विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.
विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!
August 5, 2017
माने, श्रीकांत
सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.
त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.
August 5, 2017
त्सुनामी असो, भूकंप असो वा महाराष्ट्रातला दुष्काळ.. कोल्हापूरच्या अशोक रोकडे यांनी अशावेळी धावून जाणारी “व्हाइट आर्मी” उभी केली आहे. आपत्तीची वर्दी मिळताच दीड हजार जवानांचे बळ मदतीला धावते आणि शिस्तीत काम सुरु करते.
व्हाइट आर्मी चे कमांडर
July 24, 2015
नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे.
August 16, 2011
अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.
June 29, 2022
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे.
December 15, 2010
तडफदार, धाडसी पत्रकारांपैकी एक अशी नारायण आठवलेंची ओळख महाराष्ट्राला नवी नाही.
June 24, 2013
मालिका व नाटक अशा सर्वच क्षेत्रात आपला अभिनय लोकांपर्यंत पोहचवणारे अभिजित चव्हाण हे गेली २५ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
May 23, 2014
ठाणे शहरातील विख्यात लेखक व कवी अशी ख्याती असलेल्या गणेश ताम्हणे यांचा अलिबाग सारख्या निसर्गरम्य गावी जन्मल्यामुळे निसर्गाबद्दल विशेषतः कोकणातील फुललेल्या निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी अभिरूची त्यांच्या लेखनातून वाचकांच्या मनात उत्तमरित्या उमटलेली आहे. त्यांनी आजवर नियतकालिकांमधून व मासिकांमधून विपूल प्रमाणात लेखन केले असून “सुमन”, “भारत सेवक” अशा प्रथितयश मासिकांचे सहसंपादकपद, तसेच “बालविश्व” या लहान मुलांच्या नाजुक भावविश्वावरती अलगद प्रकाश टाकणार्या मासिकाचे संपादकपद त्यांनी भुषविलेले आहे. “भग्न बासरी”, “रेंगाळणारे सुगंध”,“कोकणाची पाऊलवाट” अश्या निरनिराळ्या विषयांवरती अत्यंत रोचक व लक्षवेधी शैलीने लिखाण केल्यामुळे ते रसिकांच्या साहित्य आठवणींमध्ये ते कायमचे कोंदले गेलेले आहेत. कोकणाची “पाऊलवाट” हे त्यांचे थेट कोकणातल्या दाट वनराईमध्ये वाचकांना घेवून जाणारे व साधेपणाच्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक, विशेष गाजले होते. कोकण संस्कृतीमध्ये, पुस्तक वाचून झाल्यानंतरही सर्वांना आणखी काही क्षण रेंगाळायला लावणार्या या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे बालपण, ए.सी.सी. कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांना आलेले अनुभव, भारताचा स्वातंत्र्यलढा, जीवनविषयक त्यांचा ऐकुण दृष्टीकोन, १९२२ पासूनचे ठाणे, आदींचा तपशील संदर्भवार स्पष्ट होतो. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी देखील आपल्या वडिलांकडून म्हणजेच गणेश ताम्हणें कडून देशासाठीच्या योगदाना बद्दलचे मोलाचे धडे घेतले असल्यामुळे ते देखील सामाजिक कार्यात यशस्वी होऊ शकले . ठाण्यातील मराठी साहित्यपरंपरेचे नियोजनबध्द संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेले शारदा मंडळ, मराठी ग्रंथसंग्रहालय, कथामाला मध्यवर्ती मंडळ आणि राष्ट्र सेवा दल अशा संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सदस्य म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला राजकीय किनारदेखील लाभलेली होती. पण मूळचा पिंड साहित्यिकाचा असल्यामुळे राजकारणात ते विशेष रमू शकले नाहीत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात केली. त्यांना १९५५ साली 'वैदिक संस्कृतीचा विकास' साठी पहिला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांना १९७३ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्काराने तर १९७६साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१९५४ साली दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० ते १९८० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ पहिले अध्यक्ष होते.मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत.प्रा. रा.ग. जाधवांनी 'शास्त्रीजी' हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मृत्यू २७ मे १९९४ रोजी झाला.
त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य
वैदिक संस्कृतीचा विकास
मराठी विश्वकोश (संपादन)
धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
विचार शिल्प
आधुनिक मराठी साहित्य
समीक्षा आणि रस सिद्धांत
हिंदू धर्मसमीक्षा
श्रीदासबोध
राजवाडे लेख संग्रह (संपादन)
उपनिषदांचे भाषांतर
संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
September 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti