खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥
मातेपाशी एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिले तिने करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसी ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुक कानी आइकता त्याचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥
तेव्हा कवतुक कळो आले काही । हळुहळु दोही मायबापां ॥७॥
हळुहळु त्यांचें पुण्य जाले वाड । वारले हे जाड तिमिराचे ॥८॥
तिमिर हे तेथे राहो शके कैसे । झालिया प्रकाशे गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे ते क्षणामाजीं एका ॥१०॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.३२
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.