आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणांसाठीं होता ||१||
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ||२||
आधीं पाठिमोरीं झालीं तीं सकळे । मग या गोपाळे बुडी दिली ||३||
दिली हाक त्यानें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासी ||४||
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधी ||५||
गर्व हरावया आला नारायण । मिस या करुन चेँडुवाचे ||६||
चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ||७||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.४१
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.