सुख सुख म्हणतात ते हेच… ….. आणखी काय पाहिजे…..छोटी छोटी सुख शोधाल तर जीवन जगाल !!!
ललित..
इंद्रधनुषी रंग नदीचे…
पावसाळा संपत आला की पक्षपंधरवाड्याची सुरुवात होते.खेड्यापाडयातून पितरांच्या सर्वत्र वावरणा-या भुकेलेल्या आत्म्यांना दरवर्षी पिंडदान करून तृप्त करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.शेवटी ही पिंडे नदीकाठावर कावळ्याच्या प्रतिक्षेत ठेवली जातात किंवा नदीच्या पाण्यात मासे खातील यासाठी अलगद सोडली जातात. त्यानंतर सुरु होते ती घराची स्वच्छता व शुद्धता करणे,घराच्या भिंती मातीच्याच असायच्या त्या मातीनेच सारवून स्वच्छ करायच्या.पावसाळाभर पावसाने धिंगाणा घातलेला असायचा.पावसांचे पाणी भिंतीवरून ओघळून त्या खराब दिसू लागायच्या.त्यांना मायेने सारवल्यावर लख्खं होऊन जायच्या.सारवण्यासाठी पांढरी माती पाण्यात कालवली जायची तिचा एक सुवास संपूर्ण घ्रभर पसरायचा.या घमघमणा-या मातीच्या सुगंधाने घर शुद्ध आणि स्वच्छ होत असे.त्यासाठीच तर पोरंसोरं शाळा बुडवून सारवतांना नाकातोंडावर, हातावर मातीचे थेंब झेलत आईला मदत करु लागायचे.मायेने भिंतीवरुन पोतरं फिरवतांना आईच्या नाका-तोंडावर सगळे मातीचे थेंब उडालेले दिसंत असले तरी श्रमातून तिचा चेहरा उजळलेला असायचा.काम करत आमचेही नाक-तोंड थेंबानी भरुन जाई अशा कामात आम्हा मुलांना खूप मजा वाटायची.आज हे सारे जुने दिवस आठवले की मनाला हलके वाटू लागते. त्यावेळी पाण्यात खेळणे,मातीत हात भरवणे यामधली गंमत आजकाल तासनतास मोबाईलवर गेम खेळत बसणा-यांना कधीच नाही कळणार.ज्यांनी हे दिवस अनुभवले खरंच त्यांचे जीवन लख्खं झाले आहे.
भिंती सारवतांना मातीचे थेंब उडाल्यामुळे तसेच घरात सतत पाणी गळून कळकट मळकट झालेली मोठमोठी भांडी नदीवर नेऊन घासायलाही खूप मजा यायची.पोरीसोरी या कामात हातभार लावायच्या.नदीच्या खळखळ वाहणा-या पाण्याच्या धारेबरोबर तांब्या-पितळेच्या भांड्यानी अशी काही कात टाकलेली असायची की त्याची चमक दूरवरुनच नजरेत भरायची.
यालाच दसरा काढणे हा शब्दप्रयोग अजूनही प्रचलित आहे.खरं तर या पाठीमागे धार्मिक-पारंपारिक तत्त्वांपेक्षाही काही शास्त्रीय गोष्टी देखील नक्कीच आहेत.त्यातून मिळणारा आनंद तर आणखी वेगळीच पर्वणी या सगळ्या गोष्टींसाठी नदीच जवळ धावून यायची.कोणीही असो कसाही असो नदीनं कधी भेदभाव नाही केला.वर्षानुवर्षे ती वाहतच आलेली आहे.अजूनही वाहतेच आहे.सर्वांच्या जीवनात इंद्रधनुषी रंग भरतेच आहे.
पावसाळाभर उन फारसे नसल्यामुळे ओलसर हवेने नरम पडलेल्या कपड्यांना,अंथरूण पांघरूणांना देखील कुबट वास यायचा.पावसाळा थांबला की अशी सर्वांची कपडे धुवायची लगबग सुरु व्हायची की आख्खी नदी बायापोरांनी दूरपर्यंत भरुन जायची.जणू काही नदीपात्राजवळ जत्राच भरलेली असायची.घरातील अंथरुणं-पांघरूणं,गोधड्या-घोंगड्यांसह,गाद्या-उशांच्याखोळा नदीच्या खळाळत्या पाण्यात मांडलेल्या दगडावर अपटू-आपटू धुतल्या जायच्या.घरातल्या पोरांबाळांसह ह्या दिवसात नदीवर भली मोठी गर्दी व्हायची.दोन्हीकडील टोक धरून अंथरूणं, पांघरूणं,गोधडी पाण्यात बुडवून गोल गोल फिरवून पिळायला आम्हाला खूप गंमत वाटायची.घट्टं पिळलेले कपडे नदी जवळच्या वाळूवर,गवतावर वाळत घातले जायचे.रंगीबेरंगी वाळत घातलेले साड्या,लुगडे,गोधडे,चादरी यामुळे नदीच्या भोवताली जणू इंद्रधनुष्याचे रंग पसरायचे. आजही नदी पाहिली की डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहते की काठावरील वाळूवर वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपडयांमुळे नदीचे अवघे रंग इंद्रधनुषी होऊन जायचे.पाहतांना मन हरखून जायचे.आजूबाजूला लव्हाळ्याची हिरवळ पसरलेली असायची. वाहत्या पाण्यासोबत पोरेसोरे खेळायची.नदीचे पाणी तेंव्हा खळखळत असायचे,एवढी घाणही पाण्यात पूर्वी सोडलेली नव्हती.नितळ पाण्यातून तळाला बसलेले शंख, शिपले,वेगवेगळ्या रंगांच्या गारगोट्याही चमकत रहायच्या पाण्याखाली…
आज मात्र नदी बदलून गेली आहे.नदीचे हे रंग बेरंग होतानां पाहून मनाच्या आनंदणा-या स्मित रेषा पुसट होऊन पांढ-याफट्क होत चालल्या आहेत.पूर्वीचे नदीचे रुप किती मनोहारी असायचे.नदी म्हणजे सौंदर्याची खाण असायची,बालगोपाळांना वात्सल्याने अंगाखांद्यावर मिरवत नेणारे पाणीदार ठाण असायची.प्रत्येकाला तिची जाण असायची नव्हे तीच सर्वांना जीव की प्राण असायची म्हणूनच तर तिच्या मध्ये पूर्वी एवढी घाणही नसायची.लोक नदीमध्ये दिवे पौर्णिमेला नदीची पूजा करुन दिवे सोडायचे.नदीलाच देव मानायचे.अडीपडीला नदीच यायची मदतीला लोकांच्या !
नदी म्हणजे खरोखर काय असते ! तहानेने व्याकूळ झालेल्या वासराची गाय असते.सुपीक मातीचा घास वाहून आणणारी पिकांची माय असते.मातकट वासाच्या गढूळलेल्या रेंद्यावरची दुधाळ अशी साय असते. कधी संपूर्ण काठ स्वच्छ करणारा उपाय असते.तर कधी पात्रात भरुन संथ होऊन शांतपणे वाहणारा आनंदमयी अभिप्राय असते.
नदी म्हणजे पसरलेल्या वाळूचा लांबच लांब पट्टा किंवा हिरव्या हिरव्या लव्हाळ्यांनी वेढलेला वट्टा.नदी म्हणजे सरकत्या जिन्यासारखा लांबचलांब वेलबुट्टा किंवा चिंचेला वळसा घालणारा मातीचा कट्टा.नदी म्हणजे तर असतो हिरवाईच्या अंगावर उमटलेला विलक्षण असा चट्टा.थोडा खट्टा थोडा मिठ्ठा !
नदीच असते जन्म आणि नदीच मृत्यू असते,अख्खे जीवनसुद्धा असते नदीच ! पूर्वी नदीमुळेच तुमच्या आमच्या जीवनाला उतरायला घाट मिळायचे.कधी वाहणारे पाण्याचे पाट मिळायचे,तर कधी नदीला वाहत येणारे फाटे सतराशे साठ येऊन मिळायचे.कुठे रुप नदीचे सपाट असायचे तर कुठे तिचे रुप रौद्र आणि आफाट असायचे.
डॉ.संतोष सेलूकर,परभणी
मो.7709515110
Mail- Santosh.selukar@gmail.com
आयुष्य जगतांना खूप काही "राहिलंच" ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं.
शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं राहिलेलं असतं. कॉलेज बुडवून सिनेमा पाहायचं राहिलेलं असतं किंवा सायकल वर बसायचं देखील राहिलेलं असतं.
हे सगळं "राहिलेलं" राहिलेलं असतं ते कधी दडपणामुळे तर कधी परिस्थिती मुळे. पण जेव्हा मोठेपणी राहून जातं ते मात्र सर्वस्वी स्वतः मुळेच राहिलेलं असतं. याचे खापर फोडायला जेंव्हा वय, परिस्थिती, दडपण कामी येत नाही तेंव्हा मात्र नाईलाजाने स्वतः वर घेणं भाग पडतं ! इथे दुबळ्या मदतीला येतात ते वेळ, Ego, स्टेटस, वय किंवा जवाबदारी.
आपण आपल्या कार मध्ये बसून कुठल्याश्या ग्रामीण भागात जातो, तिथे कुणाकडे तरी जाण्या साठी रस्ता नसतो मग कार मधून उतरून पायी जात असतो, रस्त्यात मुलं गिल्लीदांडू खेळत असतात, आपल्याला आठवण होते आबक-दुबक-तिबक ची ! खेळावं वाटतं पुन्हा स्टेटस परवानगी देत नाही. मग राहून जातं....
आपण अधिकारी आहोत, आपल्याकडे काम घेऊन किंवा हाताखाली काम करणारा शाळेतला मित्र असतो, त्याला जवळ घेऊन गप्पा मारायच्या असतात पण आडवा येतो Ego. आपली बदली होते, बदलीच्या ठिकाणी जॉईन होतो आणि लक्षात येतं, गप्पा मारायचं राहिलंच......
रस्त्याने जातांना एखाद्या लग्नाची वरात जात असते, आपल्या तरुणपणीच गाणं वाजत असतं, गाडीतून उतरून त्या 'बेगानी शादी'त 'दिवना' होऊन नाचावं वाटतं पण आडवं येतं ते वय ! गाडी पुढे आणि वरात मागे जाते तेंव्हा लक्षात येतं, नाचायचं राहिलंच......
मोठे होतो, कामं वाढतात, वेळ पुरत नाही काहीच करण्यासाठी, मग उरकून घ्यायचं असतं सगळं, याच गडबडीत कधी तरी नकळत प्रेमात पडतो. सुरुवातीला बरं वाटतं ते आल्हाददायक. हळू हळू हे आल्हाददायक आल्हाद'दाहक' कधी होतं हे समजतच नाही. प्रेमाची दाहकता ब्रेकअप पर्यन्त पोचते. वेळेअभावी संभाव्य ब्रेकअप टाळू शकत (कधी कधी इच्छित शुद्ध) नाहीत. घाईघाईने ब्रेकअप चा मुहूर्त ठरतो. वेळ आणि तारीख निश्चित होते. वेळेत पोचतो. तक्रारींची आणि आरोपांची देवाणघेवाण होते. ठरल्या प्रमाणे ब्रेकअप with कॉफी. होतो सुद्धा. घड्याळ पाहून निघू का? विचारतो......
आणि टॅक्सीत बसल्यावर लक्षात येतं, सालं, एकदा मिठी मारून पोटभर रडायचं "राहिलंच...."
तर हे "राहिलंच" कधीच राहू देऊ नका. काही राहिलेल्याला पुन्हा संधी मिळते पण काही "राहिलेलं" पूर्ण आयुष्यात कधीच परत येत नाही. ते राहिलेलं राहूनच जातं, कायमचं...
तळ टीप :- तीन वर्षांपूर्वी माझे नाना(वडील) गेले. त्यांचा देहदानाचा संकल्प मलाच पूर्ण करायचा होता, मेडिकल कॉलेज 80km दूर. मृत्यू नंतर 6 तासांच्या आत मला त्यांना 'घेऊन' पोचायचं होतं म्हणून जेमतेम दिडतासच घरात ठेवून निघालो होतो. जवाबदारी होती न ती माझी, आणि माईची सुद्धा जवाबदारी माझीच !
पर्यायाने, नानांच्या छातीवर पडून ओस्काबोक्शी रडायचं, राहिलंच....
विनोद डावरे, परभणी
##सहजच सुचलं- 83
अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे……
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. रेल्वे खचाखच भरलेली. पंजाबमधील शेतकरी जास्त प्रमाणात आलेले. घोषणांनी परिसर दणाणलेला. अधिवेशनाची चर्चा. नागपूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. भूक लागलेली. हॉटेल बंद झालेले. सोबत आणलेल्या दशम्या संपलेल्या. इकडे तिकडे शोध घेतला. नवीन जागा. पर्याय काहीच नाही. त्याचवेळी जवळूनच केळी विक्रेता गाडा घेऊन निघालेला. डोक्यावर पिवळा दिवा. पिवळ्या प्रकाशात केळी पिवळीधमक दिसली. बरी वाटली. गाडीवळ गेलो. दोन डझन घेतली. पैसे दिले. केळीवाला निघून गेला. आम्ही पिवळ्या उजेडात ती खाणार होतो. सगळी केळी कच्ची निघाली. तशीच सोलली. दोन- तीन केळी खाल्ली. पोटासाठी कशीबशी. मध्यरात्र उलटली. पोट दुखायला लागले. काही केल्या थांबेना. दवाखाना कुठेच दिसेना. रात्रभर फिरत होतो. ओरडत, कण्हत रात्र काढली. मरणाच्या दारातून परत येण्याचा क्षण तो. अधिवेशन पार पडले. घोषणा दिल्या. परत आलो. पण पोटाच्या वेदनांची आठवण घेऊन. आता कुठेही केळीचा गाडा दिसला की केळी घेतो. पिकलेली आहे काय ते पाहूनच. खात्री करूनच.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
(पुण्यनगरी)
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि
शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं.
पोलिसांवर विश्वास ठेवा .....
पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा.
हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि -
पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे माहेर आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. अलकाला शनिवारी पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. अलकासोबत तिची आई होती. आईने अलकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोघी घराबाहेर पडल्यानंतर अलकाची आई रिक्षा शोधण्यासाठी पुढे गेली. नेमक्या याचवेळी खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर, हवालदार दत्तात्रय रत्नपारखी, नितीन पेठकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे, नसरूल्ला बागवान हे तेथून गस्त घालत चालले होते.बोचऱ्या थंडीत एका महिलेचा विव्हळण्याचा आवाज रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी ऐकला..प्रसवकळा सोसणाऱ्या त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. घोरपडे पेठेतून सुसाट वेगाने निघालेली पोलीस व्हॅन बाजीराव रस्त्यावर असतानाच ती महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीने सर्व सोपस्कार पोलिसांनी पार पाडले आणि खाकी वर्दीत दडलेल्या माणुसकीची प्रचिती दिली.
-- चिंतामणी कारखानीस
एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा,
"देवा,या वर्षी फारच थंडी आहे "
"देवा,भयानक उन्हाळा आहे
"देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला
"अरे काय महागाई वाढली देवा "
"देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही "
देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला,
"तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ????
तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !
Copyright © 2025 | Marathisrushti