सातार्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक मुलगा हुषारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर लंडनमध्ये अर्थशास्त्रातील पीएच . डी . मिळवतो आणि पुढे कॅनडाचे मानवी हक्क आयुक्त हे पद भूषवीत जगभरातील मानवी हक्क यंत्रणांवर आपला ठसा उमटवतो, हे कर्तृत्व अपवादात्मकच. भाऊसाहेब उबाळे या एका मराठी माणसाच्या नावे ते जमा असावे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब.
भाऊसाहेबांचे वडील सरकारी कर्मचारी असले, तरी स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या मूल्यांचे भाऊसाहेबांवर बालवयातच संस्कार झाले. कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. नोकरी करीत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली. पुढे गाठीला फारसे पैसे नसतानाही त्यांनी लंडनला प्रयाण केले. उबाळे यांनी तेथे अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळवली. या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.
१९७५ मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्रता असूनही त्यांना तेथे सुमारे दोन वर्षे कारकुनाखेरीज अन्य नोकरी दिली गेली नाही. हा अर्थातच वांशिक भेदभावाच्या मनोवृत्तीचा परिणाम होता. उबाळे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात ईस्ट इंडियन्स तसेच पाकिस्तानी स्थलांतरितांच्या विरोधात कॅनडात हिंसक दंगे होत होते. उबाळे यांनी या हल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला. पत्रकारितेतील अनुभवाचा वापर करीत, त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते तो जाहीर सभेत सरकारला 'सादर' केला . 'अहवालात काय आहे हे मला कळत नाही, पण माझं भविष्य त्यावर अवलंबून आहे,' हे त्या मुलीचं विधान माध्यमांनी उचलून धरलं आणि नंतर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभेत या अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या ! 'उबाळे अहवाल' म्हणूनच तो ओळखला जातो. कॅनडातील समाजातील बहुविधता जपतानाच, त्यातील विविध वांशिक गटांत भावनिक एकजिनसीपणा आणणे, संधीच्या समानतेचे तत्त्व रुजविणे, याकरिता उबाळे कार्यरत राहिले.
कॅनडा सरकारनेही देशाचे मानवी हक्क आयुक्त तसेच वांशिक संबंध आयुक्त या पदांवर त्यांची नियुक्ती करून, त्यांच्या कल्पकतेचा आणि तळमळीचा सुयोग्य वापर करून घेतला. गरिबी निर्मूलन हा मानवी हक्कांचाच अविभाज्य भाग आहे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे मानवी हक्क चळवळीबरोबरच, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉव्हर्टी इरॅडिकेशन' ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती आणि त्यातून ग्रामीण विकासाला चालना देणारी कामे केली जात होती.
कॅनडात १९७५ सालापासून वास्तव्य असलेल्या आणि तेथील राजकीय - सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तो मात्र त्यांच्या मायदेशात आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जेथे झाले त्या पुण्यात.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 8, 2017
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
March 22, 2022
कर्तृत्व आणि परिश्रम या गुणांच्या बळावर सामान्यातील सामान्य माणूस देखील यशस्वी होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
March 3, 2018
देव, अभिनय
जागतिकीकरणाच्या युगात जाहिरात क्षेत्राची व्याप्ती ही अमर्याद आणि तेवढीच खोलवर पसरलेली आहे. अर्थात या क्षेत्रामध्ये अनेक स्थित्यंतरे तसेच बदलही काळानुरूप होत गेले. नवनवीन संकल्पना त्यामधून उदयास आल्या. लोकजीवनाशी थेट संबंध येत असलेल्या या क्षेत्राचे आकर्षण आणि गोडी अभिनय देव या अवलियाकडे पहिल्यापासूनच होती. घर रमेश व सीमा देव यांचे, तेथे अभिनयाची सरस्वती वास करीत असली तरी त्यांच्या या ज्येष्ठ पुत्राचा कल जाहिरात क्षेत्राकडे होता.
