नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे.
March 18, 2022
माय तुहे किती आठव आठवू...
आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब
परीक्षण - डॉ.धोंडोपंत मानवतकर
" माय तुहे किती आठव आठवू " ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल...इतकी सहज सुंदर झालेली आहे. आईचे श्रमसंघर्षातील कष्टप्रद जीवन व स्वभावचित्रण प्रस्तुत संग्रहात यथार्थपणे प्रतिबिंबीत झाले आहे.
'आई 'हा अनेक लेखकांचा, नाटककारांचा, कादंबरीकारांचा, कवींच्या कवितांचा विषय झालेला आहे. आईच्या प्रेमाविषयी बऱ्याच म्हणी, सुविचार, इतकेच नव्हे; तर चित्रपटही आलेले आहेत. गद्य,पद्य, चित्रकारिता अशा वेगवेगळ्या प्रकारे आईचा महिमा उदधृत झाल्याचे आपण अनुभवले आहेच.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील कवी यशवंत दिनकर पेंढारकर, यांची (स्वामी तिन्ही जगाचा... किंवा आई म्हणोनी कोणी..), कवी माधव ज्युलियन यांची..(प्रेम स्वरुप आई ), कवी भा.दा.पाळंदे यांची...(थोर तुझे उपकार ), नंतर कवी ग्रेस,यांची.. (ती गेली तेव्हा रिमझिम...), कवी सुरेश भटांनी तर या पृथ्वीलाच 'आई' संबोधले आहे त्यांची प्रसिद्ध कविता.. ( गे मायभू तुझे मी...), कवी नारायण सुर्वे यांची...(माझी आई) , इंदिरा संत यांची..(आई), आनंद यादव यांची..( मायलेकरं ), कवी फ.मुं. शिंदे,यांची (आई एक नाव असतं, घरातल्या....), अलिकडच्या पिढीचे स.द.पाचपोळ यांची...( हंबरून वासराले...), धोंडोपंत मानवतकर यांची..(नको नको सांगू माये...), अशोक पाठक यांची...(दिसे आईच्या डोळ्यात), स्वाती दांडेकर यांची.. (झुलाघर), सुषमा जाधव यांची..(माय म्हन्ते)...तसेच गद्यलेखनात सकाळचे संपादक उत्तम कांबळे यांचे...(आई समजून घेतांना ) आईविषयी लेख, कविता लिहिणाऱ्या अशा अनेक कवीं व कवयित्रींची, लेखकांची नावे सांगता येतील; परंतु विस्तार भयास्तव ते सांगणे टाळतो. तूर्तास कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या "माय तुहे किती आठव आठवू "या संग्रहाचे प्रकाशन होत आहे, या संग्रहात अभंग शैलीतून आईविषयीची दीर्घ कविता आली आहे, त्यांच्या कवितेचा उलगडा करून घेऊ.
कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार,चित्रकार हे सर्वच प्रतिभावंत आपापल्या शैलीतून किंवा माध्यमातून सामाजिक, राजकीय, प्रापंचिक, वैयक्तिक विषयांना उजागर करत असतात. शैली आणि माध्यमे विभिन्न असली, तरी आपला विषय वाचकांना रुचेल, समजेल आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरून तो मनात खोलवर रुजेल ही अपेक्षा ठेवून कलावंत आपल्या विषयाचे प्रतिपादन करत असतो.
कवी डॉ.सर्जेराव जिगे यांनीसुद्धा ग्रामीण संस्कृतीत वावरलेल्या आईच्या स्वभावधर्माचे व कर्तव्याविषयीचे इत्थंभूत वर्णन "माय तुहे किती आठव आठवू" या खंडकाव्यात केले आहे. आईसोबतच कुटुंबाचा, परिसराचा, परिस्थितीचा, घरअंगणाचा, शेतीमातीचा, देवधर्म, दैव, कर्म, संस्कार तसेच ग्रामसंस्कृतीचा, परंपरांचा,परंपरांशी निगडित रीतीभातीचा, नीति-अनीतिचा,भेदाचा, माणसांंमाणसातील जिव्हाळ्याचा, थोडक्यात म्हणजे हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे एखाद्या मानवी विषयाला अनेक कंगोरे असतात.. त्या कंगोऱ्यांना स्पर्श करतच प्रपंचाचा गाडा पूर्णत्वाकडे जात असतो. तद्वतच आईच्या कष्टमय, सोशिक,धैर्यशील व संघर्षमय जीवनाचे, सुख-दुःखाचे अनेक कंगोरे या संग्रहात आले आहेत.
डॉ.सर्जेराव जिगे यांनी आपल्या आईची स्मृती जागविण्यासाठी, तिच्या उपकाराचे उतराई होण्यासाठी हा लेखनप्रपंच केलेला आहे. खरेतर आईच कुटुंबाचा पाया असते आणि तिच्यातूनच प्रपंचाचा विस्तार होत जातो.. म्हणूनच कवी फ.मुं. शिंदे यांच्या "आई एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं" ह्या नऊ शब्दांच्या पंक्तीच आईच्या अस्तित्वाचं मूल्यमापन नोंदवत राहतात. तिची सहनशीलता, तिची सोशिकवृत्ती, तिचा संयम, तिची धडपड, तिचं नियोजन, तिची सचोटी, तिची काटकसर, तिचं रागावणं, तिचं जीव लावणं, कुटुंबाने तिच्यावर लादलेलं स्वीकारणं, तिची सासरची काळजी, माहेरची ओढ, तिने जिव्हाळ्यातल्या मर्मबंधी व सृजनबंधी नात्याचा टिकवून ठेवलेला गहिवर, तिच्या प्रापंचिक संचिताचा झालेला गूढगुंता, स्त्री म्हणून आचरणासंबंधीची तिच्यावर असलेली सामाजिक बंधने, त्यातूनही तिच्या आवडीनिवडीवर लादलेली बंधने..अशा सगळ्या बाबी स्त्रीच्याभोवती फिरत असतात. इतक्या जोखडात राहूनही ती स्वतःच्या स्वाभिमानाबरोबरच माहेरची आणि सासरची अब्रू राखते..थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तिची "आई" म्हणून कुणीच जागा घेऊ शकत नाही.
जोपर्यंत आपण आईच्या सानिध्यात असतो तोपर्यंत तिच्या असण्याबद्दलचे आपल्याला महत्व वाटत नाही; परंतु आई जेव्हा आपल्याला सोडून जाते, तेव्हा मात्र आपल्या तनामनात पोरकेपणाची फार मोठी पोळकी निर्माण झालेली असते....तिच्यासोबत आपल्या बालपणापासून ते..ती असेपर्यंतच्या प्रत्येक आठवणींना आपण काळजात साठवतो, त्या आठवणींनी काळजात घर केलेलं असतं. तिच्या आठवणींची काळजाला कुरुपं झालेली असतात. ती कुरुपं अधूनमधून सलत राहतात. केवढाही बलवंत, श्रीमंत किंवा तिन्ही जगाचा स्वामी असला तरी तो आईविना पोरकाच असतो.
कितीही निष्ठूर माणूस असला तरी, त्याला आईची आठवण आली की,तो उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडतो, कारण त्याला पुरुष म्हणून जगाला अश्रू दाखवता येत नाहीत ....
कवी सर्जेराव जिगे यांनी आईच्या सुख-दुःखाचा, तिच्या स्वभावधर्माचा, कर्तव्याचा, धारिष्ट्याचा, धार्मिकवृत्तीचा लेखाजोखा शब्दांकित केला आहे...त्यांचे आईविषयीचे स्वभावचित्रण अभंगाचे रूप घेऊन आले आहे. "माय तुहे किती आठव आठवू" हा कवितासंग्रह शेतीमातीला विठ्ठल मानून काळया आईची सेवा करणाऱ्या आईला व आईसम कष्ट करणाऱ्या सर्व माय-माऊल्यांना अर्पण केलेला आहे.
कवीच्या अस्वस्थ मनाच्या गाभाऱ्यात स्मृती-विस्मृतीतल्या अनेक घटनांची घुसळण सुरू असते. अंतर्मनाच्या कप्प्यात भूतकालीन प्रसंगाचे कढ दाटलेले असतात. ते कढ मनाचा बांध फोडू नयेत म्हणून कवी त्यांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून देत असतो. आशय, विषय अभिव्यक्ती ही कविच्या मनाची रुपे,अपरुपे शब्दांशी नातं जोडून भावनांना बंदिस्त करत असतात. भावना आणि आठव ह्यांचं नातं चिखलाचं असतं. चिखलातून माती आणि पाणी वेगवेगळे करता येत नाहीत... तद्वतच माय आणि लेकरांच्या नात्याला वेगवेगळे करता येत नाही...माय दृष्टीआड झाली की, तिचा विरह जीवघेणाच असतो...ती दृष्टीआड झाली तरी..तिची प्रतिमा, तिचे स्वभावचित्र डोळ्यांसमोर सतत तरळत असते...त्यातूनच भावनांचे उमाळे आणि आठवांचे कढ दाटून येतात आणि कविता जन्म घेते...
माय मही भोळी | भोळा तिचा भाव |
पंढरीचा राव | मायबाप || पृ.२१
कवी डॉ.जिगे यांनी आपल्या संग्रहात पहिल्याच कवितेत आईचा भोळा स्वभाव आणि तिचा भोळा भाव असल्याचे सांगत ती निस्सिम विठ्ठलभक्त असल्याचेही सांगितले आहे. आईवडील जसे आपल्या पोटच्या मुलासाठी संकटात धावून येतात तद्वतच कवीची आई सुख-दुःखात, संकटात ती पंढरीच्या विठ्ठलाचा धावा करते, ती विठ्ठलाला मायबापच मानते. तिचा अंबाबाई तुळजाभवानी प्रतीही भक्तिभाव आहे, परंतु आई काम करत करतच नामस्मरण, देवधर्म, पुजा-अर्चा करते. ती आपल्या प्रपंचात कामाला इतके महत्व देते की, ती कामालाच चारीधाम समजते. स्वतःचे दु:ख, वेदना लपवून समग्र समाजाबद्दल कळवळा नि चिंता व्यक्त करणारे आईवडील हे आपले दैवत असून त्यांचे कर्तव्य अवर्णनीय असल्याचे कविने म्हटले आहे. आईने आयुष्यात भोगलेल्या अत्यंत खडतर घटनांचे हे कथाकाव्य असल्याची प्रचिती पहिल्या कवितेपासूनच येऊ लागते.
"माय तुहे किती आठव आठवू "आईवरील दीर्घ कवितेसाठी कवीने अभंग काव्याचीच निवड का केली असावी ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे; त्याचे उत्तर असे की, अभंग काव्यप्रकार वाचकांना सहज समजतो आणि तो मनात रुजतो. शिवाय एकूणच कवितेतून असे दिसून येते की, कविचे आईवडील हे पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यांच्या प्रपंचाचा सगळा हवाला ते पांडुरंगावर टाकतात. घरात भक्तीचे वातावरण असल्यामुळे कविच्या रचनेतून अभंग काव्यप्रकाराची निवड होणे साहजिकच आहे.
आधुनिक काळात केशवसुतांपासून मर्ढेकर- करंदीकर यांच्या पुढच्या पिढीतील दिलीप चित्रे - अरुण कोल्हटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. त्याही अगोदर अभंगाच्या वृत्ताचा वापर करून 'अखंड' या शीर्षकांतर्गत म.जोतीराव फुले यांनी विपुल काव्यलेखन करून समाज सुधारणेचे व सत्यधर्माची शिकवण देण्याचे काम केले. म.फुले यांचे काव्य अभंगाचेच रूप घेऊन ग्रामसंस्कृतीतील विकृतीला चव्हाट्यावर आणते.
कवी डॉ.जिगे यांनी आपल्या आईच्या कष्टप्रद आयुष्यात उद्भवलेल्या भल्यबुऱ्या प्रसंगांना अभंग रचनेच्या चरणखंडात शब्दबद्ध केले आहे.
माय उठे तव्हा | झोपलेलं जग |
पोटाची ती आग | जात्यावर || पृ.२४
कवीच्या आईच्या समकालीन स्त्रिया सकाळी चार वाजता उठून, चार पायल्या जात्यावर दळण दळत असायच्या. एक किलोमीटरवरून नदीचे पाणी आणून रांजण भरत असायच्या. स्वयंपाक, न्हाणं, धूणं सगळं आटोपून नवऱ्यासोबत शेतात जाऊन खांद्याला खांदा लाऊन कष्ट करावे लागे. सगळं वेळेवर करूनही सासूबाईचे टोमणे ऐकून घ्यायचे..गणागोताची सरबराई करायची. डोळ्यात अश्रू दाबत कष्ट सहन करत संसार ओढायचा. मन मोठं करून गोरगरिबांना मदत करायची. एकाचवेळी नात्याचे अनेकांगी पदर जपून ठेवण्याची मानसिक तयारी करतांना आईची कितीच दमछाक होत असेल हे तिच्या मनाचा वेदनांकित गाभाराच जाणो..!
पक्वान्न करीती | ती सणासुदीला
शिळच पोटाला | खायी माय || पृ.२४
मनाचा मोठेपणा असणाऱ्या कविच्या आईची वृत्ती परोपकारी होती. स्वतः उपाशी राहून भूकेल्यांना खाऊ घालण्यात तिला समाधान मिळे. सहरहु संग्रहात आलेली रचना कठीण, संदिग्ध किंवा शब्दबंबाळ नाही. प्रत्येक प्रसंग लगेच समजतो नि वाचक तत्कालिन परिस्थितीचा विचार करू लागतो...
मायीने पाहिले | ऊन पावसाळे |
शिवारात मळे | बहरले || पृ.२६ किंवा
काळीला खुर्तून | माय थकलेली |
रात जागलेली | खळ्यावर || पृ.२७
आईच्या आयुष्याची सर्वस्तरावर परवड होत असूनही तिचे धीरोदात्तपणे प्रपंचाला सामोरे जाणे ही प्रक्रिया सहज नसून कमालीच्या कसरतीची आहे. प्रस्तुत संग्रहातील रचनेतून कृषिवलांची भाषा, त्यांची साधने, यांत्रिक उपकरणांच्या कचाट्यात शेतीविषयक व दैनंदिन वापरात येणारे ग्रामीण शब्द लोप पावत चालले आहेत. प्रस्तुत संग्रहातील कवितेत ग्रामीण शब्दांचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. काठवती, घोंग्ता, हारखून, महामूर, खुर्तून, हातनी, उफनी, तिव्हा,मदन, बरकत,पांदन, कुरुपं, सपन, खोप, मुरत, गोठ म्हणजे गोष्ट, मुऱ्हाळी, शबुद, वावर,वापसा, माचवा,भकास,आबादानी,अशा ग्रामीण बोलीत येणाऱ्या शब्दांचा मुद्दाम वापर केलेला आहे. कवीचा जन्म खेडेगावातला असल्यामुळे त्यांच्या कवितेत ग्रामीण बोलीचे शब्द सहज येतात. याबरोबरच कवीचा शहराशी घरोबा झाल्यामुळे प्रमाणभाषा आणि ग्रामबोली यांची सरमिसळ दिसून येतो.
गणगोत तिनं | सांभाळले खूब |
जगण्याची ऊब | ओवीतून || पृ.४२
या अभंग प्रकारात ६-६-६-४ अशा मात्रा असतात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडात यमक साधावे लागते. कवीने उपरोक्त तिसऱ्या चरणाच्या शेवटी येणाऱ्या ऊब या शब्दाच्या यमकासाठी दुसऱ्या चरणात ' खूब ' ह्या फारसी अरबी शब्दाचा वापर करून यमक तर साधलेच; परंतु पंक्तीच्या आशयबोधात बाधा उत्पन्न होऊ दिली नाही. महाराष्ट्रावर अनेक सत्तांचा अमल झाल्याने त्या त्या काळात त्यांनी आपली भाषा रुजवली व ती मराठीमय झाली. समग्र समाज दैनंदिन व्यवहारात अनेक भाषा बोलत असतो. मराठी भाषेत हिंदी, उर्दू, फारशी, अरबी, इंग्रजी अशा विविध भाषांच्या काही शब्दांनी शिरकाव केलेला आहेच.. असो !
माय मही चाले | तिफणीच्या मागं |
माय बापा संगं | ढेकळात || पृ.५८
कवी डॉ.जिगे यांनी केलेल्या काही रचना फार पूर्वी लिहून ठेवलेल्या असाव्यात असे वाटते किंवा आईच्या गतस्मृतींचा तो चलचित्रपट काळीजकप्प्यात दस्तऐवजासारखा जपून ठेवलेला असल्याने अनेक घटनांच्या नोंदी करता आल्या आहेत. केवळ नोंदीच नव्हे, तर त्या नोंदीच्या मुळाशी गहिवर येणाऱ्या भावनांचा उमाळा आहे, म्हणजे आठव आहे. कितीतरी आठवांचा हा शब्दवानोळा कवीने लेखक, वाचक,रसिकांसह साहित्यसृष्टीला बहाल केला आहे. कवीच्या आईप्रमाणेच समकालीन पिढीने आपली माय सुद्धा अशीच कष्टत,तिष्ठत आणि पिचत असल्याचे चित्र बघितले आहे, बघितले असेल. ग्रामीण कास्तकार कुटुंबाच्या प्रपंचात असलेली ही कमालीची अभावग्रस्तता तरीही आशावादी राहून चिवटपणे राब-राब-राबणाऱ्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनजाणिवांची प्रांजळ अनुभूती यापेक्षा दुसरी काय असू शकते ?
कविने आपल्या संग्रहातील काही कवितांमध्ये आईच्या कृतार्थधर्मासाठी ऐतिहासिक,पौराणिक, मिथके वापरली आहेत.आईच्या सर्वस्पर्शी भावनांचे प्रस्तर उलगडतांना तिच्या प्रापंचिक प्रमेयाची कसोटी तिच्या मनाच्या मोठेपणाात व चांगुलपणातच असल्याचे सिद्ध केले आहे.
डॉ.सर्जेराव जिगे यांची कविता कृषिवलांच्या श्रमजीवी संस्कृतीचे, माय-माऊल्यांच्या कष्टप्रद जीवनाचे यथार्थ दर्शन घडविते. शब्दमर्यादेमुळे सर्वच काव्यपदांचा उल्लेख शक्य नाही. हा संग्रह संपूर्ण वाचल्यावरच ग्रामीण लेखक, कवींना ग्रामसंस्कृतीत वावरणाऱ्या माय-माऊल्यांच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नाचे संसारतत्व, तिची परवड आणि तिची सत्वधीरता समजून घेता येऊ शकेल..!
प्रस्तुत संग्रहाच्या प्रस्तावनेत ग्रामीण साहित्याचे लेखक, अभ्यासक, समीक्षक डॉ.वासुदेव मुलाटे यांनी संग्रहात आलेल्या आईच्या समग्र जीवन जाणिवांचा चिकित्सकपणे परामर्श घेतला आहे. कविवर्य प्रा.फ.मुं.शिंदे यांची व प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांची असलेली पाठराखण या संग्रहाला अधिकच महत्व प्राप्त करून देते. चित्रकार सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ व जितेंद्र साळुंके यांची सूचक व समर्पक अशी रेखाटने संग्रहाच्या सौंदर्यात भर घालतात. आदित्य प्रकाशनाने संग्रहाची सुबक व आकर्षक अशी निर्मिती केली आहे. सत्तावन्न दीर्घ कविता असलेल्या सुंदर काव्याकृतीचे वाचक स्वागतच करतील. सुंदर संघटनकौशल्य असणारे व अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलणारे कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा..!
