बाळक्रीडा अभंग क्र.२१

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊ नेदी वाया परि त्याचे ॥१॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥
गाई दवडुनि घालिती बाहेरी । तव म्हणे हरि बांधा त्याही ॥३॥
त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडयातुनि ॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायी । सहज तेथे नाही घालमेली ॥६॥
मेली ही शहाणी करिता सायास । नाही सुखलेश तुका म्हणे ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author