वास्तुविशारदाचे शिक्षण घेताना याच शिक्षणातून अभिनय यांना वेगवेगळ्या जाहिरातींची संकल्पना सुचत गेली आणि याच ऊर्मीपोटी ते ओ अॅण्ड एम या प्रख्यात जाहिरात संस्थेत दाखल झाले. आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या अभिनय देव यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास त्यानंतर बहरत गेला. काही काळ त्यांनी हायलाइट प्रॉडक्शन या जाहिरात कंपनीमध्येही दिग्दर्शक म्हणून काम केले. पण मनातील तो सुप्त दिग्दर्शक स्वस्थ बसू देत नव्हता. यामधूनच रमेश देव प्रॉडक्शन (आरडीपी) या जाहिरात संस्थेची निर्मिती झाली. तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहता ती दृष्टी तुम्हाला जाहिरात सुचवून जाते असे अभिनय देव यांचे म्हणणे आहे आणि याची साक्ष पटते ती सर्फच्या ‘दाग अच्छे है’ या जाहिरातीमधील वाक्याने. कल्पकता आणि सृजनशीलतेच्या याच जोरावर अभिनय देव यांनी तब्बल ४५० जाहिरातींना आकार दिला. जाहिरातींमध्ये दिसणारे चेहरे लक्षात राहतात, पण त्यांचे दिग्दर्शक कुणाला माहीतही नसतात.. जाहिरातींच्या या अफाट विश्वामध्ये या दिग्दर्शकांच्या कर्तृत्वाची दखल ‘कान’ महोत्सवामध्ये खास विभागात घेतली जाते. (चित्रपटांचा कान येथे होणारा महोत्सव निराळा) जाहिरात क्षेत्रामधील ऑस्कर अशी ओळख असलेला प्रतिष्ठेचा ‘कान गोल्ड लायन’ (द बेस्ट डिरेक्टर- फिल्मक्राफ्ट) हा पुरस्कार अभिनय देव यांनी पटकावून आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाची माान उंचावली. जगभरातील तब्बल १७०० जाहिरात दिग्दर्शकांमधून अभिनय देव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कल्पकता आणि सृजनशीलतेचा हा बहुमान असल्याची अभिनय देव यांची ही प्रतिक्रिया बरेचसे काही सांगून जाते.
August 5, 2017
साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.
June 7, 2022
कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.
झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.
तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.
बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.
समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’
June 20, 2022
सुरेश काशिनाथ टावरे हे भिवंडी नगरीचे प्रथम महापौर व याच लोकसभा मतदारसंघामधून २००९ मध्ये खासदार म्हणुन निवडून आले होते. सामान्य जनतेपासून ते उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये राहणार्या मतदारांना भेडसावणार्या समस्या मुळापासून सोडवणे हा त्यांच्या व्यक्तित्वामधील असाधारण असा गुण आहे. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षामध्ये आपल्या स्थानिक विकास निधीतून सुचविलेल्या ३२ विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून सुमारे १ कोटी ९९ लाख रूपये खर्चाची कामे मतदारसंघात पूर्ण केली आहेत. यामध्ये शाळांचे वर्ग बांधणे, स्मशान भूमी रोड विंधन विहीर व गटारे बांधणी, पाऊल वाट, रस्ते दुरूस्ती, आणि काँक्रिटीकरण चा समावेश आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य चिकीत्सा शिबीर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यामध्ये काही रूग्णांना मोफत औषधे व काही रूग्णांना चष्मे वाटण्यात आले होते.
त्यांच्या मतदारसंघातील ज्या ज्या गरीब लोकांना मोठया व महागडया आजारांनी ग्रासले होते, त्यांना या शिबीरानंतर निराश न होण्याचा संदेश दिला गेला, इतकेच नाही तर त्यांच्या उपचारांसाठी पंतप्रधान सहायता निधीमधून ४४ रूपयांना ३२ लाख रूपयांचे अर्थसाहाय्य त्यांनी मिळवून दिले. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी टंचाई दूर करण्यासाठी बोअरवेल अधिक खोल करण्याचे अनोखे अभियान त्यांनी सुरू केले ज्यासाठी लागणारा संपुर्ण खर्च हा शेतकर्यांच्या खिशातून एक पायलीही न काढता, खासदार निधीमधून भागवण्यात आला.
भारत निर्माण अभियानाअंतर्गत शासनांच्या विविध योजनांची माहिती तमाम शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न व त्यांना आलेले यश आजही वाखाणले जाते.
January 12, 2015
माळी, व्ही. ए.
महाराष्ट्राच्या कला परंपरेमध्ये कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कोल्हापूराने राज्याला एक श्रेष्ठ कलापरंपरा दिली. चित्रकार व्ही. ए. माळी, नव्हे माळीसर हे या कलापरंपरेतील शिरोमणी. या माळी सरांनी रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी सरांच्या अभिष्टचिंतनासाठी आलेल्या अध्र्याहून अधिक चित्रकारात सध्याच्या प्रख्यात चित्रकारांचा समावेश होता. ते सारे माळी सरांचे विद्यार्थी. सरांनी चितारलेली लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सेठ लालचंद हिराचंद, न्या. एम. सी. छागला, महात्मा फुले आदींची व्यक्तिचित्रे आदर्श मानली जाणारी.
त्या कलाकृतींनी केवळ नामवंतांच्याच संग्रहात नव्हे, तर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया म्युझियमपासून ते मुंबई-बडोद्यातील म्युझियमपर्यंत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये स्थान पटकावले आहे. त्यांच्या कलाकृती लंडनमधील इंडिया हाऊसमध्येही आहेत. माळी सरांचे वडील अनंत माळी हेही चित्रकारच. मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. मुंबईमध्ये नशिब अजमावण्यासाठी आलेल्या अनंत माळी यांचे निधन झाले, त्यावेळेस सर अवघे १० वर्षांंचे होते. शालेय शिक्षणानंतर केतकरांच्या कला संस्थेत दोन वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या माळी सरांनी जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. १९३२ साली जी. डी. आर्ट झाल्यानंतर माळी सरांनी कोळवणकरांच्या स्टुडिओमध्ये काम सुरू केले. कोळवणकर हे माळी सरांच्या वडिलांचे जिगरी दोस्त. किंबहुना मुंबईत नशिब अजमावण्यासाठी येण्याचा निर्णय अनंत माळी व कोळवणकर यांनी एकत्रितरीत्या घेतलेला होता. माळी सर व्यक्तिचित्रण करीत ते फोटोवरून किंवा प्रत्यक्षात व्यक्तीला समोर बसवून. इथेच त्यांना व्यक्तिचित्रणाची प्रमुख गोडी लागली. हातातले काम संपल्यानंतर सर स्वत बाहेर पडत आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्यांना स्डुडिओमध्ये आणून बसवून त्यांची व्यक्तिचित्रे चितारत. व्यक्तिचित्रण हा रईसांचा शौक मानला गेल्याच्या कालखंडात त्याकाळी माळीसरांनी मात्र माकडवाला, गोंधळी, पोतराज, भिल्ल स्त्रिया यांना स्थान दिले. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ सुंदर किंवा दिमाखदार दिसणाऱ्या व्यक्तीचे चित्रण या समजाला त्यांनी यशस्वीरित्या छेद दिला. माळी सरांच्या व्यक्तिचित्रणात म्हणूनच कृष्णवर्णाच्या व्यक्तींचे चित्रण पाहायला मिळते. माळी सरांच्या चित्रणशैलीचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे, या गडद रंग छटांचे चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावी पद्धतीने येते. त्यात त्यांचा शैलीदार जोरकसपणाही आहे आणि रंगांची केलेली वेगळी हाताळणीही आहे. रूढार्थाने आपण ज्याला यश म्हणतो असे यशही माळी सरांना दीर्घकाळ लाभले. १९४० साली त्यांना कलकत्ता अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टचे सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर माळीसरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९४४ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रौप्यचषक तर ४५ साली मोर विकणाऱ्या तरुणीच्या चित्रास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक. या चित्राचे प्रचंड कौतुक आणि माळी सरांचे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या पंधरा- वीस वर्षांंत आणखी काही महत्त्वाचे बहुमान माळी सरांच्या दिशेने चालत आले. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रूपधर पुरस्काराचाही समावेश आहे. शरीराच्या थोडय़ा कुरबुरी सुरू झालेल्या असल्या तरी आजही चित्रकलेचा विषय निघाला की, सर तरतरीत होतात. कुणी चित्र दाखवायला गेले की, आजही मार्गदर्शन करतात, प्रसंगी सुनावतातही. त्यांच्या सुनावण्यात आशीर्वाद असतोच, पण मोलाचे मार्गदर्शनही असते. ते टीकाही करतात आणि तेवढय़ाच अधिकाराने चूक सुधारण्याचा मार्गही सांगतात. राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना वयाची शंभरी साजरी करणाऱ्या या दिग्गज चित्रकाराचा राज्य सरकारने यथोचित गौरव केला तर तो राज्याचाच मोठा सन्मान ठरेल. माळी सरांना शताब्दी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.
August 5, 2017
सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.
January 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti