वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मुख्य रस्ता आणि रेल्वे स्थानक यांना जोडणारी एक चिंचोळी गल्ली.
गल्लीच्या दुतर्फा वेगवेगळी दुकानं.
सुरवातीला वडापाव, दाबेली, सँडविच.
मग एखादं झेरॉक्सचं दुकान.
मध्येच एक मेहेंदी काढण्याचं प्रशस्त दालन.
बाजूला कानातल्या गळ्यातल्याचं दुकान.
लागून एखादी चहाची टपरी.
पुढे स्टेशनरीचं दुकान.
शिवाय पर्स, अत्तर, मोबाईल कव्हर आणि बरंच काही.
विविध प्रकारची एक से एक दुकानं.
त्याची नोकरीनिमित्त स्टेशनवर जायची-यायची वेळ ठरलेली.
सकाळी जाताना नेहमीच ट्रेन पकडायची लगबग असायची.
त्यामुळे त्या गल्लीतून अक्षरशः पळतच जावं लागायचं.
तेव्हा दुकानांत सुद्धा सकाळच्या तयारीची, मांडामांडीची गडबड असायची.
तो संध्याकाळच्या वेळेस परतायचा ती वेळ मात्र धंदा अगदी तेजीत असण्याची.
त्यामुळे तेव्हा सगळी दुकानं आणि एकूणच गल्ली एकदम गजबजलेली.
असाच त्याचा आठवड्यातला एक सामान्य दिवस.
आज नेहमीपेक्षा तास दोन तास लवकर घरी यायचं ठरवलं होतं.
मस्त काहीतरी चमचमीत खात टीव्ही वगैरे बघत बसायचं निवांतपणे.
तसं बायकोला सांगूनही ठेवलं होतं.
खरं तर कोणाचाही वाढदिवस, कुठला कार्यक्रम वगैरे काहीही नव्हतं.
ठरलेल्या दिनक्रमाचा थोडा कंटाळा आला होता हे नुसतं निमित्त.
केवळ मनात आलं म्हणून लवकर घरी यायचं होतं हेच खरं.
एकदम आली लहर केला कहर, मेरी मर्जी.. तसंच काहीसं.
पण ऑफिसमधून निघणार इतक्यात एका महत्वाच्या मीटिंगचा निरोप आला.
सगळं मुसळ केरात .. अन् नुसता त्रागा.
लवकर निघण्याचा मानस असताना झालं मात्र उलटंच.
मीटिंग लांबली आणि निघायला नेहमीपेक्षा अडीच तास उशीर.
येतानाच्या ट्रेन प्रवासात फक्त चिडचिड आणि नशिबाला दोष देणं सुरू होतं.
“ कधी एक दिवस लवकर जाऊ म्हंटलं तर कसलं काय ? “
“ कसला मनासारखा आनंद म्हणून घेता येत नाही .. नशिबच वाईट “.... वगैरे वगैरे
त्याच नादात स्टेशनवर उतरून घराच्या दिशेने चालू लागला.
वाटेत त्या चिंचोळया गल्लीत शिरला.
आज उशीर झाल्याने ती गल्ली थोडी वेगळी भासत होती.
नेहमी सारखा गजबजाट, कलकलाट नव्हता.
काही दुकानं पूर्ण बंद झाली होती तर काही बंद होण्याच्या मार्गावर होती.
खाण्यापिण्याची दुकानं अजूनही सुरू होती पण तिथलीही गर्दी कमी होती.
तो एकेक दुकान सहज न्याहाळत चालला होता.
चालता चालता त्या मेहेंदी काढण्याच्या दुकानापाशी आला.
तिथलं दृश्य बघून त्याची पावलं आधी रेंगाळली .. मग आपसूक थांबली.
त्याचं दुकान खरं तर बंद झालं होतं पण तरीही तो मेहेंदी काढत होता.
समोर २-४ चिमुकल्या मुली बसल्या होत्या.
हसऱ्या चेहऱ्याच्या आणि गोंडस.
पण अगदी कळकट मळकट कपड्यातल्या.
मुलींचे चेहरे ओळखीचे वाटले म्हणून निरखून पाहिल्यावर लक्षात आलं.
एरव्ही दिवसा त्या मुली स्टेशन जवळच्या सिग्नलवर फुलं-गजरे वगैरे विकायच्या.
त्यातली एक मुलगी मेहेंदी काढून घेत होती.
बाकीच्या नंबर लावून , कुतुहलाने बघत तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या.
काही क्षण तिथे रेंगाळल्यावर त्याला सगळा अंदाज आला.
दिवसभर मेहेंदी काढून प्रत्येक कोन मध्ये थोडी थोडी मेहेंदी शिल्लक राहिलेली.
शेवटच्या कोन मध्ये जरा जास्तच.
उरल्या सुरल्या मेहेंदीने तो त्या मुलींच्या इवल्याश्या हातावर कलाकुसर करत होता.
“दुकान बंद झाल्यावर या!” असं त्यानेच कदाचित सांगितलं असेल.
कुठलेही पैसे न घेता तो मेहेंदी काढत होता हे तर स्पष्टच होतं.
पण तरीही त्या मुलींना नेहमीच्या इतर ग्राहकांप्रमाणेच वागणूक देत होता.
त्यांना खाली जमिनीवर बसवलं नव्हतं किंवा दुकानाबाहेर उभं वगैरेही केलं नव्हतं.
गादी असलेल्या छोट्या सोफा स्टूलावर इतरांप्रमाणेच मानाने बसवलं होतं.
अतिशय प्रसन्न मनाने आणि तन्मयतेने तो मेहेंदी काढत होता.
दिवसभराचा कामाचा थकवा आहे म्हणून कुठेही कटकट नाही.
उशीर झालाय म्हणून उगीच चार फराटे मारून उरकून टाकणं नाही.
आणि उपकार केल्याचे भाव तर अजिबातच नाहीत.
उलट, मेहेंदी काढता काढता मजा मस्करी करत त्यांना हसवत सुद्धा होता.
त्या निरागस लहानग्या सुद्धा तितक्याच उत्साहाने मेहेंदी काढून घेत होत्या.
गप्पा मारत होत्या. दंगामस्ती, कल्ला करत होत्या.
कमालीचं अप्रूप, झालेला आनंद आणि मिळालेलं समाधान असा त्रिवेणी संगम त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
याला त्या दोघांचही खूप कौतुक वाटलं.
एकीकडे तो मेहेंदी काढणारा…
त्याच्याकडे जे आहे त्यातून त्याला जितकं देणं शक्य आहे तितकं निःस्पृहपणे वाटून तो दुसऱ्याला आनंद देत होता.
शिवाय समोरच्यांना झालेला आनंद बघून स्वतःही तितकाच उल्हासित होत होता.
तर दुसरीकडे त्या चिमुकल्या...
आपली प्रतिकूल परिस्थिती असूनही जे आहे त्यात आनंद मानत होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच तक्रार नव्हती.
आलेला क्षण अतिशय प्रसन्नतेने जगत होत्या.
ते सगळं चित्र पाहून त्याच्या मनातला आवाज कानात घुमू लागला.
“आपल्याला तशी कसली ददात नसूनही आपण गेले काही तास आपल्या नशिबावर आगपाखड करत होतो!”.
“आयुष्यात मनासारखा आनंद मिळत नाही अशी मुक्ताफळं उधळत होतो!”.
“अन् इथे हे सगळे कित्येक गोष्टींपासून वंचित असूनही अतिशय समाधानी आहेत!”.
“सगळ्याचा मनमुराद आनंद घेत आहेत!”.
त्याची सगळी चिडचिड एका क्षणात संपली.
एकदम मोकळं, हलकं वाटलं.
मनात अप्रत्यक्ष आलेल्या नकारात्मकतेवर त्या मेहेंदीने सकरात्मकतेचा रंग चढवला.
त्याच्यातही आता नवचैतन्य संचारलं.
प्रसन्न मुद्रेने आणि समाधानी अंतःकरणाने तो त्या गल्लीतून बाहेर पडला.
गोड शेवट झालेल्या सिनेमाची शेवटची फ्रेम मनात साठवून प्रेक्षक बाहेर पडतो ना?
अगदी तस्सच.
आता त्याच्या मनात एकंच विचार घुटमळत होता.
“आनंद तर सर्वदूर पसरलेला आहे!”.
“फक्त आपण शोधायला हवा!”.
“जसा त्या मेहेंदी काढणाऱ्याने शोधला!”.
“जसा त्या चिमूकल्यांना गवसला!”.
“आणि आता मलाही मिळाला!”..
“तसा सगळ्यांनाच सापडेल!”.
“शोधा म्हणजे सापडेल!!”.
“शोधा म्हणजे सापडेल!!”
- क्षितिज दाते , ठाणे
July 13, 2024
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर रोजी असलेला जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.
October 15, 2021
मधुमेह किंवा डायबिटीस, अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
April 7, 2015
हे थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फळ.ह्याला मराठी मध्ये नाश्पती असे म्हणतात.हे फळ बऱ्याच जणांना आवडते.
हे हिरवट पिवळ्या रंगाचे पेरूच्या आकाराचे फळ असते.ह्याची चव आंबट गोड असते व त्याला मंद मादक सुवास येतो.
हे फळ थंड गुणाचे असून वात पित्त नाशक असून थोडे कफकर आहे.
चला आता ह्याचे घरगुती उपचार पाहुया:
१)संडासला पिवळसर काळे,भसर,भरपूर वारंवार होत असेल तर अर्ध कच्चा पेअर खावे व इतर आहार घेऊ नये.
२)पोटात जळजळ,भुक मंदावणे,आव पडणे,पोट दुःखी ह्या तक्रारी असल्यास जेवणासह पेअरचे तुकडे खावे.
३)जीभेवर पांढरा थर,दात व हिरड्या शिवशिवणे,हिरड्या मधून रक्त वाहणे ह्यात कडक पेअर चावून खावे.
४)थकवा येणे,तोंड सुकणे,घशाला कोरड पडणे,शरीरातील उष्णता वाढणे ह्यात पेअरचा रस थोडे सैंधव मीठ घालून प्यावा.
अती पेअर खाल्ल्याने सर्दी,खोकला होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते.
August 29, 2018
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.
May 20, 2019
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 15, 2020
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला, सातत्याने होत असलेल्या त्यांच्या आत्महत्यांना अनेक बाबी जबाबदार आहेत. परंतु शासनाचे चुकीचे धोरण ही त्यामधील मुख्य बाब म्हणावी लागेल. शेती आणि शेतीशी संबंधित बाबींच्याच बाबतीत शासनाचे धोरण चुकत आहे, असे नसून शेतीशी थेट संबंधित नसलेल्या अनेक बाबींच्या संदर्भातही शासनाचे चुकीचे धोरण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे.
November 2, 2008
छत्रपती संभाजी महाराजांवरील “झंझावात” या ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्या माझ्या आगामी कादंबरीतील एक लेख
June 5, 2024
पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल
August 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti