ये जरा आणखी जवळ माझ्या फुला



ये जरा आणखी जवळ माझ्या फुला
ओठ देतील हे गझल माझी तुला

भेट होता तुझी कैफ चढतो मला
रोज वार्यावरी बांधतो मी झुला

आपल्यासारखे ना जगी जोडपे
तू जणू बाहुली ! मी जणू बाहुला !

वेगळा हा दिसे, अन् लकाकत उठे
प्रेमरंगामध्ये रंग हा आपुला

मी तुझा ! मी तुझा ! मी तुझा ! मी तुझा !
रोज जपतो असा मंत्र हा सानुला

कैकदा वाटले छान लिहिशील तू
कृष्ण झालास रे शारदेच्या मुला

— प्रदीप निफाडकर

Author