डॉ.धोंडोपंत मानवतकर
१० ऑगस्ट २०२४
September 8, 2024
प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता मान्य करतो. मात्र हेच सारे त्याच्या त्या स्तरावर, रक्तामध्ये एकरुप होते. विश्लेषनात्मक वाढ होत जाणारे ज्ञान त्याला वेगवेगळ्या विचारसरणीच्या मार्गावर घेवून जाते. कोणते सत्य वा कोणते योग्य हे तर फक्त काळ व परिस्थितीच ठरवते. विचारांनी काहींमध्ये बदल होत जातो. परंतू काहीं मिळालेले मार्ग तसेच चालू ठेवतात. हा ज्याचा त्याच वैयक्तीक स्वभाव वा समज.
माझे दोन मित्र मी ज्यांच्या सहवासांत बराच काळ व्यतीत करतो, त्यांच्या स्वभावाची ठेवण यावर मी चिंतन केले. वैचारिक मार्ग खूपच भिन्न होते. साध्य एकच. साधना मार्ग मात्र वेगवेगळे निवडलेले. सत्य काय, चांगले कोणते हे तर त्या काळाच्या पडद्यामागे असलेले आमच्या जवळ असतात. ती कल्पना रम्यता व तर्क बुद्धी ज्याला जसे पटेल तोच त्याचा व त्या विचार पंथाचा योग्य मार्ग. आम्हास फक्त मिळते व कळते ते अशांनी अंगीकारलेले भिन्न मार्ग. त्यांच्या विचारांचीच एक झलक यांचे वर्णन -
एका मित्राची पुजा विधी---
एकनाथराव माझे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणे येणे असे. त्यांच्या जीवनाचा दैनंदीन व्यवहार अत्यंत चाकोरीबद्ध असलेला होता. सर्व जीवन ईश्वरी सेवा या संकल्पनेत त्यांनी घालविण्याचा नियमच करुन ठेवला होता. निवृत्त जीवन जगत होते. जीवनातील तथाकथीत दैनंदीन व्यवहार यामधून अलिप्त झालेले होते. दैनंदिनीचे चक्र अगदी स्वत:भोवतीच निर्माण केलेले आढळून आले. देह आणि मनाला ते या चक्रांत गुरफटून टाकण्याचा प्रचंड प्रयत्न करीत होते. ईश्वर सर्वव्यापी, अनंत, सर्व शक्तीमान व दयावान आहे. ही त्यांची दृढ विश्वास व धारणा होती. ते योग्यही होते. त्यांचा पौराणिक कथांवर प्रचंड विश्वास व आदर होता. ते श्रद्धावान होते. प्रयत्नांनी ईश्वर दर्शन व प्राप्ती होते, ही त्यांची मानसिक संकल्पना. विज्ञान, सत्याची कसोटी असल्या वैचारिक ज्ञानाला ते चुकीचे व धर्म परंपरेविरुद्ध असलेले विचार समजत असे. देवादिकांच्या कथांना अमान्य करणे म्हणजे ईश्वराचा अवमान केल्याप्रमाणे असते ही त्यांची ठाम समजूत.
2 त्यांच्या दैनंदिनीवर लक्ष दिले तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक गोष्टी दिसून येत असत. प्रात:काळी म्हणजे घड्याळ्यांत चारचे ठोके पडले की ते उठत. कुणाचीही झोपमोड न करता प्रात:विधी आटोपून घेत. आपणच पाणी गरम करणे व स्नानाधी गोष्टी ते नियमाने आटपून घेत असत. दांडीवर वाळवण्यासाठी टाकलेले धोतर व शर्ट हा त्यांचा पेहराव असे. सर्व कांही २ आटपून ते पाचच्या सुमारास देवपुजेसाठी मांडी घालून पाटावर स्थानपन्न होत असत. त्यांचा पूजा विधी साधारण तीन तासापर्यंत शांततेने केला जायचा.
त्यांचे देवघर हा एक संशोधनाचा विषय होता. अतिप्रचंड असे देवघर आणि त्यामध्ये मोजण्यास कठीण होतील इतकी देवाधिकांची संख्या होती. अर्थात वैयक्तीक क्षमता कमी पडत असल्यामुळे ३३ कोटी देवांना तेथे स्थानापन्न केलेले नव्हते. मात्र त्यांची वैचारिक जडण-घडण ही तशीच बनलेली होती. जर जागा असेल तर ती संकल्पना पूर्ण करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यांनी फारसा प्रवास केला नसला तरी परिसर, गांव, प्रांत ह्याच्या भोवती बरीच भ्रमंती केलेले होती. मुख्य उद्देश जे जे म्हणून देवूळ वा देवालय म्हणून माहितीच्या टापूत येईल तेथे हमखास जावून आले. प्रत्येक देवळाचे एक स्थान महात्म असते. त्याच्या मूर्ती वा देवतांच्या विषयी आख्यायिका असतात. हे अशा आख्यायिका ऐकण्यात व त्या देवळांना हमखास दर्शन देण्यात नुसतेच उत्सुक नव्हते. तर बैचेन झालेले दिसत असे. देवदर्शन, तेथे पूजा भजन, साष्टांग दंडवत प्रसाद इत्यादी विधी अतिशय उत्साहाने पूर्ण करीत. गमतीची गोष्ट म्हणजे त्या त्या देवांच्या तसबीरी अथवा मुर्त्या जे जे व जसे मिळेल ते ते जमा करुन आणणे हा त्यांचा छंद होता. अशा जमविलेल्या सर्व देवतांना ते दैनंदिन पुजेमध्ये सामील करीत असत. त्यामुळे अनेक मुर्ती अनेक फोटो तसबीरी त्यांच्या देवघरांत होत्या. त्या सर्वांना मानाचे स्थान देवून, त्यांनी त्यांना देवपूजेचा सन्मान दिला होता. भावना व श्रद्धा यांच्या ते संपूर्ण आहारी गेलेले होते. असे तुम्ही का करता? असा जर कुणी त्यांना प्रश्न केला तर ते पटकन म्हणतात, “तुम्ही नास्तिक आहात. देवाबद्दल श्रद्धा नाही आहे, विश्वास ठेवा, सर्वात तुम्हाला देव दर्शन घडेल.” जीवनाचा फक्त एकच उद्देश व अर्थ त्यांनी गृहीत धरला होता आणि तो म्हणजे ईश्वर सेवा. त्यांच्या ईश्वर सानिध्यासमोर अनेक मूर्ती, अनेक तसबीरी होत्या. ज्या ज्या ईश्वरनामाचा व वर्णनाचा महीमा त्यांनी कोठेही ऐकला, त्याचवेळी त्याची प्रतिमा त्यांना प्राप्त केली. मग ती कोणत्याही रुपामध्ये. त्यांनी अत्यंत आदराने त्या देवतेला देवघरांत स्थान दिले होते. अशावेळी एकाच देवतेचे अनेक फोटो वा मूर्ती ह्यादेखील त्यांच्या देवघरांत होत्या. निरनिराळे आकार, जसे त्या प्राप्त होत गेल्या त्या प्रमाणे, सर्व देवगणांपैकी कुणीतरी त्यांच्यासाठी दयावान होईल ही श्रद्धा.
देवपुजा ही त्यांची १६ विधींनी युक्त असे. षोडपोशोचार पद्धतीने. मात्र त्यासाठीचे विधीवत मंत्र त्यांना पाठ नव्हते. केव्हाच म्हटले नव्हते, ते पाठांतर करावयाचे असल्यामुळे
3 त्यांचा तो प्रयत्नही नव्हता. त्या मंत्राचा अर्थही त्यांनी जाणून घेण्याचा, केव्हाच प्रयत्नही केला नाही. फक्त त्यांची विधी जाणून घेतली व ती अत्यंत काटेकोर पद्धतीने पूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या या कृतीला जर प्रश्न चिन्ह केला तर त्यांचे उत्तर असावयाचे “आहो सारे भावनेने करा, काय गरज असते तेच मंत्र म्हणण्याचे”
३ मात्र त्यांनी बालपणी पाठ केलेली रामरक्षा, भगवद् गीतेचा पहिला अध्याय आणि काही मनाचे श्लोक, हे त्यांचे सारे विधी कर्म साधन. याच मंत्राचा ते उच्चार करीत संपूर्ण देवपूजा करीत असत. सर्व विधींच्या पायऱ्या ते व्यवस्थीत पूर्ण करीत. मात्र योग्य त्या मंत्राविणा. जर काही विसरले तर अधून मधून नामस्मरण हा आधार त्यांना अत्यंत प्रिय वाटे. नामस्मरणात प्रचंड शक्ती असून त्याच्या समोर कोणतेही मंत्र तंत्र दुय्यमच होत. अशी त्यांची संकल्पना होती. कदाचित हा त्यांचा पाठातरांचा प्रश्न असावा.
पुजा साहित्यामध्ये ते फार चोखंदळ होते, जेवढी उपलब्ध होतील ती फुले, पाने, दुर्वा ते आणीत. सर्व रंगाची फुले जमा करण्यासाठी ते प्रयत्नशील असे. अनेक देवांना अनेक रंगाची व तीच फुले प्रिय असतात. हे त्यांच्या मनाने घेतले होते. निरनिराळ्या धार्मिक पुस्तकामधून त्यांना ही माहिती मिळाली होती. ते या गोष्टीचा फार आदर करीत. मानवाप्रमाणे ईश्वराच्या देखील आवडी निवडी असतात. हा त्यांचा प्रचंड विश्वास. त्यात ते आग्रही होते.
गंध म्हणजे चंदनाच्या घर्षनातून प्राप्त झालेले असावे. सहान व खोड ही भलीमोठी त्यांनी बाळगली होती. अष्ट गंध, सुवासीक अत्तर यांचे मिश्रण करण्यात ते फार उत्सुक असत. गंधाचा कसा सुमधुर वास यावा हे त्यांना प्रिय होते. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील होते. यांच बराच वेळ मात्र ते खर्च करीत. वेळ ही संकल्पना, वेळेचे महत्व, त्यांना त्यांच्या विधीसमोर दुय्यम असे. कितीही वेळ खर्च होवो, सर्व काही शिस्तीने व पद्धतशीर करण्यात त्यांचा प्रयत्न असे. नैवेद्याला दररोज एखादे फळ व दुध, गुळ खोबरे यांवरच ते भागवित असत. प्रथम प्रथम नैवेद्यासाठी कोणतातरी ताजा गोड पदार्थ मिळवण्यात ते आग्रही होते. परंतू अडचण लक्षात घेवून त्यांनी त्यात सोईचा मार्ग पत्कारला. सर्व काही विधीयुक्त करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. मंत्राना मात्र त्यांनी बगल दिलेली होती. मंत्र पाठ नाहीत व आता वाढत्या वयांत ते पाठ करण्याचा प्रयत्न शक्य नसल्याचे त्यांचे विचार. परंतू सर्व विधीसुद्धा ते त्यांनी बालपणी केलेले, बघीतलेले वा कुणीतरी घरांतील वडीलधाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलेले. पूजा अर्चा या विधीमध्ये असलेले तज्ञ वा पंडीतजी किंवा गुरुजी यांच्याकडून सर्व रितसर समजावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही. व ते त्याबद्दल फार उत्सुकही नव्हते. जसे आपल्याला कळेल, समजेल व जमेल तसेच करावे. मात्र त्यातच शिस्त व नियमीतपणा असावा.
पूजेमध्ये मात्र त्यांनी अनेक आरत्या पाठ केलेल्या होत्या. त्या सर्वच दररोज म्हणत. परमेश्वराची नाराजी व त्यामुळे त्याची अपेक्षीत अवकृपा ही बाब त्यांच्या विचाराने, मनाने 4 फार गंभीरतेने घेतली होती. माझे आयुष्य संसार हे सर्व त्याच्याच कृपादृष्टीने असते. त्यात कोणतीही चूक वा दुर्लक्ष होऊ नये. नसता त्याप्रमाणे परिणाम, तुम्हास भोगावे लागतात. हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे ते सतत दबावाखाली जीवन कठीत असल्याचे भासे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सारे वागणे, व्यक्त करणे सर्व काही त्या समजल्या गेलेल्या
४ ईश्वराविषयीच फक्त. संसारातील दैनंदीन संबंध, हीतसंबंध, वागणूक, गरजा, धडपड, आशा इत्यादी बाबतीत मात्र ते अत्यंत सामान्य माणसाप्रमाणेच वागत. स्वार्थ-निस्वार्थ राग लोभ ह्या भावनिक चक्रात मात्र ते प्रसंगानुसारच वागत. येथे त्यांचा ईश्वर केव्हांच मध्यस्थी करताना त्यांना समजला नाही. ईश्वरांची सर्व कर्मकांडे विधीवत व्हावयास हवी ही त्यांचा पक्की व अंतरिक धारणा होती.
पूजा प्रारंभ हा एक बघण्यासारखा विधी होता. स्नानादी झाल्यानंतर ते पाटावर आसनस्त होत. मांडीची त्यांची पक्की व दीर्घकालीन बैठक असे. सर्व अंगाला, चेहरा, कपाळ, भूजा, छाती, पाय इत्यादी भागांत भस्माचे व्यवस्थीत पट्टे लावले जात. ते गढद व निटनिटके कसे होतील त्याकडे त्यांचे लक्ष असे. मग त्याप्रमाणे गंधाचे टिपके, लावणे होत असे. अत्यंत कौशल्याने ते हे सारे व दररोज करीत. गंध कसे ठसठशीत दिसेल ह्याबद्दल ते फार चोखंदळ होते. गंधातून कसा सुवास दरवळला पाहिजे ही त्यांची धारणा. देवघरात एक आरसा ठेवलेला होता. त्याचा ते उपयोग घेत. हे सारे करताना प्रभू रामचंद्र वा श्रीकृष्ण यांच्या विषयीचे सुभाषिते किंवा नामस्मरण चांगल्या खड्या आवाजात करीत. पूजाविधी मध्ये कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते त्यांना सहन होत नव्हते. मग ते कापूर असो, गुलाल असो, बुक्का असो व कोणती फुले. तसे ते ह्या वस्तूंची स्वत: जमवा जमव करीत असत. पण जर घरातील कुणाशी त्याचा संबंध आला, तर मात्र त्रागा करुन आपल्या भावना व्यक्त करीत.
वयानुसार फिरावे, व्यायाम करावे ह्यात त्यांना रस नव्हता. हा वेळेचा अपव्यय असतो. त्यापेक्षा नामस्मरण करा. तो सारे तुम्हास देईल ही त्यांची संकल्पना. वाचनाचा त्यांना नाद होता. परंतू फक्त पौराणिक कथांच. शिवाय त्याच त्याच कथा पुन्हा वाचणे, ऐकणे यात त्यांचे मन रमत होते. पौराणिक कथा म्हणजे जीवनाला जगण्याचा एक मार्ग ही त्यांची धारणा. कुणी जर त्यांना त्यांच्या पुजाविधीमध्ये “पूजाविधी” या पुस्तकामधील सूचना केली, तर ते त्यास केव्हाच मान्यता देत नसत. “बदल” करणे म्हणजे आपण आजपर्यंत करीत असलेले चुकले हे मान्य केल्याप्रमाणे होईल, ही त्यांची धारणा. कोणत्याही बदलास त्यांचा विरोध असे. उत्तम कृती, लक्ष लावून केलेली पूजा ही समाधान देते. ही त्यांची समज “ध्यान धारणा” ही बाब त्यांना चुकीची वाटत असे. मन चंचल असते. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. तो शांत व अविचल कसा होईल. ध्यान केव्हाच लागत नसते ही त्यांची
5 धारणा. मात्र पूजेमध्ये ध्यानस्त बसले तर श्री रामचंद्राची मूर्ती सदैव समोर येत असते. ही त्यांची भावना. स्वभावाने ते अत्यंत प्रेमळ व आदरातिथ्य बाळगून होते.
(एकाची पुजाविधी संपली - दुसऱ्याची पुढील अंकी)
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 23, 2017

प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना.. आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही.. वजाबाकीच सदैव होत गेली !!
December 7, 2010
१९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती.
May 30, 2021
आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो.
February 4, 2026
वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.
February 15, 2021
हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती.
August 27, 2018

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
April 3, 2017
२ मे २००५ या दिवशी सकाळी अभिषेक बच्चन यांचा मला फोन आला. ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्स या दिल्ली येथील संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून ते बोलत होते. २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून 'कोहिनूर ऑफ इंडिया' या पुरस्कारासाठी माझी निवड झाली होती. मला अतिशय आनंद झाला. त्यांचे पुढील वाक्य होते. "हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते तुम्हाला दिला जाणार आहे.” मला काय बोलावे तेच सुचेना. जो माझा सर्वात आवडता अभिनेताच नव्हे, तर आमच्या पिढीचे रोल मॉडेल होता. ज्याचा मी डाय हार्ड फॅन होतो, त्याच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार होता. त्यांच्या सोयीसाठी या समारंभाचे आयोजन मुंबईतच केले जाणार होते. ही बातमी लवकरच सगळीकडे पोहोचली आणि माझ्या आप्तेष्टांनी, मित्रांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. लवकरच २६ मे २००५ रोजी मुंबईच्या हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या दिमाखदार समारंभात सुपरस्टार श्री. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार मी स्वीकारला. समारंभाला अभिनेत्री राणी मुखर्जी यांचीही विशेष उपस्थिती होती. हा दिवस माझ्यासाठी एक अविस्मरणीय दिवस होता. या समारंभातील भाषणात अमिताभ बच्चन म्हणाले, "कलाकार की ऊँचाईयों पे कभी पाबंदी नहीं होती। आप एक मंजिल पा लेते हो तो और कई मंजिले दिखाई देती हैं। और इस सफर में आप हमेशा लोगोंको खुशियाँ बाँटते हो, इसलिए कलाकार होना बड़े नसीब की बात हैं।" त्यांच्या चिरपरिचित धीरगंभीर आवाजातील ते शब्द मी कधीच विसरू शकणार नाही. अशा महान कलाकाराच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचे मला लाभले. या पुरस्कारासाठी मी काहीही केले नव्हते. काहीही न मागता ईश्वराने मला अनेक गोष्टी दिल्या. त्यापैकी ही एक! त्या रात्री मी झोपू शकलो नाही. झोपणार कसा? स्वप्नवत तर आत्ताच घडून गेले होते. या पुरस्काराने मला प्रचंड ऊर्जा दिली होती. रात्रभर बसून मी पुढील कार्यक्रमांची आखणी सुरू केली. संपूर्ण रात्रभर तेच शब्द कानात घुमत होते, 'कलाकार की ऊँचाईयोंपे कभी पाबंदी नही होती।'
लवकरच माझे हितचिंतक प्रकाशजी गुप्ते यांच्यासाठी कार्यक्रम केला. तसेच माझे मित्र प्रकाश दामले यांनी स्टेट एक्साईजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर 'आंबा महोत्सव'मध्ये मी गायलो. काही दिवसांनी अंकुर प्रॉडक्शन्सने आयोजित केलेल्या 'गजरा' या विविधरंगी कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मी भाग घेतला. माझ्याबरोबर त्यागराज खाडिलकर, सुधीर गाडगीळ, स्मिता तळवळकर आणि रामदास फुटाणे असे प्रथितयश कलाकार होते.
-अनिरुद्ध जोशी
August 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti