२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी व मंदाकिनी या नद्यांवर (हायड्रोइलेक्ट्रिक वीजनिर्मितीसाठी) धरणें बांधणें हें गंगेसाठी घातक ठरेल , नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होईल , आणि अर्थातच, त्याचा अनिष्ट परिणाम ecology वरही होईल. त्यांच्या या वक्तव्यात वावगें कांहींच नाहीं. (अर्थात, देशाला हायड्रोइलेक्ट्रसिटीची जरूर आहेच, ही नाण्याची दुसरी बाजू झाली).
आपण या बाबीवर चर्चा करतांना अर्थकारण, समाजकारण, विद्युतनिर्मिती, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, फक्त ‘पाणी’ या विषयावर लक्ष केंद्रित करूं या, व पाहूं या, उमा भारतीजींना आपण कांहीं उपयुक्त माहिती पुरवूं शकतो कां, तें.
१. सरस्वती : आपल्याला हें माहीतच आहे की ‘सरस्वती’ नांवाची महा-नदी, जिचें पात्र रुंदी कांहीं ठिकाणी ८-१२ किलोमीटर रुंद होतें , व जिच्या काठावर पुरातन ‘सिंधु-सरस्वती-गंगा’ संस्कृतीची वाढ झाली, ती महा-नदी आटत गेली, आणि इ.स.पू. १९००-१५०० च्या सुमाराला लुप्तच झाली. अनेकांना हेंही माहीत असेलच की, आतांच्या युगात पर्यावरणामुळे बर्फ वितळण्याचें प्रमाण वाढल्यानें हिमनद्या (glaciers) लहान-लहान होत चालल्या आहेत, व त्यामुळे हिमालयातून वाहणार्या (गंगेसारख्या) नद्यांच्या अस्तित्वाला धोका आहे. एक ग्लेसियर गंगेसारख्या मोठ्या नदीला १०,००० वर्षें मानी पुरवूं शकतो. त्यापेखी किती वर्षें उलटून गेलेली आहेत ? त्यायून, ग्लेसियर्स् आटत चालले आहेत. म्हणून, गंगा नदी तर एक दिवस आटणारच आहे ; फक्त, ती घटना आपल्या आयुष्यात, किंवा अगदी नजिकच्या भविष्यात घडणार नाहीं, एवढेंच. भगीरथानें महा-प्रयत्नानें गंगा हिमालयातून (स्वर्गातून) खाली (समतल प्रदेशात) आणली (असें पुराणें सांगतात). त्या गंगेला सध्याच्या काळीं कसें जगवायचें, आणि / किंवा गंगा-खोर्याला पाणी-पुरवठा कसा कमी होणार नाहीं, हें आपण पहायला हवें.
२. सरस्वतीबद्दल आणखी कांहीं : डॉ. एस्. कल्याणरामन् त्यांच्या पुस्तकात ( संदर्भ नंतर दिलेला आहे) म्हणतात की हा ‘सिंधु-सरस्वतीचा प्रदेश’ म्हणजे एक विशाल homogeneous-aquifer आहे, जणूं एक प्रचंड मोठा स्पाँज आहे.
सरस्वती नदी जरी आजच्या ३५००-३९०० वर्षें आधी आटून गेलेली असली, तरी, तिच्या ‘लुप्त’ पात्रात आजही पाणी लागतें. राजस्थानातील जैसलमेर हा भाग वाळवंटी आहे. पण त्या भागात बोअर-वेल् घेतली असतां खाली बारमाही-पाणी लागतें. ‘रेडिओ-कार्बन डेटिंग’नें हें दिसून आलेलें आहे की, हें groundwater (भूगगर्भजल) इ.स.पू. २९५० ते २४०० या (म्हणजेच, आजच्या काळाच्या ४४००-५००० वर्षें आधीच्या) काळातील आहे . हें वहातें पाणी आहे. त्याचा वेगही मोजला गेलेला आहे. ज्याअर्थी हें पाणी वहातें आहे, त्याअर्थी त्याचा आजही, जमिनीखालून, त्याच्या हिमालयीन उगम-भागाशी संपर्क आहे. या , डीप-वॉटर / ग्राउंड-वॉटर / अॅक्विफर च्या BARC नें केलेल्या ‘Tritium (Hydrogen Isotope) Analysis’ नें याचा काळ, इ. स.पू. ५४०० ते इ.स.पू. ४०० असा दाखवला आहे. BARC च्या रिसर्चर्सनी असें दाखवलेलें आहे की, हें राजस्थानमधील अॅक्विफर्समधील पाणी हिमालयीन आहे, व त्याचा उगम-काळ इ.स.पू. ६००० इतका आहे. (सर्व संदर्भ : Kalyanraman यांचा सरस्वतीसंबंधी ग्रंथ, ‘The River Saraswati : Legend, Myth and Reality’). हे ई.स.पू.चे वेगवेगळे निष्कर्ष असें नक्कीच दाखवतात, की हें भूगर्भजल फार-पुरातन-कालीन आहे.
ही अगदी हल्लीची बातमी पहा : ती सांगते की राजस्थानातील थर वाळवंटात आतां शेतकर्यांना Tube-wells मध्ये भरपूर बारमाही पाणी मिळत आहे, आणि तेंही इतक्या जोरात (forcefully) वर येत आहे की तें थांबवणें कठीण आहे. वृत्तपत्र म्हणतें की, याचा अर्थ असा असूं शकतो की सरस्वती नदी पुन्हा बाहेर येत आहे. (संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई, दि. २६ एप्रिल २०१६ च्या अंक).
जैसलमेर नजिकच्या, पाकिस्तानातील-भूभागातही अशीच परिस्थिती आहे, तेथेंही, वाळवंटी भागातील bore-wells ना पाणी मिळत आहे.
३. USA मध्ये दक्षिण-पश्चिम भागात, जमिनीच्या खाली एक प्रचंड तलाव आहे, (युरोपमधील एखाद्या लहान समुद्राएवढा) , जो अनेक states च्या खाली पसरलेला आहे. त्यातलें पाणी उपसा करून वापरलें जातें.
४. गंगा-खोरें : जसें जसें आपण पूर्वेकडे जाऊं तसें तसें गंगेला वेगवेगळ्या उपनद्या मिळत रहातात, जसें , यमुना,शोण इत्यादी इत्यादी, व तिच्यातील पाणी वाढत रहातें. म्हणजे, गंगेच्या-पाण्याचा जो कांहीं प्रश्न आहे तो पर्वतराजींपासून अलाहाबादपर्यंतचा आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ श्री. ढवळीकर यांनीं लिहिलें आहे की, देहरादूनपासून ते अलाहाबादपर्यंतच्या प्रदेशात उत्खनन करतांना तें चिखलातच करावें लागतें. तसेंच, या भागात खूप लहान-लहान तळी आहेत. या सर्वाचा अर्थ ते असा काढतात की, वेद-पुराणात जो ‘प्रलयाचा’ (महापुराचा) उल्लेख आहे, त्या प्रलयामुळे हें जमिनीतील मुरलेलें पाणी आहे.
तें असो-नसो, पण गंगेनें अनेकदा पात्र मात्र बदललेले आहे, त्याचाही कांहींतरी परिणाम असणारच.
मला असें वाटतें की, ही तळी व हा चिखल याचा अर्थ एकतर असा असूं शकतो की, तिथें जमिनीखालीं एक, पुरातन-काळीं-वहात-असलेली पण नंतर-‘लुप्त’-झालेली (जशी सरस्वती झाली तशी ) ‘नदी’ असूं शकेल. इंडियन टॅक्टॉनिक प्लेट ही एशियन प्लेटला घासली गेल्यामुळे गेल्या कांहीं सहस्त्रकांत बर्याच उलथापालथी झालेल्या आहेत. त्यामुळेच, सरस्वतीच्या उपनद्या असलेल्या सतलज व यमुनेनें प्रवाह बदलले, दृशद्वती नष्ट झाली, तोंस ही यमुनेची उपनदी झाली, व सरस्वती लुप्त झाली. त्याचप्रमाणें गंगेजवळही, सहस्त्रों-वर्षांपूर्वी-अस्तित्वात-असलेली एखादी नदी लुप्त होणें शक्य आहे.
किंवा, USA मध्ये आहे तसा एखादा मोठा भूअंतर्गत (underground) तलावही त्या भागात असूं शकेल.अखेरीस, हिमालयीन पर्वराजींमधून सगळेंच पाणी फक्त जमिनीवरील वाहत्या नद्यांमधूनच जात असेल असें नाहीं, तर कांहीं पाणी जमिनीखाली, वहात किंवा स्थिर असूंही शकेल
रिमोट सेन्सिंग एजन्सीनें जसा घग्गर-हाक्रा या सध्याच्या नद्यांच्या भूभागाचा सर्व्हे केलेला आहे (लुप्त सरस्वती नदीसाठी) , तसा गंगाखोर्याचा केलेला आहे काय ; किंवा जिऑलॉजिकल सर्व्हे, आर्कियॉलॉजिकल सर्व्हे, वॉटर-रिसर्च कमिशन, वगैरे संस्थांनी त्या भागात भूगर्भजल शोधण्यासाठी कांहीं प्रयोगादाखल उत्खनन केले आहे काय, बोशर-वेल्स् खणून पाहिल्या आहेत काय, व कांहीं माहिती गोळा केली आहे काय , याची मला कल्पना नाहीं . पण , तसें केलेलें नसल्यास तो अभ्यास व्हायला मात्र हवा.
५. भूगर्भजल : कल्याणरामन् सांगतात की, जैसलमेरच्या पश्चिमेच्या ( वाळवंटी ) सरस्वती-पात्रात (भूगर्भात) अंदाजे ३००० मिलियन क्युबिक मीटर इतका रिझर्व आहे. त्याचा वापर सुयोग्य प्रकारें करतां येऊं शकेल . सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाचे भूतपूर्व डायरेक्टर. डॉ. के. आर्. श्रीनिवासन् त्यांच्या एका लेखात सांगतात की, ‘सेंट्रल-सरस्वती-बेसिन’ या राजस्थानातील केवळ एका भूभागातच, १० लाख ट्यूब-वेलस् ना कायमस्वरूपी पाणी पुरवण्याची क्षमता आहे. कल्याणरामन् हेंही सांगतात की पाकिस्तानातील-पंजाब भागात detailed investigations झालेलें आहे, आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की , सिंधु व तिच्या उपनद्यांमधून जेवढें पाणी वाहून जातें, त्याच्या दसपट groundwater-reservoir ( भूगर्भजल-साठा) तेथें आहे.
६. जसें जेसलमेर भागात जमिनीखाली पुरातन-काळातील भूगर्भजल मिळालें आहे ; जसें पाकिस्तानातील पंजाब भागात प्रचुर भूगर्भजल आहे ; तसें, कदाचित, किंवा बहुतेक, गंगा-खोर्यातही असूं शकेल. गंगाखोर्यातही जर पुरातन-भूगर्भजलसंचय मिळाला, किंवा जमिनीखाली पुरातन-‘लुप्त’-नदी मिळाली, तर तिथेंही, वापरायला पाणी मुबलक मिळेल, आणि मग, धरणांमुळे गंगा-प्रवाहात कमतरता येण्याबद्दलची काळजी करायचें कारण रहाणार नाहीं.
७. मंत्रीजी उमा भारती यांच्यावर गंगेबद्दलची जबाबदारी आहे. तेव्हां, त्यांनी पुढाकार घेऊन, गंगा-खोर्यातील भूगर्भजलाच्या अभ्यासाला चालना द्यावी, वेग द्यावा. त्यातून प्राप्त होणार्या माहितीनें कदाचित गंगेच्या पाण्याचा प्रश्न सुटेलही !
- सुभाष स. नाईक
जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं.
जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले गेले. मात्र या कायद्यांना सर्रासपणे केराची टोपली दाखवणार्यांवर कारवाई करायला संबंधित यंत्रणांनी नेहमीच टाळाटाळ केलेली दिसते.
महाराष्ट्रात अनेक उद्योग आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, औषधी, शीतपेये, वैद्यकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील लहान आणि मोठ्याही उद्योगांचा समावेश आहे. संगणक, मोबाईल विविध उपकरणे वगैरे बनवणारे उद्योगही आहेत.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ मे १९६६ पासून सर्व कामकाज मराठीतून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांना राज्यात उत्पादित केल्या जाणार्या, तसेच विकल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वस्तू, संगणकीय प्रणाली, माहिती तंत्रज्ञान उपकरणे, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन), इत्यादींच्या पॅकेजिंग तसेच माहितीपत्रकांमध्ये मराठीचा वापर होत नसल्याचे दिसते. हे जाणीवपूर्वक केले जाते असे अनेकांचे मत आहे. औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादि वस्तुंबाबतही हेच चित्र दिसून येते.
मराठीच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट एकच आहे ती म्हणजे मराठी आणि हिंदीसाठीही देवनागरी लिपीच वापरली जाते. त्यामुळे बर्याच लोकांचा असा समज होतो की हिंदीत लिहिले की मराठी माणसाला वाचता येणारच. हे खरे असले तरी वाचता आले म्हणजे समजले असे नाही ना?
विक्रीला असलेल्या औषधांच्या वेष्टनांवरील माहिती, शीतपेयांची लेबल्स, भ्रमणध्वनी संच तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने यांचे बॉक्स किंवा इतर अनेक प्रकारचे पॅकेजिंग यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य भाषा इतके काय अगदी उर्दूमध्येही दिलेली असते. या उत्पादनांचे माहितीपत्रकही मराठी सोडून अन्य भाषामध्ये असते. ही माहिती मराठीत नसल्याने ग्रामीण भागातील व्यक्तीला त्यावर काय लिहिले आहे, हे समजत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याचीही शक्यता अधिक असते.
कर्नाटक राज्यात उत्पादन झालेल्या वस्तू त्या राज्याबाहेर जरी वितरित होत असतील तरी त्यावरील माहिती इतर कन्नडमध्ये असते. एक साधे उदाहरण आठवते. काही महिन्यांपूर्वी बंगलोरच्या आयकर सेंट्रल प्रोसेसिंग सेलमधून आलेल्या एका पत्रावर त्या सेलचे नाव आणि पत्ता चक्क कन्नडमध्ये होता. वास्तविक मुंबईला पाठवलेल्या त्या पत्रात कन्नडचा सुतरामही संबंध नव्हता. आता मुंबईतील एखादी कंपनी किंवा केंद्र सरकारचे कार्यालय हाच कित्ता गिरवून मराठी मजकूर असलेले पत्र एखाद्या कन्नडिगाला पाठवेल का?
सध्या सहिष्णूता या शब्दाची चलती आहे. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सहिष्णूतेबद्दलच शंका घेतली जातेय. इतरांचे काहीही असो, मराठी माणूस मात्र मूळचाच सहिष्णू आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि टपलीत मारुन जावे असे मराठीच्या बाबतीत नेहमीच होताना दिसते.
ज्या आस्थापना आणि उद्योग मराठीचा वापर करत नसतील त्यांना शिक्षा आणि दंडाची तरतूद करावी, अशी मागणी अनेक संस्थांनी वेळोवेळी केली आहे. या संदर्भात आमदारांच्या माध्यमातून विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित करण्यात आला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या संदर्भात परिपत्रक काढून ज्या आस्थापना मराठीचा वापर करत नाहीत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी सर्व विभाग/कार्यालय यांनी करावी, असे आदेश दिले होते. मात्र या आदेशालाही केराची टोपली बघायला मिळालेली दिसते.
शासन परिपत्रक क्रमांक - कपासू-२०१४/प्र.क्र.९४/भाषा-२ नुसार राज्यात विकल्या जाणार्या सर्व वस्तू, उत्पादित केल्या जाणार्या, तसेच विकल्या जाणार्या प्रत्येक भ्रमणध्वनी उपकरणात, संगणकीय प्रणालीत आणि माहिती तंत्रज्ञान उपकरणात मराठी भाषा वापरण्याची, वाचण्याची, टंकलिखित करण्याची सोय असण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकाची महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील लिंक खाली दिली आहे. हे परिपत्रक नक्की वाचा.
दुर्दैवाने खुद्द मराठी भाषा विभागानेच काढलेल्या या परिपत्रकातच शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत.
आता समजलं.. मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय असं का म्हटलं ते?
-- निनाद अरविंद प्रधान
------
मराठी भाषा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : कपासू-२०१४/प्र.क्र.९४/भाषा-२
परिपत्रकाचा संकेतांक : 201409251212142933
पाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…
२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात जोडून श्रध्दांजली अर्पण केली आणि माझ्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर चार वर्षांपूर्वीची घटना उभी राहिली. माझा नागपूरचा एक जुना मित्र पुण्यात एका चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळला होता व काही सेकंदात सर्व काही संपलं होतं. आज तिचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी जिथे ठेवण्यात आला होता तिथेच चार वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या मृतदेहासमोर मी अश्रू ढाळत उभा होतो. त्यानंतर अनेक दिवस मी सैरभैर झालो होतो. आज पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून मी अंत्यदर्शनापासून कटाक्षाने दूर राहिलो.
ती होती अश्विनी एकबोटे व तो होता संजय सूरकर.
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
डोक्याला मस्तं मुंग्या आल्या की थांबावं, असोशीने संपवायच्या मागे लागू नये, बाटलीत राहिली म्हणून ती वाया जात नाही, नासत नाही, चव, रंग बदलत नाही. सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या दुनियेत ही स्कॉच मात्र ईमान राखून आहे.
ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्यातील अनुभव लिहिलेले आहेत.
यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.
शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच!
सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता.
दुःखदाह सांगणारी कविता
Copyright © 2025 | Marathisrushti