(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

    राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे.

    यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

    राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गीतकार म्हणून राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेली गाणी
    असावा सुंदर चॉकलेटचा
    उर्मिले त्रिवार वंदन तुला
    कोणास ठाऊक कसा
    सती तू दिव्यरूप मैथिली

  • खतरों के खिलाडी अक्षय कुमार

    अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्यांचा जन्म ९ सप्टेबर १९६७ रोजी झाला. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी.

    लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते.

    त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे.

    नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे

    श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो.

    "वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.

    अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले.

    बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले.

    पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले. १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले.

    मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्याीच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.

    १७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.

    खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्यांतना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली.

    १७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांूच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले. १७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला.

    इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली.

    सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्यातला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे २ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

    त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते.

    नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले.

    त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

    सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म.

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय.

    एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या.

    पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

    अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजीनी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

    पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या.

    पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्‍या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्तीसुद्धा होती.

    १९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

    जितेंद्र अभिषेकी यांचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2AJq1VvaCGw

    https://www.youtube.com/watch?v=BZVAfYiqsjk

    https://www.youtube.com/watch?v=tZol6tvKek8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw&index=2

    https://www.youtube.com/watch?v=mB9uW1I28EM&index=4&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=kmGeigOguMg&index=8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=t0XLyce4HQM&index=9&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=er5W9FLyPKA

  • सुधीर फडके उर्फ बाबुजी

    कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता.

  • कवी, कथाकार अर्जुन उमाजी डांगळे

    “पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती.

  • विकिपीडिया चे सहसंस्थापक व प्रमुख जिमी वेल्स

    आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला.

    जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा त्यातच कुठे तरी असावी. या शिवाय लहानपणापासूनच त्यांना संगणकाची ओढ होती. तासन् तास संगणकावर खेळ खेळणे, कॉम्प्युटर कोड तयार करणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यातूनच त्यांना या माध्यमाची महती लक्षात आली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली.

    अलाबामा आणि इंडियाना विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी संगणक क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सहकाऱ्यांसह बोमीस हे वेबपोर्टल तयार केले. ते अश्लील मजकुराचे, छायाचित्रांचे पोर्टल होते. पण त्याचेही एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपली छायाचित्रे अपलोड करू शकत असत. मात्र त्यांचा तो प्रयोग सपशेल फसला आणि जिमी वेल्स ऑनलाइन विश्वकोश निर्मितीकडे वळले. २००० साली त्यांनी ‘नूपीडिया’ हा ऑनलाइन विश्वकोश सुरू केला. तत्पूर्वी त्यांची लॅरी सँगर या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती. १९९०च्या सुमारास वेल्स एक ऑनलाइन ग्रुप चालवत होते. त्यात आयन रँड या तत्त्ववेत्त्या लेखिकेच्या ऑब्जेक्टिव्हिजम या तत्त्वज्ञानाची चर्चा होत असे. त्यातूनच त्यांचा सँगर यांच्याशी परिचय झाला होता. या दोघांनी मिळून नूपीडिया चालवताना येत असलेल्या अडचणींचा वेध घेऊन, त्यात सुधारणा करून, १५ जानेवारी २००१ रोजी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने ‘विकिपीडिया’ हे संकेतस्थळ सुरू केले.

    विकिपीडिया हे साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस 'विकी विकी वेब डॉट विकी' हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. लोकांनी आपणांस हव्या त्या विषयावरील माहिती या संकेतस्थळावर अपलोड करावी. उपलब्ध माहितीत भर घालावी, ती संपादित करावी, असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. आज इंग्रजी विकिपीडियामध्ये असे सुमारे ४८ लाखाहून अधिक लेख आहेत. असे माहितीपूर्ण लेख एकाच ठिकाणी असणे ही काही साधी गोष्ट नाही. कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते.

    आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती 'ओपन सोर्स लायसन्स'प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोश म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेला विश्वकोश असे त्याबद्दल म्हणता येईल.

    ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तसा प्रत्येकालाच - एखाद्या विषयावर लेख लिहिताना, प्रोजेक्ट तयार करताना, निबंध लिहिताना, शाळेचा गृहपाठ करताना जेव्हा आपण विकिपीडियाकडे धाव घेतो तेव्हा - येत असतो!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते “चिंचोरे गुरुजी”

    माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !

    "चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !

    चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !

    माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
    भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….

    विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
    वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !

    मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !

    शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !

    माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !

    तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,

    -- उपेंद्र पंडित चिंचोरे

  • वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’

    संगीत संशोधक आणि अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथाचं नाव आहे, ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’.

    केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार केला तर वसंत देसाई हे कधीच व्यावसायिकदृष्टय़ा आघाडीचे संगीतकार नव्हते. परंतु वसंतरावांच्या सांगितिक आयुष्याचा, हिंदी चित्रपट हा केवळ एक पैलू आहे. मराठी चित्रपट संगीत, नाटय़संगीत गैरफिल्मी संगीत असा त्यांच्या प्रतिभेचा व्याप मोठा आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीची विस्तृत माहिती मिळवून, त्याची वर्गवारी करून ते या ग्रंथात अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. छायाचित्रांची नुसतीच संख्यात्मक रेलचेल नाही, तर ती चित्रे आणि त्यातील व्यक्ती पाहता पाहता अनेक दुर्मिळ क्षण जे कुठे कुठे विखुरले होते ते एकत्रितरीत्या गवसल्याचा आनंद मिळतो.

