‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
July 9, 2022
ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते.आणिू कालांतराने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. पुढे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले.
June 20, 2022
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे.
July 13, 2022
पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे.
आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य.
नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही.
अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले.
सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे.
शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.
August 4, 2017
Amol Palelar is an Indian actor of the 1970s and a director of Hindi and Marathi cinema.
April 13, 2010
असं म्हणतात की देवाने माणसाला काही विशीष्ठ विषयांमध्ये गती दिलेली आहे, व काहींमध्ये अधोगती. परंतु काही हिरे असे असतात, की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.
July 29, 2011
शेख, फैयाज
काही व्यक्तींच्या अंगी चतुरस्र गुण असूनही त्यांना त्यांच्या योग्यतेचे दान पदरी पडायला उशीर लागतो. ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख या अशांपैकीच एक! उत्तम गाणे, रूपसंपदा, अभिनय हे सर्व असूनही त्यांच्या या गुणसंपन्नतेचे म्हणावे तितके चीज झाले नाही.
आपण उत्तम गायिका-अभिनेत्री असूनही बऱ्याचदा आपल्या वाटय़ाला बदलीच भूमिका आल्या, याबद्दलची खंत त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेची उशिरा का होईना, यथोचित दखल घेतली गेली. सोलापूरमध्ये आपल्या नाटय़कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाटय़संपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाटय़सृष्टीत पदार्पण केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंत त्यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाटय़संगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाटय़-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्या मुंबईत येत त्यावेळी फैय्याज यांना गाणे शिकवीत. ‘कटय़ार’मधील झरिना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. ‘महानंदा’, ‘पैंजण’, ‘वजीर’, ‘दायरे’, ‘एक उनाड दिवस’ असे चित्रपटही त्यांनी केले. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्यासोबत केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढय़ांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. आजही त्या त्याच तडफेने कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाव फैयाज शेख पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात सहजपणे सामावून जाईल, असे व्यक्तिमत्त्व. मोठे डोळे आणि चेहऱ्यावर कायमचे स्मित. गळा अतिशय सुरेल. गायक कलावंत म्हणूनच कारकीर्द गाजावयाची. पण कलावंत म्हणूनच सतत रंगभूमीवर उभे राहण्याचे भाग्य मिळाले. फैयाज हे नाव कुणाही मराठी माणसाने उच्चारले तरी डोळ्यासमोर ‘कटय़ार काळजात घुसली’ मधील झरीनाच उभी राहणार. या कलावतीला मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घोषित होणे,
ही मराठी रंगभूमीसाठी आनंदाची बातमी ठरली. गद्य आणि संगीत नाटकांत तेवढय़ाच तडफेने भूमिका साकारणाऱ्या फैयाज यांची रंगभूमीवरील कारकीर्द साडेचार दशकांची आहे. १९६५ मध्ये त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजही त्या रंगभूमीवर अधूनमधून दर्शन देत असतात. या काळात त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या चार हजारांच्या घरात जाणारी आहे. दौरे आणि कार्यक्रमांनी न थकणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी त्या आहेत. कटय़ार काळजात घुसली, हे त्यांचे गाजलेले नाटक तसेच ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’, ‘मत्स्यगंधा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकातील त्यांच्या भूमिका स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. ‘महानंदा’ या चित्रपटातील त्यांची प्रमुख भूमिका रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. किनारा, वादळ वारं, पेइंग गेस्ट, थँक्यू मिस्टर ग्लाड, सूर राहू दे, मी मालक या देहाचा, अंधार माझा सोबती, गुंतता हृदय हे, भटाला दिली ओसरी, वीज म्हणाली धरतीला, मैत्र अशा नाटकांमधील तर बावनखणी, संत