१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी झाला. त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘गोलमाल’, ‘हम किसीसे कम नहीं’ यांसारख्या चित्रपटांपासून ते थेट अलीकडच्या ‘क्रिश’, ‘किसना’, ‘कोई मिल गया’ यांसारख्या ७० हून अधिक चित्रपटांचे पटकथा लेखन करणारे सचिन भौमिक यांनी नासिर हुसैन, हृषिकेश मुखर्जी, सुभाष घई, प्रमोद चक्रवर्ती, जे ओमप्रकाश, राकेश रोशन यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्यानंतर १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या शम्मी कपूर-राजश्री अभिनीत चित्रपटासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. भौमिक यांचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. सचिन भौमिक यांचे १२ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 17, 2017
बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.
विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला.
समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले.
'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2019
पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.
July 20, 2017
नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता, २१ डिसेंबर १९०९.
April 19, 2022
पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३० रोजी पंढरपूर येथे झाला. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. पंढरीनाथ कोल्हापुरे मा.कुमार गंधर्वांना गुरुस्थानी मानत. कुमार गंधर्वांचे शिष्यत्व स्वीकारण्यासाठी, पंढरीनाथांनी 'गुजराथी सनरिच सिनेमा कंपनी'तील १९४७च्या काळातील दोनशे रुपयांची नोकरी सोडली होती. इतकेच काय, प्रसंगी मो. ग. रांगणेकरांच्या 'नाटय़निकेतन'चे बोलावणेही पंढरीनाथांनी विनम्रपणे नाकारले आणि पंढरीनाथांनी आपले सर्व जीवन 'कुमार संगीता'ला वाहून घेण्याचे ठाम ठरविले. पंडित कुमार गंधर्वांनी देवासला वास्तव्य केल्यानंतरही, पंढरीनाथ कोल्हापुरे हे त्यांचे एकलव्य शिष्य राहिले. मा.पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांनी त्यांची "मैफलीगवई" असल्याची क्षमता सिद्ध केली. नंतर त्यांनी संगीताचे अध्यापन करण्याचे ठरवल्याने, ते याच क्षेत्रात "गुरू" होऊन राहिले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला. शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा. गायनातली कारकीर्द चालू असतानाच मुलगी पद्मिनीला बॉलीवुडमधून मोठ्या ऑफर्स आल्याने पंढरीनाथांनी मग बराच काळ मुलींच्या करिअरकडे लक्ष दिले. त्या स्थिरस्थावर झाल्यावर पंढरीनाथांनी लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन अशा चारही अंगांनी पुन्हा जोमाने संगीतसेवा सुरू केली.
पं. पंढरीनाथ यांनी तीन पुस्तकेही लिहिली असून पं.कुमार गंधर्व यांना समर्पित ‘गानयोगी शिव पुत्रा’, पत्नी निरुपमा कोल्हापुरे यांना समर्पित ‘शब्द सुरांचे बोल रुद्र वीणाचे’ आणि तिसरे पुस्तक १८ व्या शतकातील ख्याल गायकीचे निर्माते नियामत खान यांच्यावर आधारित ‘नियामत खान - सदारंग’ यामध्ये नियामत यांच्या बंदिशींचा समावेश आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी १०० वर्षा पेक्षा जुनी आपल्या वडिलाची आठवण म्हणून वीणा जपून ठेवली होती. पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांना मिळाला होता, मुंबई महानगर पालिकेने अंधेरीतील के-पश्चिम विभागात गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ या मार्गास पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव दिले आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे १५ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पंढरीनाथ कोल्हापुरे यांची वेबसाईट. www.pandharinathkolhapure.com/
February 20, 2017
खाप्रुमामा ना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.
लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 3, 2017
त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही.
August 14, 2021
दानशूर उद्योजक, विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात २४ जुलै १९४५ रोजी झाला.
प्रेमजी यांचे आजोबा ब्रिआटिशांच्या काळाज जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत असत. त्यांची जपान, रंगून (ब्रह्मदेश) व अन्य ठिकाणी तांदूळ निर्मितीची कार्यालये होती. 'राइस किंग' असे त्यांना त्याकाळी म्हटले जाई.
बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. त्यांनी प्रेमजी कुटुंबियांनी फाळणीनंतर पाकिस्तानात यावे, असा आग्रह धरला होता. परंतु, आपली जन्मभूमी कर्मभूमी भारतच आहे. भारत देशावरच आपले प्रेम आहे. याविषयी प्रेमजी कुटुंबियांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. ते जिनांच्या दबावाला बळी पडले नाहीत. पाकिस्तानात गेले नाहीत.
भारतात त्यांचा 'वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स' या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून शब्द तयार झाला विप्रो.
अझीम यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी काही मोठी नव्हती. अमेरिकेतील स्टॅँडफोर्ड विद्यापीठात ते शिकत असताना १९६६ मध्ये त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण सोडून कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. याच 'विप्रो' नावाने पुढे प्रेमजी यांनी १९६६ मध्ये कारभार हाती घेतल्यानंतर मोठा विस्तार केला. हवा कुणीकडे चालली आहे, जगात नवीन कोणते उद्योगधंदे पुढे येताहेत, कोणते तंत्रज्ञान पुढे येते आहे, यावर प्रेमजींचे लक्ष असे. म्हणूनच एकीकडे साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. त्या-त्या क्षेत्रातील गुणी माणसे हेरून त्यांना आपल्या उद्योगसमूहात सामील करून उद्योग चौफेर विस्तारला. 'विप्रो प्लुइडपॉवर', 'विप्रो टेक्नॉलॉजिस', 'इन्फ्रास्ट्रक्चर', 'लायटिंग', 'इकोएनर्जी', 'मॉड्युलर फर्निचर' अशा अनेक कंपन्या काढल्या.
माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेक, माइंडट्री, नेटक्रॅकर अशा कंपन्यांद्वारा कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली.
वैयक्तिक जीवनातही प्रेमजी यांना डामडौल, बडेजाव आवडत नाही. ते विमानाच्या 'इकॉनॉमी क्लास'ने प्रवास करतात. शाकाहारी जेवण त्यांना आवडते. त्यांच्या कंपनीच्या वा कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी अन्न दिले जाते, तेच ते घेतात. कर्मचारी, कामगार यांच्याशी खुला संवाद करणे, त्यांना आवडते. बेंगळूरूमध्ये ते ऑफिसच्या दोन किलोमीटर अगोदरच गाडीमधून उतरून पायी चालत ऑफिसला जातात. बड्या, महागड्या हॉटेलात राहायला त्यांना आवडत नाही. जगातील सर्वांत महाग गाडी ते वापरू शकतात; पण त्यांची गाडी आहे 'टोयोटा कोरोला' ही. त्यांचे घरही साधेच आहे. कंपनीच्या कामकाजात वशिला, भ्रष्टाचार, खोटारडेपणा ते अजिबात खपवून घेत नाहीत.
गुणवत्तेसंदर्भात भारतात '६-सिग्मा' ही प्रणाली त्यांनीच आणली, लागू केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत मोलाचा मानला जाणारा 'पीसीएसएम लेव्हल -५' हे प्रमाणपत्र त्यांच्या कंपनीस मिळालेले आहे. कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, सचोटी अशी 'विप्रो' उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आणि दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचे अठरा टक्के शेअर्स समाज कार्यासाठी दान करण्याचे ठरविले. ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा विनियोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून केला जाईल. त्यांचा हा निर्णय खरोखरच महत्त्वाचा आहे आणि देशातील धनिकांनी आवर्जून अनुकरण करावे, अशाच स्वरूपाचा आहे.
जागतिक स्तरावर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या 'गिव्हिंग प्लेज' नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिले भारतीच उद्योजक आहेत. समाजोपयोगी उपक्रम आणि कार्य जवळपास सर्वच कंपन्या करीत असतात. त्यांना सीएसआर म्हणजे 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' या नावाने ओळखले जाते. त्याचा कायदाही आहे आणि त्यानुसार विशिष्ट टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करावी लागते. असा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून प्रेमजी समाजासाठी मोठा निधी देत आहेत.
शिक्षण हा त्यांचा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे प्रेमजी यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्युत अभिआंत्रिकी विषयाचे उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले होते. कोणालाही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहायला मिळू नये, असा त्यांचा ध्यास आहे.
फोर्ब्सकने जाहीर केलेल्या यादीनुसार अझीम प्रेमजी यांच्याीकडे ११२० कोटी डॉलरची संपत्ती असून ते जगातील ९१ वे बिलिनयर आहेत. बेंगळुरू येथे राहणारे प्रेमजी भारतातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
२००१ मध्ये त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने प्रामुख्याने शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हे फाउंडेशन हजारो सरकारी शाळांमध्ये कार्यरत आहे. प्रेमजी यांनी आपल्या कंपनीतील स्वत:चे काही भांडवल विकून सुमारे दोन अब्ज डॉलर (सुमारे दहा हजार कोटी रुपये) उभारले आणि यातून या फाउंडेशनचे कामकाज चालते. आता त्यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. 'टाइम'ने २००४ मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते. त्यांच्या योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता हे सगळे लक्षात घेऊन २००५ मध्ये 'पद्मभूषण' आणि २०११ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानांनी गौरविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 24, 2017
दिलीप सरदेसाई यांची ओळख विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज
अशी होती. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी मडगाव गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती. त्यावेळी गोवा राज्यात मध्ये तसे क्रिकेट कमीच होते. लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत. ते शाळेच्या अनेक स्पर्धेत टेबल टेनिस खेळले. परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे.
त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे. दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम. एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली.
एम. एस. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ' हिट विकेट ' करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले.
ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या. दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही.
दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.
दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ' दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.' दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे, गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.
३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.
विजय मर्चंट यांनी दिलीप सरदेसाई यांना'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले.
१९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.
दिलीप सरदेसाई यांनी बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत यांच्याशी लग्न केले. असे म्हणतात दिलीप सरदेसाई हे नंदिनी पंत यांना दररोज एक पत्र लिहीत असत. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत.
दिलीप सरदेसाई यांची पत्नी नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 8, 2021
स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्. एम्. आय्. एस्.) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय ‘ला एडनजवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या एच्. एम्. आय्. एस्. ‘खैबर’ या फ्लीट माइन स्वीपरची अधिकारसूत्रे स्विकारली. दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे. २६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर नेमले जाणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. तसेच जून १९४७ मध्ये पहिले भारतीय अधिकारी म्हणून कॅप्टन या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. १९४९ मध्ये एच्. एम्. आय्. एस्. ‘जमुना’ या युद्धनौकेचे ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यानंतर ७ ऑक्टोबर १९५१ रोजी इंडियन नॅव्हल शिप खख (आय्. एन्. एस्) ‘दिल्ली’ या नौसेनेच्या त्यावेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशाखापटनम् येथील आय्. एन्. एस्. ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.
भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर-इन-चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर या पदावर पदोन्नती मिळाली. एप्रिल १९६० मध्ये त्यांची फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) या पदावर नियुक्ती करण्यात आली. फोसिफ झाल्यावर सोमणांनी सर्वप्रथम आय्. एन्. एस्. ‘म्हैसूर ‘चा कार्यभार सांभाळला. त्यामुळे ते फोसिफ म्हैसूर या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर पदोन्नती मिळून ते स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख झाले (५ जून १९६२). तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भारतीय नौसेनेला १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावता आली नाही. जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले.
सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले. सोमण यांचे निधन ८ फेब्रुवारी १९९५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : पित्रे शशिकान्त /मराठी विश्वकोश
February 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti