(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

    मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत.

    आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.

    त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

    आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

    ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते.

    तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

    नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या.

    त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    माहेरची माणसे चित्रपट.
    https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
    संसार चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8

  • ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे

    १९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले.

  • भीमसेन जोशी

    भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.

    पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
    कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले. वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले. विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती. ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण. जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम. २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन. १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी. समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद. उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग. गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
    २४ जानेवारीला भीमसेन जोशी यांची माहिती समूहावर आलेली आहे, त्यामुळे आज माहिती न टाकता काही दिग्गज व्यक्तीनी सांगीतलेल्या भीमसेन जोशी यांच्या आठवणी...........

    माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगीतले होते.

    श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?

    त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या. 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला. त्यांनी संगीत दिलेल्या, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
    रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
    आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
    कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
    ही अशी रचना अशी आहे कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही.

    गौतम राजाध्यक्ष यांनी भीमसेन जोशी यांची सांगितलेली आठवण
    मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही ब-यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की गौतम सांगायचा, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.

    किशोरी अमोणकर यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
    आम्ही एका कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही ? त्याने ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही.

    सुधीर गाडगीळ यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
    "पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.

    पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश.
    पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
    भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
    पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
    भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
    पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
    भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
    पु.ल. : पुण्याला.
    भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
    पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
    भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
    सचिन तेंडूलकर यांच्या आठवणीतील भीमसेन जोशी.
    मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
    "नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"
    त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'
    लता मंगेशकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल आठवणी.
    मला भारतरत्न मिळाल्यानंतर "या भारतरत्न' असे
    नेहमी म्हणणारे... "अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो' असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी... ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
    पं. संजीव अभ्यंकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दलची आठवण.
    १९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अमेरिकेतील आमदार श्री ठाणेदार

    २०२० च्या अमेरिकेतील निवडणूकीत भारतीय वंशाचे अमेरिकेतील करोडपती श्री ठाणेदार मिशिगनमधून ९३ टक्के मते मिळवत सिनेटर (आमदार) झाले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. श्री ठाणेदार पेशाने ते संशोधक आणि व्यवसायिक आहेत. त्यांनी सहा जणांना हरवत निवडणूक जिंकली आहे.

  • नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई

    नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ रोजी झाला. वसंत देसाई हे नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. १९६० साली बडोद्यात भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.

    विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली. मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, बालगंधर्व-व्यक्ती व कला, रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड, संगीत विभाग, विधिलिखित, अमृतसिद्धी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ साली हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या.

    तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात.. या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. १९३७ मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली.

    शब्द वसंत शांताराम देसाई यांचे व मास्तर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाटय़पदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’ वसंत शांताराम देसाई यांचे २३ जून १९९४ रोजी रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सीतारादेवी

    सितारादेवी यांनी कथक नृत्यशिवाय भरतनाट्यम , मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीचा अभ्यास केला . लोकनृत्य , परदेशी नृत्याची देखील त्यांना आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना मैदानी खेळ , पोहणे यांचीही आवड होती. त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे होते त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतही स्वतःची छाप पडली होती.

  • अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर

    जिवंतपणीच दंतकथा बनण्याचा मान मिळविलेली हॉलिवूडमधील मदमस्त नायिका, तसेच हॉलिवूडच्या सुवर्णकाळाची एक अनभिषिक्त सम्राज्ञी एलिझाबेथ टेलर या लिझ या नावाने ओळखल्या जायच्या. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला.

    एलिझाबेथ टेलर हॉलिवूडमधील कारकीर्द संपल्यानंतरही सतत चर्चेत राहिल्या. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून वयाच्या नवव्या वर्षी त्या सर्वप्रथम ‘देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून झळकल्या. ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटाद्वारे त्यांनी नायिका म्हणून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एलिझाबेथ टेलर यांनी पॉल न्यूमन, रॉक हडसन, जेम्स डीन, मार्लन ब्रँडो आदी दिग्गज नायकांबरोबर काम केले. ‘क्लिओपात्रा’, ‘जायंट’, ‘बटरफिल्ड’, ‘व्हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’, 'नॅशनल वेलवेट' आदी त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. एलिझाबेथ टेलर यांना १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या बटरफिल्ड एट या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना दोनवेळा सर्वत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून अॅरकेडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हॉलिवूडमधील अन्य अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले होते. एलिझाबेथ टेलर यांनी केलेले एकूण आठ विवाह हा जगभर चर्चेचा विषय बनला. त्यातही जगप्रवासी तसेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या गेलेल्या रिचर्ड बर्टन यांच्याबरोबर दोनवेळा झालेले विवाह विशेष औत्सुक्यपूर्ण होता. बर्टन यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटही केले होते. संपूर्ण आयुष्य उत्फुल्लतेने आणि रसपूर्णतेने जगलेली अभिनेत्री म्हणून एलिझाबेथ टेलर यांना जग ओळखत असे. एलिझाबेथ टेलर यांचे २३ मार्च २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ उद्योगपती पंडितराव कुलकर्णी

    पंडितकाकांनी कार्बोरेटरला लागणाऱ्या क्रिटिकल पार्टचे मशीनिंग सुरू करून पुरवठा करण्याचे शिवधनुष्य उचलले. सतत काम आणि नवीन गोष्टींचा शोध घेत असल्यामुळे कामामधून निवृत्ती त्यांना माहीतच नव्हती. फायमुळे इचलकरंजी आणि आजूबाजूला असलेल्या परिसरात प्रचंड रोजगारनिर्मिती होऊ लागली.

  • तबलावादक पं. सामताप्रसाद

    प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.

  • इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

    १९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले.