बाळक्रीडा अभंग क्र.३५

बाळक्रीडा अभंग क्र.३५

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पहा । उदकांत डोहाचियां माथा ॥१॥
माथा कळंबाचे अवघडा ठायी । दावियेला डोही जळामाजी ॥२॥
जळात पाहाता हाडतिये दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसे नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आत । खरा तेथे चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनी डोळा । म्हणती गोपाळा आता कैसे ॥५॥
कैसे करूनिया उतरावा खाली । देखोनिया भ्याली अवघी डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळया भीतरी । सरली माघारी अवघी जणे ॥७॥
जयाचे कारण तयासीच ठावे । पुसे त्याच्या भावे त्यास हरि ॥८॥
त्यांसी नारायण म्हणे राहा तळी । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जाता हरि पाहाती सकळ । म्हणति गोपाळ आम्ही नेणो ॥१०॥
नेणो म्हणती हे करितोसि काई । आम्हा तुझी आई देईल शिव्या ॥११॥
आपुलिया काना देउनिया हात । सकळी निमित्य टाळियेले ॥१२॥
निमित्याकारणे रचिले कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवे । पाडावा त्या भावे चेंडू तळी ॥१४॥
तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरीचा देव कळों नेदी ॥१५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author