तुकाराम, पंडितराज जगन्नाथ, होनाजी बाळा, संत गोरा कुंभार या संगीत नाटकांतील त्यांचे काम रसिकांना भावले. बालगंधर्वासारख्या संगीत सम्राटाने रंगभूमीला जो अभिजाततेचा दर्जा दिला, तो टिकवून ठेवण्यासाठी आजही जे प्रयत्न होत आहेत, त्यामध्ये फैयाज यांचाही वाटा आहे. आपल्या गळ्याने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. संगीत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वाचीच म्हटली पाहिजे. रंगभूमीवर स्त्रियांनी काम करण्यास समाजाने मान्यता देण्यास विसावे शतक उजाडावे लागले. कमलाबाई गोखले, कमळाबाई बडोदेकर यांच्यासारख्या कलावंतांनी रंगभूमीवर भूमिका करून जी सांस्कृतिक क्रांती केली, त्यामुळे तर नंतरच्या काळात महिलांना जीवनाच्या इतर प्रांतातही प्रवेश करणे सुलभ झाले. हिराबाई बडोदेकरांनी संगीत रंगभूमीवर संशयकल्लोळ या नाटकात पहिल्यांदा अभिजात संगीताचा आविष्कार केला. त्यानंतरच्या काळात स्त्रियांना संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून गायन सादर करण्याची समाजमान्यता मिळाली. हिराबाईंनी केलेल्या या क्रांतीला सगळ्याच कलावंतांनी सादर प्रणाम केला पाहिजे. फैयाज या अशा देदीप्यमान परंपरेशी आपले नाते सांगणाऱ्या कलावती आहेत. संगीत रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ासाठी आणि ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी फैयाज यांनी पाश्र्वगायन केले होते. पाठराखीण आणि घरकुल या मराठी आणि बावर्ची, प्रेमपर्वत, अचानक, रंगबिरंगी, आलाप, गुंबीश, कलयुग का कृष्ण, धरतीपुत्र यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही रसिकमान्य झाली. एचएमव्हीने त्यांनी गायलेल्या ‘हुस्नेगजल’ या ध्वनिमुद्रिकेलाही रसिकांनी पसंतीची पावती दिली. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘जोगिया’ या काव्यसंग्रहातील कवितांचे संगीतकार सी. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले वाचन तर रसिक आजही आठवतात. सोलापूरचे पंचवाडकरबुवा यांच्याकडे संगीताचे शिक्षण सुरू केल्यानंतर पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव कुळकर्णी, बेगम अख्तर यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. मराठी रंगभूमीवर आपल्या कलेने रसिकांना सतत आनंद देणाऱ्या या कलावतीचे मनापासून अभिनंदन!
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज
सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्
ताने या गुणी अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध...
वीज म्हणाली धरतीला नाटकात जुलेखाची भूमिका करणा - या फैयाजबाईंच्या तोंडी एक गाणं होतं-
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी...
मात्र या चार पक्षिणींमधली एक राजहंसी होती, तर दोघी हंसी होत्या, चौथीला मात्र आपण कोण तेच ठाऊक नव्हतं. ती तना-मनाने त्यांच्याबरोबर होती. पण तोपर्यंत तिला आपल्या अस्तित्त्वाची ओळखच झालेली नव्हती. ती स्वत:ला त्यांची सावलीच समजत असे. अन् एके दिवशी अकल्पित घडतं...
बाण आला तो कोठुनी, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा...
फैयाजबाईंची कथा यापेक्षा वेगळी नाही. फरक एवढाच होता की, गाण्यातल्या कोकिळेला स्वत:ची जात शेवटपर्यंत कळली नव्हती. फैयाजबाईंना मात्र आपली कोकिळेची जात कधीच कळली होती. पण त्यांच्या आजुबाजूला कावळ्यांचा जमाव एवढा मोठा होता की, त्यांनी त्या कोकिळेला ऐन उमेदीत स्वतंत्रपणे गाण्याचं-उडण्याचं स्वातंत्र्य कधी दिलंच नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वषीर् फैयाजबाई मुंबईत आल्या. हैदराबादजवळ वरंगळला असलेली बाईंच्या वडिलांची चादरीची फॅक्टरी बंद पडली आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्या सोलापूरहून मुंबईत आल्या. अभिनयाची उत्तम जाण आणि गाण्या-नृत्याची आवड हेच त्यांच्याजवळचं तेव्हा भांडवल होतं. त्या भांडवलावरतीच 'नाट्यसंपदा' या नाट्यसंस्थेने बाईंना पाचशे रुपयांच्या नोकरीवर बांधून घेतलं. बाई पगारातले चारशे रुपये गावी पाठवायच्या आणि शंभर रुपयात कसंबसं स्वत:चं भागवायच्या. बाईंची हीच नड 'नाट्यसंपदा'ने नेमकी हेरली आणि तब्बल पंधरा वर्ष बाईंना आपल्याच कंपूत अडकवून ठेवलं. मात्र, एवढ्या वर्षांत 'कट्यार काळजात घुसली'मधील झरिना, 'अश्रूंची झाली फुले'मधील नीलम अशा दोन-तीन महत्त्वाच्या भूमिका सोडल्या, तर बाईंना कुठल्याच फ्रेश भूमिका मिळाल्या नाहीत. पंधरा वर्षं त्यांना केवळ रिप्लेसमेंटच्या भूमिकाच दिल्या गेल्या.
मात्र, कोंबडं झाकलं, तरी सूर्य उगवायचा राहात नाही, याच न्यायाने फैयाजबाईंचा उदयकाळ व्हायचा राहिला नाही. त्यांच्या अभिनयगुणाची, गानकौशल्याची झलक दाखवण्यासाठी 'कट्यार'सारखं नाटक पुरेसं होतं. आणि बाईंनी या संधीचं सोनं केलं. यातल्या त्यांच्या झरिनाच्या भूमिकेचं आणि गाण्यांचं पं. रविशंकर, जयदेव, कुमार गंधर्व, सी. रामचंद अशा बड्या मंडळींनी दिलखुलास कौतुक केलं. अर्थात याचं श्रेय फैयाजबाईंनी कायम नाटकात खाँसाहेबांचं काम करणाऱ्या वसंतराव देशपांडे आणि नाटकाला संगीत देणाऱ्या पंडित जितेंद अभिषेकीबुवांनाच दिलं आहे. कारण त्यांच्यामुळेच ही नामवंत मंडळी नाटक बघायला आलेली होती.
पण या नाटकाने फैयाजबाईंचा जणू पुनर्जन्म झाला. तब्बल सतरा वर्षं या नाटकाचे अखंड प्रयोग सुरू होते. वसंतराव देशपांडेंचं निधन झालं, तेव्हाच त्याचे प्रयोग थांबले. पण तोपर्यंत मराठी व्यावसायिक रंगभूमीला आणि उतरती कळा लागलेल्या संगीत रंगभूमीला एक गुणवान गायक अभिनेत्री गवसली होती. त्यामुळेच नंतरच्या काळात फैयाजबाईंना त्यांच्या गाण्याचा कस लागेल, अशी वीज म्हणाली धरतीला, संत गोरा कुंभार, राजहंसी प्रीत अशी एकाहून एक सरस नाटकं मिळाली आणि बाईंनी वेळोवेळी आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं.
झरिनाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेल्या गाण्याच्या तयारीमुळे आणि त्यांच्या खास पत्तीदार आवाजामुळेच जयदेव, सी. रामचंद यांनी त्यांच्याकडून काही गाणी गाऊन घेतली. सी. रामचंदांनी तर ग. दि. माडगूळकरांना 'गीत गोपाल'ची निमिर्ती करायला सांगून त्यातही बाईंकडून काही गाणी गाऊन घेतली. परंतु गीत रामायणाच्या प्रभावळीत 'गीत गोपाल' झाकोळलं गेलं.
अर्थात, गाणं हे काही बाईंचं करियर नव्हतं. पण त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांनी गाण्यातच करियर करावं, असं अनेकांना वाटायचं. त्यापैकीच एक म्हणजे ठुमरी-गझलसम्राज्ञी बेगम अख्तर. अख्तरीबाईंशी फैयाज यांची भेट वसंतराव देशपांडे यांनीच घडवली. मात्र या भेटीचं रूपांतर आपुलकीच्या नात्यात कधी झालं, ते फैयाज आणि अख्तरीबाईंनाही कळलं नाही. नंतर बेगम अख्तर जेव्हा जेव्हा मुंबईत येत, तेव्हा तेव्हा फैयाजबाईंना बोलावून घेत. आपल्या कार्यक्रमात त्यांना साथीला बसवत. आज फैयाजबाई बेगम अख्तर यांच्या गझला तेवढ्याच सशक्तपणे गातात, ते यामुळेच!
पण फैयाजबाईंनी आपलं गाणं आवडीच्या पातळीवरच ठेवलं. कारण एव्हाना नाटक, सिनेमा, दूरदर्शनमालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले होते. 'महानंदा' चित्रपटाच्या निमित्ताने बाईंच्या दमदार अभिनयाची चुणूक रसिकांना पाहायला मिळालीच. पण पुलं, श्रीराम लागू, विक्रम गोखले यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं.
त्याच लौकिकावर त्यांना नुकताच मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे बहुधा प्रथमच फैयाज यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली गेलेली असावी. अन्यथा आजवर त्यांची वाटचाल एक होती पक्षिणी अशीच होती...
August 5, 2017
मराठी चित्रपटसृष्टीत असे खूप गुणवंत आहेत ज्यांच्या कलेची व्हावी तशी कदर झाली नाही आणि त्यांच्या योग्यतेच्या तुलनेत त्यांच्या पदरी तसे फार यश पडले नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर हे अशांपैकीच एक होते.
August 5, 2017
त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.
June 22, 2022
बोकील, शांताराम
संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.
विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti