बाळक्रीडा अभंग क्र.२७

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



भक्तीसाठीं करी यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥
देव गिळुनिया धरिले मोहन । माय म्हणे कोण येथे दुजे ॥२॥
दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥
देवापाशी पुसे देव काय जाला । हासे आले बोला याचे हरि ॥४॥
यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिके मानिती साच खरे ॥५॥
लटिके ते साच साच ते लटिके । नेणती लोभिके आशाबध्द ॥६॥
सांग म्हणे माय येरु वासी तोड । तंव ते ब्रम्हांड देखे माजी ॥७॥
माजी जया चंद्र सूर्य तारांगणे । तो भक्तांकारणे बाळलीला ॥८॥
लीळा कोण जाणे याचे महिमान । जगाचे जीवन देवा देव ॥९॥
देवे कवतुक दाखविले तया । लागतील पाया मायबापें ॥१०॥
मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥
तो हि त्यांचा देव दिला नारायणे । माझे हे करणे तो हि मीच ॥१२॥
मीच म्हणउनि जे जे जेथे ध्याती । तेथे मी श्रीपति भोगिता ते ॥१३॥
ते मज वेगळे मी तया निराळा । नाही या सकळा ब्रम्हाडांत ॥१४॥
तद्‌भावना इच्छा भावितसे त्यांचे । फळ देता साचे मीच एक ॥१५॥
मीच एक खरा बोले नारायण । दाविले निर्वाण निजदासां ॥१६॥
निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूती नारायण ॥१७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author