भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही.
ही सर्व मंडळी गाद्यागिरद्या वापरणारीच असतील कदाचित पण अति नको हे मात्र खरं.
९. झोपण्यापूर्वी हात पाय धुवुन झोपावे. पण हात पाय ओले ठेवून अजिबात झोपू नये. पूर्णपणे कोरडे करावेत. नंतरच झोपावे. याचा अजिबात आळस करू नये.
झोपताना हात पाय धुवून झोपल्याने झोप शांत लागते. हातापायावरील जंतु निघून जातात. अंगावरील मळ, घाम जाऊन त्वचा स्वच्छ होते. हात पाय धुण्यापेक्षा खांद्याखाली आंघोळ केली तरी चालेल. पण अंग पूर्णपणे कोरडे करूनच झोपावे. नाहीतर रात्रभर अंगाला चिकटून रहाणाऱ्या पाण्याच्या ओलेपणामुळे वाताचा त्रास वाढतो.
वाताची प्रकृती नसेल तरीही झोपताना सर्व अंगाला, डोक्यावर, डोळ्यांना बाहेरून गावठी काढलेलं खोबरेल तेल चोळून लावावे. नाकात तेल लावलेली करंगळी फिरवावी. कानात कोमट तेल भरावे. कानातील तेल तळहातावर घेऊन तळपायाला चोळून टाकावे. म्हणजे तेल फुकट न घालवता वापरता येते. आजच्या भाषेत आपलंच तेल आपल्याला रिसायकल करून वापरता येतं.
पण जेवताना मात्र हात पाय धुवून कोरडे न करताच ओल्या हातानी जेवावे.
हात पाय धुतल्याने हातापायावरील जंतु धुतले जातात आणि आरोग्याचे सुरक्षा कवच मिळते. पण हात पाय ओले असतानाच जेवायचं असतं. धुतलेले हात कोरडे करण्यासाठी जो पंचा, टाॅवेल, नॅपकीन वापरला जाईल, त्यावरील अतिसूक्ष्म जीवजंतु जेवणापूर्वी हाताला चिकटू नयेत. आणि मांडी घालून जेवताना ताटाच्या जवळ असणारे जंतु पायाला चिकटावेत.
आज ऑपरेशन थिएटरमधे देखील ऑपरेशन पूर्व “वाॅश” घेतल्यावर ग्लोव्हज चढवण्यापूर्वी धुतलेले हात कोरडे करीत नाहीतच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021