क' च्या कथानकातली 'तुलसीभाभी' तुम्हाला आठवते का? आतासारखी चॅनेल्सची गर्दी तेव्हा नव्हती. त्यामुळे 'तुलसीभाभीने' घराघरात घर केलं होतं. त्यातला हँडसम हिरो 'मिहीर'अॅक्सिडेंटमध्ये गेला हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. सगळीकडे एकच चर्चा. अगदी लोकलच्या लेडीज डब्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. आता सिरीअल न पाहण्याचा निर्णय कित्येकांनी घेतला आणि त्याला पुन्हा अवतरावे लागले. कसा काय ते तुम्हाला आठवत असेलच. आणि हे फक्त सिनेमा आणि सिरीअल मध्ये शक्य आहे हे मी सांगण्याची गरज नाही. नुकतीच पूर्णविराम घेतलेली मालिका, 'एका सुनेच्या पाच सासूबाई की सासूबाया? आणि त्यांच्यावर एक आई आज्जी फ्री! वाढता वाढता वाढे... जसे हनुमानाचे शेपूट. सोशल मिडियावर चेष्टेचा विषय ठरली आणि ज्या प्रेक्षकांनी स्वागत केले होते त्यांनीच 'आता पुरे करा'चा नारा दिला. तरीही काहीही हं श्री हा लाडिकपणा टीआरपी वाढवित राहिला. सध्या सुरू असलेला खंडोबाचा गोंधळ बिचाऱ्या प्रेक्षकांचा किती गोंधळ उडवतोय, पहाताय ना? देवांचा देव अशा श्रध्दास्थानी असलेल्या महादेवाचं पर्सनल लाईफ भोळ्या भाबड्या प्रेक्षकांना विचारात पाडतेय. धर्मसंकटात सापडलेल्या देवांची अवस्था सर्वसामान्यांसारखीच होतेय. हा, या सगळ्यामुळे फक्त दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे लोकांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि दुसरा मालिकेचा टीआरपी! तसेच जेजुरीला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी श्रध्देपेक्षा मालिकाच धावून आली हेही एक सत्य आहे.
सम्राट अशोकाचा जीवनपट उलगडून दाखवणारी मालिका पाहताय ना, कौटुंबिक यादवीमध्ये गुरफटून कशी टीआरपी वाढवतेय ती! सध्या ती दूर्वा, ती जान्हवी, ती आदिती, ती स्वानंदी, ती म्हाळसा आणि ती बानू या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आमचे प्रेक्षक जगतात. त्यांच्या फॅशन्स मॉलमधून घरी येतात, तर त्यातले हेवेदावे, कटकारस्थाने जेवणासोबत चघळली जातात. खरंच अपार प्रेम करतात प्रेक्षक या मालिकांवर! सगळ्या धकाधकीतून वेळ काढून टीव्ही समोर बसतात. काही कारणाने शक्य झाले नाही तर 'उद्या सकाळी बघू' असे म्हणत मनाला समजावतात. घरी असलेली मंडळी तर दुपारी सुध्दा कालचा भाग रिपीट टेलिकास्ट म्हणून आनंद घेतात. काहीजण तर भराभर कामे आटोपून टिव्ही समोर ठाण मांडतात ते सगळ्या मालिका संपेपर्यंत जागा सोडत नाहीत. मग स्वत:च्या झोपेचे बारा वाजले तरी पर्वा नसते. काल काय झाले याच्या लोकलच्या लेडीज डब्यात रंगीत चर्चा तर ऑफिसच्या लंच टाईमला चविष्ट चर्चा चालतात. म्हणजेच गप्पांचा प्राईम सब्जेक्ट म्हणजे डेलीसोप!
असो, परंतु या अशा भाबड्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या या मालिकांचा तटस्थपणे विचार केला तर 'हसावं की रडावं' हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. अगदी प्राईम टाईममध्ये घराघरात पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या मालिका पहाता, मुबलक जाहिराती, मागील भागात, पुढील भागात असे म्हणत कूर्मगतीने चाललेले कथानक केवळ पंधरा ते वीस मिनिटांचा अर्धा तास करीत असते. आता संपेल असे वाटत असतानाच 'कहानी में ट्विस्ट' म्हणत उपकथानकाचा जन्म होतो. तुम्हा-आम्हा सर्वांना कळून चुकते, 'आमटीत पाणी घालून वाढविली आहे आणि पांचट लागू नये म्हणून वरून तिखट मीठ!' पण आश्चर्य हे की मूळची चव संपली हे कळूनसुध्दा सवयीचे गुलाम झालेले आम्ही प्रेक्षक तसेच चिकटून राहतो.
कधी कॉमेडीची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या म्हणते तसेच फू बाई फू म्हणत हास्यसम्राट हसवणूक करतात की फसवणूक कोण जाणे? ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आणि कलाकृतींची चेष्टा आणि पाणउतारा म्हणजे विनोद, असे समीकरण तयार होतेय की काय अशी भीती वाटते. दर्जेदार विनोद लोकांना समजत नाहीत असा गोड गैरसमज तर नाही ना यांचा? खरंच राहून वाटतं आज पु.ल. किंवा अत्रे असते तर यांचे कान धरून म्हणाले असते, अरे काय हे? कुठे नेऊन ठेवलाय विनोद आमचा!'
डिटेक्टिव मालिकांचं तर विचारूच नका. वर्षानुवर्षे एकाच डायलॉगवर चालतात, 'कुछ तो गडबड है, दया दरवाजा तोड दे.' आँखे उघडून अस्मिता गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करते खरी, परंतु प्रेक्षकांची आँखे उघडतात की गुन्हेगारीची नवनविन तंत्र गरजूंना मिळतात हा खरा प्रश्न आहे.
भूतप्रेत, बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक हे खेळसुद्धा रात्री किंवा दिवसा चालत असतात. अंधश्रध्दा निर्मूलन कि अंधश्रध्दा प्रसारण? सिगारेट पॅकवरच्या लेबलप्रमाणे 'धुम्रपान हानिकारक आहे' एवढे म्हणून विक्री सुरू. 'देशी दारूचे दुकान, परवाना क्रमांक ...... ' म्हणत राजरोस विक्री सुरू. यासारखेच नाही का ते?
पूर्वी फक्त दूरदर्शनच्या काळातल्या 'हमलोग, सर्कस, मालगुडी डेज, तेनाली रामा' अशा अनेक मालिका आजही आठवतात. त्यांनी समाजाला सुसंस्कार दिले आणि अनेक चांगले कलाकारही चित्रपट दृष्टीला दिले. आतासुद्धा काही मालिका चांगले विषय मांडतात, मनोरंजन बरोबरच समाज शिक्षणही देतात. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे हे दुर्दैव! बाकी बहुसंख्य मालिका केवळ आणि केवळ टिआरपीकडे लक्ष ठेवून मागणी तसा पुरवठा करताना दिसतात.
कधी कधी मनात विचार येतो, आपण प्रेक्षक आपला महत्त्वाचा वेळ आणि पैसा खर्च करून अलगद त्या गुंत्यात गुंतत जातो. त्यांचा टिआरपी वाढतो आणि आमचा केवळ टाईमपास होतो. बुद्धीला टाळे लावून डोळे आणि कानांचे मनोरंजन हाच मनोरंजनाचा अर्थ लावला जातो का ? पाहताना विचारही करायला हवाच ना? म्हणूनच म्हणावेसे वाटते, माणसाचा तिसरा डोळाही उघडा असायलाच हवा. आणि टीआरपी च्या हवेत तरंगणाऱ्या 'कांहीही....' ला 'काही ही चालणार नाही' हे सांगायला हवे.
("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)
-- नूतन बांदेकर
July 6, 2016
प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो.
August 18, 2022
जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात.
May 6, 2023
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.
November 20, 2024
तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात....
आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही... आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून... या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात.... पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात.....
त्यातलाच एक तुम्हाला सांगतो....
काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत ठरला.... ऐनवेळी काजूच्या बागेतुन यायला ऊशिर झाला... मग घाईत बागेतुन आलो तसाच हाप पँट आणी टिशर्टवर गाडीत ड्रायव्हींगला बसलो....
वाटेत सौंच्या मैत्रीणीचे दुकान... शकूंतलाचे...10 वर्षापूर्वी तिच लग्न झालय अशी सौनी माहीती दिली.
मैत्रीणीचे दुकान म्हणजे खरेदी अपरिहार्य... पण सुदैवाने ती मला ऒळखत नव्हती... खाउची खरेदी झाल्यावर... तिला गाडीत कुणी ऒळखीचे वाटले... बघितले तर मैत्रीण.... मग मुलाला आणखी एखादा पुडा दिला बहुधा.. आणी आणखी गिऱ्हाईक नसल्यामुळे गाडीजवळ आली.... व ईकडच्या तिकड़च्या गप्पा सुरू झाल्या... मध्येच ती सौं ना बोल्ली,
"बघ गो कोन पोरग्या आसा तर भावाक... "
ही खास ताकाला येऊन भांड लपवण्याची मालवणी स्टाईल....
मी मध्येत तोंड घातले....
"वो ताई माका पोरग्या बघा खय आसा तर"
तीचे डोळे अचानक चमकले बहुदा कुणीतरी मुलगी असावी पाहुण्यात....
तिने पटकन विचारले मैत्रीणीला....
"गो वय काय हेंचा? काय करतात? तुमच्याकडेच ड्रायव्हर आसत मा?
आणि आमच्यातलेच......... /जातितले/........ मा?
आसा एक पोरग्या पण अपेक्षा काय?
एव्हाना "गाडी" गरम होउ लागली होती.... मला अंदाज आला पण ईलाज नव्हता .. ऊत्तर दिल्याशिवाय गाडी पुढे नेता येत नव्हती...
शेवटी सौनि ऊत्तर दिले...
" अपेक्षा काय नाय..... फक्त एक समोर आसा ती बायको.... आणि दोन पोरा संभाळुक व्हयी"
मी काहीही न बोलता गाडी चालू केली.... आणि शकुंतला वेड्यासारखी माझ्याकडे व सौकडे आलटुन पालटुन बघत होती
बापूर्झा.
डॉ. बापू भोगटे
March 14, 2017
सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित.
May 13, 2024
शायर हसन नईम म्हणतो ,
एक शायर था कि जागा रात भर
सारे अहमक़ सो गये आराम से।
मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा "भारत-पाकिस्तान" सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला.
"सामंतसाहेब , गुडमॉर्निंग"...
.......वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत होते.
"बाहेर हवा कशी आहे ? मॅच होणार ना ?".........त्याने "यंदा पाऊस पडेल काय ?" असे नंदीबैलाला निरागसपणे विचारणाऱ्या प्रश्नकर्त्याच्या उत्साहात (मला) विचारले. मला खात्री आहे की स्पर्धेच्या आयोजकांनीदेखील इतक्या धुंद गुलाबी पहाटे त्या दिवशीचा वेदर रिपोर्ट घेतलेला नसावा. त्यादिवशीचा ( खिडकीचा पडदा बाजूला करुन ) हवामान अंदाज देणारा निःसंशय मी पहिला वार्ताहर होतो. त्यानंतर दिवसभर तो मला "मनसब" रेस्टोबारमधे ५५ मित्रांबरोबर चाललेल्या सेलिब्रेशनचे व सामन्याचे 'लाइव्ह' अपडेट्स देत होता. जणूकाही तोच स्टेडियमवर होता आणि मी 'होम क्वारंटाईन' होतो. मात्र पाकिस्तानी कर्णधार सर्फराज खानची विकेट गेल्यावर त्याने पाठविलेला "झिंगाट विजयोत्सव व्हिडिओ" इतका स्फोटक होता की तो फुल व्हॉल्यूममधे लावल्यावर माझ्या आजूबाजूचे स्थानिक गुजराथी प्रेक्षक त्या तालावरच नाचायला लागले आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा के.एल.राहुल आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षागारात अचंब्याने पाहू लागला,आणि हे मी मँचेस्टरच्या जिल्हा न्यायालयातदेखिल चंद्रकांत पाटीलांची शपथ घेऊन सांगेन.
त्याच्या मोदीप्रेमाविषयीदेखिल असेच काहीसे म्हणता येईल. ते प्रेम आंधळे असेल , एकांगी असेल , काहीसे टोकाचे आणि अनाकलनीयही असेल पण ते स्वार्थी , बेगडी आणि दिखाऊ आहे असे त्याच्या विचारधारेचे कट्टर विरोधक असलेले त्याचे जवळचे मित्रदेखील म्हणणार नाहीत. जी गोष्ट करायची ती आत्यंतिक मनापासून , आसुसून आणि स्वतःला पूर्ण झोकून देऊन , हा त्याचा स्थायीभावच आहे. त्याला आता इलाज नाही.२०१९च्या लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आम्ही जवळजवळ दिवसभर एकत्र होतो. भाजपाने ३०० जागांचा आकडा पार केल्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे बालसुलभ आनंदी भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.
इंग्लंडचा शैलीदार डावखुरा फलंदाज "गोल्डनबॉय" डेव्हिड गोवरच्या फलंदाजीचे वर्णन करताना कोणीतरी लिहिले आहे ...."His class is never in doubt , but his ability to stay on the ground is always in dark".
शायर हमीद अल्मास म्हणतो ,
वो भी इन्सान है ऐ दिल उसे इल्जा़म न दे
जाने उसको भी किन आफ़ात ने घेरा होगा।
मध्यंतरी त्याची काही व्यावसायिक गणितं चुकली असं म्हणतात. मला सांगा, कोणाची चुकत नाहीत ? कागदावर १००% फुलप्रूफ वाटणारे व्यावसायिक हिशेब प्रत्यक्षात व्यवहारात तसेच्या तसे उतरविणारा एकतरी व्यावसायिक सांगा मला. मी खात्रीने सांगतो , एकही नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात ही फेज कधी ना कधी येतेच.एकतर आधी किंवा नंतर. पण सुदैवाने त्यातून तो लवकरच सावरला आणि आम्हाला आमचा जुना प्रोफेसर मित्र परत दिसायला लागला. मध्यंतरी त्याचे त्याच्या विद्यार्थ्यांसोबतचे , येऊरच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांबरोबर गातानाचे , हास्यविनोद करतानाचे व्हिडीओज् माझ्या पाहण्यात आले आणि मी निश्चिन्त झालो.
अभिषेक बदलला नव्हता. बदलणारही नव्हता. त्याला बदलवण्यासाठी नियतीला अजून किमान सात जन्म घ्यावे लागतील.
आम्हाला तो 'ठाणेवैभव' दैनिकाच्या जाहिरातीच्या पोस्टरवर दिसणारा , मॅरेथॉन धावणारा , विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच देशभक्तीचे व देशसेवेचे बाळकडू पाजणारा , स्वतः लिंबूसरबत पिऊन मित्रांसाठी थीम पार्ट्यांचे आयोजन करणारा , जिममधे सकाळी ७.४५ वाजता केक आणून मित्रांचे वाढदिवस साजरे करणारा व त्यांच्यासाठी पावणेदोन मिनिटांचे व्हिडीओज् बनविणारा ,देओल खानदानावर जिवापाड प्रेम करणारा , हिरीरीने मोदी प्रशासनाची खिंड लढविणारा आणि क्रिकेट व तंदुरुस्ती यांना आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग मानणारा प्रोफेसर अभिषेक निकम खूप खूप प्यारा आहे.
