अॅन फ्रँकची डायरी

केवळ पुस्तकावर विसंबून राहायचे नसेल तर काही छंद जोपासायला हवेत. छंदातून आनंद तर मिळतोच; पण ज्ञान आणि कौशल्य यासाठीही छंद उपयोगी पडतात. डायरी लिहिण्याचा छंद हा संघर्षाचा आणि हर्षाचा कोलाज असतो. छंद म्हणून लिहिणं वेगळं आणि आलेल्या अनुभवाची गाथा लिहिणं वेगळं. अनेकांच्या आयुष्यात पुस्तकं येतच नाहीत. जन्मापासून संघर्ष, आव्हानं यांचा सामना करावा लागतो. पुस्तकांपेक्षाही परिस्थितीच माणसांना शिकविते, संघर्ष करत करतच ते आयुष्य जगत असतात आणि तोच वस्तुपाठ पुस्तक म्हणून आपल्यासमोर येतो.



केवळ पुस्तकावर विसंबून राहायचे नसेल तर काही छंद जोपासायला हवेत.

छंदातून आनंद तर मिळतोच; पण ज्ञान आणि कौशल्य यासाठीही छंद उपयोगी पडतात. डायरी लिहिण्याचा छंद हा संघर्षाचा आणि हर्षाचा कोलाज असतो. छंद म्हणून लिहिणं वेगळं आणि आलेल्या अनुभवाची गाथा लिहिणं वेगळं. अनेकांच्या आयुष्यात पुस्तकं येतच नाहीत. जन्मापासून संघर्ष, आव्हानं यांचा सामना करावा लागतो. पुस्तकांपेक्षाही परिस्थितीच माणसांना शिकविते, संघर्ष करत करतच ते आयुष्य जगत असतात आणि तोच वस्तुपाठ पुस्तक म्हणून आपल्यासमोर येतो.

तेराव्या वर्षाच्या वाढदिवशी अॅनाला मिळालेली डायरी हीच पुढे तिच्या सुखदुःखाची खरी साक्षीदार बनणार आहे, याचा तिने कधी विचारही केला नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरने ज्यूंचा अनन्वित छळ सुरू केल्यामुळे ज्यू कुटुंबात जन्मलेल्या तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला. दोन वर्षे भूमिगत अवस्थेत राहून अत्यंत असुरक्षित वातावरणात, तुरुंगात राहिल्याप्रमाणे अत्यंत हाल सोसावे लागले. या दरम्यान, ॲनाने दैनंदिनी लिहायला सुरुवात केली. प्रत्येकाने ही डायरी वाचावी अशीच आहे. डायरी ही अनेकांसाठी पुढील आयुष्यासाठी दीपस्तंभ असते.

आजकाल डायरी लिहिण्याचा छंद हळूहळू कमी होत आहे. डायरी लिहिण्याने भावनांची अभिव्यक्ती होते. डायरी म्हणजे निरीक्षणाचा टीपकागदच होय. निरीक्षणातून खूप मोठं ज्ञान आपल्याला मिळतं. मुलांमध्ये निरीक्षणाची सवय लावायला हवी. आमची मुले सहलीला जाऊन एखादा किल्ला पाहातात; पण त्याच्याविषयीची माहिती, किल्ल्याचे शिलालेख, यांचे निरीक्षण करून त्यावर लिहिण्याने मुलांच्या ज्ञानात भर तर पडतेच; पण ज्ञान पक्कं लक्षात राहातं. डायरी हा एक प्रकारचा आरसाच असतो. तुम्हाला वरचेवर सुधारणा करण्यासाठी वाव देणारा एक मित्र असतो. आपल्या कर्तृत्वाचे, आयुष्याचं सिंहावलोकन करणं आवश्यक असतं. मनन, चिंतन या बाबी विकसित झाल्या तर ज्ञान पक्कं होतं. ‘माझ्या मृत्यूनंतरही मला जगत राहायचं आहे’, ही ॲनाची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.

अॅमस्टरडॅम शाळेचं नाव आता ॲना फ्रँक स्कूल असं आहे आणि जिथे ॲनाचा मृत्यू झाला, त्या बेल्सनमध्ये एकाही दगडावर एकाही थडग्यावर तिचं नाव कोरलेलं नाही. या चुकीची भरपाई म्हणून की काय जर्मनीमध्ये, इस्त्राएलमध्ये आणि काही ठिकाणी तिची स्मारकं उभारलेली आहेत; पण या सगळ्यापेक्षा ही तिची डायरी अजून जतन करून ठेवलेली आहे. तिचा आवाजही जतन करून ठेवलेला आहे. ॲनाच्या डायरीवर नाटक, चित्रपटही निघाले. खिशात ठेवण्याजोग्या आकारात प्रकाशित झालेली डायरी खूप खपली. त्याच्या नऊ लाख प्रती विकल्या गेल्या.

१९५२ साली इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये ‘डायरी यंग’ या नावाने ही डायरी लोकांसमोर आली. तिच्या पहिल्या प्रकाशनानंतर वीस वर्षांनी हे पुस्तक ३१ भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. लाखो लोकांनी हे पुस्तक वाचलं. या पुस्तकाचा जर्मन अनुवाद शाळेतलं पाठ्यपुस्तक म्हणून अमेरिकेत वापरलं जातं.

एक तेरा वर्षांची मुलगी जास्तीत जास्त कुठल्या स्तरापर्यंत विचार करू शकते? त्यांच्या मतांचा, विचारांचा नेहमी अनादरच केला पाहिजे का? ॲनाची ही डायरी वाचल्यानंतर या प्रश्नांना काही अर्थच उरत नाही. सूक्ष्म निरीक्षण शक्ती लाभलेली ॲनाची डायरी वाचावी अशीच आहे.

लहान मुलीने लिहिलेले हे एक असामान्य पुस्तक आहे आणि लहान मुलं सत्य सांगायला घाबरत नाहीत. युद्ध आणि त्याचे माणसावर होणारे परिणाम यावर अतिशय सुज्ञपणाने आणि ओघवत्या भाषेत सुंदर भाष्य या पुस्तकात आहे.

सोळा वर्षे जगलेल्या ॲनाच्या डायरीबद्दल व तिच्या आवाजाबद्दल शनॅबेलने लिहिलंय, ‘ज्या लाखो लोकांचा आवाज बंद केला गेला त्यापैकी हा आवाज, जो एखाद्या लहान मुलांच्या कुजबुजीपेक्षा मोठा नव्हता; पण हा आवाज मात्र खून करणाऱ्यांच्या आरडाओरड्यापेक्षा जास्त काळ टिकून आहे आणि कालातीत असणारा आहे.’

केवळ पुस्तकी ज्ञानाने मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा अनुभवातून मिळणारे ज्ञान चिरकाल टिकतं व स्मरणात राहातं.

Author