    ‘मराठी संस्कृती’चे जतन करण्यासाठी अलीकडे अनेकांचे हात शिवशिवत असतात, त्या सर्वाना असे ग्रंथ पाहिल्यावर ‘संस्कृती जतना’चा खरा अविष्कार म्हणजे काय, ते खरे तर लक्षात यायला हवे!

    कलावंताला, त्याच्या चाहत्यांना, कलावंताच्या वारसांना त्या कलावंताच्या कामगिरीचे चीज झाले अशी भावना हा देखणा ग्रंथ पाहताना होते. वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. त्यात वसंतरावांच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाची व संगीत कारकिर्दीची माहिती आहे.

    लेखक, गीतकार गुलजार यांनी ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’ या चित्रपटांच्या वेळी आलेले आपले अनुभव अतिशय मोजक्या परंतु भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहेत. ‘गुड्डी’साठी वसंतरावांनी संगीतबद्ध केलेली ‘हमको मन की शक्ती देना’ ही प्रार्थना ए. आर. रहमानलासुद्धा स्तिमित करते, हे गुलजार यांनी आवर्जून नमूद केले आहे. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये ‘सोयरी’ झालेल्या वाणी जयराम हिने अत्यंत आत्मियतेने वसंतरावांवर लेख लिहिला आहे.

    ‘आय वॉज लाईक ब्लॉटिंग पेपर, अॅाब्सर्बिग एव्हरीथिंग ही टॉट मी’ असे ती म्हणते तेव्हा वसंतरावांचे तिच्या कारकिर्दीतील स्थान अधोरेखित होते. विकास देसाई, वैजयंतीमाला, भालचंद्र पेंढारकर, सुलोचना चव्हाण, इनॉक डॅनिअल्स, डॉ. मंदार बिच्छू, जगदीश खेबुडकर, फैयाज, हेमंत पंडित, बाळ देशपांडे यांच्या लेखांमधून वसंतराव एक संगीतकार आणि एक व्यक्ती म्हणून म्हणून उलगडत जातात. चित्रपट संगीताचे आस्वादक-अभ्यासक राजू भारतन यांनी त्यांच्या ‘ही टय़ून्ड विथ गॉड’ या लेखात वसंतरावांच्या दैवी प्रतिभेचे मर्म उलगडून दाखविले आहे. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे.

    विश्लेषण, माहिती आणि आठवणींनी भरलेली ही सव्वाशे पाने संपली की मग सुरू होतो लेखा-जोखा! त्यात पहिल्या भागात हिंदी चित्रपट भेटतात. १९४२ साली ‘शोभा’ या चित्रपटापासून सुरू झालेला संगीतकार म्हणून प्रवास १९७६ साली ‘शक’ या चित्रपटाशी थांबला तो वसंतरावांच्या अकाली अपघाती मृत्युमुळे. या दरम्यान त्यांनी संगीतबद्ध केलेले ५२ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले तर ‘अमर समाधी’ आणि ‘कामदेव’ अप्रदर्शित राहिले. या चित्रपटांमधील कलावंत, गाणी, गायक असा सर्व तपशील यात आहे. याच पद्धतीने पुढील भागांमध्ये २१ मराठी चित्रपट (सात अप्रदर्शित मराठी चित्रपट), गुजराती, बंगाली चित्रपट, १४ संगीत नाटके, माहितीपट, गैरफिल्मी गीते, नृत्यनाटके यांची १९ तपशीलांसह नोंद आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची व्यवस्थित दखलही घेण्यात आली आहे.

    पुस्तकातील लेख आणि फोटोखालील ओळी इंग्रजीत तरी इतर सर्व तपशील आणि माहिती हिंदी/मराठी व इंग्रजीत देण्यात आली आहे. पुस्तकात सर्वत्र वसंतरावांचे विविध मूडस् टिपणारी आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे दाखविणारी छायाचित्रे आहेत. सहकाऱ्यांसमवेत गाण्यांची चर्चा करणाऱ्या भावमुद्रा आहेत. मासिकाच्या आकारातील पुठ्ठा बांधणीचे सुंदर मुखपृष्ठ, उत्तम दीर्घ-जीवी कागद आणि अप्रतिम छपाई यामुळे हे पुस्तक म्हणजे वसंतरावांच्या प्रतिभेला खरा सलाम ठरते.

    ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे संगीत यात बंदिस्त आहे. अशा प्रतिभावंतांचे संगीत या मातीत जन्मते, हेच ‘ऋणानुबंधांच्या सुरेल गाठी’सारखे असते, याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे! ‘वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’, संशोधन, संकलन, संपादन- विश्वास नेरूरकर, बिश्वनाथ चॅटर्जी, गायत्री पब्लिकेशन व स्वरयोग, पृष्ठे- ४०८, किंमत- ८०० रुपये!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट
    संदर्भ.श्री.श्रीकांत बोजेवार

  • संवेदनशील कवी कैफी आझमी

    आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला.