झाक असलेली लायटिंग यामुळे मला एका पाठोपाठ एक असे अनेक चांगले फोटो टिपता आले.
पारंपरिक वेषभूषेतल्या लूकनंतर गिरिजाचं ग्लॅमरस फोटोशूट करायचं ठरलं होतं. यासाठी तिचा मेकओव्हर करावा लागणार होता. मेकओव्हरला साधारणपणे एक-दीड तास जाईल हे हेरून माझी टीम पुढच्या लायटिंगच्या तयारीला लागली. शूटच्या मध्ये बराच वेळ होता. याच वेळी गिरिजा तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगत होती. तिला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होतं. पुढे त्या दिशेने तिने अभ्यासदेखील सुरू ठेवला होता. रुईया महाविद्यालयातून पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या विषयांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तर यानंतर सायकॉलॉजीचं पदव्युत्तर शिक्षणदेखील तिने पूर्ण केलं होत. गिरिजाचे वडील त्याकाळचे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच गिरिजाला अभिनयाचं बाळकडू मिळालं. अभ्यासाच्या जोडीनं गिरिजाला लहानपणापासूनच नृत्य आणि संगीत याची वेगळी गोडी होती. पाचवीत असल्यापासून तिने गुरुवर्या गांगल यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा नियमित अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तर यांच्या जोडीने पं.गोपीकृष्ण यांचे शिष्य राजकुमार केतकर यांच्याकडून तिने कथ्थकचे धडे गिरवले. हाच नृत्यकलेचा उपयोग तिला पुढे झाला. महाविद्यालयात तिने दीपाली विचारे हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नृत्य कार्यक्रमांतही सहभाग नोंदवत आपल्या नृत्याची चुणूक दाखवल्याचे ती सांगत होती.
पारंपरिक लूकनंतर आता गिरिजाचा मॉर्डन आणि ग्लॅमर्स लूक होता. गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून तिची मध्यमवर्गीय स्त्राrची तसेच गावरान महिलेची भूमिका समोर आली होती. मात्र यापलीकडे गिरिजा किती बोल्ड आणि ब्युटीफुल आहे हे दाखवण्यासाठी तिचा ग्लॅमरस मेकओव्हर करण्याचं आम्ही ठरवलं होत.
पारंपरिक साडीनंतर गिरिजाने गडद काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. वेशभूषा लक्षात घेऊन ‘लो की’ (low key) लायटिंग करून तिचे काही मिड शॉटस् आणि हेडशॉटस मी कॅमेराबद्ध केले. तर यानंतर पुन्हा लूक बदलून तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि हॉट पॅन्ट परिधान केली. यात गिरिजा अधिकच बोल्ड दिसत होती. तिच्या या लूकमधल्या दिलखेच अदा मी कॅमेराबद्ध केल्या. अर्थात तब्बल सहा तास चालेल्या या एकूण शूटनंतर आणि नऊ जणांच्या अथक मेहनती अंती गिरिजाचे विविध लूक मला कॅमेराबद्ध करण्यात यश आले होते.
गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून गिरिजाची समोर आलेली प्रतिमा पुसून तिने पुढे काही सिनेमात अभिनय साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या आगामी सिनेमातून तिचा हा बोल्ड लूक समोर येईल. तर आगामी ‘रघु रोमिओ’ या सिनेमातही तिने साच्याबाहेरील अभिनय साकारल्याचं पाहायला मिळणार आहे. आपल्या कसदार अभिनयानं वेळोवेळी रसिकमन जिंकलेल्या गिरिजानं अथक मेहनतीने आणि परिश्रमाने तिचा पुढचा अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. आगामी सिनेमांतून गिरिजा आपल्या अभिनयानं यापुढेही यशाचा आलेख उंचच उंच ठेवेल.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
March 4, 2019
नकलाकार म्हणून अमोलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.
May 9, 2013
बॉलिवूडमधील 'काश्मीर की कली' शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला.
शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. मा.शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते.
१९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली. भारताला सर्वात प्रथम नोबेल पुरस्काार मिळवून देणा-या रवींद्रनाथ टागोर यांची नातेवाईक असलेली शर्मिला टागोर आणि मन्सू र अली खान पतोडी ही एक आदर्श जोडी म्हीणून गणली जाते. मन्सूीर अली खान पतोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. जेव्हा नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली व आपल्या आईकडे शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या.
लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये मन्सूेर पतोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला टागोर यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती.
शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला टागोर यांना नवीब पतोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला टागोर यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. १९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला टागोर बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्द्यावरून रणक्रंदन झाले.
शर्मिला टागोर त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणाऱ्या त्या पहिल्या अॅक्ट्रेस बनल्या. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार. मा.राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता.
बेशरम सिनेमात अमिताभ सोबत काम केले होते. २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 29, 2019
कव्वाली, गझल, शास्त्रीय, पारंपारिक गायक म्हणून नुसरत फतेह अली खान यांनी जागतिक स्तरावर नाव मिळवले. नुसरत यांच्या आवाजाची जादू भारतावरही चालली. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९४८ रोजी पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे पंजाबी मुसलमान कुटुंबात झाला. त्यांनी गायलेली ‘आफरीन आफरीन’, ‘मेरा पिया घर आया’, ‘पिया रे-पिया रे’, ‘सानू एक पल चैन ना आए’, ‘तेरे बिन’ अशी अनेक गाणी आजही तितकीचं प्रसिद्ध आहेत.
शिकागो येथे १९९३ साली झालेल्या रॉक कॉन्सर्टमध्ये नुसरत यांनी गाण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील नागरिकही त्यांच्या आवाजावर फिदा झाले. मात्र, नुसरत फतेह अली खान यांना केवळ ४९ वर्षांचेच आयुष्य लाभले. नुसरत फतेह अली खान यांचे १६ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 8, 2017
मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.
संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. मुकुल शिवपुत्र हे रागांच्या सादरीकरणातील संपूर्ण नव्या दृष्टीकोनाच्या कलेसाठी ओळखले जातात. ते या सादरीकरणाला एक नवीन आयाम देतात आणि त्यातून त्यांचे वेगळे अंग रसिकांसमोर येते. हिंदुस्तानी शास्त्रिय संगीत आणि ठुमरी, चौती, कजरी आणि होरी यांसारख्या काही अर्ध शास्रीय संगीत प्रकारांवरही त्यांचे एकसारखे प्रभुत्व आहे. सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही भजनांचे अगदी उत्तम असे सादरीकरण ते करतात. आपल्या समूहातर्फे मुकुल शिवपुत्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..
‘‘कुणी जाल का.. सांगाल का..
सुचवाल का त्या कोकिळा..
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा..
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!’’
सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, ‘मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..’ महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मकुल शिवपुत्र यांचे गायन
https://youtu.be/exX364lveFA
https://youtu.be/p1XddjLg818
March 27, 2017
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
March 2, 2022
मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले.
April 17, 2021
दानशूर उद्योजक, विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात २४ जुलै १९४५ रोजी झाला.
प्रेमजी यांचे आजोबा ब्रिआटिशांच्या काळाज जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत असत. त्यांची जपान, रंगून (ब्रह्मदेश) व अन्य ठिकाणी तांदूळ निर्मितीची कार्यालये होती. 'राइस किंग' असे त्यांना त्याकाळी म्हटले जाई.
बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. त्यांनी प्रेमजी कुटुंबियांनी फाळणीनंतर पाकिस्तानात यावे, असा आग्रह धरला होता. परंतु, आपली जन्मभूमी कर्मभूमी भारतच आहे. भारत देशावरच आपले प्रेम आहे. याविषयी प्रेमजी कुटुंबियांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. ते जिनांच्या दबावाला बळी पडले नाहीत. पाकिस्तानात गेले नाहीत.
भारतात त्यांचा 'वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स' या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून शब्द तयार झाला विप्रो.
अझीम यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी काही मोठी नव्हती. अमेरिकेतील स्टॅँडफोर्ड विद्यापीठात ते शिकत असताना १९६६ मध्ये त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण सोडून कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. याच 'विप्रो' नावाने पुढे प्रेमजी यांनी १९६६ मध्ये कारभार हाती घेतल्यानंतर मोठा विस्तार केला. हवा कुणीकडे चालली आहे, जगात नवीन कोणते उद्योगधंदे पुढे येताहेत, कोणते तंत्रज्ञान पुढे येते आहे, यावर प्रेमजींचे लक्ष असे. म्हणूनच एकीकडे साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. त्या-त्या क्षेत्रातील गुणी माणसे हेरून त्यांना आपल्या उद्योगसमूहात सामील करून उद्योग चौफेर विस्तारला. 'विप्रो प्लुइडपॉवर', 'विप्रो टेक्नॉलॉजिस', 'इन्फ्रास्ट्रक्चर', 'लायटिंग', 'इकोएनर्जी', 'मॉड्युलर फर्निचर' अशा अनेक कंपन्या काढल्या.
माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेक, माइंडट्री, नेटक्रॅकर अशा कंपन्यांद्वारा कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली.
वैयक्तिक जीवनातही प्रेमजी यांना डामडौल, बडेजाव आवडत नाही. ते विमानाच्या 'इकॉनॉमी क्लास'ने प्रवास करतात. शाकाहारी जेवण त्यांना आवडते. त्यांच्या कंपनीच्या वा कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी अन्न दिले जाते, तेच ते घेतात. कर्मचारी, कामगार यांच्याशी खुला संवाद करणे, त्यांना आवडते. बेंगळूरूमध्ये ते ऑफिसच्या दोन किलोमीटर अगोदरच गाडीमधून उतरून पायी चालत ऑफिसला जातात. बड्या, महागड्या हॉटेलात राहायला त्यांना आवडत नाही. जगातील सर्वांत महाग गाडी ते वापरू शकतात; पण त्यांची गाडी आहे 'टोयोटा कोरोला' ही. त्यांचे घरही साधेच आहे. कंपनीच्या कामकाजात वशिला, भ्रष्टाचार, खोटारडेपणा ते अजिबात खपवून घेत नाहीत.
गुणवत्तेसंदर्भात भारतात '६-सिग्मा' ही प्रणाली त्यांनीच आणली, लागू केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत मोलाचा मानला जाणारा 'पीसीएसएम लेव्हल -५' हे प्रमाणपत्र त्यांच्या कंपनीस मिळालेले आहे. कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, सचोटी अशी 'विप्रो' उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आणि दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचे अठरा टक्के शेअर्स समाज कार्यासाठी दान करण्याचे ठरविले. ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा विनियोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून केला जाईल. त्यांचा हा निर्णय खरोखरच महत्त्वाचा आहे आणि देशातील धनिकांनी आवर्जून अनुकरण करावे, अशाच स्वरूपाचा आहे.
जागतिक स्तरावर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या 'गिव्हिंग प्लेज' नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिले भारतीच उद्योजक आहेत. समाजोपयोगी उपक्रम आणि कार्य जवळपास सर्वच कंपन्या करीत असतात. त्यांना सीएसआर म्हणजे 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' या नावाने ओळखले जाते. त्याचा कायदाही आहे आणि त्यानुसार विशिष्ट टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करावी लागते. असा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून प्रेमजी समाजासाठी मोठा निधी देत आहेत.
शिक्षण हा त्यांचा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे प्रेमजी यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्युत अभिआंत्रिकी विषयाचे उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले होते. कोणालाही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहायला मिळू नये, असा त्यांचा ध्यास आहे.
फोर्ब्सकने जाहीर केलेल्या यादीनुसार अझीम प्रेमजी यांच्याीकडे ११२० कोटी डॉलरची संपत्ती असून ते जगातील ९१ वे बिलिनयर आहेत. बेंगळुरू येथे राहणारे प्रेमजी भारतातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
२००१ मध्ये त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने प्रामुख्याने शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हे फाउंडेशन हजारो सरकारी शाळांमध्ये कार्यरत आहे. प्रेमजी यांनी आपल्या कंपनीतील स्वत:चे काही भांडवल विकून सुमारे दोन अब्ज डॉलर (सुमारे दहा हजार कोटी रुपये) उभारले आणि यातून या फाउंडेशनचे कामकाज चालते. आता त्यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. 'टाइम'ने २००४ मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते. त्यांच्या योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता हे सगळे लक्षात घेऊन २००५ मध्ये 'पद्मभूषण' आणि २०११ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानांनी गौरविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 24, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti