कौटिल्यांनी रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे हे गुरू व महामंत्री. कौटिल्य या राजनीतिज्ञाचे विचार व सिद्धांत सांगणारा अर्थशास्त्र हा ग्रंथ. तरी तो कौटिल्यानेच रचला की नाही? याबद्दल मतभेद आहेत.
म्हैसूर येथील पौर्वग्रंथसंग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. शामशास्त्री ह्यांस ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत १९०४ च्या सुमारास प्रथम उपलब्ध झाली. त्यांनी सर्वांगीण अभ्यास करून व संपादन करून हा ग्रंथ १९०९ साली प्रसिद्ध केला. त्यानंतर अनेक भारतीय व भारताबाहेरील विद्वानांनी ह्या ग्रंथाची इंग्लिश व इतर भाषांमध्ये भाषांतरे, संशोधनपूर्ण विवरणे व टीका प्रसिद्ध केल्या.
कौटिलीय अर्थशास्त्रात राजनीतिशास्त्र बऱ्याच विस्ताराने सांगितले आहे. परंतु पाश्चात्त्यांच्या अर्थाने ह्यास ‘राज्यशास्त्रीय’ ग्रंथ असे म्हणता येणार नाही. राज्य ह्या संस्थेची उत्पत्ती, तिचा विकास, सत्ता व अधिकार यांचे तात्त्विक स्वरूप नागरिक या कल्पनेचे स्पष्टीकरण अशा स्वरूपाचे तात्त्विक व सैद्धांतिक विवेचन यात नाही. ह्याबाबत अनुषंगाने काही आले असले, तरी ग्रंथकाराला मुख्यतः राज्य कसे मिळवावे ? व चालवावे? हेच सांगावयाचे आहे.
या ग्रंथात पूर्वीच्या राजनीतिकार आचार्यांची नावे व विचार उल्लेखिलेले आहेत. यांवरून या ग्रंथापूर्वी हे शास्त्र लिखित स्वरूपात बऱ्याच प्रमाणात निर्माण झाले होते असे मान्य करावे लागते. नंतरही हजार-दीडहजार वर्षे संस्कृतातून राजनीतिविषयक ग्रंथांची निर्मिती होतच होती.
ग्रंथात त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ व काम असे तीन पुरुषार्थ सांगितले असून हे तिन्हीही पुरुषार्थ परस्परपोषक आहेत असे म्हणून त्यात अर्थ हाच प्रधान होय, धर्म व काम हे अर्थावलंबी आहेत, असे कौटिल्याचे मत मुख्य सिद्धांत म्हणून प्रतिपादिले आहे.
‘अर्थ म्हणजे मनुष्याची वृत्ती म्हणजे जीवन आणि अर्थ म्हणजे मनुष्य राहतो ती भूमी’ असे ‘अर्थ’ शब्दाचे दोन अर्थ सांगून ‘मनुष्यवती भूमी मिळविणे व तिचे पालन करणे याचा उपाय म्हणजे अर्थशास्त्र’ अशी व्याख्या त्यात सांगितली आहे.
धर्मशास्त्रकारांनी म्हणजे स्मृतिकारांनी दंडनीती किंवा राजनीती ही धर्मशास्त्रातच अंतर्भूत केली आहे. परंतु अर्थशास्त्राच्या पूर्वपरंपरेप्रमाणे राजनीती हा धर्मशास्त्राचा भाग नसून ते स्वतंत्र शास्त्र आहे. राजधर्म हा स्वतंत्र विषय आहे आणि त्याचे विवरण धर्मशास्त्रावर अधिष्ठित असू नये, अशी दृष्टी कौटिल्यपूर्व बार्हस्पत्य व औशनस इ. राजनीतिकारांची होती व तीच कौटिल्याने मान्य केली.
या ग्रंथात एकूण पंधरा अधिकरणे आहेत. पहिल्या पाचांत राज्यशासन व पुढील आठांत अन्य राजसत्तांशी संबंध आणि शेवटच्या दोहोंत क्रमाने अधार्मिकांच्या नाशाचे गुप्त उपाय व शास्त्ररचना-पद्धती हे विषय प्रामुख्याने येतात. सर्व ग्रंथ प्रायः गद्य स्वरूपातच आहेत परंतु प्रत्येक अध्यायाच्या शेवटी व क्वचित मध्येही काही श्लोक आहेत. हे श्लोक ३८० च भरतात. परंतु या ग्रंथात सहा सहस्र श्लोक आहेत असे म्हटले आहे, ते जुळत नाही.
राज्याची अंतर्गत शासकीय व्यवस्था आणि त्याचे परराष्ट्रसंबंध यांविषयी सर्व दृष्टिकोनांचा आढावा घेणारे खंडनमंडनात्मक असे सविस्तर विवेचन या ग्रंथात केलेले आहे. कोणत्याही राज्याची स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश. दण्ड आणि मित्र अशी सात अंगे सांगून प्रत्येकाविषयी तपशीलवार विवेचन केले आहे. प्रजेला संतुष्ट ठेवून व धाकातही ठेवून राज्यकारभार कसा करावा आणि त्याकरिता उपर्युक्त सातही अंगांचे रक्षण कसे करावे, याचे व्यावहारिक भूमिकेतून त्या काळाला योग्य असे मार्गदर्शन केले आहे. परराष्ट्रसंबंधांचा ऊहापोहही स्वराज्याचे स्थैर्य व वृद्धी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला दिसतो.
कौंटिल्य हा कुटिल राजकारणाचा पुरस्कर्ता होता. राजाने आपले आसन स्थिर ठेवण्याकरिता व राज्यविस्ताराकरिता सर्वसामान्यांना लागू होणारे किंवा प्रजेला लागू होणारे नीतिनियम बाजूस ठेवण्याचा प्रसंग आला, तर तसे करावे असे कौटिल्याचे मत आहे. तथापि कौटिल्याने कुटिल आणि कठोर उपायांची जी तरफदारी केली आहे, ती मुख्यतः राजद्रोही व समाजकंटक यांच्या विरुद्ध केली आहे, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. त्याच्या मते राजाचे कल्याण व सुख प्रजेच्या कल्याणात, सुखात, व विशेषतः वर्णाश्रमधर्माच्या रक्षणात सामावले आहे आणि त्याला याहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काहीही असू शकत नाही. जमिनीची मशागत, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, प्रजांच्या नवीन वसाहती वसविणे, धातूंच्या खाणी व अन्य उद्योगधंदे उभारणे इ. अनेक बाबतींत कौटिल्याने सांगितलेल्या कल्याणकारी योजनांवरून त्याची प्रजाभिमुख राजनीती सुस्पष्टपणे दिसून येते.
या ग्रंथाइतका राजनीतिविषयक मूलगामी ग्रंथ संस्कृत भाषेत निर्माण झालेला आढळत नाही. अशाअनेक दृष्टींनी एक ऐतिहासिक साधनग्रंथ म्हणूनही ह्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
धनश्री विठ्ठल तेलंग
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए.भाग २
दि. ३१. ०८. २०२२