जीवनधर्माला असोशीने भिडणाऱ्या आमच्या या जिंदादिल मित्राने २५ एप्रिलला वयाची चाळीशी पार केली. त्याला तुम्हाला 'भेटवावेसे' वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, अंगठीतला खडा लाभावा तसा अभिषेकसारखा मित्र लाभण्याचे भाग्य आयुष्यात किती जणांच्या वाट्याला येते ?
शायर दुष्यंत कुमार म्हणतो ,
सिर्फ शायर देखता है क़हक़हों की अस्लियत
हर किसी के पास तो ऐसी नज़र होगी नही ।
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
२८/०४/२०२०.
December 20, 2024
टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला.
December 4, 2023
अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग . खरेच आपण तिथे काय आहे ही नीट पाहिले आहे का ? तिथे मला कुठेही फारसे पोलीस दिसले नाही, आणि आश्चर्य म्हणजे एकही स्कूटर किवा बाईक चालवणारा हेल्मेटशिवाय दिसला नाही. तर कोपऱ्यावर चिट्ठी फाडणारा पोलीस किवा घासाघीस करणारा माणूस सापडला नाही.
November 16, 2023
माना के इस जहाँ को न गुलज़ार कर सके
कुछ ख़ार कम ही कर गए,गुज़रे जिधर से हम
(मान्य आहे या जगाचं नंदनवन नाही करु शकलो पण जिथे कुठे गेलो,तेथील किमान काही काटे तर कमी केले.)
शंभर वर्षांची डेरेदार परंपरा असणाऱ्या समग्र चित्रपटसृष्टीच्या अंतरीची भावनाच साहिरच्या या ओळींतून व्यक्त होते अशी माझी सश्रद्ध धारणा आहे.
सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा 'कानून' ही त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानत आलाय.
मानो बापडा.
त्याने निर्माण केलेल्या कलाकृतींबाबत बोलण्याचा त्याचा किमान इतकातरी अधिकार आपण मान्य करायला हवा.
मात्र गुणग्राही चित्रपटप्रेमींचं (उदा.राजू भारतन,खलिद मोहंमद,शिरीष कणेकर आणि कसचं कसचं) पहिलं नमन त्याच्या "नया दौर"ला आहे.
"नया दौर" मधे विशेष असं काय आहे हे सांगण्यापेक्षा त्यात (फक्त) काय नाही हे सांगणे अधिक सोपं आहे.
"नया दौर"मधे कोणालातरी कोणाच्या नरडीचा घोट घ्यायला उद्युक्त करणारी 'सूडकथा' नाही.(उदा. शोले.) अथवा 'कोण म्हणतो खून केला ?' च्या अंगाने जाणारा कोर्टरुम ड्रामा नाही.(उदा. चोप्राचाच वक्त.)
त्यात एक तरल,हळुवार प्रेमकथा तर आहेच,पण ती तर यशराज फिल्म्सच्या जवळपास प्रत्येक सिनेमात असते.
त्यात प्रेमाचा त्रिकोणही आहे,पण कधीकाळी शाहरुखच्या दोनपैकी एका सिनेमात तो असायचाच की.
बाकी सारं सोडा राव पण ऱ्हिदमकिंग ओपीच्या 'यह देश है वीर जवानोंका' या वीरश्रीपूर्ण गाण्याने सुरु झालेला सिनेमाचा सुरेल संगीतप्रवास 'मांग के साथ तुम्हारा' , 'उडे जब जब झुल्फे तेरी' , 'आना है तो आ' , 'साथी हाथ बढाना' , 'रेशमी सलवार कुडता जालीका' आणि 'मै बंबई का बाबू' अशा सात, बंदया रुपयासारख्या खणखणीत सदाबहार गाण्यांवर संपतो.
तरीही "नया दौर" ही 'नागिन' अथवा 'बैजू बावरा' प्रमाणे निव्वळ संगीतिका नाही.
सहज जाता जाता....
१९८८ साली आलेला 'पाप की दुनिया' ('जवा नविन पोपट हा' चालचोर फेम) ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे हे कळल्यावर माझ्या उरणच्या सिनेरसिक आत्याला भोवळच आली होती.
('पतिता'मधील तलतचं 'अंधे जहॉं के अंधे रास्ते' ऐकवल्यावर ही शुद्धीवर आली असं आमचे आतोबा आल्यागेलेल्याला सांगायचे.)
चित्रपटाची बांधेसूद पटकथा,चपलख संवाद,अप्रतिम दिग्दर्शन,बहारदार संगीत, सर्वच मुख्य व सहाय्यक कलाकारांचा सरस अभिनय व एकंदरीतच चित्रपटातील प्रसन्न वातावरण यावर भरभरुन बोलता आणि लिहिता येईल.(आणि लिहिणार आहेच मी. सोडतो की काय ?)
पण मग या सिनेमाचं वेगळेपण नेमकं कशात आहे ?
चित्रपटाच्या सुरुवातीलाच गांधीजींचं एक विधान येतं.
" मानवी श्रमांचे विस्थापन करणाऱ्या आणि काही ठराविक कुटुंबांत आर्थिक शक्ती केंद्रित करणाऱ्या यंत्रसामुग्रीला भारतीय संस्कृतीत स्थान नाही.उलट यंत्रांनी भारतातील सात लाख खेड्यांमध्ये विखुरलेल्या करोडो श्रमिकांच्या प्रयत्नांना मदत करुन त्यांचे जीवन अधिक सुसह्य करणे अपेक्षित आहे."
आणि हाच या सिनेमाचा आत्मा आहे.बाकी सारं तदनंतर.
चित्रपटात माणूस विरुद्ध मशिन असा झगडा तर केंद्रस्थानी आहेच पण त्यात श्रमसंस्कृतीचे महत्वही अधोरेखित केलेले आहे.
यात तंटामुक्त गावाचा हुंकार आहे पण सोबत जातीय सलोख्याचा विचारही आहे.
चित्रपटाला 'गाव करील ते राव काय करील ?' या उक्तीची धार आहे आणि हुंडाविरोधाची किनारही आहे.
गीतकार साहिरचा राजकीय लाल रंग काही कधीच लपून राहिलेला नव्हता.
त्याचा शोधपत्रकार (जॉनी वॉकर) उघडच म्हणतो..."आया हू मै बंधू रुस और चीन मे जाके !"
म्हणजेच तो रशियाला जाऊन जगातील पहिले कामगारांचे, कामगारांनी, कामगारांच्या हितासाठी चालविलेले सरकार बघून आलेला आहे.
मात्र 'नया दौर' आला त्याच वर्षी (१९५७) लोकशाही मार्गाने निवडुन आलेले जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन व्हावे या निव्वळ योगायोग असावा.
(इंदिरा गांधींच्या बालहट्टापायी पंडित नेहरुंनी आपल्या मनाविरुद्ध १९५९ साली नाईलाजाने ते बरखास्त केले.)
सिनेमातील खलनायक कुंदन (जीवन) हादेखील हिंदी सिनेमात दिसणारा टिपीकल खलनायक नाही.
नायिकेवर पापी नजर ठेवत नाही तो कसला बुळचट खलनायक ?
पण खरं तर आपला व्यवसाय वाढवायच्या खटपटीत नायिकेकडे किंवा गावातील इतर स्त्रियांकडे पहायला त्याला फुरसतच नाही.
(सहज जाता जाता...... नायिका व खलनायकाला एकमेकांसमोरही न आणणारा 'नया दौर' हा दुसराच व शेवटचा सिनेमा असावा.
१९५१ च्या 'तराना'मधे नायिका मधुबाला व खलनायक गोप हे चित्रपटाच्या एकाही फ्रेममध्ये एकत्र दिसत नाहीत.)
कुंदन हा शहरात शिकून सवरुन आल्यामुळे त्याच्यावर औद्योगिकरणाचा जबरदस्त पगडा आहे.फक्त डोळ्यावर यंत्रप्रेमाचा जाड पडदा आल्यामुळे त्याच्या सामाजिक जाणिवा किंचित बोथट झाल्या आहेत व त्यावर भांडवलशाहीची धूळ जमा झाली आहे इतकंच.
जॉर्ज फर्नांडिस मुंबईचा अनभिषिक्त 'बंद'सम्राट असताना एकदा मुंबई महानगरपालिकेत यांत्रिक झाडूचा प्रस्ताव आला होता.
त्याला विरोध करताना जॉर्ज म्हणाला 'ज्या देशांत मनुष्यबळाची कमतरता आहे त्यांना हे ठीक आहे.
पण आपल्या देशात विपुल मनुष्यबळ असताना आणि मागितलेल्या हातांनाच काम मिळत नसताना सरसकट यंत्रांची गरज काय ?'
सिनेमात नायक शंकर कुंदनला क्रोधाने ऐकवतो ...."झगडा तो हाथ और मशिनका है बस !"
जॉर्जची आणि शंकरची जातकुळी एक नाही असं कोण म्हणेल ?
त्यावेळेस जॉर्जचा आणि कामगारांचा टोकाचा विरोध पाहून हा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला.
पण एकेकाळी साक्षात दुर्गा इंदिरा गांधींना , भर कोर्टात, हातातील बेड्या खळखळवत, 'आप मुझे इन जंजिरोंमे बांध सकती है, मगर इस देश को नही !' असं ठणकावणारा जॉर्ज जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर परिघाबाहेर फेकला जाऊन कालौघात बाद ठरणार हे तर उघडच होतं.
'शंकर, मुकाबले के वक्त हमारी लाशपरसे टांगा निकालके लेके जाना !' असं सांगणारा सामान्य गावकरी आणि बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसून नव्हे पण पुसल्यागत डॉ.सामंतांच्या लढ्यात सहभागी होणारा गिरणी कामगार यांच्यात डावं-उजवं करणं मला तरी अशक्य आहे.
चित्रपट वेगाने शेवटाकडे धावत असताना कुंदनच्या तोंडून शापवाणी येते...."मशिनोंका एक रेला उठेगा और तुम सब कुचलके रख दिये जाओगे !" अडीच तास थिएटरच्या काळोखी कोपऱ्यात दबा धरुन बसलेली उलट्या काळजाची नियती तात्काळ आपला डाव साधते आणि निर्लज्जपणे 'तथास्तु' म्हणून मोकळी होते.
"आजतक आदमी मशिने बनाता आ रहा है,मशिनने किसी आदमी को नही बनाया !"
या भरतवाक्यावर चित्रपट संपतो आणि अंधाऱ्या वास्तवाची जाणीव करुन देणारे थिएटरमधील प्रखर दिवे लागतात.
आज गावोगावी, दिशाहीन तरुण बेकारांचे तांडे खांद्यावर वेगवेगळ्या रंगांचे झेंडे घेऊन स्वार्थी व भ्रष्ट नाना,भाई आणि दादांच्या मागून फरफटत जाताना पाहून बलदेव राज चोप्राची (१९१४-२००८),अहंकारी कुंदनच्या बसपुढे आपला टांगा घेऊन जाणाऱ्या त्याच्या जिगरबाज शंकरची आणि प्रवाहाविरुद्ध पोहोणाऱ्या झुंजार जॉर्ज फर्नांडिसची तीव्रतेने आठवण येते आहे.
पार्श्वभूमीवर मला साहिरचाच 'फिर सुबह होगी'मधील आशावाद ऐकू येतोय..... तुम्हाला येतोय का ?
जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी
उस सुबह को हम ही लाएँगे,वो सुबह हमीं से आएगी
वो सुबह कभी तो आएगी....
संदीप सामंत.
९८२०५२४५१०.
१२/०२/२०२२.
January 14, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti