जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले.
सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.
नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.
१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.
हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे.
पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2019
गणपती वासुदेव बेहेरे उर्फ ग.वा. बेहेरे हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि संपादक होते. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत.
त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले.
शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती.
ग.वा.बेहेरे यांचे ३० मार्च १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
March 31, 2017
असे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन – यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
August 20, 2018
विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.
विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते सुरूवातीला केंन्द्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.
लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी विद्यासागर राव करीमनगर जिल्हयातील मेटपल्ली विधानसभा मतदार संघातून आंध्रप्रदेश विधान सभेवर १९८५, १९८९ व १९९४ असे सलग तीनवेळा निवडून गेले. या तिन्ही वेळा ते भाजप सांसदिय मंडळाचे सभागृहातील गटनेते होते.
१९९८ साली विद्यासागर राव करीमनगर मतदार संघातून बाराव्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. १९९९ साली त्यांची आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. १९९९ साली ते तेराव्या लोकसभेवर दुसऱ्यांलदा निवडून गेले. आपल्या सांसदीय जीवनामध्ये त्यांनी लोकलेखा समिती, कामकाज सल्लागार समिती व अर्थविषयक समितीवर सदस्य म्हणून काम केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लामसलत समितीचे देखिल ते सदस्य होते.
करीमनगर येथे त्यांनी सुरूवातीला जनसंघ व नंतर जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखिल काम केले आहे. १९७५ साली त्यांना मिसा खाली अटक झाली व वरंगळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला. विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 12, 2019
बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
१९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं.
निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. निरुपा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 9, 2017
५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.
October 5, 2020
उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.
May 31, 2022
महान आयरिश नाटककार, समीक्षक आणि विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. पुढे तो डब्लिनहून लंडनला स्थायिक झाला. ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत बसून त्याचं वाचन आणि लेखन चाले. त्याच्या सुरुवातीच्या चारही कादंबऱ्या प्रकाशकांनी नाकारल्या होत्या. वर्तमानपत्रासाठी पाठवलेले लेखही साभार परत आले; पण त्याने लिहिणं सुरूच ठेवलं.
दरम्यान, लंडनमध्ये ‘फेबियन सोसायटी’ची स्थापना झाली होती. ‘क्रांतीपेक्षा उत्क्रांत होत जाणारा समाजवाद’ हे त्यांचं ध्येय होतं. शॉ त्यांच्या विचारांकडे ओढला गेला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वाने त्याचा हिरीरीने प्रचार करू लागला. शॉला संगीताची आवड होती आणि त्याच्याकडे नाटकांच्या समीक्षेचं कामही आलं. तो स्वतःची नाटकंही लिहू लागला.
१८९० ते १९५० अशा साठेक वर्षांत त्याने तब्बल २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती केली. ‘आर्म्स अँड दी मॅन’, ‘मिसेस वॉरेन्स प्रोफेशन’, ‘सेंट जोन’, ‘सीझर अँड क्लिओपात्रा’, ‘हार्टब्रेक हाउस’, ‘मेजर बार्बरा’, ‘मॅन अँड सुपरमॅन’, ‘दी डॉक्टर्स डिलेमा’, ‘अँड्रोक्लस अँड दी लायन’ अशी त्याची नाटकं गाजली. पण त्याचं सर्वांत गाजलेलं आणि अजरामर नाटक म्हणजे ‘पिग्मॅलिअन!’ या नाटकानं इतिहास घडवला. त्या नाटकावर हॉलिवूडमध्ये ‘माय फेअर लेडी’ हा नितांतसुंदर सिनेमा बनला, ज्यात ऑड्री हेपबर्न आणि रेक्स हॅरिसन यांनी काम केलं होतं आणि त्याला आठ ऑस्कर मिळाले. याच कथेवर आधारित ‘पुलं’नी ‘ती फुलराणी’ हे अप्रतिम नाटक लिहिलं आहे.
एक गंमतीदार किस्सा. असं म्हणतात, की इसाडोरा डंकन या सुप्रसिद्ध अमेरिकन नृत्यांगनेनं बर्नार्ड शॉच्या विद्वत्तेवर भाळून त्याला म्हटलं, ‘कल्पना कर मला तुझ्यापासून मूल झालंय, तर ते किती छान होईल, त्याला माझं सौंदर्य आणि तुझी बुद्धिमत्ता लाभेल!’ हजरजबाबी शॉ त्यावर लगेच उत्तरला, ‘ते ठीक आहे; पण समजा त्यानं तुझी बुद्धी आणि माझं रूप घेतलं तर..?’
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन २ नोव्हेंबर १९५० रोजी झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
July 26, 2021
स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले.
संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होतागोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एच.एम.व्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय. नीलकमल, सुहागरात, हमारी बेटी, गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर, आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. प्रमोद देव
May 29, 2017
स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लाॅर्ड बेडन पावेल यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले.
१९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.
भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘ भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.
भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti